रेयून्यों बेट : हिंदी महासागरातील मास्कारेन्य द्वीपसमूहापैकी एक ज्वालामुखी बेट व फ्रान्सचा सागरपार विभाग. बेटाची लांबी ६४ किमी., रुंदी ४८ किमी., क्षेत्रफळ २,५१२ चौ. किमी. व लोकसंख्या ५,६४,६०० (१९८७ अंदाज) आहे. अक्षवृत्तीय विस्तार २०° ५२’ ते २१° २२’ दक्षिण व रेखावृत्तीय विस्तार ५५° १३’ ते ५५° ५०’ पूर्व यांदरम्यान असून हे मादागास्करच्या पूर्वेस ६४० किमी., तर मॉरिशसच्या नैर्ऋत्येस १८० किमी. अंतरावर आहे. बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर असलेले सँ दनी (लोकसंख्या १,०९,०७२−१९८२) हे या विभागाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

मास्कारेन्य द्वीपसमूहातील हे सर्वांत मोठे लंबगोलाकार बेट असून त्याला २०७ किमी. लांबीचा किनारा लाभलेला आहे. ज्वालामुखी क्रियेतून ह्या बेटाची निर्मिती झालेली असून ते पर्वतीय स्वरूपाचे आहे. वायव्य−आग्नेय दिशेत असणाऱ्या विभंगाला अनुसरून येथील ज्वालामुखी आढळतात. मध्यवर्ती गिरिपिंडातील ज्वालामुखी क्रिया ही फ्लायोसीन कालखंडात झालेली असावी. येथील ज्वालामुखी शंकूंची उंची ३,००० मी. पर्यंत आढळते. बेटावर एकूण १० शिखरे आहेत. त्यांपैकी पूर्व भागात पीतों दे ला फोरनेस (उंची २,६०० मी.) हा जागृत ज्वालामुखी असून त्याचा उद्रेक अनियमितपणे होत असतो. पीतों दे नेझ हे बेटावरील सर्वोच्च (३,०८९ मी.) शिखर आहे. येथे काही वेगवान प्रवाह आढळतात.

रेयून्यों बेटावर सामान्यपणे उष्णकटीबंधीय सागरी व सम हवामान आढळते. जास्त उंचीच्या प्रदेशात हवामान थंड असते. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात वाहणाऱ्या आग्नेय व्यापारी वाऱ्यांपासून बेटाच्या दक्षिण व पूर्व भागांस पर्जन्य भरपूर पडतो, तर उत्तर व पश्चिम भागांत तो बराच कमी पडतो. पूर्व किनाऱ्यावर तर वर्षभर जवळजवळ दररोज पाऊस पडतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान किनाऱ्यावर ६८·६ सेंमी. तर जास्त उंचीच्या प्रदेशात ४७१ सेंमी. आहे. हे बेट विषुववृत्तीय निर्वात पट्‌ट्यात (डोल्ड्रम) येत असल्याने उन्हाळ्यात तेथील सखल भागात आर्द्र हवामान असते. तसेच हिंदी महासागरातील चक्रवाताच्या पट्ट्यात येत असल्याने डिंसेबर ते एप्रिल या काळात अधूनमधून येथे चक्रवातही निर्माण होतात. वार्षिक सरासरी तापमान किनाऱ्यावर २०° ते २८° से., तर जास्त उंचीच्या भागात ते ८° ते १९° से. असते.

किनाऱ्याजवळील अरण्यांत रोजवुड, एबनी, आयर्नवुड व इतर उष्णकटिबंध कठीण लाकडाचे वृक्ष आढळतात. येथे सागरातील प्राणिजीवन विपुल आहे.

