धर्मशिक्षण : धर्मशिक्षण म्हणजे धर्माचरण व धर्मविचार यांचे शिक्षण. धर्मग्रंथांच्या विचारांचे शिक्षण म्हणजे धर्मविचारांचे शिक्षण. धर्म म्हणजे माणसाच्या परमकल्याणास अनुकूल असे कर्तव्य होय. या कर्तव्यात परमकल्याणास प्रतिकूल आचरणाचा त्यागही अंतर्भूत होतो. माणसाचे मरणोत्तरही अस्तित्व असते व मानवी आचरणाचा मरणोत्तर जीवनावरही परिणाम होतो, हे तत्त्व परमकल्याणाच्या संकल्पनेच्या मुळाशी गृहीत धरलेले आहे. माणसाच्या ऐहिक व पारलौकिक जीवनाचा आणि विश्वाचा विचार म्हणजे धार्मिक तत्त्वज्ञान, हाच धर्मविचार होय. विश्वविचार हा मानवाचा ऐहिक व पारलौकिक जीवनाच्या विचाराचाच भाग ठरतो. विश्वविचाराशिवाय मानवी जीवनाचा विचार अपूर्ण राहतो.

जगात निरनिराळे उच्च धर्म आहेत उदा., हिंदू धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, ज्यू धर्म, ख्रिस्ती धर्म, इस्लाम धर्म, शीख धर्म, पारशी धर्म, शिंतो धर्म इत्यादी. त्यांचे प्रमाणभूत धर्मग्रंथही आहेत. प्रत्येक व्यक्तीला वा समुदायाला बालपणापासून कुटुंबसंस्थेच्या द्वारे व धर्मपीठांच्या द्वारे धर्माचरणाचे व धर्मविचारांचे शिक्षण देण्याची सोय असते. सामान्य शिक्षणसंस्थामध्येही मूलभूत संविधानात धर्माचे शिक्षण देण्यासंबंधी प्रतिबंध नसल्यास, त्या त्या राज्यातील त्या त्या धर्माच्या विद्यार्थ्यांनाही इतर प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठे यांच्यामध्येही धर्मशिक्षणाची तरतूद केलेली असते. हा प्रकार मुख्यतः धर्माच्या बौद्धिक शिक्षणाचा प्रकार होय.

ज्या देशांच्या संविधानात निधर्मितेचा वा धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत अंतर्भूत असतो किंवा स्वदेशातील कोणत्याही एका विशिष्ट धर्माला राज्याची मान्यता नसते, तेथे धर्माचे बौद्धिक शिक्षण देण्यास प्रतिबंध असतो, असे मानण्याचे कारण नाही. निधर्मिता वा ⇨ धर्मनिरपेक्षता म्हणजे राष्ट्रातील भिन्नभिन्न धार्मिक समाजांचा त्या त्या विशिष्ट धर्माला मान्यता न देता राष्ट्रातील किंवा राज्यातील सर्व धर्मांच्या बाबतीत राज्याने तटस्थता बाळगणे हा एक अर्थ आहे. राष्ट्रातील किंवा राज्यातील सर्व धर्मांकडे समतेने पाहून सर्व धर्मांना मान्यता देणे म्हणजे सर्व धर्मी समत्व, असाही निधर्मितेचा दुसरा अर्थ आहे. निधर्मितेचा पहिला अर्थ स्वीकारल्यास उपासनात्मक किंवा आचारात्मक धर्मशिक्षण संविधानानुसार राज्याश्रित किंवा राज्याकडून अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षणसंस्थांत देता येणार नाही. दुसरा अर्थ स्वीकारल्यास त्या त्या धर्माच्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना राज्याचा आधार असलेल्या किंवा अनुदान मिळणाऱ्या शिक्षणसंस्थांमधून आपापल्या धर्माचे शिक्षण देण्यास राज्याची संमती असू शकते. हे शिक्षण बौद्धिक असेल तसे उपासनारूप किंवा आचारात्मकही असू शकेल.

