लक्सेंबर्ग : ड्यूकच्या आधिपत्याखालील पश्चिम यूरोपातील एक भूवेष्टित स्वतंत्र देश ४९० २६’ ५२ ते ५०० १०’ ५८“ उत्तर अक्षांश व ५० ४४’ १०“ ते ६० ३१’ ५३“ पू. रेखांश यांदरम्यान विस्तारलेल्या या देशाची जगातील लहान देशांत गणना होते. २,५८६ चौ. किमी. क्षेत्रफळ असलेला हा देश साधारणपणे त्रिकोणाकृती असून याची दक्षिणोत्तर लांबी ८२ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ५७ किमी. आहे. एकूण लोकसंख्या ३,६९,५०० (१९८७) असून पूर्वेस जर्मनी, दक्षिणेस फ्रान्स, पश्चिमेस व उत्तरेस बेल्जियम यांनी हा देश वेढलेला आहे. देशाला ३५६ किमी. लांबीची सरहद्द लाभली असून पूर्व सरहद्द ऊर, स्यूर व मोझेल नद्यांनी बनली आहे. लक्सेंबर्ग (लोक. ७६, ६४०-१९८७) ही देशाची राजधानी आहे.
भूवर्णन : भूवैज्ञानिक दृष्ट्या लक्सेंबर्ग म्हणजे दक्षिणेकडील फ्रान्समधील लॉरेन पठार व उत्तरेकडील बेल्जियममधील आर्देन पर्वतरांग यांचा विस्तारलेला भाग आहे. भौगोलिक रचनेनुसार देशाचे उत्तरेकडील ओएस्लिंग (अपलँड) व दक्षिणेकडील बॉन पेस (गुड लँड) असे दोन भाग केले जातात. यांपैकी ओएस्लिंग हा भाग उंच टेकड्यांचा असून त्याने देशाचा सु. ३३% भाग व्यापला आहे. हा सस. पासून सु. ४०० ते ४९० मी. उंचीचा, दाट जंगलव्याप्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. बर्गप्लाट्झ (५५९ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर याच भागात उत्तर सीमेजवळ आहे. दक्षिण भागाच्या तुलनेत या प्रदेशातील मृद्रा निकृष्ट प्रतीची असून धातुमळीचा खतासारखा वापर करून तिचा विकास करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहेत. या भागातील दाट जंगले शिकारीसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरउतारांवरील विस्तृत कुरणांमध्ये दूध व मांस उत्पादनाच्या दृष्टीने गुरूपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या भागात सातू, ओट, राय, बटाटे इ. पिके घेतली जातात.
दक्षिणेकडील बॉन पेस हा सुपीक प्रदेश असून सस. पासून सु. २७५ मी. उंचीचा आहे. पॅरिस द्रोणीच्या ईशान्येकडील या विस्तारित भागात वालुकाश्माच्या लहानलहान रांगा आहेत. हा भाग यूरोपातील महत्त्वाच्या लोहधातू साठ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथील सुपीक जमिनीत प्रामुख्याने गहू, फळझाडे-विशेषतः द्राक्षे-यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. देशाचा बहुतेक भाग नद्यांनी विच्छेदित झालेला आहे. येथील नद्या खूपच कमी लांबीच्या असून सर्वसामान्यपणे देशाच्या मध्यभागी एकत्र येऊन पूर्वेस वाहत जातात व पूर्व सरहद्दीवरील मोझेल नदीस मिळतात. स्यूर ही देशातील प्रमुख नदी पश्चिमेस बेल्जियममध्ये उगम पावून देशातून पश्चिम-पूर्व दिशेने वहाते. देशातील तिची लांबी ८० किमी. आहे. पूर्व सरहद्दीवर ती आग्नेयीस वळते व व्हासरबिलिख शहराजवळ मोझेल नदीस मिळते. या शहरापासून पुढे ती नौवहनास योग्य आहे. आल्झेट ही ६४ किमी. लांबीची तिची प्रमुख उपनदी आल्झेट शहराच्या नैर्ऋत्येस सु. ४ किमी.वर उगम पावून प्रथम पूर्वेस व नंतर उत्तरेस वहात जाऊन एटलब्रुक शहराजवळ स्थूर नदीला मिळते. लक्सेंबर्ग हे राजधानीचे ठिकाण याच नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे. ऊर ही नदी देशाच्या ईशान्य सरहद्दीवरून उत्तर-दक्षिण दिशेने वहात येऊन दीकिर्ख शहराच्या पूर्वेस सु. ९ किमी.वर स्थूर नदीस मिळते. या प्रमुख नद्यांशिवाय उत्तरेकडून येणारी क्लेर्फ नदी व तिला पश्चिमेकडून येऊन मिळणारी व्हिल्टस नदी तसेच ईश, आटेअर, व्हार्क या पश्चिम भागातून वहात येऊन आल्झेट नदीला मिळणाऱ्या नद्यांनी देशाच्या बऱ्याच भागाचे जलवाहन केले आहे. देशाच्या आग्नेय सरहद्दीवरून दक्षिणोत्तर वाहणारी मोझेल नदी व्हासरबिलिख शहराजवळ स्यूर नदीस मिळते व पुढे पूर्वेस जर्मनीत वहात जाते. झीर ही तिची या देशातील दक्षिणेकडील प्रमुख उपनदी आहे. मोझेल व स्यूर नद्यांची खोरी प्रामुख्याने कुरणे व द्राक्षमळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
हवामान : लक्सेंबर्गचे हवामान सौम्य व समशीतोष्ण असून वार्षिक सरासरी तापमान ८० से. असते. उन्हाळा सौम्य असतो. लक्सेंबर्ग शहराचे जानेवारीतील सरासरी तापमान ३० से., तर जुलै महिन्यातील तापमान १९० से.पर्यंत जाते. उत्तरेकडील ओएस्लिंग भागात मात्र दोन्ही वेळी तापमान यापेक्षा कमी असते. आर्देनच्या उंच भागात हिवाळ्यात बर्फ पडते. या काळात दक्षिण भागातील तापमान ०० से. अथवा क्वचित प्रसंगी त्यापेक्षा खाली जाते. आर्देनच्या डोंगररांगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांपासून देशाचे संरक्षण होते. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५१ सेंमी. असून उंच डोंगराळ प्रदेशात पाऊस जास्त काळ पडतो परंतु जास्तीत जास्त (१०० सेंमी.) व कमीत कमी पावसाची नोंद देशाच्या अनुक्रमे नैर्ऋत्य व आग्नेय भागांत (गुड लँड प्रदेशात) झाल्याचे दिसून येते.