पोर्तुगीज समन्वेषक पेद्रो दे मास्कारेनस याने ९ फेब्रुवारी १५१३ रोजी या बेटाचा शोध लावला. त्यावेळी हे बेट निर्जन होते. १६३८ मध्ये फ्रान्स व भारत यांदरम्यानच्या सागरी मार्गावरील थांब्याचे ठिकाण म्हणून फ्रेंचांनी त्यावर हक्क दाखविला व १६४२ मध्ये ते ताब्यात घेतले. १६४९ मध्ये त्यांनी त्याला बूर्बा हे नाव दिले. बेटाचे सध्याचे रेयून्यों हे नाव १७९३ पासून वापरण्यात येऊ लागले. सतराव्या शतकात फ्रेंचाची सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी येथे वसाहत स्थापन केली. १६६५ मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने हे लष्करी ठाणे केले. सुरुवातीला कॉफी व विशेषतः १८०० नंतर ऊस उत्पादनामुळे बेटाची भरभराट झाली. सतराव्या ते एकोणिसाव्या शतकापर्यंत फ्रेंच स्थलांतरितांचा ओघ बेटाकडे सतत चालू होता. त्याबरोबरच निग्रो, मले, इंडोचायनामधील लोक तसेच चिनी व मलबारी (भारतीय) लोकही येथे आले. १८१० ते १८१४ या काळात हे बेट ग्रेट ब्रिटनने घेतले होते. १८४८ मध्ये येथील गुलामगिरी संपुष्टात आली. १८६९ मध्ये सुएझ कालवा सुरू झाला, त्यामुळे रेयून्योंचे महत्त्व कमी झाले.

हा १९४६ मध्ये फ्रान्सचा सागरपार विभाग बनला व १९७३ मध्ये याला प्रादेशिक दर्जा मिळाला. जून १९७८ मध्ये आफ्रिकन ऐक्य संघटनेने रेयून्यों बेटाच्या स्वातंत्र्याची मागणी केली, मात्र तिला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. रेयून्यों बेटावरून फ्रान्सच्या कनिष्ठ सभागृहात पाच व वरिष्ठ सभागृहात दोन प्रतिनिधी आणि आर्थिक व सामाजिक मंडळांत एक परिषद सदस्य पाठविला जातो. प्रादेशिक परिषद व महापरिषद यांद्वारे बेटावरील राज्यकारभार चालतो. फ्रेंच शासनाचा एक आयुक्त येथे असतो. हिंदी महासागरातील फ्रेंच लष्कराचे रेयून्यों हे प्रमुख केंद्र आहे.

मादागास्करच्या सभोवती असलेल्या ह्वान दे नोव्हा, यूरोपा, बॅसझ द इंडिया, ईल ग्रॉऱ्यझ व त्राम्लँ या लहान निर्जन बेटांवर १९६० पासून फ्रान्सची सत्ता असून त्यांचा समावेश रेयून्यों या सागरपार विभागात केला जातो.

येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर अवलंबून असून १४·७%लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत (१९८२). शेती उत्पादनातील ऊस हे सर्वांत मुख्य पीक असून तोच अर्थव्यवस्थेचा मूळ आधार आहे. एकूण क्षेत्रफळापैकी २५% क्षेत्र शेतीखाली असून त्यापैकी ७०% जमीन उसाखाली आहे. त्याशिवाय चही, कॉफी, व्हॅनिला, तंबाखू व मॅनिऑक यांचे, तसेच उष्णकटिबंधीय फळांचे उत्पादन बेटावर होते. जिरॅनियम, व्हेटिव्हर इ. उत्पादनेही महत्त्वाची असून त्यांचा उपयोग सुवासिक तेलनिर्मितीसाठी केला जातो. रेयून्योंचे जिरॅनियम तेलउत्पादन जगात सर्वांत जास्त आहे. १९८६ मध्ये काहीमहत्त्वाची कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन मे. टनांमध्ये) : साखर २,४१,००० मळी ६९,३५३ (१९८४), केळी ५,००० मका १४,००० बटाटे ४,००० कांदा १,८३१ (१९८४) अननस ४,००० टोमॅटो ३,००० व्हॅनिला १६८ रम ९८,०३७ हेलि. (१९८४). बेटावरील अरण्यांखालील क्षेत्र १,०३,३३० घ. मी. झाले. बेटावरील पशुधन पुढीलप्रमाणे : गुरे २०,००० डुकरे ७२,००० मेंढ्या ३,००० शेळ्या ४४,००० व कोंबड्या ४० लक्ष (१९८६). १९८५ मध्ये येथे येथे २,१८० टन मासे पकडण्यात आले.


