युनियन  ऑफ  इंटरनॅशनल  टेक्निकल  ॲसोसिएशन्स : (UITA). विविध तांत्रिक विषयांशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा हा संघ आहे. त्याची स्थापना १९५१ मध्ये झालेली असून त्याचे कार्यालय पॅरिस येथे यूनेस्कोच्या इमारतीत आहे. या संघाच्या २६ आंतरराष्ट्रीय संघटना सदस्य आहेत. सदस्य संघटनांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महासभांचा समन्वय करणे यूनेस्को, ⇨ इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स वगैरे संस्थांशी सहकार्य करणे विविध भाषांत तांत्रिक संदर्भ साहित्य सूची व तांत्रिक शब्दकोश प्रसिद्ध करणे अशा कामांचा या संघाच्या कार्यात समावेश आहे. या संघाच्या काही महत्त्वाच्या सदस्य संघटनांसंबंधीची माहिती खाली दिली आहे.

इंटरनॅशनल ॲसोसिएशन फॉर हायड्रॉलिक रिसर्च : द्रवाच्या प्रवाहासंबंधीच्या संशोधनाकरिता १९३५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था नेदर्लंडसमधील डेल्फ्ट येथे असून तिचे २३०० व्यक्तिगत व २७० निगम सदस्य आहेत. प्रकाशने : जर्नल (त्रैमासिक फ्रेंच वा इंग्रजीत) डिरेक्टरी ऑफ हायड्रॉलिक रिसर्च इन्स्टिट्यूट्स अँड लॅबोरेटरीज (दर ५ किंवा ६ वर्षांनी), प्रोसिडिंग्ज ऑफ बायोनियल काँग्रेसेस.

इंटरनॅशनल कमिशन ऑफ ॲग्रिकल्चरल एंजिनियरिंग : कृषी अभियांत्रिकीविषयी १९३० साली स्थापन झालेला हा आयोग पॅरिस येथे असून त्याच्या २३ राष्ट्रांतील संस्था व ६ राष्ट्रांतील व्यक्तिगत सदस्य आहेत. मृदाविज्ञान व जलविज्ञान यांचा कृषी अभियांत्रिकीतील उपयोग मृदा संधारण, सिंचन व जमीन सुधारणा ग्रामीण क्षेत्रातील बांधकामे व साधनसामग्री कृषी यंत्रसामग्री ग्रामीण विद्युत्‌ पुरवठा व एकूण ऊर्जेच्या संदर्भात त्याचा उपयोग शेतीच्या कामाचे शास्त्रीय पद्धतीने आयोजन इ. विषयांवर हा आयोग कार्य करतो.

इंटरनॅशनल कमिशन ऑन ग्लास : काचनिर्मितीची कला, विज्ञान व तंत्रविद्या यांसंबंधीच्या माहितीचा विनिमय व सहकार्य होण्यासाठी १९३३ मध्ये व्हेनिस येथे झालेल्या आयोगाचे कार्यालय झेकोस्लोव्हाकियातील प्राग येथे आहे. २१ राष्ट्रांतील संस्था वा व्यक्ती या आयोगाच्या सदस्य आहेत. प्रकाशने : बिब्लिऑग्राफी ऑफ ग्लास लिटरेचर डिक्शनरी ऑफ ग्लास मेकिंग (६ भाषात) वगैरे.

इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज : सिंचन व निचरा यांसंबंधीच्या या आयोगाची स्थापना १९५० मध्ये झाली. हा आयोग नवी दिल्ली येथे असून ८० राष्ट्रे त्याची सदस्य आहेत.

इंटरनॅशनल कमिशन ऑन लार्ज डॅम्स : मोठ्या धरणांसंबंधीच्या या आयोगाची स्थापना १९२८ मध्ये झाली व त्याचे कार्यालय पॅरिस येथे आहे. ७७ त्यामुळे राष्ट्रांतील राष्ट्रीय स्तरावरील समित्या याच्या सदस्य आहेत. प्रकाशने : काँग्रेस प्रोसिडिंग्ज (दर ३ वर्षांनी) वर्ल्ड रजिस्टर ऑफ डॅम्स इत्यादी.

इंटरनॅशनल कमिटी ऑफ फाउंड्री टेक्निकल ॲसोसिएशन्स : ओतकामासंबंधीच्या संस्थांची ही समिती १९२७ मध्ये स्थापन झाली. दर वर्षी तिच्या महासभा भरतात. स्वित्झर्लंडमधील झुरिक येथे ही समिती असून तिच्या ३३ राष्ट्रीय संस्था सदस्य आहेत.

इंटरनॅशनल काँग्रेस ऑन फ्रॅक्चर : पदार्थांतील भंग, शिणवटा आणि बल यांसंबंधीच्या संशोधनास चालना देण्यासाठी ही संस्था १९६५ मध्ये स्थापन झाली. जपानमधील टोहोकू विद्यापीठात या संस्थेचे कार्यालय असून ३० संघटना हिच्या सदस्य आहेत. प्रकाशन : प्रोसिडिंग्ज (दर ४ वर्षांनी).