वनस्पती व प्राणी : देशाचा सु. ३३% भाग (विशेषतः उत्तर भाग) जंगलांनी व्यापलेला असून त्यांत मुख्यतः पानझडी वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. उंच भागात सूचिपर्णी व कमी उंचीच्या भागात खुरट्या वनस्पती आढळतात. पाइन, चेस्टनट, स्प्रूस ओक, लिंडेन, एल्म, बीच इ. वनस्पतींसाठी येथील जंगले प्रसिद्ध असून नदीखोऱ्यांतून अनेक प्रकारच्या फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. कमी उंचीच्या पठारी भागांत ब्लूबेरी, जनिस्टा, फर्न यांसारख्या छोट्या वनस्पती व विविध प्रकारची फुलझाडे आढळतात. जंगलांत प्रामुख्याने रो हरिण, रानडुक्कर यांसारखे प्राणी असून देशाच्या सर्व भागांत विविध पक्षी दिसून येतात. शिकारीसाठी येथील जंगले प्रसिद्ध आहेत. नद्या व इतर जलाशयांतून प्रामुख्याने पर्च, कार्प, ब्रीम, ट्राउट, पाइक, ईल इ. जलाचर मोठ्या प्रमाणात आहेत.
इतिहास व राज्यव्यवस्था : लक्सेंबर्गचे भौगोलिक स्थान हे येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे प्रमुख कारण आहे. वेगवेगळ्या काळात याच्या चोहोबाजूंनी झालेल्या साम्राज्य विस्ताराच्या चढाओढींची झळ या प्रदेशाला मोठ्या प्रमाणात सोसावी लागली. सांप्रत लक्सेंबर्ग ज्या भागात आहे, तो प्रदेश इ. स. पू. पहिल्या शतकाच्या मध्यावधीत रोमनांच्या ताब्यात होता. इ. स. पाचव्या शतकापर्यंत या प्रदेशावर त्यांची सत्ता होती. पाचव्या शतकात फ्रँक लोकांनी तो जिंकला व पुढे शार्लमेनच्या फ्रेंच साम्राज्याचा तो एक भाग बनला. ८४३ मध्ये हा भाग पहिल्या लोथरच्या राज्यात (काही वेळा ‘मिड्ल किंग्ड्म’ या नावाने ओळखले जात होते) व त्यानंतर लॉथरिंजच्या ईस्ट फ्रँकिश राज्यात समाविष्ट करण्यात आला. पुढे या भागातील आल्झेट नदीवर (सांप्रतच्या राजधानीच्या जागी) रोमनांनी बांधलेला किल्ला, आर्देन प्रदेशाचा काउंट सीगफ्रीड (शार्लमेनचा वंशज) याने विकत घेतला (१२ एप्रिल ९६३). त्या वेळी हा किल्ला लुसिलिनबर्हुक-लूट्झेलबर्ग (लहान किल्ला)-या नावाने ओळखला जात होता. काही वर्षांनी त्याचे लक्सेंबर्ग हे नाव रूढ झाले. (लक्सेंबर्गचा इतिहास रुढार्थाने या शतकापासून सुरू होतो). अकराव्या शतकात ‘कोनराड’ या सीग्फ्रीडच्या वारसाने ‘काउंट ऑफ लक्सेंबर्ग’ असे नाव प्रथमच धारण केले. सीग्फ्रीडच्या वंशावळीत पुढे पुरुष वारसदार न राहिल्याने ११३६ नंतर जर्मन सम्राटाने हा प्रदेश चौथ्या हेन्रीच्या (काही वेळा ‘दुसरा हेंरी’ म्हणून ओळखला जात असे) ताब्यात दिला. थोड्याच दिवसांत त्याची ‘नामुरचा काउंट’ म्हणून नियुक्ती झाली. नामुरच्या प्रशासनाने या प्रदेशावर एकामागून एक अशा चांगल्या राज्यकर्त्यांची नियुक्ती केली. त्यांनी प्रथमतः याच्या आजूबाजूंच्या राज्यांशी विवाहसंबंध जोडून राज्याचा विस्तार केला. एर्मेसिंदे या काउंटिसच्या करकीर्दीत (११९६-१२४७) या राज्याचा विस्तार तिप्पट वाढला होता. लक्सेंबर्गचा काउंट सातवा हेंरी, पुढे रोमन सम्राट झाल्याने (१३०८) या घराण्याचे महत्त्व खूपच वाढले. त्याचा मुलगा काउंट जॉन (कार. १३०९-४६) हा बोहीमियाचा राजा म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याने राज्याचा विस्तार केला परंतु उत्तर फ्रान्समधील क्रेसी येथे झालेल्या ‘शतवार्षिक युद्धा’त तो मारला गेला (१३४६). राष्ट्रनेता म्हणून तो पुढे प्रसिद्ध झाला. त्याचा मुलगा चार्ल्स (१३१६-७८) याच्या कारकीर्दीत (हा रोमन सम्राट चौथा चार्ल्स या नावाने प्रसिद्ध झाला) लक्सेंबर्गला ‘ड्यूक राज्या’चा दर्जा मिळाला, परंतु राज्याची आर्थिक स्थिती मात्र खालावली.
