लंडन विद्यापीठ : ग्रेट ब्रिटनमधील एक जगप्रसिद्ध विद्यापीठ. याची स्थापना लंडनमध्ये १८३६ साली झाली. उच्च अध्यापन करणाऱ्या पन्नासांहून अधिक ब्रिटिश शिक्षणसंस्था लंडन विद्यापीठाशी संबद्ध असल्यामुळे त्याला शैक्षणिक महासंघाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोणत्याही धर्मपंथाशी निगडित नसलेला, शासनाने पुरस्कारिलेला व सहशिक्षण देणारा असा हा महासंघ आहे. जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांसारखी त्यास प्रतिष्ठा व परंपरा लाभली आहे.

लंडन विद्यापीठ म्हणजे एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी चळवळीचे फलित मानावे लागले. टॉमस कँबेल या कवीने १८२५ मध्ये विद्यापीठाची मागणी केल्यावरून उदारमतवादी लोकांनी आणि अँग्लिकन चर्च विरोधकांनी कारागीरांपासून गर्भश्रीमंतांपर्यंत सर्वांना शिक्षण उपलब्ध होऊ शकेल, असे विद्यापीठ स्थापन केले. विद्यापीठाने कॅथलिक, ज्यू आणि अँग्लिकनेतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे विद्यापीठाला शाही सनद नाकारण्यात आली. १८३१ मध्ये किंग्ज महाविद्यालय चर्च ऑफ इंग्लंडच्या अनुयायांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आले परंतु ही सनददेखील संमत होण्यात अडथळे निर्माण करण्यात आले लंडन विद्यापीठ स्वतः कोणतेही अध्यापनवर्ग चालविणार नाही पण युनिव्हर्सिटी कॉलेज व किंग्ज कॉलेज या दोन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना पदव्या प्रदान करेल, अशा प्रशासनाचा अधिकार लंडन विद्यापीठास १८३६ मध्ये अधिकृतपणे प्राप्त झाला. विद्यापीठाच्या १८३९ च्या पुरवणी सनदेनुसार ब्रिटिश साम्राज्यातील कोणत्याही उच्च शिक्षणसंस्थेत अध्ययन करीत असलेल्या विद्यार्थ्यास लंडन विद्यापीठाच्या परीक्षांना बसणे व उत्तीर्ण झाल्यावर त्या विद्यापीठाकडून पदवी संपादन करता येणे शक्य झाले. ऑक्सफर्डमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला किंवा लंडनच्या वर्किंग मेन्स कॉलेजमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास लंडन विद्यापीठाची पदवी मिळविता येऊ लागली. पुढेपुढे तर, कोणत्याही संस्थेमध्ये नाव न नोंदविताही विद्यार्थ्यांना खाजगी रीत्या (बहिःस्थ) लंडन विद्यापीठाच्या परीक्षांना बसणे व पदव्या मिळविणे शक्य होऊ लागले.

रॉयर व्हेटेरिनरी (१७९१), बिर्कबेर्क (१८२३), इंपीरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (१९०७), बेडफर्ड (१८४९, महिलांसाठी), क्वीन एलिझाबेथ (१८८१), वे (१८९४) ही महाविद्यालये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स (१८९५), स्कूल ऑफ फार्मसी (१८४२), द स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (१९१६) इ. विशेष संस्था विद्यापीठाशी संबद्ध आहेत.

ग्रेट ब्रिटन व इतर देश यांमधील उच्च शिक्षणाच्या विकासावर लंडन विद्यापीठाचा खोलवर प्रभाव पडलेला आहे. भारतातील कलकत्ता, मद्रास आणि मुंबई या विद्यापीठांची स्थापना लंडन विद्यापीठाच्या मूळ संविधानावरूनच करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धसमाप्तीपासून या विद्यापीठाने राष्ट्रकुलांतर्गत अर्धविकसित देश-प्रदेशांतील अनेक विद्यापीठसद्दश महाविद्यालयांना (युनिव्हर्सिटी कॉलेजे) विद्यापीठीय दर्जा मिळवून देण्याच्या कामी बहुमोल प्रोत्साहन दिले आहे. ग्रेट ब्रिटन व वेल्स यांमधील १८४९-१९४९ या शंभर वर्षांच्या काळात स्थापण्यात आलेल्या विद्यापीठीय महाविद्यालयांना प्रारंभीचा काही काळ लंडन विद्यापीठाच्या बहिःस्थ पदवी पद्धतीच्या छत्राखाली घालवावा लागला आणि आपले अभ्यासक्रम व विद्याविषयक प्रमाणके यांमध्येही प्रसंगानुरूप बदल व दुरुस्त्या करून घ्याव्या लागल्या. 

