स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन : मुख्य इमारत.

स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन : इंग्रज वैज्ञानिक जेम्स स्मिथसन यांच्या मृत्युपत्रानुसार मिळालेल्या सु. ५,८०,३१,८४६ डॉलर संपत्तीच्या आधारे अमेरिकेत स्थापन झालेली वैज्ञानिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संशोधनासाठी कार्यरत असलेली संस्था. या प्रकारची देणगी स्वीकारण्याचा अधिकार अमेरिकी संघराज्याला नाही, असे जॉन सी. कॅलहून व इतर अमेरिकी काँग्रेस सदस्यांचे म्हणणे होते. तथापि, ही देणगी स्वीकारावी म्हणून मुख्यतः जॉन क्विन्सी ॲडम्स यांनी प्रयत्न केले. अखेरीस ही देणगी स्वीकारून अमेरिकी काँग्रेसने केलेल्या अधिनियमा-द्वारे ही संस्था वॉशिंग्टन, डी. सी. येथे १० ऑगस्ट १८४६ रोजी स्थापन झाली. या संस्थेचे कार्य खाजगी प्रतिष्ठानाप्रमाणे व ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्त्वावर चालते. ज्ञानप्रसार व ज्ञानवृद्धी हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. संस्थेचा कारभार राजप्रतिनिधींचे (रीजंटांचे) मंडळ पाहते. या मंडळात अमेरिकेचे उपाध्यक्ष, सरन्यायाधीश, अमेरिकी सीनेट व हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज् यांचे प्रत्येकी तीन सदस्य आणि काँग्रेसच्या संयुक्त ठरावाने नेमलेले नऊ नागरिक असतात. मंडळाचे सभासद संस्थेचा चॅन्सलर निवडतात. या संस्थेच्या प्रशासनाखाली १९ संग्रहालये, ९ संशोधन केंद्रे, १५० पेक्षा अधिक संलग्न संग्रहालये असून संलग्न संस्थांची विश्वस्त मंडळे व धोरणे स्वतंत्र आहेत. या संस्थेचे स्मिथसोनियन इयर (वार्षिकी) व स्मिथसोनियन मासिक प्रसिद्ध होतात. शिवाय येथून अनेक वैज्ञानिक व सांस्कृतिक प्रकाशने प्रसिद्ध होतात.

ही संस्था विज्ञान, इतिहास, कला व सार्वजनिक सेवा या सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेली संग्रहालये, कला दालने (गॅलरी) इ. संघट-नांची बनलेली आहे. हिची संग्रहालये मुख्यतः वॉशिंग्टनमध्ये असून अनेक संग्रहालये कॅपिटॉल व वॉशिंग्टन मॉन्युमेंट दरम्यानच्या नॅशनल मॉलमध्ये आहेत. हिच्या ‘ कॅसल ’ या पहिल्या इमारतीचा अभिकल्प (आराखडा) वास्तुविशारद जेम्स रेनविक यांनी तयार केला होता व ही इमारत १८५५ मध्ये पूर्ण झाली. हेच संस्थेचे प्रशासकीय मुख्यालय असून येथे स्मिथसोनियन इन्फर्मेशन सेंटर तसेच वुड्रो विल्सन इंटर-नॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्सही आहे. निसर्गेतिहास व कला यांमधील मूळ वस्तूंचा संग्रह येथे आहे.

सदर संस्था आपले उद्दिष्ट अनेक प्रकारे साध्य करते. संग्रहालयांत वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि कलात्मक लाखो वस्तूंचे जतन व प्रदर्शन केले जाते आणि ही संस्था त्यांचा अभ्यासासाठीही उपयोग करते. यातूनच ही संस्था अमेरिकेचा इतिहास, निसर्गेतिहास, वैज्ञानिक आणि अवकाश समन्वेषण तसेच विज्ञान व तंत्रविद्या यांतील वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आखते विविध सेवा पुरविते विद्वत्ताप्रचुर नियतकालिकांची देवाण-घेवाण करते इतर माध्यमांतून माहिती देते व फिरती प्रदर्शन सेवा पुरविते. शिवाय प्राणि-संग्रहालये, वैज्ञानिक संशोधन केंद्रे, सांस्कृतिक देवाण-घेवाण या सदर संस्थेच्या अन्य सुविधा आहेत. द्रव्यरूप देणग्या, प्रयोगशाळेसाठी जागा, पुस्तके व उपकरणे संस्था देते. दूरवरच्या प्रदेशांचे समन्वेषण करण्यासाठी संस्था मोहिमा काढते आणि याबाबतीत सल्ला व मदत पुरविते. संस्थेचा ग्रंथसंग्रह सु. ९,६०,००० पेक्षा अधिक ग्रंथांनी समृद्ध आहे.

स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनच्या अखत्यारीत पुढील संस्था, संघटना इ. येतात त्यांच्या नावावरून या संस्थेच्या प्रचंड कार्याची व्याप्ती व वैविध्य लक्षात येऊ शकते : आर्काइव्ह्ज ऑफ अमेरिकन आर्ट, कूपर-हेविट म्यूझीयम ऑफ डेकोरेटिव्ह आर्ट्स अँड डिझाइन, जॉन एफ्. केनेडी सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स, नॅशनल एअर अँड स्पेस म्यूझीयम, नॅशनल आर्मड् फोर्सेस म्यूझीयम ॲड्व्हायझरी बोर्ड, नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी, नॅशनल झूलॉजिकल पार्क, रेडिएशन बायॉलॉजी लॅबोरेटरी, सायन्स अँड इन्फर्मेशन एक्सचेंज, स्मिथसोनियन ॲस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरी, स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, आर्थर एम्. सॅकलर गॅलरी (फॉर एशियन अँड मिडल ईस्टर्न आर्ट), नॅशनल म्यूझीयम ऑफ आफ्रिकन आर्ट, नॅशनल म्यूझीयम ऑफ द अमेरिकन इंडियन, तसेच हार्व्हर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्स, ऑफिस ऑफ पब्लिकेशन एक्सचेंज, इंटरनॅशनल एक्सचेंज सर्व्हिस, ॲनॅकोस्टिया नेबरहूड म्यूझीयम, रेनविक गॅलरी ऑफ द नॅशनल म्यूझीयम ऑफ अमेरिकन आर्ट, स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन सेंटर फॉर शॉर्ट-लिव्हड् फिनॉमेना, स्मिथसोनियन सायन्स इन्फर्मेशन एक्सचेंज, स्मिथसोनियन एन्व्हायरन्मेंटल रिसर्च सेंटर वगैरे.

पहा : वैज्ञानिक संस्था व संघटना.

संदर्भ : 1. Cohen, I. B. Ed., The Smithsonian Institution : Documents Relating to It’s History, 2nd Vol., 1980.

            2. Oehser, P. H. The Smithsonian Institution, 1983.

            3. Park, E. Carlhian, J. P. A New View from the Castle, 1987.

            4. Park, E. Treasures of the Smithsonian, 1983.

ठाकूर, अ. ना.