रॉयल सोसायटी : ग्रेट ब्रिटनमधील ही सर्वांत जुनी वैज्ञानिक संस्था असून यूरोपातील जुन्या वैज्ञानिक संस्थांपैकी एक आहे. या संस्थेचे पूर्ण नाव ‘द रॉयल सोसायटी ऑफ लंडन फॉर इंप्रुव्हिंग नॅचरल नॉलेज’ असे असून तिची स्थापना १६६० साली झाली. तथापि संस्थेचे मूळ १६४५ पासून लंडन येथे भरत असलेल्या त्या काळच्या नामवंत विद्वानांच्या बैठकांमध्ये असल्याचे दिसून येते. या संस्थेच्या मूळ बारा संस्थापक सदस्यांत क्रिस्टोफर रेन, रॉबर्ट बॉइल व रॉबर्ट मेरी यांचा समावेश होता. लॉर्ड विल्यम ब्रंग्कर यांची संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून १६६१ मध्ये नियुक्ती झाली. इंग्लंडचे राजे दुसरे चार्ल्स यांनीही संस्थेच्या कार्यात रस घेऊन १५ जुलै १६६२ रोजी संस्थेच्या पहिल्या सनदेत मान्यता दिली. संस्थेच्या विशेषाधिकारात वाढ करणारी दुसरी सनद २२ एप्रिल १६६३ रोजी संमत करण्यात आली. संस्थेचे ब्रीदवाक्य Nullius in Verba असे असून त्यावरून प्रारंभीच्या सदस्यांचा वास्तववादावरूनच सर्व विधानांचा पडताळा ठरविण्याचा निर्धार दिसून येतो.

               

वरील ब्रीदवाक्याला अनुसरून संस्थेची पुढील उद्दिष्टे ठरविण्यात आली : (१) संस्थेचे नवीन सदस्य निवडताना उच्चतम वैज्ञानिक दर्जा राखणे आणि ऑफ फक्त असामान्य गुणवत्तेच्या व्यक्तींनाच पदके, अधिव्याख्यातापदे, संशोधन नेमणुका यांचा मान देणे (२) नवीन वैज्ञानिक ज्ञान प्रसिद्ध करणे आणि याविषयी आस्था असणाऱ्या सर्वांना खुला असलेल्या संस्थेच्या बैठकांमध्ये त्यावर चर्चा करण्यास प्रोत्साहन देणे (३) विविध प्रकारे (उदा., अनुदानाची तरतूद करून) वैज्ञानिक संशोधनाला, विशेषतः नवीन क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देणे (४) सहकारी संशोधनास पुरस्कृत करणे व ते सुकर होण्यासाठी प्रयत्ना करणे, विशेषतः यासाठी परदेशी वैज्ञानिक संस्थाशी रीतसर विनिमय करार करणे व परदेशात प्रवास करण्यास मदत करणे (५) अनेक आंतरराष्ट्रीय बिनसरकारी वैज्ञानिक संस्थाशी संपर्क ठेवणार ब्रिटनची राष्ट्रीय संस्था म्हणून कार्य करणे (६) सरकारला व इतर संस्थांना वैज्ञानिक सल्ला देणे (७) विशेषत्वाने विज्ञानाच्या इतिहासासंबधी ग्रंथसंपदा असलेले ग्रंथालय चालविणे. ब्रिटिश सरकारला राष्ट्रीय महत्त्वाच्या वैज्ञानिक उपक्रमासंबंधी सल्ला देण्याबरोबर आंतरराष्ट्रीय संशोधन मंडळावर ब्रिटिश प्रतिनिधी नेमण्याचा अधिकारही संस्थेला देण्यात आलेला आहे. ही संस्था सरकारतर्फे करीत असलेले एक महत्वाचे कार्य म्हणजे विविध शाखांतील वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य व इतर संस्थाबरोबर आयोजित करण्यात येणारे विनिमय कार्यक्रम यासांठी देण्यात येणाऱ्या वार्षिक अनुदांनाची व्यवस्था पाहणे हे होय. असे असले, तरी ही संस्था सरकारपासून पूर्णपणे स्वतंत्र आहे.