आचारधर्म, उपासना आणि पूजा यांचे शिक्षण त्या त्या धार्मिक समाजात व्यक्तींना व समुदायाला मिळत असते व मिळविण्याची सोय असते. कुटुंबसंस्था, देवालये, धर्मगुरूंचे मठ आणि कौटुंबिक, समाजिक वा धार्मिक समारंभ यांच्यात अशा शिक्षणाची परंपरा चालू असते. घरात, देवळांत वा धर्मगुरूंच्या मठांत व्यक्तींचे धार्मिक संस्कार होत असतात. निरनिराळ्या विधिनिषेधांचे परीपालन व्हावे, म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाते. प्रार्थना व पूजा यांच्यामध्ये व्यक्ती व समुदाय भाग घेतात. देऊळ व मठ यांमध्ये धार्मिक ग्रंथांचे पठन, परिशिलन व प्रवचन चालू असते, त्यांत स्त्रीपुरूष व्यक्ती उपस्थित राहतात व भागही घेतात. धार्मिक निर्बंधांचे उल्लंघन झाल्यास वडीलधारी माणसे व गुरू किंवा धार्मिक संस्था प्रायश्चित्तादी विधींचे आचरण दोषांच्या परिमार्जनाकरिता व्यक्तींना करावयास लावतात. पूजा, प्रार्थना आदी धार्मिक विधी कसे करावेत, याचे शिक्षण देऊन ते विधी करवून घेतात. त्या त्या धार्मिक समाजांत निरनिराळ्या तऱ्हचे कर्मकांड सुरू असते. त्याचाही प्रभाव व्यक्तींच्या मनावर पडत असतो. धर्मनिष्ठांच्या आचरणाचेही अनुकरण व्यक्ती करीत असतात. अशा रीतीने श्रद्धा आणि भक्ती दृढ करणारे उपासनारूप वा आचारधर्मात्मक शिक्षण व्यक्तींना मिळत असते. हेच खरेखुरे धर्मशिक्षण होय.

त्या त्या विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थिनींचा जो आपापला धर्म असेल, त्याप्रमाणे उपासनेचे व आचाराचे शिक्षण देणे आवश्यक मानले जाते यालाच खरोखर धर्मशिक्षण म्हणतात. धर्मशिक्षणाने धर्मनिष्ठा तयार होते. धर्मग्रंथ, ऋषिमुनी, प्रेषित, साधुसंत आणि देवता यांच्याबद्दल श्रद्धा व भक्ती उत्पन्न होऊन दृढ होते. तसेच धर्माच्या बौद्धिक शिक्षणाने होतेच असे नाही. बौद्धिक शिक्षणाने धर्माची माहिती मिळते, धर्मविषयक विचार करण्याची संधी मिळते, विचाराने ज्ञान प्राप्त होते. भक्ति किंवा श्रद्धा यांना हे ज्ञान, विचार वा माहिती पोषक होऊ शकते. कित्येकदा ज्ञानाने व विचाराने श्रद्धा व भक्ती यांना धक्काही पोहोचू शकतो. अनेक धर्मांची माहिती मिळाल्यावर तुलनात्मक विचार उत्पन्न होतो. या तुलनात्मक विचाराने श्रद्धा व भक्ती अधिक शुद्ध होते. उच्च दर्जाचा नवीन धर्मविचारही उत्पन्न होऊ शकतो,  अथवा व्यापक बौद्धिक धर्मशिक्षण घेणारी व्यक्ती चिकित्सक वा बुद्धिवादी असल्यास प्रस्थापित धर्माचे धर्मग्रंथ, त्यांतील पुराणकथा यांनी विविध प्रकारच्या निर्माण झालेल्या समजुती यांचे शुद्धीकरण होते किंवा श्रद्धा व भक्ती यांना मुळापासून धक्काही बसतो. शुद्ध बुद्धिवाद व चिकित्सा धर्मश्रद्धेला व भक्तीला आधारभूत होऊ शकत नाही. बुद्धिवाद व चिकित्सा ही धर्मनिष्ठेची दुय्यम अंगे आहेत. धर्मनिष्ठेचा तो आधार होऊ शकत नाही. धर्मनिष्ठेचा आधार श्रद्धा व भक्तीच होऊ शकते.