लक्सेंबर्ग १४४३ मध्ये बर्गडीचा ड्यूक फिलिप द गुड याच्या, तर १४८२ मध्ये हॅप्सबर्ग घराण्याच्या ताब्यात गेले. त्यापुढील सु. ३०० वर्षांचा या प्रदेशाचा इतिहास ⇨नेदर्लंड्सच्या (दक्षिण नेदर्लंड्स) इतिहासात सामावलेला आहे. या काळात या भागावर अनुक्रमे स्पेन [१५०६-१७१४ (१६८४-९७ हा फ्रेंच सत्ताकाळ वगळून)], ऑस्ट्रिया (१७१४-९५), फ्रान्स (१७९५-१८१५) यांचे आधिपत्य होते. १८१५ मधील व्हिएन्ना काँग्रेसच्या करारानुसार मोझेल, स्यूर, ऊर या नद्यांच्या पूर्वेकडील प्रदेश प्रशियाला देण्यात येऊन उरलेला लक्सेंबर्गचा प्रदेश नेदर्लंड्सच्या राजाच्या आधिपत्याखाली स्वतंत्र ड्यूक राज्य म्हणून जाहीर करण्यात आला. नेदर्लंड्सचा राजा हाच लक्सेंबर्गचा ड्यूक असे. या करारानुसार लक्सेंबर्ग शहरातील किल्ल्यात प्रशियन सैन्य ठेवण्यास परवानगी देण्यात आली. १८३९ मध्ये लक्सेंबर्गचा जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त भाग (बेल्जियममधील सांप्रतचा लक्सेंबर्ग प्रांत) बेल्जियमने हस्तगत केला परंतु त्यानंतर उरलेल्या लक्सेंबर्गला, त्यावर नेदर्लड्सच्या राजाची सत्ता असूनही, मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वायत्तता मिळाली. १८६७ च्या लंडन परिषदेने लक्सेंबर्ग स्वतंत्र व तटस्थ राज्य म्हणून जाहीर केले व तटबंदीयुक्त किल्ल्यातील प्रशियन सैन्य काढून टाकण्यात आले. १८९० मध्ये नेदर्लंड्सच्या गादीवर व्हिल्हेल्मीना राणी आल्याने लक्सेंबर्गने राणीचे शासन अमान्य केले त्यामुळे येथील कारभार नॅसॉचा ड्यूक ॲडॉल्फ (कार. १८९०-१९०५) याच्या ताब्यात गेला. १९०५ मध्ये याच घराण्यातील चौथा विल्यम व १९१२ मध्ये मारीआ आदेलाईद यांनी ड्यूक म्हणून सत्ता गाजविली. पहिल्या महायुद्धकाळात तटस्थ राज्याविषयीचे सर्व नियम धुडकावून देऊन जर्मन सैन्याने हा प्रदेश ताब्यात घेतला होता. त्यानंतर १९१९ मध्ये आदेलाईद बहीण शार्लट ही या प्रदेशाची ग्रँड डचिस बनली. २८ सप्टेंबर १९१९ रोजी देशाच्या कारभाराविषयी जनतेनेही तिच्या बाजूने बहुमत दिले. १९२२ मध्ये लक्सेंबर्गने ब्रूसेल्सच्या मदतीने ‘आर्थिक संघा’ची स्थापना केली. १९४० मध्ये जर्मनीने या देशावर पुन्हा आक्रमण केले परंतु ड्यूक कुटुंबीय तसेच इतर सरकारी अधिकारी मात्र येथून सहीसलामत सुटले व त्यांनी लंडनमध्ये आश्रय घेऊन तेथे लक्सेंबर्ग सरकारची स्थापना केली व देशाच्या स्वातंत्र्याविषयी हालचाली सुरू केल्या. १९४२ मध्ये नाझी सरकारने लक्सेंबर्गमधील नागरिकांना सक्तीने जर्मन सैन्यात भरती केले. या काळात येथील नागरिकांचे खूपच हाल झाले व देशाचे अतोनात नुकसान झाले. सप्टेंबर १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांनी या जाचातून लक्सेंबर्गची सुटका केली. याच वर्षी लक्सेंबर्ग सरकारने बेल्जियम व नेदर्लंड्स यांच्या सहकार्याने आर्थिक संघ स्थापनेस मान्यता दिली. हा देश संयुक्त राष्ट्रे, नाटो, यूरोपीय समूह यूरोपियन कम्यूनिटी), यूरोपीय कोळसा व पोलाद समूह यांचा तसेच बेनेलक्स, बेनेलक्स जकात संघ, बेनेलक्स आर्थिक संघ या त्रिदेशीय संघटनांचा प्रमुख सभासद आहे. गादीचा वारस म्हणून ग्रँड डचिस शार्लटचा मुलगा जीन याची १९६१ साली नियुक्ती करण्यात आली असून शार्लटने ४५ वर्षांच्या कारकीर्दीनंतर औपचारिक रीत्या १९६४ पासून गादीचा हक्क सोडला. जुलै १९८५ मध्ये तिचे निधन झाले.