               

या संस्थेच्या मदतीने वा प्रोत्साहनाने झालेल्या महत्त्वपूर्ण कार्यात पुढील काही प्रतिनिधिक गोष्टीचा उल्लेख करता यईल कालगणना पद्धतीतील बदल (१७५१), लांबीच्या ब्रिटिश आणि फ्रेंच प्रमाणभूत मापांची तुलना भूगणितीय सर्वेक्षण (१७८४) आटार्क्टिक मोहिमा (कॅप्टन जेम्स कुक १७७२, जेम्स रॉस १८३९, १९००) आर्क्टिक मोहिमा (१८१७, विल्यम पॅरी १८१९, पॅरी व रॉस १८२७, जॉन फ्रँक्किल १८४५, कॅप्टन जॉर्ज नेअर्झ १८७५) आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्षांतील अंटार्क्टिक मोहिम (१९५६−५९) सूर्याच्या ग्रहणाचे निरीक्षण करण्यासाठी अनेक मोहिमा चार्ल्स बॅबिज यांचे गणकयंत्र रंगांधत्वासाठी अनुसंधान वेस्ट इंडीजमधील ज्वालामुखी उद्रेकांची पहाणी आइन्टाइन यांच्या व्यापक ⇨सापेक्षता सिद्धांताचा पडताळा पाहण्यासाठी १९१९ मधील खग्रास सूर्यग्रहणाचे निरीक्षण करण्यासाठी दोन मोहिमा विविध उष्ण कटिबंधीय रोगासंबंधीचे (उदा., हितताप, निद्रारोग, काळा आजार) संशोधन वगैरे.

               

दर वर्षी संस्थेतर्फे विज्ञानात वा तंत्रविद्येत लक्षणीय महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पदके देण्यात येतात आणि ती संस्थेच्या वर्धापन दिनी भरणाऱ्या बैठकीच्या वेळी संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते देण्यात येतात. संस्थेचा सर्वोच्च बहुमान कॉप्ली पदक  हा असून तो सर गॉडफ्री कॉल्पी यांच्या मृत्युपत्रित देणगीतून १७३१ मध्ये स्थापन करण्यात आला. हे पदक जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाला त्याने कोणत्याही विषयात केलेल्या कामगिरीबद्दल देण्यात येते. तीन रॉयल पदके दरवर्षी संस्थेच्या मंडळाने केलेल्या शिफारसीनुसार ब्रिटनच्या सार्वभौम राजसत्तेतर्फे दिली जातात. यापैकी दोन नैसर्गिक ज्ञानात महत्त्वाची भर घातल्याबद्दल (एक गणितीय व भौतिकीय विज्ञांनासाठी व दुसरे जैव विज्ञांनासाठी) आणि तिसरे अनुप्रयुक्त विज्ञांनात विशेष कामगिरी केल्याबद्दल दिली जातात. इतर नऊ पदकांत ब्रिटनच्या राष्ट्रीय उत्कर्षाला प्रत्यक्ष मदत करणाऱ्या विज्ञान वा अभियांत्रिकी किंवा तंत्रविद्या यांतील प्रगतीसाठी महात्त्वाची कामगिरी करण्याबद्दल देण्यात येणारे मुलार्ड पदक व पुरस्कार (स्थापना १९६६), तसेच कोणत्याही स्वरूपातील ऊर्जेच्या कार्यक्षम उपयोगास वा रूपांतरास मदत करणाऱ्या विशेष वैज्ञानिक व तांत्रिक कार्यासाठी देण्यात येणारा एस्सो पुरस्कार यांचा समावेश होतो. डेव्ही व ह्यूझ ही पदके प्रतिवर्षी. रम्फर्ड व डार्विन ही पदके दोन वर्षांनी, सिल्व्हेस्टर पदक तीन वर्षांनी आणि ब्यूकॅनन पदक पाच वर्षांनी देण्यात येतात.

               

संस्थेतर्फे खाजगी व सार्वजनिक निधींतून संशोधनाकरिता कित्येक नेमणुका करण्यात येतात. संस्थेच्या स्वतःच्या संशोधन संस्था वा प्रयोगशाळा नाहीत. संशोधन प्राध्यापक व अधिछात्र यांची इतर संस्थात (विशेषतः विद्यापीठांत) व्यवस्था केली जाते. १९७७ मध्ये १८ संशोधन प्राध्यापकपदे व ३५ अधिव्याख्याता पदाच्या दर्जाच्या अधिछात्र वृत्या होत्या. फुलर्टन, हेन्‍री डेल व नेपिअर ही प्राध्यापकपदे अनुक्रमे वैद्यक, शरीरक्रियाविज्ञान किंवा औषधिक्रियाविज्ञान व कर्करोग या विषयांतील संशोधनाकरिता असून इतर प्राध्यापकपदांकरिता विषयांची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. संस्थेच्या अधिछात्रवृत्त्या मात्र विशिष्ट विषयांकरिता (उदा., पिकरिंग अधिछात्रवृत्ती ही रसायनशास्त्र वा वनस्पतिविज्ञान यांकरिता, वीर अधिछात्रवृत्ती ही रेडिओ ज्योतिषशास्त्राकरिता) ठेवण्यात आलेल्या आहेत.