विद्यापीठास १९०० मध्ये स्वतःचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. बरेचसे विद्यार्थी लंडन विद्यापीठाचे बहिःस्थ विद्यार्थी म्हणून अध्ययन करीत असतात. भारत, ऑस्ट्रेलिया या देशांनी तसेच आफ्रिका खंडातील अनेक स्वतंत्र देशांनी लंडन विद्यापीठाचा आदर्श समोर ठेवून आपली विद्यापीठप्रणाली निश्चित केलेली आढळते. स्त्रियांना विद्यापीठाची पदवी देणारे (१८७८), तसेच प्राध्यापिका म्हणून स्त्रियांची नियुक्ती करणारे (१९१२) पहिले विद्यापीठ अशी लंडन विद्यापीठाची ख्याती आहे.


विद्यापीठ विधिसभेचे निर्धारित केल्यानुसार विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संस्था व विशेष शिक्षणसंस्था यांना आपले कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यापीठनिधीतून वित्तपुरवठा करण्यात येतो तथापि विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणावर परिणाम होऊ शकेल असा एखादा वित्तविषयक निर्णय घेण्यापूर्वी, विधिसभेला नियामक मंडळ व कार्यकारी मंडळ या नात्याने सर्व विद्यापीठीय शैक्षणिक प्रश्नांबाबत विचार करणाऱ्या अधिसभेचा अहवाल वा शिफारस लक्षात घ्यावी लागते. त्या अधिसभेद्वाराच विद्यापीठाचे प्राध्यापक व प्रपाठक यांच्या नेमणुकी केल्या जातात. धर्मविद्या, कला, विधी, संगीत, वैद्यक, विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र आणि शिक्षण ह्या विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आहे. विद्यापीठात सु. २,००० अध्यापक असून विद्यापीठात अध्ययन करणारे सु. ४८,००० व सु. १६,९४८ बहिःस्थ विद्यार्थी होते (१९८८).

