प्रवेशपत्र : (व्हिसा). एखाद्या देशाच्या नागरिकास जर दुसऱ्या देशात जावयाचे असेल, तर त्या देशात प्रवेश करण्यासाठी आणि तेथे विशिष्ट मुदतीपुरते वास्तव्य करण्यासाठी त्या देशाच्या सरकारची जी परवानगी घ्यावी लागते, तिला प्रवेशपत्र अथवा प्रवेशपरवाना असे म्हणतात. सामान्यतः संबंधित देशाचा जो प्रतिनिधी स्वदेशात असतो, त्या प्रतिनिधीचा शिक्का व सही पारपत्र पुस्तिकेत कोऱ्या ठेवलेल्या पानांपैकी एकावर घेतली जाते. प्रवेशपत्र मिळविण्यासाठी दुसऱ्या देशात कशासाठी जावयाचे आहे व तेथे किती काळ वास्तव्य करावयाचे आहे, हे नमूद करून अर्ज करावा लागतो. वाटेत लागणाऱ्या परदेशी बंदरांवर किंवा विमानतळांवर उतरण्यासाठीही प्रवेशपत्र लागते त्याला संक्रम प्रवेशपत्र (ट्रॅन्झिट व्हिसा) म्हणतात. प्रवेशपत्रासाठी प्रत्येक देशाने विशिष्ट शुल्क ठरविलेले आहे. सामान्यतः पारपत्राच्या बरोबरच प्रवेशपत्र घ्यावे लागते.

पहा : पारपत्र (पासपोर्ट).

कुलकर्णी, स. वि.