देशात १८६८ ची घटना मान्य करण्यात आली असली, तरी १९१९, १९४८, १९५६ आणि १९७२ मध्ये तिच्यात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यांनुसार देशाची चिरस्थायी तटस्थता, सक्तीची सैनिकी सेवा या अटी काढून टाकण्यात आल्या आहेत. संविधानानुसार देशात परंपरागत राजेशाही (ग्रँड ड्यूक अथवा डचिस) असून हा अधिकार नॅसॉ-व्हिल्बर्ग राजघराण्याकडे वारसाहक्काने देण्यात आला आहे. ग्रँड ड्यूक हा सर्वसत्ताधारी असून अंतिम निर्णय त्याच्या सल्ल्याने घेतला जातो. प्रत्यक्षात सरकारी कामकाज संसदीय लोकशाही पद्धतीने केले जाते. देशात एकसदनी संसद (चेंबर ऑफ डेप्युटीज) असून तिचे ६४ सभासद असतात. त्यांची नियुक्ती प्रौढ (१८ वर्षांवर), सार्वत्रिक मतदान पद्धतीने ५ वर्षांसाठी केली जाते. निवडणूक उमेदवार लक्सेंबर्गचा नागरिक असून त्याचे वय कमीत कमी २१ वर्षे असणे आवश्यक असते. काही वैधानिक कार्यक्रमांची जबाबदारी ग्रँड ड्यूकने तहहयात नेमलेल्या २१ सभासदांच्या सल्लागार मंडळावर (कौन्सिल ऑफ स्टेट) सोपविलेली असते. हे मंडळ वैधानिक, प्रशासकीय, न्यायदानविषयक कामात मदत करते. मंडळ रद्द करण्याचा अधिकार संसदेस देण्यात आला आहे. कार्यकारी सत्ता राबविण्याच्या दृष्टीने ग्रँड ड्यूक पंतप्रधानाची व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. प्रशासनाच्या सोयीसाठी देशाचे १२ विभाग पाडण्यात आले आहेत. देशात प्रमुख ६ राजकीय संघटना होत्या (१९८४).
न्याय व संरक्षण : औद्योगिक व दंडविषयक कायदे (बेल्जियन न्यायपद्धतीवर आधारित) वगळता देशाची न्यायव्यवस्था नेपोलियनच्या विधिसंहितेवर आधारलेली आहे. न्यायदानाच्या सोयीसाठी देशात जस्टिस ऑफ द पीस, डिस्ट्रिक्ट कोर्ट (लक्सेंबर्ग व दीकिर्ख येथे) व सुपीरिअर कोर्ट ऑफ जस्टिस असे तीन भाग करण्यात आले आहेत. देशात एकूण तीन कनिष्ठ न्यायालये (जस्टिस ऑफ द पीस) आहेत. या न्यायालयांत प्रामुख्याने दिवाणी, व्यापारविषयक आणि काही कमी महत्त्वाचे फौजदारी खटले चालविले जातात. त्यावरील दोन्ही न्यायालयांत महत्त्वाचे दिवाणी व फौजदारी खटले चालविले जातात. सुपीरिअर कोर्ट ऑफ जस्टिस हे अंतिम अपील न्यायालय असून त्याच्या अधिकारितेतील कोर्ट ऑफ असाइजमध्ये फक्त फौजदारी खटले चालतात. प्रशासनासंबंधीच्या न्यायालयीन निर्णयांवर अंतिम विचार करण्याचा अधिकार कौन्सिल ऑफ स्टेटमधून नियुक्त केलेल्या ११ सभासदांच्या समितीकडे असतो. न्यायाधीशांची नेमणूक तहहयात असून ती ग्रँड ड्यूककडून केली जाते. देशात १९७९ पासून देहांत शासन रद्द करण्यात आले आहे.
लक्सेंबर्गमध्ये १९४४ साली सक्तीच्या सैनिकी सेवेचा कायदा करण्यात आला होता. हा देश १९४९ पासून नाटोचा सभासद झाला आहे. १९६७ पासून सक्तीची सैनिकी सेवा रद्द करण्यात आली असली, तरी येथे स्वयंसेवी सैन्यदल आहे. १९८८ साली या दलात ६३० सैनिक होते. ऑक्टोबर १९८६ पासून स्त्रियांना स्वयंसेवी दलात भाग घेण्यास संसदेने मान्यता दिली आहे. मार्च १९८७ मध्ये बेल्जियम व नेदर्लंड्सबरोबरच लक्सेंबर्गनेही ‘बेनेलक्स’च्या सैनिकी करारावर सह्या केल्या. या तीनही देशांतील सैनिकी प्रशिक्षण, युद्धसामग्री यांच्यात प्रमाणबद्धता असावी हा कराराचा प्रमुख उद्देश आहे. देशाचे सैन्यदल नाटो एसीईच्या फिरत्या दलाशी बांधील आहे.
