रोडोनाइट : (मँनॅनीज स्पार). खनिज. स्फटिक त्रिनताक्ष सामान्यतः कडा गोलसर झालेले जाड वडीसारखे [⟶ स्फटिकविज्ञान] बहुधा संपुंजित, पाटनक्षम ते घट्ट पुंज वा जडवलेले कण या रूपात आढळते. पाटन : (110) व (110)चांगले [⟶ पाटन] भंजन शंखाभ ते खडबडीत. कठिनता ५.५ ते ६.५. वि. गु. ३.४ ते ३.७. पारदर्शक ते दुधीकाचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी ते पाठनपृष्ठाची मोत्यासारखी. कस पांढरा [⟶ खनिजविज्ञान]. रंग फिकट ते लाल वा तपकिरी गुलाबी कधीकधी पिवळसर वा हिरवट छटा. मँगॅनीज डाय-ऑक्साइडामुळे याच्या कडा कधीकधी काळपट दिसतात. तसेच हवेत उघडे पडल्यावर रंग काळवंडतो. रा.सं. MnSiO3. पुष्कळदा यात मँगॅनिजाच्या जागी लोखंड वा कॅल्शियम तर क्वचित जस्त आलेले आढळते. बदल होऊन बऱ्याच वेळा यापासून पायरोल्यूसाइटासारखी मँगॅनिजाची धातुके (कच्च्या रूपातील धातू) बनलेली आढळतात. उदा., भारतातील मँगॅनिजाच्या निक्षेपांत (साठ्यांत) पुष्कळदा हे रोडोक्रोसाइटाबरोबर आढळते. उरश पर्वत (रशिया), स्वीडन, कॅलिफोर्निया व न्यू जर्सी (अमेरिका), न्यू साउथ वेल्स, हंगेरी, इटली, जर्मनी, भारत इ. प्रदेशांत हे आढळते. रत्न म्हणून व शोभिवंत कामासाठी वापरण्यात येणारा याचा सूक्ष्मकणी, नितळ व गुलाबी प्रकार मुख्यत्वे उरल पर्वतात आढळतो व त्याला झिलई करून त्याचा डुलासारख्या दागिन्यांत वापर करतात. भारतातही काही ठिकाणी हा प्रकार आढळतो. कॅल्शियमाचे प्रमाण जास्त असणाऱ्या याच्या प्रकाराला बुस्टॅमाइट, तर जस्तयुक्त प्रकाराला फाउलेराइट म्हणतात.
स्फटिकीय दृष्ट्या रोडोनाइटाचे पायरोक्सिनाशी साम्य असून हे रोडोक्रोसाइटाप्रमाणे दिसते. तसेच कधीकधी हे फेल्स्पारासारखे वाटते. मात्र रोडोनाइट हे रोडोक्रोसाइटापेक्षा अधिक कठीण असून रोडोक्रोसाइटाप्रमाणे हे गरम हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळत नाही, तसेच याचे वि. गु. फेल्स्पारापेक्षा अधिक असते. रंगामुळे गुलाब अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे रोडोनाइट हे नाव पडले आहे.
ठाकूर, अ. ना.