बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी : प्राणिविज्ञानविषयक टिपणांचा व निरीक्षणांचा जिज्ञासूंमध्ये विनिमय व्हावा आणि प्राणिजीवनाच्या विविध लक्षवेधक नमुन्यांचे प्रदर्शन मांडावे या हेतूने मूलतः ही संस्था मुंबईत इ. स. १८८३ मध्ये स्थापन झाली. सुरुवातीस या खाजगी संस्थेत फक्त सात सभासद होते व त्यांनीच १८८६ मध्ये एक नियतकालिक काढले आणि ते जर्नल ऑफ द बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी या नावाने आजपर्यंत चालू आहे.

गेली कित्येक वर्षे या संस्थेकडे प्राण्यांचे आणि वनस्पतींचे नमुने त्यांची ओळख पटविण्याकरिता पाठविले जात आहेत ते जतन करण्याकरिता संस्थेच्या हवाली केले जातात. संस्थेच्या संग्रही असे भारतातील २०,००० सस्तन प्राण्यांचे नमुने आहेत. यात कित्येक दुर्मिळ प्राण्यांची कातडी आहेत. पक्ष्यांच्या संग्रहात २३,००० पक्षी आहेत. यात माळढोकसारखे दुर्मिळ पक्षीही आहेत. यांखेरीज १,५०० माशांच्या जाती, ४,००० सरीसृप (सरपटणारे) प्राणी, १,००० उभयचर (पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणारे), ८०,००० कीटक व अनेक अपृष्ठवंशीय (पाठीचा कणा नसलेले) प्राणी यांचे नमुने संस्थेच्या संग्रहालयात आहेत. हा संग्रह सर्वसामान्य जनतेस पाहण्यास खुला नाही पण या विषयातील तज्ज्ञ व संशोधक यांना अभ्यासाकरिता तो उपलब्ध आहे.

मुंबई सरकार व प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम यांच्या सहकार्याने १९२३ साली या संग्रहालयात एक प्रकृतिविज्ञान (नॅचरल हिस्टरी) विभाग उघडण्यात आला. याची देखभाल बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या सहकार्याने करण्यात आली. सर्व प्राण्यांचे प्रदर्शन कलात्मक रीतीने त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीस जुळेल असे करण्यात आले. आता हे प्रदर्शन जनतेस खुले करण्यात आले आहे.

संस्थेचे नियतकालिक वर्षातून तीन वेळा निघते. यात पौर्वात्य प्रदेशातील प्राणी व वनस्पती यांवर लेख असतात. आतापर्यंत फुलपाखरे, बदके, साप, कीटक, तालवृक्ष (पाम), वाळवंटी वनस्पती, औषधी व विषारी वनस्पती, ऑर्किड्‌स वगैरे विविध विषयांवर आधारलेले तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. याखेरीज संस्थेने काही ग्रंथही प्रसिद्ध केले आहेत. भारतातील पक्षी, शिकारी पक्षी, भारतातील पशू, वेली व झुडपे, फुलपाखरे, मॉलस्का (मृदुकाय) प्राणी वगैरे या ग्रंथाचे विषय आहेत. लहान मुलांकरिता संस्थेने विविध विषयांवर (उदा., भारतातील पक्षी, सुंदर वनस्पती, मॉन्सून वनस्पती इ.) व निरनिराळ्या भारतीय भाषांत पुस्तिकाही प्रसिद्ध केल्या आहेत.

संशोधन क्षेत्रातही संस्था क्रियाशील आहे. संस्थेने बऱ्याच निरीक्षण मोहिमा काढल्या व त्यांत १९११ – २३ या काळात सस्तन प्राण्यांची पाहणी करण्याकरिता काढलेली मोहीम महत्त्वाची होती. या मोहिमेत जमा केलेल्या सस्तन प्राण्यांच्या नमुन्यांवर बरेच संशोधनात्मक लिखाण प्रसिद्ध झाले आहे. पूर्व घाटातील पक्ष्यांची पाहणी करण्याची मोहीम १९२९ साली हाती घेण्यात आली व आता सर्व देशभर ती सतत चालूच आहे. या मोहीमेत भारत, सिक्किम, भूतान, पश्चिम घाट. अंदमान व निकोबार बेटे या प्रदेशांतील पक्ष्यांचे नमुने गोळा करण्यात आले. एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पात आथ्रोपॉड (संधिपाद) प्राण्यांद्वारे प्रसार पावणाऱ्या व्हायरसांच्या प्रसारातील पक्ष्यांच्या स्थानासंबंधी संशोधन करण्याकरिता २,००,००० पक्ष्यांवर १९५९ – ७० या काळात प्रयोग करण्यात आले. याचप्रमाणे अमेरिकेतील येल विद्यापीठ व स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन यांच्या सहकार्याने गुजरातमधील गीरच्या जंगलातील सिंह व इतर वन्य खुरी प्राण्यांचाही परिस्थितिवैज्ञानिक अभ्यास संस्थेतर्फे सुरू आहे. ही संस्था मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून पक्षी, सरीसृप प्राणी व सस्तन प्राणी यांचा अभ्यास येथे करून संशोधकास विद्यापीठाची एम्. एस्‌सी. किंवा पीएच्. डी. ही पदवी घेता येते.

वन्य पशूंचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या क्षेत्रातही ही संस्था सरकारशी सहकार्य करते. संस्थेचे कार्यकर्ते शाळा – महाविद्यालयांस भेटी देऊन विद्यार्थ्यांत निसर्गाची आवड निर्माण करण्याकरिता व्याख्याने देतात. तसेच काही होतकरू विद्यार्थ्याना अनुदान अगर शिष्यवृत्त्याही देण्यात येतात.

संस्थेचे ६,००० ग्रंथ असलेले ग्रंथालय असून त्यात प्राणिविज्ञान, वनस्पतिविज्ञान व त्यांच्याशी संबंधित अशा विविध विषयांची पुस्तके आहेत.

संस्थेची व्यवस्था पाहण्याकरिता एक सन्मान्य कार्यवाह व १० सभासदांची एक कार्यकारी समिती नियुक्त केली जाते. या समितीची सभा महिन्यातून एकदा होते व तिचा अहवाल सर्व सभासदांना पाठविला जातो. सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा वर्षातून एकदा होते. भारत, पाकिस्तान, श्रीलंका तसेच यूरोप, अमेरिका व जगातील इतर भागांतील सु. १,००० तज्ज्ञ या संस्थेचे सदस्य आहेत.

या संस्थेने आतापर्यंत जीवनविज्ञानविषयक लोकशिक्षणाचे आणि संशोधनात्मक असे बरेच कार्य केले आहे. 

पहा : प्राणिवैज्ञानिक संस्था व संघटना.

जमदाडे, ज. वि.