रोडोक्रोसाइट : (डायालोगाइट). खनिज. स्फटिक षट्‍कोणी सुटे स्फटिक क्वचित आढळतात व त्यांची पृष्ठे बहुधा वक्र असतात [⟶ स्फटिकविज्ञान]. सामान्यपणे हे पाटनक्षम [⟶ पाटन], संपुंजित, कणमय ते घट्ट पुंज, स्तंभाकार किंवा लेपाच्या रूपात आढळते. पाटन : (1011) उत्तम. भंजन खडबडीत. ठिसूळ. कठिनता ३.५ ते ४. वि. गु. ३.५ ते ३.७. पारदर्शक ते अपारदर्शक. चमक काचेसारखी. कस पांढरा. रंग गुलाबी ते लालसर, कधीकधी तपकिरी किंवा करडी छटा. हवेत उघडा पडल्याने लाल रंग निघून जातो. तसेच यामुळे पृष्ठभागी गडद रंगाचा पापुद्रा निर्माण होतो. रा. सं. MnCO3. यातील मँगॅनिजाच्या जागी फेरस लोह वा कॅल्शियम व कधीकधी मॅग्ग्नेशियम वा जस्त आलेले असते. स्फटिकरचनेत मँगॅनिजाच्या जागी कॅल्शियम वा लोखंड येऊन बनणारे कॅल्साइट वा सिडेराइट यांचा घन विद्राव वनतो. ही तिन्ही खनिजे अशा प्रकारे समरूप आहेत.

रोडोक्रोसाइट अगलनीय असून गरम हायड्रोक्लोरिक अम्‍लात हे विरघळून कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे बुडबुडे बाहेर पडतात. रोडोनाइट मात्र असे विरघळत नाही आणि ते रोडोक्रोसाइटापेक्षा कठीणही आहे. कमी तापमानात तयार झालेल्या तांबे, शिसे, जस्त व चांदी यांच्या धातुक (कच्च्या रूपातील धातूंच्या) शिरांत, अधिक उच्च तापमानाला तयार झालेल्या मॅंगॅनीयुक्त खनिजांत, तसेच अवसाद व पेग्माटाउट खडक यांत रोडोक्रोसाइट आढळते. रूमानिया, सॅक्सनी, इंग्‍लंड, बेल्जियम, वेस्ट फेलिया, डकोटा, मेन, माँटॅना तसेच अर्जेंटिना, पेरू, ब्राझील इ. प्रदेशांत हे सापडते. कोलोरॅडोत याचे चांगले स्फटिक आढळतात. पोलादनिर्मितीत वापरल्या जाणाऱ्या फेरोमँगॅनिजांमध्ये मँगॅनीज समाविष्ट करण्यासाठी हे वापरतात. मँगॅनिजाची इतर संयुगे तयार करण्यासाठी व मँगॅनिजाचे गौण धातुक म्हणूनही याचा वापर केला जातो. याच्या रंगावरून गुलाब व रंग या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून याचे रोडोक्रोसाइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.