विद्यापीठाच्या सभासदांना युनिव्हर्सिटी ऑफ लंडन लायब्ररी (स्था. १८३८) या ग्रंथालयाच्या सर्व सुविधा प्राप्त होतात. त्यात दहा लाखांवर ग्रंथ असून त्यांचा संदर्भग्रंथ व उसनवारी म्हणून उपयोग केला जातो. या ग्रंथालयाची खालील विशेष व महत्त्वाचे संग्रह असलेली उपग्रंथालये आहेत : गोल्डस्मिथ (अर्थशास्त्रविषयक साहित्य), द क्किक मिमॉरिअल (शिक्षण व शिक्षण इतिहास), डर्निंग-लॉरेन्स (एलिझाबेथकालीन सतराव्या शतकातील साहित्यग्रंथ-प्रामुख्याने शेक्सपिअर आणि सर फ्रान्सिस बेकन यांचे तसेच त्यांच्यासंबंधीचे साहित्य), द हॅरी प्राइस ग्रंथालय (जादूविद्येचे साहित्यग्रंथ), द स्टर्लिंग (इंग्रजी वाङ्मयावरील प्रथम आवृत्त्या असलेले ग्रंथ), कार्लटन शॉर्टहँड, ब्रॉमहेड (लंडन शहरावरील ग्रंथ), अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांवर पुस्तके असलेले ग्रंथालय, फॅमिली वेल्फेअर असोसिएशन ग्रंथालय, माल्कम मोर्ले (रंगभूमिविषयक ग्रंथाचा संग्रह असलेले) ग्रंथालय इत्यादींचा अंतर्भाव होतो.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स या लंडन विद्यापीठाच्या विशेषत्वाने प्रसिद्धी पावलेल्या संस्थेची स्थापना १८९५ मध्ये झाली असून संस्थेचे संचालक इंद्रवदन गोरधनभाई पटेल (आय् . जी. पटेल) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. संस्थेत २९० प्राध्यापक, ३५ संशोधक असून ३,९०० पूर्णवेळ व ६०० अर्धवेळ विद्यार्थी आहेत. संस्थेद्वारा पुढील मासिके प्रकाशित होतात : एल्एस्ई क्वार्टर्ली इकॉनॉमिका (अर्थशास्त्र, आर्थिक इतिहास व सांख्यिकी या विषयांचे त्रैमासिक) द ब्रिटिश जर्नल ऑफ सोशिऑलॉजी (त्रैमासिक) ब्रिटिश जर्नल ऑफ इंडस्ट्रियल रिलेशन्स जर्नल ऑफ ट्रॉन्सपोर्ट इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी (वर्षातून तीनदा) रिप्रिंटस ऑफ स्कोअर्स वर्क्स ऑन पोलिटिकल इकॉनॉमी, मोनोग्राफ्स ऑन सोशल ॲन्थ्रॉपॉलॉजी मिलेनियम : जर्नल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज ग्रेटर लंडन पेपर्स, जिऑग्रफिकल पेपर्स आंकेजनल पेपर्स ऑन सोशल ॲडमिनिस्ट्रेशन इत्यादी. या संस्थेच्या अखात्यारीत पुढील विभाग स्वतंत्रपणे काम करतात : (१) बिझिनेस हिस्टरी युनिट (१९७८) : इंपीरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या सहकार्याने व्यवसाय-इतिहासाला, तंत्रविद्येची दिशा आणि प्रगती लक्षात घेऊन, संशोधनाची जोड देण्याचे कार्य. (२) सेंटर इन इकॉनॉमिक काँप्यूटिंग (१९८३) : व्यवस्थापन व आर्थिक गृहीतांचे विश्लेषण या दोहोंचा विकास. (३) सेंटर फॉर लेबर इकॉनॉमिक्स (१९७४) : श्रम अर्थशास्त्र, विशेषतः बेकारी, उत्पन्नविभाजन व प्रोत्साहने, यांमध्ये संशोधन. (४) सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीज (१९६७) : आंतरराष्ट्रीय अभ्यासामध्ये, विशेषतः सोव्हिएट, चिनी व यूरोपीय अभ्यासामध्ये, संशोधन. (५) निर्णय विश्लेषण विभाग (१९८३) : मानवी निर्णयांसंबंधीचे शास्त्रीय ज्ञान उपलब्ध करणे. (६) ग्रेटर लंडन ग्रुप (१९५८) : बृहद्-लंडन (लंडन महानगर) व आग्नेय विभाग यांसंबंधीच्या समस्यांबाबत संशोधन व प्रकाशन करणे. (७) सुनोरी-टोयोटा इंटरनॅशनल सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड रिलेटेड डिसिप्लिन्स (१९७८) : अनुप्रयुक्त अर्थशास्त्र व संबंधित क्षेत्रे यांमध्ये संशोधन करणे. (८) लोकसंख्या अन्वेषण समिती (१९३६) : लोकसंख्याविषयक समस्यांबाबत संशोधन करणे व अशा प्रकारच्या कार्याचा प्रसार करणे. लंडन अर्थशास्त्र संस्थेच्या ‘जनांकिकी’ या पदव्युत्तर अभ्यास कार्यक्रमात सहयोग देणे. (९) आंतरराष्ट्रीय साधनसंपत्ती कार्यक्रम (१९८४) : जागतिक नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विकासात येणाऱ्या समस्या व अडचणी यांबाबत यांबाबत अन्वेषण करणे.

या संस्थेच्या ‘ब्रिटिश लायब्ररी ऑफ पोलिटिकल अँड इकॉनॉमिक सायन्स’ (१८९६) या ग्रंथालयात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, आंतरराष्ट्रीय विधी इ. विषयांवरील ८.३० लक्षांवर ग्रंथ तसेच वैधानिक व प्रशासकीय अहवाल, कार्यालयीन कागदपत्रांसंबंधीचे महत्त्वाचे दस्तऐवज आणि हस्तलिखिते आहेत.

गद्रे, वि. रा.