रेयून्योंमध्ये एकूण १६,००० कामगार असून ते एकूण ४१८ कारखान्यांत काम करतात. त्यांपैकी साखर उद्योगात २,९०० कामगार होते (१९८५). १९८६ मध्ये येथे एकूण ३,९४० लक्ष किवॉ. ता. वीज निर्माण झाली.

अन्नधान्ये, खनिज तेलउत्पादने यांची प्रामुख्याने आयात केली जाते. साखर, मध व रम यांची निर्यात होते. एकूण निर्यात किंमतीपैकी ७२% निर्यात सारखरेची असून ६६% व्यापार फ्रान्सशी चालतो त्याखालोखाल ग्रेट ब्रिटनशी रेयून्योंचा मोठा व्यापार चालतो. पर्यटन व्यवसायाचा विकास करण्याचे विशेष प्रयत्न चालू आहेत. १९८५ मध्ये एकूण ७८,९५२ पर्यटकांनी रेयून्योंला भेट दिली.

बेटावर १,७११ किमी. लांबीचे रस्ते व ६१४ किमी. लांबीचे लोहमार्ग असून नोंदणीकृत वाहनांची एकूण संख्या ९२,९०० होती (१९८४). प्वँत-दे-गाले हे सागरी वाहतुकीचे व सँ प्येर हे मासेमारीचे प्रमुख बंदर आहे. सँ दनीजवळ गिलॉत-सूद हा विमानतळ असून हवाई वाहतूकसेवा एअर फ्रान्सकडून पुरविली जाते. रेयून्यों बेटाला मॉरिशस, मादागास्कर व फ्रान्सशी दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. बेटावर एकूण ३८ डाक कार्यालय व ८५,८६१ दूरध्वनी संच होते (१९८४). रेडिओ व दूरचित्रवाणी सेवेची यंत्रणा फ्रेंच प्रक्षेपण विभागाकडून राबविली जाते. ७५% रेडिओ कार्यक्रम स्थानिकरीत्या तयार केले जातात. येथे एकूण १,१४,५०० रेडिओ संच व १,०७,५०० दूरचित्रवाणी संच होते (१९८४). येथून तीन दैनिके प्रकाशित होत असून त्यांचा एकूण खप ७०,००० होता (१९८५). चित्रपटगृहांची संख्या २५ असून त्यांत एकूण १०,२०० प्रेक्षक बसू शकतात.

बेटावर यूरोपियन, आफ्रिकन, भारतीय व चिनी लोकांचे मिश्रण असून सुमारे २५% लोक फ्रेंच आहेत. एकूण लोकसंख्येपैकी ९६% लोक रोमन कॅथलिक आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स २०५·३ होती (१९८२). फ्रेंच ही येथील अधिकृत भाषा असली, तरी बहुसंख्य लोक क्रीओल भाषा (लौकिक व्यवहारात वापरली जाणारी) बोलणारे आहेत. येथे गुजराती भाषाही बोलली जाते.

सहा ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांना पाच वर्षांचे प्राथमिक व ५ वर्षांचे माध्यमिक शिक्षण सक्तीचे आहे. बेटावर १९७१ मध्ये एका विद्यापीठाची स्थापना झाली असून येथे एक प्रशिक्षण महाविद्यालयही आहे. १५ वर्षांवरील लोकसंख्येत २१·३% लोकसंख्या निरक्षर होती (१९८२). रेयून्योंमध्ये २१ रुग्णालये, ३,८७९ खाटा, ७६२ डॉक्टर, १८३ दंतवैद्य, १८० औषधनिर्माते १०२ प्रसविका १,७९१ परिचारिका होत्या (१९८४).

सँ दनी हे या विभागाचे राजधानीचे तसेच सर्वांत मोठे शहर असून सँ पॉल (लोकसंख्या ५८,४१०–१९८२) व सँ प्येद (५०,०८१), सँ झोझेफ, सँ ल्वी ही इतर मोठी शहरे आहेत.

चौधरी, वसंत