रोही पर्च : या माशाचा समावेश ॲनॅबॅटिडी कुलात होतो. त्याचा प्रसार आग्नेय आशिया, मलाया व आफ्रिकेत आहे. पहिल्या क्लोमाच्या चापापासून (कल्ल्याच्या कमानीपासून) तयार झालेले एक जादा श्वसन अंग ह्या माशांमध्ये आढळते. ते कर्ण कुहरासारखे जटिल असून क्लोमाच्या वरील कोष्ठात असते.
हे मासे गोड्या व मचूळ पाण्यात राहतात. त्याचे खवले फणीसारखे असतात. त्याच्या लांब पृष्ठ व गुद पक्षांना (पाठीवर व गुदाजवळील परांना म्हणजे हालचाल व तोल सांभाळण्यास उपयोगी पडणाऱ्या स्नायुमय घड्यांना) सामान्यतः काटे असतात. ते पाण्याबाहेर जमिनीवर कमीअधिक काळ राहतात. ॲनाबास टेस्ट्यूडिनीयस ही जाती दक्षिण आशियात मचूळ व गोड्या पाण्यात आढळते. भारतात ती नदीमुखात व गोड्या पाण्यात आढळते व ती कोलेरे सरोवरात विपुल आहे. एलोरजवळ त्याची मोठी मासेमारी चालते. दक्षिण भारतात गढूळ पाण्यात पाळण्यासाठी त्याचा भरपूर उपयोग होतो. त्याची लांबी २३-२६ सेंमी. असते. शरीर बहुधा सिगारच्या आकाराचे, बळकट, चापट व थोडेसे दामटलेले असते. त्याचे डोके मोठे असून त्याचा रंग वरच्या बाजूला हिरवा किंवा हिरवट तपकिरी व खालच्या बाजूचा फिकट असतो.
रात्रीच्या वेळी तो एका डबक़्यातून दुसऱ्या डबक्यात जातो. जमिनीवर चालताना तो क्लोमावरणाचा आणि अंसीय पराचा (अंसपक्षाचा) आधारासाठी उपयोग करतो. पाण्यात असताना हवा घेण्यासाठी तो पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर पुनःपुन्हा येतो. असे केले नाही तर तो गुदमरून जाईल, असे वाटते. तो मांसाहारी असून खादाड आहे. गांडुळे वगैरेंच्या शोधात तो जमिनीवर येतो. तसेच अतिआर्द्र हवामानात कृमीच्या शोधात तो झाडावर चढतो किंवा बागांमध्येही घुसतो. वरील हवामानात तो पाण्याबाहेर सहा दिवसांपर्यंत जगू शकतो. त्यामुळे ताजा विकता येत असल्यामुळे तो एक लोकप्रिय जिवंत मासा आहे. भारताच्या काही भागांत तो आवडीने खातात कारण त्याच्या मांसाला चांगला स्वाद असतो. तो चिखलामध्ये सुप्तावस्थेत राहतो. अशा वेळी आटलेल्या तात्पुरत्या डबक्यातून तो पकडून आणला जातो.
जमदाडे, ज. वि.