श्रद्धा व भक्ती ही मनुष्यातील विश्वास ठेवण्याच्या स्वाभाविक प्रवृत्तीतून उत्पन्न होते. जीवनाचा व विश्वाचा विचार करीतच मनुष्य जगत असतो. जीवनाचे आणि विश्वाचे विविध अनुभव येतात जाणिवा तयार होतात, विवेचक बुद्धी या अनुभवांना व जाणिवांना सुसंगत रूप देते. हे सुसंगत रुप येत असताना विश्वास उत्पन्न होतो. विश्वासाची जीवनाला गरज असते. विश्वास बसला, की तो दृढमूल होऊ लागतो. वर्तनाला विश्वासाची गरज असते. विश्वासाशिवाय वर्तन घडत नाही. जीवनाचा अर्थ अदृश्य शक्तींच्या संकल्पनेने स्पष्ट होतो. म्हणून अदृश्य शक्तींवरचा विश्वास उत्पन्न होतो. सुखदुःखात्मक अनुभवांतून अदृश्य शक्तींबद्दल विचार तयार होऊन प्रवृत्ती व निवृत्ती निर्माण होते. या सुखदुःखात्मक अनुभवास अदृश्य शक्तीवरील विश्वास मदत करीत असतो व प्रवृत्ती-निवृत्ती निर्माण होतात. अदृश्य शक्तीचे भय व प्रेम हे धर्माचे मानसिक मूळ होय. भगवद्‌गीतेत म्हटले आहे की, माणूस हा श्रद्धामय आहे, ही श्रद्धा हेच सर्व धर्मांचे अधिष्ठान होय.

धर्माला इतिहास आहे. आज जगात जे धर्म आहेत व धर्मसंस्था आहेत त्यांचा इतिहास व विकास सांगता येतो. जगातील निरनिराळे समाज व सामाजिक गट धर्मविकासाच्या खालच्या व वरच्या निरनिराळ्या पातळीवर जगत होते व जगत आहेत. जीवनाचे व विश्वाचे ज्ञानही प्राथमिक अवस्थेपासून आजच्या विकसित अवस्थेप्रत निरनिराळ्या विकासांच्या पातळीवरून विकसित झाले आहे. त्याचा प्रभाव धर्मसंस्थांवरही पडला आहे. आजच्या तथाकथित उच्च हिंदू, ज्यू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती, इस्लाम इ. धर्म, धर्मसंस्था व धार्मिक समाज यांच्यामध्ये खालच्या व वरच्या धार्मिक पातळींवरचे आचारविचार व त्यांवरील श्रद्धा आढळतात. या श्रद्धांची भिन्नभिन्न पातळींवरील तत्त्वे असतात. या भिन्न पातळी अशा : (१) प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या पदार्थांत अनुकूल शुभ शक्ती व अशुभ शक्ती असतात त्या शक्तीहून ते पदार्थ भिन्न मानलेले नसतात. (२) त्या पदार्थांहून त्या शक्ती भिन्न आहेत अशी श्रद्धा उत्पन्न होते. (३) दैवीशक्ती म्हणजे देवता आसुरी वा अनिष्ट शक्ती म्हणजे असुर, राक्षस, पिशाच, राक्षसी, पिशाची इत्यादी. (४) एकच मुख्य देवता वा देव सर्वज्ञ सर्वशक्तिमान, परम पवित्र व पतितपावन, दयाधन आहे ती वा तो उच्च धर्माचा उपदेश करतो त्या भक्त, प्रेषित, ऋषी इ. असतात.