               

या संस्थेतर्फे आठ खास व्याख्याने दाननिधीतून आयोजित करण्यात येतात. चार व्याख्याने वार्षिक असून त्यांतील कूनियन व्याख्याने (स्थापना १६८४) जीवविज्ञानीय विषयांवर, बेकरीयन व्याख्याने (१७७५) भौतिकीय विज्ञानांवर, लेव्हेनहूक व्याख्याने सूक्ष्मजीवविज्ञानावर आणि क्लिफर्ड पॅटर्सन व्याख्याने विद्युत् विज्ञान व तंत्रविद्या या विषयांवर असतात. तीन व्याख्याने त्रैवार्षिक असून त्यांतील बर्नाल व्याख्याने विज्ञानाच्या सामाजिक कार्यावर, फेरिअर व्याख्याने तंत्रिका तंत्राची (मज्जा संस्थेची) संरचना व कार्य यांवर आणि विल्किन्झ व्याख्याने विज्ञानाच्या इतिहासावर असतात. अधूनमधून होणारी रदरफर्ड स्मृती व्याख्याने राष्ट्रकुलातील देशांतील निवडक विद्यापीठांत आणि ब्लॅकेट स्मृती व्याख्याने आलटून पालटून भारतात व ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात येतात.

               

उच्च गुणवत्तेचे वैज्ञानिक संशोधन निबंध प्रसिद्ध करणे हे या संस्थेच्या महत्त्वाच्या कार्यांपैकी एक आहे. फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्स या १६६५ मध्ये स्थापन झालेल्या व सातत्याने प्रसिद्ध होत असलेल्या सर्वांत जुन्या वैज्ञानिक नियतकालिकात व्याप्तिलेख आणि दीर्घ चर्चा बैठकींचे अहवाल प्रसिद्ध करण्यात येतात. १८३२ मध्ये सुरू झालेल्या प्रोसिडिंग्ज मध्ये लघू संशोधन निबंध, व्याख्याने व एक दिवसाच्या चर्चा बैठकींची कार्यवृत्ते प्रसिद्ध होतात. दर वर्षी संस्था बायॉग्राफिकल मेम्वार्स ऑफ फेलोज ऑफ द रॉयल सोसायटी (एक खंड), इयर बुक आणि नोटस् अँड रेकॉर्डस ऑफ द रॉयल सोसायटी (एक खंड दोन भाग) ही नियतकालिके प्रसिद्ध करते. यांपैकी पहिल्यात अलीकडेच मृत्यू पावलेल्या प्रत्येक सदस्याचे चरित्र आणि त्याच्या कार्याचा वैज्ञानिक दृष्ट्या गुणगौरव यांचा समावेश असून शेवटच्यात संस्थेच्या इतिहासावरील व तिच्या गतकालीन सदस्यांवरील लेख आणि विज्ञानाच्या विकासावरील अधिक व्यापक लेख असतात. इयर बुकमध्ये सदस्यांची निर्देशिका आणि संस्थेसंबंधीची सर्व तपशीलवार माहिती दिलेली असते.

               


इ.स.१६६६ मध्ये हेनरी हौअर्च (नंतर ड्यूक ऑफ नॉरफॉक) यांनी आजोबा टॉमस (अर्ल ऑफ ॲरंडस) यांचा ग्रंथसंग्रह संस्थेस भेट दिला आणि अशा प्रकारे संस्थेच्या महत्त्वपूर्ण वैज्ञानिक ग्रंथसंग्रहाचा पाया घातला गेला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत संस्थेच्या ग्रंथालयात संपूर्ण विज्ञानाच्या क्षेत्रातील ग्रंथ व नियतकालिके संग्रहित करण्यात येत होती तथापि विज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे व विशिष्ट विषयांकरिता स्थापन झालेल्या याची जरूरी राहिली नाही. यामुळे संस्थेने इतर देशांच्या राष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांचे इतिहास, सदस्यांनी लिहिलेले ग्रंथ, तसेच सदस्यांची चरित्रे आणि आत्मचरित्रे यांच्या संग्रहावर विशेष लक्ष केंद्रित केले. संस्थेच्या ग्रंथालयात १,४०,००० ग्रंथ असून १६६० ते १८०० या काळातील विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी हे एक उत्तम ग्रंथालय समजले जाते.

