राज्यत्याग : (ॲब्डिकेशन). राजाने किंवा सम्राटाने स्वेच्छेने आपले राजपद सोडणे. इंग्रजीतील ‘ॲब्डिकेशन’ ही संज्ञा या अर्थाची असली, तरी त्या इंग्रजी संज्ञेचे कायद्याच्या दृष्टीने इतरही अर्थ होतात. उदा., दिवाणी कायद्यांमध्ये स्वेच्छेने केलेला वारसाहक्काचा त्याग, त्याचप्रमाणे न्यायदंडाधिकारी किंवा तत्सम पदाधिकारी यांनी आपल्या पदाचा नियत कालावधी संपण्यापूर्वी स्वेच्छेने केलेला त्याग. कायद्याच्या दृष्टीने पदत्याग आणि राजीनामा यांत फरक आहे. कायद्याच्या दृष्टीने राजीनामा म्हणजे नेमणूक करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपला पदाधिकार परत सुपूर्त करणे होय.

                 

एखाद्या राजाला किंवा सम्राटाला बळजबरीने राजपद सोडण्यास भाग पाडलेले असते, यास पदच्युत करणे किंवा पदभ्रष्ट करणे म्हणता येईल. स्वेच्छेने केलेल्या राज्यत्यागाच्या मागे विविध कारणे असतात, असे इतिहासावरून दिसून येते. रोमन सम्राट सुला याने इ. स. पू. ७९ मध्ये राज्यघटनात्मक कारणासाठी राज्यत्याग केला होता. तुर्कस्तानचा सम्राट दुसरा मुराद याने दोन वेळा (इ. स. १४४४ आणि १४४५) राजपदाचे ओझे सहन होत नाही म्हणून राज्यत्याग केला होता. प्रकृतीच्या कारणास्तव रोमन साम्राज्याचा सम्राट पाचवा चार्ल्स याने १५५६ साली राज्यत्याग केला होता. आपल्या लज्जास्पद धोरणांचा परिपाक म्हणून नेदरलँड्सच्या पहिल्या विल्यमने १८४० साली राज्यत्याग केला. प्रतिकूल लोकमताला प्रतिसाद म्हणून फ्रान्सच्या लुई फिलिपने १८१८ साली राज्यत्याग केला. इंग्लंडच्या आठव्या एडवर्डने आपल्या प्रेमविवाहास रूढ संकेतांमुळे विरोध झाल्याने राज्यत्याग केला. (१९३६).

               

सामान्यतः राज्यत्याग हा स्वेच्छेने करण्यात येतो. तथापि इंग्लंडमध्ये मात्र राजाला (किंवा राणीला) राज्यत्याग करण्यापूर्वी तेथील संसदेची संमती घ्यावी लागते. इंग्लंडमधील संसदेच्या या विशेषाधिकारामुळे एखाद्या राजाला वा राणीला राज्यत्याग करण्याची सक्तीही ती करू शकते. उदा., इंग्लंडमधील रक्तहीन राज्यक्रांती (१६८९). त्यावेळी दुसऱ्या जेम्सवर राज्यत्याग करण्याची वेळ आली आणि ब्रिटिश संसदेने त्यांसंबंधी जाहीर घोषणा केली.

कुंचूर, शैला