ऱ्हायझोफोरेसी : (कांदळ कुल). फुलझाडांचे [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक कुल. याचा अंतर्भाव ⇨मिटेंलीझ अथवा जंबुल गणात ⇨ व्हायटेसी अथवा द्राक्षा कुलाबरोबर केला जातो. ऱ्हायझोफोरेसीत एकूण सु. १७ प्रजाती व ७० जाती असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधातील देशांच्या बहुतांशी समुद्रकाठी नद्यांच्या मुखांजवळ खाऱ्या चिखलात झालेला आढळतो. भारतात अशा ठिकाणी कांदळ, कांकरा, चौरी इ. वनस्पती आढळतात शिवाय इतरत्र पांशीसारख्या वनस्पती इतर झाडाप्रमाणे वाढतात. या कुलातील सर्व वनस्पती लहान, कठीण झुडपे व लहान वृक्ष असून त्यांना साधी, जाड, चिवट, सोपपर्ण (तळाशी लहान उपपर्णे-उपांगे-असलेली) पाने असतात. फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, नियमित, परिकिंज (पुष्पदलाची बैठक अथवा पुष्पस्थली पोकळ पेल्यासारखी असलेली) किंवा अपिकिंज (पुष्पदलांची बैठक संवर्ताने पूर्णपणे वेढलेली), पानांच्या बगलेत, एक एकटी किंवा वल्लरीवर [⟶ पुष्पबंध] येतात. संवर्तात ३-१६ संदले (सामान्यपणे ४-८), तळाशी जुळलेली व जाड असून ती सतत राहतात पुष्पमुकुटातील दले (पाकळ्या) साधारणपणे तितकीच पण लहान व सुटी असतात आठ किंवा त्यापेक्षा जास्त केसरदलांचे (पुं-केसरांचे) एकच मंडल असून ती संवर्तातील बिंबाला चिकटून असतात. किंजदले (स्त्री-केसर) बहुधा २-५, क्कचित ६ व जुळलेली असून किंजपुटाभोवती संवर्ताचे अर्धवट किंवा पूर्णपणे चिकटलेले पेल्यासारखे वेष्टन सतत असते त्या संदर्भात किंजपुट अर्धवट किंवा पूर्णपणे अधःस्थ मानतात. त्यातील कप्पे १-६ व प्रत्येकात १-२ बीजके असतात. किंजल बहुधा एक, क्वचित अधिक [⟶ फूल]. फळ बहुधा मृदू, क्वचित अश्मगर्भी (आठळीयुक्त) किंवा शुष्क बोंड प्रकरचे असते. बी एकच व बहुधा सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेले), क्कचित अध्यावरणयुक्त (बीजावर अधिक वाढ असलेले) असून झाडावर रुजते. आदिमूळ व अधराक्ष बाहेर येते व नंतर ते चिखलात पडून नवीन वनस्पती वाढते व याला अपत्यजनन म्हणतात. खाऱ्या जमिनीत व समुद्राच्या लाटांच्या सान्निध्यात सतत वाढत राहिल्याने त्या परिस्थितीशी जमवून घेण्याकरिता त्यांना विशिष्ट लक्षणे [आधार मुळे व श्वसनमुळे ⟶ मूळ] प्राप्त झाली आहेत, त्यांचा अंतर्भाव लवण वनस्पतीत करतात. या कुलातील बहुतेक वनस्पतींच्या खोडावरील सालीपासून टॅनीन मिळते व खोडांचा इतर भाग जळणाकरिता वापरतात. वर उल्लेख केलेल्या वनस्पतींवरच्या स्वतंत्र नोंदी पहाव्यात.

पहा : मिर्टेलीझ लवण वनस्पति.

संदर्भ : Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

नवलकर, भो. सुं.