आर्थिक स्थिती : देशाच्या उत्पन्नात शेतीला दुय्यम स्थान असून या उद्योगाचा राष्ट्रीय उत्पन्नात फक्त ६% वाटा आहे. स्थानिक गरजा भागविण्याइतपत शेतीतून उत्पादन होते. या उद्योगात काम करणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू घटत चालले असून १९७० मध्ये देशातील एकूण कामकऱ्यांपैकी फक्त १२% कामगार या व्यवसायात होते. परंपरेने चालत आलेल्या वारसाहक्काच्या कायद्यामुळे शेतीचे अनेक तुकडे झाले होते, परंतु १९६० पासून त्यात थोडा बदल करण्यात आला असून १४ ते ३० हेक्टरचे तुकडे करण्यात आले आहेत. देशात प्रामुख्याने मिश्र शेती केली जाते. त्याचबरोबर दुध-दुभते व मांस उत्पादनासाठी गुरुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. १९८१ साली देशाच्या एकूण क्षेत्रापैकी सु. ५०% क्षेत्र लागवडयोग्य होते. त्यापैकी ४३.७% क्षेत्र प्रत्यक्ष लागवडीखाली व बाकीचे कुरणांखाली होते. १९८६ साली एकूण १,२६,९६० हे. क्षेत्र लागवडीखाली होते व एकूण कामकऱ्यांपैकी ७,००० लोक या उद्योगात गुंतलेले होते. अलीकडे द्राक्षमळ्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. शेती उत्पादनात बटाटे, सातू, ओट, गहू, मका इ. पिकांचे प्रमाण जास्त आहे. १९८६ मध्ये त्यांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे हजार मे. टनांत) : गहू २९.५ राय २.८ सातू ६४.६ ओट २१.९ बटाटे २५.५ मद्यार्क-द्राक्षे १६.००. याच वर्षी १,१६३ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षउत्पादनातून १,५९,७०० हेक्टोलिटर वाइनचे उत्पादन झाले. बहुतेक शेती यांत्रिक पद्धतीने केली जाते. अन्नधान्याची फारशी आयात करावी लागत नाही. पशुपालन हा देशातील महत्त्वाचा जोडधंदा असून १९८६ साली देशात २,२२,८६४ गुरे १,६९९ घोडे ७५,६०९ डुकरे ५,९०० मेंढ्या व ९२,८५९ कोंबड्या इतके पशुधन होते. १९८१ मध्ये देशात २०,७०० टन मांस व २,६९,६०० टन दूध उत्पादन झाले. राखीव जंगलांच्या नियमांमुळे लाकूड उद्योग फारसा महत्त्वाचा नाही.
देशाच्या एकूण १३,०५,००० किवॉ. वीज निर्मितिक्षमतेपैकी ८६.५% जलविद्युत् होती (१९८१). १९८६ साली येथे एकूण ९,७६० लक्ष किवॉ. ता. वीजनिर्मिती झाली. देशास थोड्या प्रमाणात औष्णिक वीजनिर्मितीही होते.
लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचा विचार केल्यास लक्सेंबर्ग हा मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेला जगातील एक प्रमुख देश मानला जातो. पूर्वीपासून याची अर्थव्यवस्था मुखत्वे खाणकाम व लोखंडपोलाद उद्योगांवर अवलंबून होती. देशाच्या नैर्ऋत्य भागात लोहधातूच्या खाणी व लोखंड-पोलाद उद्योगांचा विकास झाला असला, तरी इतर यूरोपीय देशांतील लोखड-पोलाद उद्योगांच्या प्रगतीमुळे १९७४ पासून या व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी झाले आहे. लोखंड-पोलाद उद्योगापासून देशाला मिळणारे २१.४% उत्पन्न (१९७४) १०.१ टक्क्यांपर्यंत घटले (१९८१). त्यामुळे देशाला इतर निर्मितिउद्योगांची प्रगती करणे भाग पडले. अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीने लक्सेंबर्गमधील रबर, रसायने व रसायन उत्पादने यांच्या कारखान्यांची प्रगती होऊन राष्ट्रीय उत्पन्नातील तूट भरून काढण्यात आली. याबरोबरच कातडी कमावणे, सिमेंट, कापड, वाइन, बीर, सिगारेटी, मृत्पात्री इत्यादींचे निर्मितिउद्योग व पर्यटन, बँकसेवा यांची भरभराट झाली. येथील अन्नप्रक्रिया उद्योग जगप्रसिद्ध आहे. बँकव्यवसायाला देण्यात आलेल्या सवलतींमुळे अनेक यूरोपीय आर्थिक समुदायासारख्या, महत्त्वाच्या, तसेच अन्य देशीय कंपन्या व संस्था यांनी आपली कार्यालये येथे उघडली आहेत. १९८५ मध्ये देशाच्या स्थूल उत्पन्नात बँकसेवा उद्योगाचा महत्त्वाचा वाटा होता व त्या वर्षी देशातील एकूण कामकऱ्यांपैकी ७% लोक या उद्योगात गुंतलेले होते. यूरोपीय आर्थिक समुदायाशी देशाचे संबंध दृढ झाल्याने लक्सेंबर्गच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला. १९२२ मध्ये आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने बेल्जियम