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंग : वितळजोडकामासंबंधीची ही संस्था लंडन येथे असून तिची स्थापना १९४८ मध्ये झाली. ३६ राष्ट्रांतील ५२ संस्था तिच्या सदस्य आहेत. प्रकाशन : वेल्डिंग इन द वर्ल्ड (दर दोन महिन्यांनी).

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर प्रॉडक्शन एंजिनियरिंग रिसर्च : सर्व घन पदार्थांवर करण्यात येणाऱ्या यांत्रिक प्रक्रियांवर संशोधन करण्यासाठी १९५० मध्ये स्थापन झालेल्या या उत्पादन अभियांत्रिकीविषयक संस्थेचे कार्यालय पॅरिस येथे आहे. या संस्थेचे १५१ सदस्य असून ७८ पत्रव्यवहार सदस्य व १०३ सहयोगी सदस्य आहेत. प्रकाशने : ॲनल्स (वार्षिक) डिक्शनरी ऑफ प्रॉडक्शन एंजिनियरिंग.

इंटरनॅशनल मेझरमेंट कॉन्‌फेडरेशन : मापन तंत्रांतील विकास, उपकरणांचा अभिकल्प (आराखडा) व उत्पादन, वैज्ञानिक संशोधनात आणि उद्योगांत उपकरण योजनेचे उपयोग यांसंबंधीच्या वैज्ञानिक व तांत्रिक माहितीच्या विनिमयासाठी १९५८ मध्ये हा महासंघ स्थापन झाला. याचे कार्यालय हंगेरीतील बूडापेस्ट येथे असून २९ संघटना याच्या सदस्य आहेत. प्रकाशने : बुलेटीन (वर्षातून दोनदा) मेझरमेंट (त्रैमासिक) वगैरे.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रक्चरल काँक्रीट : बांधकामाकरिता वापरण्यात येणारे काँक्रीट व सर्व राष्ट्रांतील त्यासंबंधीचा विकास याविषयीच्या विचारविनिमयाला आणि संशोधनाला चालना देण्यासाठी १९५२ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेची ४२ राष्ट्रे सदस्य आहेत. ही संघटना इंग्लंडमधील वेक्सहॅम स्प्रिंग येथे आहे. प्रकाशने : प्रोसिडिंग्ज ऑफ काँग्रेसेस अँड सिंपोझिया वगैरे.

इंटरनॅशनल युनियन ऑफ टेस्टिंग अँड रिसर्च लॅबोरेटरीज ऑन मटिरियल्स अँड स्ट्रक्चर्स : बांधकाम संरचना व सामग्री यांविषयी संशोधन आणि परीक्षण करणाऱ्या प्रयोगशाळांचा हा संघ १९४७ मध्ये स्थापन झालेला असून तो पॅरिस येथे आहे. त्याचे ८१६ सदस्य आहेत. प्रकाशन : मटिरियल्स अँड स्ट्रक्चर्स–रिसर्च अँड टेस्टिंग (दर दोन महिन्यांनी).

पर्मनंट इंटरनॅशनल ॲसोसिएशन ऑफ नॅव्हिगेशन काँग्रेसेस : देशांतर्गत व सागरी जलमार्ग, बंदरे व सागरकिनारी प्रदेश यांचे अभिकल्प, बांधकाम, सुधारणा, देखभाल व कार्य यांच्या प्रगतीस प्रोत्साहन देऊन देशांतर्गत व सागरी नौकानयनास चालना देण्यासाठी ही संस्था १८८५ मध्ये स्थापन झाली. ही संस्था बेल्जियममधील ब्रूसेल्स येथे असून तिचे २,०९७ व्यक्तिगत सदस्य व ६९० निगम सदस्य आहेत. प्रकाशने : बुलेटीन (त्रैमासिक) टेक्निकल डिक्शनरी वगैरे.

पर्मनंट इंटरनॅशनल ॲसोसिएशन ऑफ रोड काँग्रेसेस : जागतिक रस्त्याचे जाळे निर्माण करण्यासंबंधी चालना देण्याकरिता १९०९ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे कार्यालय पॅरिस येथे असून तिचे १,६४० सदस्य आहेत. प्रकाशने : बुलेटीन Dictionnaires Techniques Routiers वगैरे.

वर्ल्ड एनर्जी कॉन्फरन्स, द : शक्ती व इंधन तंत्रविद्येच्या विविध शाखांमध्ये दुवा निर्माण करण्याच्या उद्देशाने ब्रिटनमध्ये १९२४ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे कार्यालय लंडनमध्ये आहे. जगातील या विषयातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ञांमध्ये (अभियंते, वैज्ञानिक, प्रशासक व अर्थशास्त्रज्ञ) ही संस्था संपर्क ठेवते. या संस्थेची ७९ राष्ट्रे सदस्य असून दर तीन वर्षांनी महासभा भरविण्यात येतात. प्रकाशने : ट्रॅन्झॅक्शन्स ऑफ काँग्रेसेस सर्व्हे ऑफ एनर्जी रिसोर्सेस (दर सहा वर्षांनी) टेक्निकल डेटा ऑन फ्युएल वगैरे.

संदर्भ : Europa Publications Ltd. The World of Learning, London, 1986.

भदे, व. ग.