उपासनात्मक व आचारात्मक धर्मशिक्षण द्यायचे, तर ते देण्याचा उद्देश श्रद्धा व भक्ती दृढ करणे हाच असतो. म्हणून धर्मशिक्षण द्यावयाचे, तर त्याचा शैक्षणिक कार्यक्रम ठरवावा लागतो. जगातील प्रत्येक उच्च धर्मामध्ये निरनिराळे धार्मिक पंथ वा संप्रदाय आहेत. हिंदू धर्मात तर शेकडो धार्मिक संप्रदाय आहेत. या संप्रदायांच्या मुळाशी निरनिराळी धार्मिक तत्त्वज्ञाने आहेत. त्या तत्त्वज्ञानांना अनुसरून पुराणकथा, आचारधर्म, पूजाविधी, तीर्थस्थाने, यात्रा, उत्सव, आहारविहाराचे नियम इ. गोष्टी आहेत. अशा स्थितीत विद्यार्थी व विद्यार्थिनींना धार्मिक शिक्षण द्यावयाचे म्हणजे धर्मग्रंथांचे ज्ञान, तत्त्वज्ञान, त्या त्या संप्रदायांची विशिष्ट उपासनापद्धती इत्यादिकांचे प्रत्यक्ष आचारात्मक शिक्षण द्यावयाचे व त्याचा कार्यक्रम निश्चित करावयाचा, ही गोष्ट विद्यालयांच्या कार्यक्रमात अंतर्भूत करणे आवश्यक ठरते. त्यामुळे सर्वांना समान असा धार्मिक शिक्षणाचा कार्यक्रम आखणे फार गुंतागुंतीची गोष्ट ठरते. त्या त्या संप्रदायांच्या शिक्षणसंस्थांमधील केवळ त्या त्या संप्रदायाचेच विद्यार्थी व विद्यार्थिनी असल्यास, त्या त्या विद्यालयांना एक व्यवस्थित कार्यक्रम आखता येणे सुकर ठरते. परंतु हिंदू धर्मासारख्या शेकडो संप्रदायांनी भरलेल्या धर्मसंस्थेच्या व धार्मिक समाजांच्या विद्यालयांमध्ये आचारात्मक धर्मशिक्षणाचा सुसंगत समान कार्यक्रम आखणे फार कठीण आहे. ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम इत्यादिकांच्या विद्यालयांमध्येसुद्धा वरील कारणांमुळे असा सुसंगत एकरूप कार्यक्रम आखणे कठीण आहे.

परंतु त्या त्या धर्मातील काही विशिष्ट उच्च तत्त्वज्ञानावर आधारलेल्या उपासनांचा समान कार्यक्रम आखणे कठीण असले, तरी त्यात अडचणी कमी आहेत परंतु खरेखुरे आचारात्मक धार्मिक शिक्षण भारतासारख्या बहुधर्मीय देशात विद्यालयांतून अथवा शिक्षणसंस्थांमधून प्रचलित करणे जवळ जवळ अशक्य आहे.