व लक्सेंबर्ग यांनी ‘बेल्जियम-लक्सेबर्ग इकॉनॉमिक युनियन’ची स्थापना केली. पुढे १९४८ मध्ये नेदलँड्स या देशाच्या जोडीने वरील दोन्ही देशांनी जकात संघाची स्थापना केली. १९५८ मध्ये या तीन देशात ‘बेनेलक्स’ नावाने प्रसिद्ध असलेला ५० वर्षांचा आर्थिक करार करण्यात आला [⟶ समाईक बाजारपेठा]. यानंतर उच्च प्रतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लक्सेंबर्गने विविध प्रकारंच्या उद्योगधंद्यांमध्ये प्रगती घडवून आणली आहे. उद्योगधंद्यांसाठी लागणारे इंधन व पोलादासाठी लागणारा कोक यांची देशाला आयात करावी लागते. १९८६ मध्ये देशात २६,४९,७०० टन लोहधातूचे व ३७,०५,३०० टन पोलादाचे उत्पादन झाले. १९८५ मध्ये देशाने अनुक्रमे १७,७१३.७० कोटी व १६,८०४.४० कोटी लक्सेंबर्ग फ्रँकची आयात-निर्यात केली. आयातीत मुख्यत्वे खनिज उत्पादने, विविध यंत्रसामग्री, रसायने, वाहतुकीची साधने, कोळसा, कापूस, स्वयंचलित वाहने, शेती अवजारे यांचा तर निर्यातीत नीच धातू, लोहधातू, प्लॅस्टिक, रबर इत्यादींचा समावेश असतो. बहुतेक मालाची आयात बेल्जियम, जर्मनी या देशांतून, तर निर्यात या दोन देशांप्रमाणे फ्रान्सलाही केली जाते. १९८७ मध्ये देशातील एकूण १२२ बँकांपैकी ११० परदेशी बँकांच्या शाखा तसेच २१ बँकेतर पतसंस्था होत्या. ‘द बँक नॅशनल दे बेल्जिक’ ही देशाची मध्यवर्ती बँक आहे. फ्रँक (लक्सेंबर्ग फ्रँक) हे देशाचे चलन असून १४ ऑक्टोबर १९४४ पासून बेल्जियम फ्रँक व लक्सेंबर्ग फ्रँक यांचे मूल्य समान करण्यात आले आहे. कायद्याने बेल्जियन नॅशनल बँकेच्या नोटा देशात वापरता येतात. १ लक्सेंबर्ग फ्रँकचे १०० सेंटिम होतात. ३१ डिसेंबर १९८७ रोजी याचा विनिमय दर पुढीलप्रमाणे होता : १ स्टर्लिंग पौंड = ६२ फ्रँक व १ अमेरिकी डॉलर = ३३ फ्रँक.
फ्रँकचे अवमूल्यन होऊ नये म्हणून लक्सेंबर्ग सरकारने १९८२ साली मजुरी व वस्तूंच्या किंमती गोठविल्या परंतु त्यामुळे संप-बेकारी यांचे प्रमाण वाढून औद्योगिक प्रगती खुंटली. १९८६ मध्ये यात थोडीफार सुधारणा झाली. या सर्व अडचणी असल्या, तरी लक्सेंबर्ग हा एक उद्योगप्रधान व प्रगतिशील देश आहे. येथील लोकांचे राहणीमान उच्च प्रतीचे आहे.
पर्यटन हा लक्सेंबर्गमधील वाढता उद्योग असून निसर्गरम्य ठिकाणे आणि प्राचीन अवशेष (सु. १३८ किल्ले) ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. मध्ययुगीन किल्ल्यांच्या परिसरात क्लेर्फ, एश स्यूर, व्हीआंडन, व्हिल्टस इ. अनेक पर्यटन केंद्रे उभारण्यात आली आहेत. किल्ल्यांच्या परिसरात पर्यटकांना फिरण्यासाठी स्वतंत्र पायवाटा आहेत. १९८६ साली सु. ४,६२,२५८ पर्यटकांनी देशाला भेट दिली.
वाहतूक व संदेशवहन : उंच डोंगराळ प्रदेश वगळता देशातील वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रतीची आहे. १९८७ साली देशात सु. ५,२२० किमी. लांबीचे रस्ते होते. बहुतेक शहरे एकमेकांशी चांगल्या रस्त्यांनी जोडलेली असून काही ठिकाणी जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आहेत. याच वर्षी देशात पुढीलप्रमाणे स्वयंचलित वाहने होती : १,६२,४८१ प्रवासी मोटारी, ९,६२७ ट्र्क, ७०१ बसगाड्या व १८,८७१ ट्रॅक्टर. १९८६ मध्ये देशात एकूण २७० किमी. लांबीचे लोहमार्ग होते व त्यांपैकी १६२ किमी.चे विद्युतीकरण झाले होते. रेल्वेयंत्रणा ‘फ्रँको-बेल्जियन-लक्सेंबर्ग कॉर्पोरेशन’तर्फे नियंत्रित केली जाते. तीत लक्सेंबर्गचे ५१% भागभांडवल आहे. लक्सेंबर्ग शहरापासून सु. ५ किमी.वर फिंडेल हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यूरोपीय देशांकडे येथून दररोज विमानसेवा उपलब्ध आहे. मोझेल नदीतून उद्योगधंद्यांच्या मालाची वाहतूक केली जाते. या नदीतून १,५०० टनांपर्यंतच्या जहाजांना वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. ही नदी ऱ्हाईन नदीशी कालव्यांनी जोडण्यात आलेली असल्याने त्यांद्वारा ऱ्हाईन नदीतून जहाजे या देशापर्यंत येऊ शकतात. अपतट सागरी जहाज वाहतुकीची नोंद करण्यासाठी या देशात १९८८ मध्ये लक्सेंबर्ग नौकानयन नोंदणी संस्थेची स्थापना करण्याची योजना होती.
