अधिकार-विधेयक : मूलभूत अधिकार आश्वासित करणारे विधेयक. पाश्चिमात्य राष्ट्रांत अनियंत्रित राजसत्तेविरूद्ध झालेल्या झगड्यांतून मूलभूत अधिकाराच्या कल्पनेचा व त्यासाठी करावयाच्या अधिकार-विधेयकाचा जन्म झाला. राजेशाहीच्या पुरस्कर्त्यांनी राजाच्या दैवी अधिकाराची कल्पना निरंकुश सत्तेकरिता राबविली त्यामुळे प्रजेचे हितसंबंध व हक्क डावलले गेले. या दैवी अधिकाराच्या कल्पनेस कडाडून विरोध झाला. या विरोधातूनच सामाजिक कराराचा सिद्धांत उदयास आला. या सिद्धांताप्रमाणे प्रजेने स्वहिताकरिता आपसात व राजाशी सामाजिक करार करून राजसत्ता निर्माण केली असल्यामुळे त्यांच्या हक्कांचे व हिताचे संरक्षण होणे आवश्यक ठरविण्यात आले. अशा मूलभूत अधिकारांकरिता खास कायदे करण्याची किंवा संविधानातच त्यांचा अंतर्भाव करण्याची प्रथा पडली. अधिकार-विधेयकांची निर्मिती प्रथमत: राजेशाहीतील राजाच्या निरंकुश सत्तेविरुद्ध झाली. पुढे लोकशाहीचा उदय व विकास होताना कायदेमंडळाच्या अधिसत्तेवरील अंकुश म्हणून आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या जपणुकीसाठीही त्यांचा उपयोग होऊ लागला.

इंग्लंडमधील अधिकार-विधेयक (१६८९) ही तेथील राज्यसंविधानाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना होय. प्रजेच्या मूलभूत अधिकारांची जंत्री त्यात दिलेली असून प्रजेच्या अधिसत्तेच्या दृष्टीने त्या विधेयकाचे मूल्य फार आहे. त्याचे जागतिक राजकारणावरही फार दूरगामी परिणाम झाले आहेत.

फ्रान्समधील राष्ट्रीय विधिमंडळाने १७८९ साली ‘मानवाच्या हक्कांचा जाहीरनामा’ समंत केला. या घटनेचा अमेरिकेच्या संविधानकारांवर प्रभाव पडला व त्यांनी अमेरिकेच्या संविधानात अधिकार-विधेयक अंतर्भूत करून घेतले. १७९१ साली ज्या पहिल्या दहा दुरूस्त्या अमेरिकेच्या संविधानात करण्यात आल्या, त्या सर्वांना मिळून ‘अधिकार-विधेयक’ म्हटले जाते. खरे पाहता, अमेरिकेच्या मूळ संविधानात बरेच मूलभूत अधिकार समाविष्ट केलेले आहेत. नंतर वेळोवेळी, अगदी अलीकडच्या काळापर्यंत, मानवाच्या हक्काच्या संरक्षणासाठी ज्या ज्या दुरुस्त्या अमेरिकेच्या संविधानात करण्यात आल्या आहेत, त्यांनाही अधिकार-विधेयकाचा भाग म्हणून तेथील न्यायालये मानतात. अमेरिकेचे संविधान अंमलात आल्यानंतर इतरत्र जी संविधाने तयार झाली, त्यांमध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद करण्याची पद्धत सुरू झाली आहे. भारताच्या संविधानातही मूलभूत अधिकारांची सविस्तर, स्पष्ट व विधायक तरतूद करण्यात आली आहे.

पहा : भारतीय संविधान मूलभूत अधिकार.

रूपवते, दा. ता.