धार्मिक शिक्षण म्हणजे केवळ एकेश्वर भक्ती व उच्च नैतिक तत्त्वांवरील श्रद्धा निर्माण करण्याचे आचार-विचारात्मक शिक्षण एवढाच अर्थ केल्यास, तत्त्वतः त्याचा कार्यक्रम आखणे कठीण असले, तरी शक्यतेच्या कोटीतील आहे. त्यातून भिन्नभिन्न धर्मग्रंथी, भिन्नभिन्न तत्त्वज्ञाने, भिन्नभिन्न पुराणकथा इ. गोष्टी बऱ्याच प्रमाणात गाळाव्या लागतील. सर्व उच्च धर्मांचे आध्यात्मिक, तात्त्विक व नैतिक रहस्य समानच आहे, असा बाबू भगवानदासांसारख्या धार्मिक तत्त्वचिंतकांचा सिद्धांत आहे. म. गांधी यांचाही असा सिद्धांत होता. यांच्या ग्रंथांतून वा लेखनातून आवश्यक असा उच्च निष्कर्ष लक्षात घेऊन धर्मशिक्षणाचा उपासनामार्ग ठरविणे काही अंशी शक्य आहे तथापि भगवानदास व म. गांधी यांच्यामध्ये हिंदू धर्मातील तात्त्विक गूढवादाचा आशय भरलेला आहे तो हिंदू धर्मेतर बऱ्याच धार्मिक आचार्यांना व गुरूंना मान्य होणे कठीणच आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् ह्यांच्या अध्यक्षतेखाली १९४८ मध्ये नेमण्यात आलेल्या आयोगाने आपल्या अहवालात धर्मशिक्षण हे शिक्षणाचे अविभाज्य अंग असले पाहिजे, असे मत प्रतिपादन केले आहे. भारत हे निधर्मी राज्य आहे. ह्याचा अर्थ एवढाच होतो, की हे राज्य कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा किंवा धर्मपंथाचा पुरस्कार करीत नाही. निधर्मी राज्य म्हणजे जे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा किंवा धर्मपंथाचा पुरस्कार करीत नाही, असे राज्य. निधर्मी राज्य म्हणजे धर्म विरोधी किंवा धर्माला जीवनात स्थान नाकारणारे राज्य नव्हे, हे स्पष्ट करून भारतीय परंपरेचे वैशिष्ट्य टिकविण्यासाठी आणि उच्च व उदार मूल्यांचा वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात परिपोष करण्यासाठी धार्मिक शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे, असे आपले मत या आयोगाने नमूद केल आहे. मात्र धार्मिक शिक्षणाचा उद्देश विशिष्ट धर्मांनी श्रद्धेने स्वीकारलेल्या सिद्धांतांची माहिती करून देणे हा असता कामा नये, तर सर्वच धर्मांत वेगवेगळ्या रीतींनी प्रतिबिंबित झालेल्या, जीवनाच्या आध्यात्मिक दर्शनाचा आणि ह्या दर्शनाला अनुरूप अशा साधनेचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, हा त्याचा उद्देश असला पाहिजे, अशी आयोगाची भूमिका आहे. ह्या दृष्टीने आयोगाने पुढील शिफारसी केल्या होत्या : (१) सर्व शिक्षणसंस्थानी दिवसाच्या कामाची सुरुवात काही काळ मूक ध्यान पाळून करावी. (२) प्रथम पदवीच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी गौतम बुद्ध, कन्फ्यूशस, जरथुश्त्र, सॉक्रेटीस, येशू ख्रिस्त, शंकर, रामानुज, मध्व, मुहंमद पैगंबर, कबीर, नानक, गांधी यांसारख्या थोर धार्मिक नेत्यांची चरित्रे शिकवावी. (३) दुसऱ्या वर्षी जागतिक धर्मग्रंथांतून व्यापक विचारसणीचे वेचे निवडून ते शिकवावे. (४) तिसऱ्या वर्षी धर्माच्या तत्त्वज्ञानातील मध्यवर्ती समस्यांचा परामर्ष घ्यावा.

प्रा. डी. एस्. कोठारी ह्यांच्या अध्यक्षतेखाली १९६४ मध्ये नेमण्यात आलेल्या शिक्षण-आयोगाने राधाकृष्णन् आयोगाने केलेल्या वरील शिफारसींना तसेच श्रीप्रकाश समितीने केलेल्या शिफारसींना आपल्या अहवालात पाठिंबा दिला आहे. एक तर, भारतासारख्या बहुधार्मिक समाजातील भिन्न धर्मपंथीयांना एकमेकांच्या धर्मांची सहानुभूतीने ओळख करून दिली, तर त्यांच्यामधील सामंजस्य वाढेल. शिवाय विज्ञानाने भौतिक प्रगती झाली, तरी मानवी जीवनाचा तोल सांभाळण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबरच अनासक्ती, अपरिग्रह, अहिंसा इ. भारतीय परंपेतील आध्यात्मिक मूल्यांचाही परिपोष समाजजीवनात होणे आवश्यक आहे. ह्या दोन्ही कारणांसाठी कोठारी आयोगाने धार्मिक शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादली आहे.

संदर्भ : 1. Government of India, Ministry of Education, Report of the Education Commission, New Delhi, 1966.

            2. Manager, Government of India Press, The Report of the University Education Commission, Simla, 1949.

जोशी, लक्ष्मणशास्त्री