लक्सेंबर्ग १९८२ साली ५,२०० किमी. लांबीचे दूरध्वनी व दूरलेखा (तारायंत्र) मार्ग होते. १९८६ साली देशात १,५७,११२ दूरध्वनी संच, तर १९८५ मध्ये १०६ डाकगृहे व ३८७ दूरलेखा कार्यालये, तसेच २,२७,००० रेडिओ व १,३३,००० दूरचित्रवाणी संच होते. १९८८ च्या अखेरीस देशातील एका खाजगी कंपनीसमूहाकडून, १६ परिवाहांद्वारा कार्यक्रम प्रसृत करणारा ‘ॲस्ट्रा’ नावाचा उपग्रह सोडण्यात आला आहे. त्याचा संपूर्ण यूरोपला उपयोग होतो.
लोक व समाजजीवन : उच्च राहणीमान, दैनंदिन जीवनातील नियमितपणा व स्थैय तसेच दीर्घायुष्य लाभलेली जनता, असा हा जगातील एक प्रमुख देश मानला जातो. ‘आम्ही जसे आहोत तसेच आम्हास राहू द्या’ हे येथील जनतेचे ब्रीदवाक्य असून त्याच आशयाच्या देशभक्तिपर गीतातून त्यांच्या राजकीय स्वातंत्र्याच्या अपेक्षा व जीवनविषयक आत्मविश्वास प्रकट होतो. याचे उदाहरणच द्यायचे झाले, तर फ्रेंच आणि जर्मन या जरी देशाच्या अधिकृत भाषा असल्या, तरी सर्वसामान्यपणे लेट्सबुर्झ किंवा लक्सेंबर्गिश (लक्सेंबर्गियन) ही स्थानिक भाषा वापरण्याकडे लोकांचा कल दिसतो.
देशात लोकसंख्यावाढीचे प्रमाण कमी आहे. १८४० व १८७० मध्ये परदेशी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या खूपच वाढली होती परंतु एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील येथील औद्योगिक प्रगतीमुळे शेजारील देशांतून येऊन येथे स्थायिक झालेल्यांची संख्याही बरीच वाढली. त्यामुळे लोकसंख्येतील समतोल कायम राहिला आहे. देशात १९८१ मध्ये लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.ला १४१ लोक इतकी होती. बहुतेक लोकसंख्या दक्षिण भागात एकवटलेली असून लक्सेंबर्गसारख्या शहराच्या उपनगरीय भागांची झपाट्याने वाढ होत आहे. १९८१ साली एकूण लोकसंख्येपैकी ६८% लोक शहरी भागांत रहात होते. देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे. रोमन कॅथलिक, प्रॉटेस्टंट, ज्यू इ. धर्मांचे व पंथाचे लोक येथे असून १९८७ साली ९५% रोमन कॅथलिक, तर ५% प्रॉटेस्टंट, ज्यू व इतर धर्मीय होते. कॅथलिक, प्रॉटेस्टंट व ज्यू धर्मगुरूंना सरकारतर्फे मानधन देण्यात येते.
‘लेट्सबुर्झ’ ही देशातील बहुसंख्य जनतेची बोलीभाषा असून तिला १९८५ पासून अधिकृत मान्यता मिळाली आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण भाषा मूळच्या जर्मन-मोझेल-फ्रँकोनियन भाषेपासून (ही पूर्वी प. जर्मनीत बोलली जात होती) आली असून तिच्यात फ्रेंच शब्दांची व शैलीची भर पडली आहे. फ्रेंच ही प्रामुख्याने प्रशासकीय कामकाजाची भाषा म्हणून वापरली जाते, तर जर्मन भाषेचा वापर मुख्यत्वे व्यापार-वाणिज्य व वृत्तपत्रे यांसाठी केला जातो. कनिष्ठ न्यायालयांत प्रामुख्याने जर्मन भाषा उपयोगात आणली जाते. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील भाषेत थोडाफार फरक आढळतो. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून लेट्सबुर्झ भाषेचा साहित्यासाठी वापर सुरू झाला आहे. मीशेल रोदँगे याच्या द रेनेर्ट या १८७२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या महाकाव्यात तिचा प्रथम वापर केलेला दिसून येतो. त्यानंतर मात्र काव्ये, नाटके व कादंबऱ्या या भाषेत लिहिलेल्या आढळतात. लक्सेंबर्गचे मूळचे वाड्मय फ्रेंच व जर्मन भाषांत आहे.
देशात प्राथमिक शिक्षण मोफत असून ६ ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना ते सक्तीचे आहे. माध्यमिक शिक्षण फ्रेंच व जर्मन भाषांतून दिले जाते. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक खाजगी शाळा प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात आहेत. १९८६-८७ साली देशातील शिशूशाळांत ८,३१५ प्राथमिक शाळांत २२,०५९ तांत्रिक माध्यमिक शाळांत १३,१३५ माध्यमिक शाळांत ७,१९७ उच्च तांत्रिक शिक्षण संस्थांत २६२ शिक्षक प्रशिक्षण संस्थात १४५ तर विद्यापीठांत ३,०३४ (१९८४-८५) विद्यार्थी शिक्षण घेत होते. बरेचसे विद्यार्थी इतर यूरोपीय विद्यापीठांतही शिक्षण घेतात.
