पंच : शब्दशः पाहता ‘पंच’ याचा अर्थ पाच असा होतो परंतु ऐतिहासिक संकेतामुळे या संशेला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला. लवाद, वादग्रस्त बाबींत निर्णय देणारे तसेच पंचायतीतील एक किंवा सर्व व्यक्ती यांनाही पंच या संज्ञेने संबोधिले जाते. कार्याच्या दृष्टीने न्यायपंच (ज्यूरी) व व्यवस्थापक पंच, असे दोन प्रकार संभवतात.

भारताच्या जुन्या परंपरेप्रमाणे सर्वसाधारणपणे पाच व्यक्ती पुढारी म्हणून मानल्या जात. देवालये, अज्ञान व्यक्ती व त्यांच्या संपदा यांची व्यवस्था ते करीत, गावातील तंटे सोडवीत, संपत्तीच्या वाटण्या करीत आणि छोटे गुन्हे करणाऱ्याना दंडही करीत. त्यांची भूमिका लवादाची असे. उभय पक्षांच्या विश्वासातील असह्याने पंच म्हणून त्यांची नियुक्ती होई. बहुमताने निर्णय घेण्यासाठी वा घेण्याच्या दृष्टीने पाच ही विषम संख्या सोयीची आहे. पंचांच्या शब्दाला दैवी प्रामाण्य असे. ‘पाचामुखी परमेश्वर’ ही म्हण त्यावरूनच रूढ झाली असावी. पंच म्हणून निवडलेली व्यक्ती प्रतिष्ठित, निःपक्षपाती आणि नि:स्पृह म्हणून सर्वमान्य असावी लागते.

इंग्‍लंड आदी पाश्चिमात्य देशांत कायद्यात तज्ञ नसणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने दिवाणी व फौजदारी कामे न्यायालयात चालत आणि त्यांबाबत त्यांनी देलेले मत न्यायाधीशांवर बंधनकारक असे. त्यांना ज्यूरी सदस्य म्हणतात.भारतातही सत्र न्यायलयात किंवा उच्च न्यायालयात फौजदारी कामे ज्यूरी सदस्यांच्या साहाय्याने चालत असत. त्यांच्याकडून निःपक्षपाती व त्रयस्थाच्या भूमिकेची अपेक्षा असे.

पोलिसांनी झडतीत्या वेळी जवळपास राहणाऱ्या व्यक्तीसमक्ष तपास अधिपत्र बजवावे, अशी तरतूद १९७३ च्या फौजदारी व्यवहार संहितेच्या कलम १०० (४) मध्ये आहे. ते बजावताना पोलिसांकडून गैरप्रकार घडू नयेत व लोकांमध्ये विश्वास उत्पन्न व्हावा, या दृष्टीने त्या व्यक्ती संभावित व स्वतंत्र असाव्यात व त्याचप्रमाणे त्या पोलिसांच्या वर्चस्वाखाली नसाव्यात, अशी अपेक्षा असते.  तेच तेच पंच न्यायालयापुढे वारंवार साक्षीला येऊ नयेत, अशी खबरदारी न घेतल्यास ते पोलिसांचे हस्तक आहेत असे अनुमान काढणे शक्य होते. फिर्यादी पक्षात पोलिसांचा हितसंबंध असतो, या कल्पनेमुळे कायद्याप्रमाणेच नव्हे, तर सावधगिरी म्हणूनसुद्धा त्यांना छापे, झडती वगैरे गोष्टी पंचांसमक्ष कराव्या लागतात. त्या वेळी घडलेली हकीकत पोलीस पंचनाम्यात नमूद करतात. त्यावर पंचांनी सही करावयाची असते पण आपल्या समक्ष घडलेल्या गोष्टींचा अंतर्भावच पंचनाम्यात केला आहे, अशी खात्री त्यांनी करून घ्यावयाची असते. गुन्ह्याचा तपास करताना पंचांची उपस्थिती आवश्यक असलेल्या प्रसंगाची हकीकत न्यायालयसमोर सांगण्यासाठी पंचांची साक्ष आवश्यक मानावी. केवळ पोलिसांचीच साक्ष पुरेशी ठरत नाही. सर्व पंचांची साक्ष घेतलीच पाहिजे असे नाही पण एका पंचाची साक्ष असमाधानकारक झाली किंवा तो पंच फुटला, तर दुसऱ्याची साक्ष घेणे हे पोलिसांचे कर्तव्य असते. तसे न केल्यास केवळ पोलिसांच्या साक्षीवर आरोप सिद्ध मानावयास न्यायालये सहसा तयार होत नाहीत.

पोलीस व इतर शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते. तसे करण्यास तो कायद्याप्रमाणे बांधला असता योग्य कारणाशिवाय व बुद्धिपुरस्सर त्याने ते चुकविले, तर तो शिक्षेला पात्र होतो.

श्रीखंडे, ना. स.