येकूत्स्क : रशियातील याकूत या स्वायत्त सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिकची राजधानी. लोकसंख्या १,७०,०००(१९८३). याकूतमधील प्रमुख प्रशासकीय व आर्थिक केंद्रस्थान म्हणून यास विशेष महत्त्व आहे. हे लीना नदीकाठी वसलेले असून रस्त्यांनी व हवाई मार्गांनी प्रमुख शहरांशी जोडलेले नदी बंदर आहे. हे १६३२ मध्ये वसविण्यात आले या ठिकाणी प्रारंभी किल्ला बांधलेला होता. अल्पावधीतच लोकरव्यापाराचे प्रमुख ठिकाण म्हणून ते प्रसिद्धीस आले. येथे लाकूड गिरण्या, जहाज दुरुस्ती, शिकार, मासेमारी, हत्तीचे दात गोळा करणे, लोकर इत्यादी व्यवसाय चालतात. हे प्रमुख व्यापारकेंद्र असून लोकर, हस्तिदंत, सोने यांची येथून निर्यात होते. येथे तांत्रिकशाळा, विद्यापीठ (१९५६), अकादमी ऑफ सायन्सेस ऑफ दयू.एस्.एस्.आर्.ची शाखा, शिक्षक महाविद्यालय इ.संस्था आहेत.
गाडे, ना.स.