देशात आरोग्यविषयक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथील लोकांचे आरोग्य चांगले असून सरासरी आयुर्मानही इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. रुग्णांना अत्यंत कमी दरात औषधोपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयांची व्यवस्था रोमन कॅथलिक चर्च व सरकार यांच्यामार्फत पाहिली जाते. संसर्गजन्य रोगांविरुद्ध सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जात आहेत. १९७५-८० या काळात येथील स्त्रियांचे सरासरी आयुर्मान ७५.४ व पुरुषांचे ६८.१ वर्षे होते. १९८६ साली देशातील रुग्णालयांत ४,६१६ खाटांची सोय होती व ६८६ डॉक्टर होते अपघातग्रस्त, अपंग व वृद्ध यांना तसेच प्रसूती व मोठे आजार यांसाठी सरकारकडून काही प्रमाणात भत्ता दिला जातो. सर्व थरांतील कामगारांचे व सेवकांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे विमे उतरविले जातात. घरबांधणीसाठी सरकारकडून कमी व्याजाने कर्ज पुरविले जाते. सायकल चालविणे, पायी फिरणे, चित्रपट पाहणे हे येथील लोकांचे छंद आहेत. १९८६ साली प्रमुख ६ दैनिके व २० पेक्षा जास्त नियतकालिके येथे प्रसिद्ध होत होती व १९८७ साली देशात ११ चित्रपटगृहे होती.
‘नॅशनल लायब्ररी’ हे देशातील सर्वांत मोठे ग्रंथालय लक्सेंबर्ग शहरात असून त्यात सु. ५,६५,००० पुस्तके आहेत. याशिवाय ५५,००० पुस्तके असलेले दुसरे मोठे ग्रंथालय एश-स्यूर आल्झेट येथे आहे. स्टेट म्यूझीयम व म्यूझीयम पेस्कॅटोर ही देशातील दोन मोठी संग्रहालये लक्सेंबर्ग शहरात आहेत.
महत्त्वाची स्थळे : लक्सेंबर्ग ही देशाची राजधानी दक्षिण भागात आल्झेट व पेत्रुस नद्यांच्या संगमावर बसलेली असून देशातील प्रमुख लोहमार्ग प्रस्थानक तसेच ऐतिहासिक, औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोमनकाळात या शहराभोवती भक्कम तटबंदी उभारण्यात आली होती. दहाव्या शतकात येथे बांधण्यात आलेल्या किल्ल्याभोवती शहराचा विस्तार होत गेला. इ. स. ९६३ मध्ये सीगफ्रीड काउंटने या किल्ल्याचा ताबा घेतला होता. मध्ययुगात हा किल्ला ‘लुसिलिन्बर्हुक’ किंवा ‘लूट्झेलबर्ग’ या नावाने ओळखला जात असे. हा किल्ला क्रमाक्रमाने बर्गंडीचे सरदार (१४४३), स्पेन (१५४४), फ्रान्स (१६८४) यांच्या ताब्यात होता. फ्रेंचांच्या कारकीर्दीत किल्ल्याला मोठ्या प्रमाणात तटबंदी करण्यात आली. १८६७ च्या लंडन करारानुसार शहराची बरीच तटबंदी काढून टाकण्यात आली. सांप्रत विस्तारलेल्या लक्सेंबर्ग शहराच्या मध्यभागी हा किल्ला असून त्यामुळे शहराचे जुने व नवे असे दोन भाग झाले आहेत. जुना भाग उंच पठारावर असून नवे शहर नद्यांच्या खोऱ्यात पसरले आहे. हे दोन्ही भाग उंच पुलांनी एकमेकांशी जोडण्यात आले आहेत.
इतर यूरोपीय देशांच्या राजधान्यांप्रमाणे लक्सेंबर्ग शहर फार मोठे नसले, तरी येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत व त्यामुळे लक्सेंबर्ग हे ‘सर्वदेशीय’ शहर म्हणून ओळखले जाते. शहरात अनेक राजवाडे, संसदभवन, विविध परदेशी बँकांची व सरकारी तसेच लक्सेंबर्ग पोलाद कंपनी, यूरोपीय कोळसा व पोलाद समुदाय यांची कार्यालये असून उपनगरी भाग उद्योगधंद्यांनी गजबजलेला आहे. लोखंड-पोलाद हा येथील प्रमुख उद्योग असून त्याबरोबरच फर्निचर, कातडी वस्तू, यंत्रसामग्री, कापड, वीर, अन्नप्रक्रिया इ. उद्योग चालतात. शहरात सोळाव्या शतकातील नोत्रदाम गॉथिक कॅथीड्रल, ड्यूकचा राजवाडा व नगरभवन, अनेक उंच पूल, एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगो याचे घर इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. यूरोपभर कार्यक्रम प्रसारित करणारे लक्सेंबर्गचे प्रमुख नभोवाणी केंद्र याच शहरात आहे.
एश-स्यूर आल्झेट (लोक. २३,७२०-१९८७) हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून ते खाणकाम उद्योगाचे प्रमुख केंद्र मानले जाते. हे देशाच्या नैर्ऋत्य भागात आल्झेट नदीकाठी वसलेले असून देशातील एक महत्त्वाचे लोहमार्ग प्रस्थानक आहे. लोखंड-पोलाद, सिमेंट, खते इत्यादीचे निर्मितिउद्योग येथे आहेत. डिफरडँझ (१६,०००) हे लक्सेंबर्गच्या नैर्ऋत्येस १९ किमी.वरील शहर लोहधातूच्या खाणींसाठी व लोखंड-पोलाद, खते यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. डूडलँझ (१४,०६०) शहर एश-स्यूर आल्झेट शहराच्या आग्नेयीस ८ किमी.वर असून झोतभट्ट्या, लोहधातूच्या खाणी, बीर, खत व तंबाखू उत्पादने यांसाठी महत्त्वाचे आहे. पेटँझ (११,५९०) शहर एश-स्यूर आल्झेटच्या वायव्येस १० किमी.वर श्येअर नदीकाठी वसलेले असून लोहधातूच्या खाणीचे केंद्र म्हणून ओळखले जात.
चौंडे, मा. ल.