रॉयल सोसायटीचे सदस्यत्व हे वैज्ञानिकाच्या श्रेष्ठत्वाच्या आंतरराष्ट्रीय मान्यतेचे द्योतक समजले जाते. आयझॅक न्यूटन, हंफ्री डेव्ही, मायकेल फॅराडे, अर्नेस्ट रदरफर्ड, विल्यम टॉमसन, केल्व्हिन, जे. जे. टॉमसन, आर्थर एडिंग्टन, लॉरेन्स व विल्यम टॉमसन, केल्व्हिन, जे. जे. टॉमसन, आर्थर एडिंग्टन, लॉरेन्स व विल्यम ब्रॅग, ॲल्बर्ट आइन्स्टाइन, नील्स बोर, पॉल डिरॅक आणि विज्ञान व तंत्रविद्येच्या विविध शाखांतील ज्ञानाच्या सीमा विस्तारण्यात महत्त्वाची कामगिरी केलेल्या अनेक वैज्ञानिकांचा या संस्थेच्या सदस्यांच्या यादीत समावेश आहे. राष्ट्र कुलातील देशांमधील व आयरिश प्रजासत्ताकातील मान्यवर वैज्ञानिकांबरोबरच जगातील इतर देशांतील श्रेष्ठ दर्जाच्या वैज्ञानिकांचीही परदेशी सदस्य म्हणून निवड केली जाते. संस्थोचे १६६६ मध्ये १३१ व १६६९ मध्ये २२८ सदस्य होते. सुमारे दोन शतके संस्थेतील प्रवेश प्रभावीपणे मुक्त राहिला पण १८४७ मध्ये प्रतिवर्षी निवडावयाच्या सदस्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली व फक्त अव्वल दर्जाचे वैज्ञानिक कार्य करणाऱ्या वैज्ञानिकांचीच निवड करण्याचे ठरविण्यात आले. यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संस्थेला पूर्णपणे वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झाले व ते आजतागायत टिकून आहे. १९८८ मध्ये संस्थेच्या सदस्यांची संख्या हजारापेक्षा थोडी अधिक (१९७८ मध्ये ८३३) व परदेशी सदस्यांची संख्या जवळजवळ शंभर (१९७८ मध्ये ८२) होती.

               

रॉयल सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य अर्देशिर कर्सेटजी हे होत. जहाजबांधणी आणि संबंधित अभियांत्रिकीय तंत्रात केलेल्या सुधारणा यांकरिता कर्सेटची यांची १८४१ मध्ये सदस्य म्हणून निवड झाली. १९८८ पावेतो २९ भारतीय वैज्ञानिकांची रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झालेली असून त्यांची यादी निवडवर्षासह पुढीलप्रमाणे आहे अर्देशिर कर्सेटजी (१८४१), श्रीनिवास अय्यंगार रामानुजन (१९१८), जगदीशचंद्र बोस (१९२०), चंद्रशेखर व्यंकट रामन (१९२४), मेघनाद साहा (१९२७), बिरबल रुचिराम साहनी (१९३६), कार्यमाणिक्कम श्रीनिवास कृष्णन (१९४०), होमी जहांगीर भाभा (१९४१), शांतिस्वरूप भटनागर (१९४३), प्रशांतचंद्र महालनोबीस (१९४५), दारशा नौशेरवान वाडिया (१९५७), सत्येंद्रनाथ बोस (१९५८), शिशिर कुमार मित्र (१९५८), तिरूव्यंकट राजेंद्र शेषाद्री (१९६०), पंचानन माहेश्वरी (१९६५), कल्ममपुडी राधाकृष्ण राव (१९६७), माम्बिलिकाल्थिल गोविंद कुमार मेनन (१९७०), बेंजामिन पिअरी पाल (१९७२), मोनकोंबू सांबशिवन् स्वामिनाथन् (१९७३), गोपालसमुद्रम् नारायण रामचंद्रन् (१९७७), देवेंद्र लाल (१९७९), अवतार सिंग पेन्टल (१९८१), चिंतामणी नागेश रामचंद्र राव (१९८२), सुब्रह्मण्यम् चंद्रशेखर (१९८३), ओबेद सिद्दिकी (१९८४), वुलिमिरी रामलिंगस्वामी (१९८६), सी. गोपालन (१९८७), ए.पी. मित्र (१९८८), सी. एस्. शेषाद्री (१९८८). यांतील अर्देशिर कर्सेटजी, ए. पी. मित्र, सी. गोपालन व अवतार सिंग पेन्टल या वैज्ञानिकांखेरीज इतर सर्व वैज्ञानिकांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत. गोपालन यांना पोषणविज्ञानाच्या प्रगतीत महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल सदस्यत्त्वाचा बहुमान मिळालेला असून ते न्यूट्रिशन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेचे संचालक आहेत. पेन्टल यांची जलद श्वसनक्रियेला कारणीभूत असणाऱ्या फुफ्फुसातील यंत्रणेच्या शोधाकरिता सदस्य म्हणून निवड झाली. ते इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे महासंचालक आहेत. ए. पी. मित्र यांना रेडिओ व अवकाश भौतिकी या विषयांतील कार्याकरिता सदस्यत्वाचा अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक आहेत.

                                                 गोखले, श्री. पु. भदे, व. ग.