लंडन-२ : कॅनडाच्या आँटॅरिओ राज्यातील मिडलसेक्स परगण्यातील एक महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक शहर. लोकसंख्या ३,४२,३०२ (१९८६). कॅनडामधील दोन लाखांवर लोकसंख्या असणाऱ्या १६ शहरांमध्ये लंडनचा अकरावा क्रमांक लागतो. त्याचे स्थान ईअरी सरोवराच्या उत्तरेस ३७ किमी. अंतरावर, टोराँटोच्या नैर्ऋत्येस १६० किमी. कॅनडाच्या राष्ट्रीय महामार्गांवर तसेच कॅनोडियन पॅसिफिक व मिशिगन सेंट्रल या लोहमार्गांवर आहे. टेम्स नदी येथूनच विभाजित होते. लंडन हे पंचमहासरोवरांच्या उत्तरेस केंद्रीय स्थानी असल्याने खुष्कीच्या मार्गाच्या विकासात हे स्थान महत्त्वाचे ठरले आहे. म्हणूनच उत्तर कॅनडाची राजधानी करण्यासाठी १७९३ साली गव्हर्नर सिम्को यांनी हे स्थान मुक्रर केले तथापि, १८२६ पर्यंत येथे वसाहत होऊ शकली नाही. एकोणिसाव्या शतकात हे गाव केवळ शिबंदीचे (सैन्याचे) ठाणे होते.

जसजसा कृषिविकास होत गेला व नव्या भूवाहतूक मार्गांचा वापर होऊ लागला, तसतशी लंडनची वाढ जलद होत गेल्याचे आढळते. गावाची नोंदणी १८४० मध्ये झाली त्याला नगराचा दर्जा १८४८ मध्ये व शहराचा दर्जा १८५४ मध्ये मिळाला. लंडन हे समृद्ध कृषिप्रदेशाच्या केंद्रस्थानी असल्याने कृषिसंबंधित उद्योगांचा येथे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. फळे, भाजीपाला, गहू व दुग्धजन्य पदार्थांची ही मोठी बाजारपेठ असून कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे कारखाने, विमानजुळणी कारखाने शहरात आहेत. त्यांशिवाय आसवन्या, बिस्किटे, सिगार, न्याहारीचे पदार्थ, बीर, पीठगिरण्या, तसेच कृषियंत्रे, गॅसशेगड्या, डीझेल यंत्रे, रेल्वे एंजिने, एनॅमल व पितळी वस्तू रेडिओ, बॉयलर, लोखंडी सामान, विजेची उपकरणे, चामड्याच्या वस्तू व विणमाल यांचे निर्मितिउद्योग येथे बहुसंख्येने उभारण्यात आले आहेत. हे शहर शैक्षणिक केंद्र असून येथे १८७८ मध्ये वेस्टर्न आँटॅरिओ विद्यापीठ स्थापन करण्यात आले. यांशिवाय येथे अँग्लिकन व रोमन कॅथलिक पंथांची बिशप-कार्यालये, राज्य मनोरुग्णालय, तसेच विमानतळ असून सेंटेनिअल म्यूझीयम ह्या संग्रहालयात ऐतिहासिक देखावे जतन करण्यात आले आहेत.

डिसूझा, आ. रे.