रोसेटी, डँटी गेब्रिएल : (१२ मे १८२८-९ एप्रिल १८८२). इंग्रजी कवी आणि चित्रकार. लंडन शहरी जन्मला. आपल्या मायदेशातून हद्दपार करण्यात आलेले इटालियन कवी आणि देशभक्त गेब्रिएल रोसेटी ह्यांचा तो पुत्र. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर कलाशिक्षणासाठी तो रॉयल अकॅडमीत डँटी गेब्रिएल रोसेटीदाखल झाला. तथापि तेथील शिक्षण त्याला सांकेतिक स्वरूपाचे वाटल्यामुळे तो तेथे टिकला नाही. पुढे फोर्ड मॅडोक्स ब्राउन आणि अन्य काहींकडून त्याने कलाशिक्षण घेतले. १८४८ साली विल्यम होलमन हंट आणि जॉन एव्हरेट मिले ह्या चित्रकारांच्या सहकार्याने त्याने प्री-रॅफेएलाइट ब्रदरहुड ह्या संघटनेची स्थापना केली. रॅफेएलच्या प्रबोधनकालीन कलापरंपरेतून निर्माण झालेल्या ब्रिटिश अकादमिक चित्रकलेतील निर्जीवपणा व सांकेतिकता ह्यांविरुद्धची प्रतिक्रिया म्हणून ही संघटना उभारण्यात आली होती. रॅफेएलपूर्व, म्हणजे चौदाव्या-पंधराव्या शतकांतील आद्य इटालियन कलेपासून ह्या संघटनेने प्रेरणा घेतली. संघटनेचे अन्य काही सदस्यही होते. त्यांपैकी डँटी गेब्रिएल  रोसेटीचा भाऊ विल्यम मायकेल रोसेटी हा संघटनेच्या द जर्म ह्या मुखपत्राचा संपादक होता.

डँटी गेब्रिएल रोसेटी ह्याचा साहित्याकडेही ओढा होता आणि कवी व्हावे की चित्रकार, हा प्रश्न त्याला एके काळी पडला होता. त्याच्यामुळेच प्री-रॅफेएलाइट ह्या संघटनेच्या कक्षा साहित्य आणि सामाजिक ध्येयवाद ह्यांना सामावून घेण्याइतक्या विस्तारल्या. १८६० साली एलिझाबेथ सिद्दल ह्या स्त्रीशी त्याने विवाह केला. आपल्या काही चित्रांत रोसेटीने तिचा मॉडेल म्हणून उपयोग करून घेतला होता. विवाहानंतर अवघ्या दोन वर्षांनी तिचे निधन झाले. आपल्या कवितांचे एक हस्तलिखित रोसेटीने तिच्या पार्थिव देहाबरोबर पुरले. तथापि १८६९ मध्ये ते तेथून बाहेर काढून त्यातील कविता त्याने पोएम्स या नावाने प्रसिद्ध केल्या. हा त्याचा पहिला कवितासंग्रह. त्याचे चांगले स्वागत झाले. त्या आधी अर्ली इटालियन पोएट्स (१८६१)- पुढे ह्याच पुस्तकाचे नामांतर दान्ते अँड हिज सर्कल असे करण्यात आले (१८७४)- हे त्याचे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. दान्ते आणि अन्य इटालियन कवींच्या काव्यरचनेचे त्याने केलेले इंग्रजी अनुवाद त्यात अंतर्भूत आहेत. बॅलड्स अँड सॉनेट्स हा त्याचा काव्यसंग्रह त्याच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी प्रसिद्ध झाला (१८८१).

रोसेटीने चित्रकृतींसाठी जलरंगाप्रमाणेच तैलरंगही वापरले. त्याच्या चित्रकृतीचे विषय मिथ्यकथात्मक, प्रतीकात्मक असे मुख्यतः आहेत. दान्तेज ड्रीम (१८५६) आणि वेटिंग ऑफ सेंट जॉर्ज अँड प्रिन्सेस सात्रा (१८५७) ह्या त्याच्या जलरंगातल्या उत्कृष्ट चित्रकृती मानल्या जातात, तर गर्लहुड ऑफ भेरी व्हर्जिन (१८४९) ही त्याची तैलरंगातली चित्रकृती ख्याती पावली आहे. गर्लहुड ऑफ मेरी व्हर्जिन ह्या चित्राची शैली साधी असली, तरी त्यातील प्रतीकात्मकता व्यापक आहे. Ecce Ancilla Domini हे त्याचे तैलरंगातले चित्र कठोर टीकेचे लक्ष्य ठरले. रोसेटीला हे टीका सहन झाली नाही. परिणामतः त्याचे आपल्या चित्रांचे प्रदर्शन करणे सोडून दिले आणि तैलरंगाऐवजी जलरंगाकडे वळला.

प्री-रॅफेएलाइट ब्रदरहुड ह्या संघटनेचा कलाविषयक दृष्टिकोण, रोसेटीच्या चित्रकृती आणि रोसेटीची कविता ह्यांच्यातील नाते स्पष्टपणे प्रत्ययास येते. ‘रोसेटीने चित्रांकित केलेली कविता’ असे त्याच्या कवितेचे वर्णन त्याच्या समकालीनांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे त्याचे स्वतःचे वर्णन ‘वाङ्‌मयीन चित्रकार’ असेही केलेले आढळते. दृक्कलेत मध्ययुगीन इटालियन चित्रकृतींमधील गुणधर्म आणण्याचा प्रयत्न प्री-रॅफेएलाइट…ह्या संघटनेतील सदस्यांचा होता. तपशिलांचा वास्तववादी काटेकोरपणा आणि साधी, सरळ अभिव्यक्ती हेही त्यांच्या चित्रकलेचे लक्षणीय विशेष होते. हेतूपूर्वक आणलेला साधेपणा, तपशील देण्याची प्रवृत्ती, अलंकरण, आर्षतेचे तसेच मध्ययुगीन वातावरणाचे अनुकरण ही रोसेटीच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. ‘द ब्लेसिड डॅमझल’ आणि ‘द हाउस ऑफ लाइफ’ ही सुनीतमाला ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय रचना. पत्रकार आणि समीक्षक रॉबर्ट ब्यूकॅनन ह्याचे टॉमस मेटलंड हे टोपण नाव घेऊन रोसेटीच्या कवितेवर, ‘द फ्लेश्ली स्कूल ऑफ पोएट्री’ हा लेख लिहून अत्यंत कडवट टीका केली. आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही दृष्टीनी रोसेटीची कविता अप्रशस्त असल्याचे दाखवून देण्यासाठी ब्यूकॅननने रोसेटीच्या कवितांचा विकृत अर्थ लावण्यासही मागेपुढे पाहिले नव्हते. ह्या लेखाने रोसेटी अतिशय दुखावला गेला. ‘द स्टिल्दी स्कूल ऑफ क्रिटिसिझम’ हा लेख लिहून त्याने त्याच्यावरील हल्ल्याला प्रत्युत्तरही दिले. तथापि त्या हल्ल्याचा त्याच्या प्रकृतीवर काही अनिष्ट परिणाम झालाच.

विख्यात इंग्रज कलासमीक्षक जॉन रस्किन ह्याला रोसेटीबद्दल आस्था आणि जिव्हाळा वाटे. १८५४ च्या सुमारास प्री-रॅफेएलाइट ब्रदरहुड ही संघटना जवळपास संपल्यात जमा होती. तथापि रोसेटीच्या उत्साही व्यक्तीमत्त्वाने एडवर्ड बर्न-जोन्झ आणि विल्यम मॉरिस ह्या तरुण अनुयायांच्या बळावर त्या संघटनेच्या दुसऱ्या पर्वास आरंभ केला.

रोसेटीच्या अखेरच्या दिवसांत निद्रानाश, सतत ढासळत जाणारी तब्येत ह्यांनी तो त्रस्त होता. मद्य व गुंगी आणणारी औषधे तो घेत असे.

बर्चीग्टन-ऑन-सी, केंट येथे निधन पावला.

संदर्भ : 1. Boas, H. O. B. Rossetti and His Poetry, London, 1914.

           2. Doughty, Oswald, Dante Gabriel Rossetti, London, 1957.

          3. Fleming, G. H. Rossetti and the Pre-Raphaelite, Brotherhood, London, 1967.

          4. Waugh, Evelyn, Rossetti, His Life and Work, London, 1928.

कुलकर्णी, अ. र.