राष्ट्रीय प्रयोगशाळा : भारतातील विज्ञान व उद्योगधंदे यांतील संशोधनाबाबतची सर्व प्रकारची जबाबदारी असणारे ⇨कौन्सिल ऑफसायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च हे स्वायत्त मंडळ भारत सरकारने १९४२ मध्ये स्थापन केले. संपूर्ण देशातील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधनाचे नियंत्रण व मार्गदर्शन करणे व आपल्या कक्षेतील संशोधनकार्याचा समन्वय साधणे ही या कौन्सिलच्या कामाची मुख्य दिशा आहे. यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळा, संख्या, संघटना व प्रादेशिक प्रयोगशाळा स्थापण्यात आल्या असून १९८५ साली त्याच्या अशा एकूण ३६ संशोधन आस्थापना होत्या. या आस्थापना व यांची सु.९० क्षेत्रीय केंद्रे सर्व देशभर पसरलेली आहेत. प्रस्तुत नोंदीत या आस्थापनांची उद्दिष्टे व त्यांत करण्यात येणारे संशोधन यांविषयी सर्वसाधारण माहिती दिलेली आहे.            

नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (नवी दिल्ली) व नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (पुणे) येथे उद्योगधंद्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने मूलभूत असे संशोधनकार्य चालते. इतर प्रयोगशाळांतून अन्न, इंधन, इमारती व रस्ते यांच्याविषयीच्या देशाच्या सर्वसाधारण गरजांच्या संबंधातील संशोधन करण्यात येते. इलेक्ट्रॉनिकी, काच व मृत्तिका उद्योग, चर्मोद्योग, खनिजे व धातू, सागरी रसायने, औषधे आणि वैज्ञानिक उपकरणे यांसारख्या विशिष्ट उद्योगांशी संबंधित असलेल्या प्रश्नांविषयीच्या संशोधनाशी काही आस्थापना निगडित आहेत. यांत्रिक अभियांत्रिकी, वैमानिकीय अभियांत्रिकी, पर्यावरणीय अभियांत्रिकी, विद्युत् रसायनशास्त्र, भूभौतिकी, महासागरविज्ञान, प्रायोगिक वैद्यक व विषविज्ञान यांच्याशी संबंधित संशोधन करणाऱ्या आस्थापनाही आहेत. प्रादेशिक प्रयोगशाळांचा संबंध मुळात त्यांच्या भौगोलिक क्षेत्रातील औद्योगिक विकासाविषयीच्या समस्यांशी येतो परंतु त्या राष्ट्रीय महत्त्वाचे प्रकल्पही हाती घेतात.

प्रत्येक संशोधन आस्थापनेची कार्यकारी व समिती असून ती आस्थापनेच्या कार्याचे नियमन व त्यांविषयी सर्वसाधारण मार्गदर्शन करते. या समितीला सल्ला देण्यासाठी संशोधन सल्लागार परिषद असते.               

भारतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा देशाच्या आर्थिक विकासासाठी प्रभावीपणे वापर करून घेण्याच्या दृष्टीने संशोधन करणे, हे संशोधन आस्थापनांच्या मुख्य कार्यांपैकी एक काम आहे. देशी कच्च्या मालाला साजेशी अशी नवीन उत्पादने व प्रक्रिया तसेच तंत्रे विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून अनुसंधान येथे करण्यात येते. दुर्मिळ अगर टंचाई असलेल्या साधनसामग्रीला पर्यायी ठरू शकणाऱ्या साधन-सामग्रीचा शोध घेण्यात येतो. यामुळे देशाचे आयातीवरचे परावलंबन कमी होऊन विदेशी चलन वाचते. उद्योगधंद्यात वापरण्यासाठी व निर्यात करण्यासाठी कमी दर्जाच्या द्रव्यांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने अभिशोधनाच्या तंत्रांचा विकास करण्यात येतो. टाकाऊ वा बिनमहत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या द्रव्यांचा वापर करून घेण्याचे प्रयत्न केले जातात. या आस्थापना प्रकल्पअभिमुख असे मूलभूत संशोधनही बऱ्याच प्रमाणात करतात. अनेक अखिल भारतीय समन्वित प्रकल्प व ग्रामीण विकास प्रकल्प या प्रयोगशाळांनी निर्दिष्ट केले असून त्यांचा पाठपुरावा करण्यात येतो.             

काही आस्थापनांनी पुढील जादा उद्दिष्टे समोर ठेवली आहेत : (१) प्रयोगशाळेत विकसित केलेल्या प्रक्रियांची व्यावहारिक वापराची शक्यता अभ्यासणे (२) उद्योग व शासन यांनी पुरस्कृत केलेले प्रकल्प हाती घेणे (३) संशोधनासाठी लागणारी सुविकसित उपकरणे व सामग्री यांची देखभाल करणे आणि (४) अशी उपकरणे व सामग्री यांच्या विकासाविषयांचे काम हाती घेणे.               

मार्गदर्शी संयंत्रे (अंतिम संयंत्रे चालविण्यासाठी अनुभव मिळविण्याच्या दृष्टीने बांधण्यात येणाऱ्या योजलेल्या संयंत्रांच्या छोट्या आवृत्त्या) व संशोधन सामग्री यांचा अभिकल्प (आराखडा) आणि बनावट (जोडकाम) यांविषयीच्या सुविधा प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता प्रस्थापित करणे व उत्पादनाच्या आर्थिक बाबींचे मूल्य निर्धारण करणे या दृष्टींनी मार्गदर्शी संयंत्राच्या टप्पापर्यंतची यशस्वी प्रयोगशालीय अनुसंधाने करण्यात येतात. उद्योगाच्या वापरासाठी तपशीलवार प्रकल्प−अहवाल तयार केले जातात. नवीन क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या उत्पादकांना विकासाचे काम करून आणि उत्पादित वस्तूंचे परीक्षण करून तसेच उत्पादनांमध्ये कशी सुधारणा करावी या विषारी सल्ला देऊन साहाय्य करण्यात येते. परीक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन उद्योगाला तांत्रिक मदत देण्यात येते. प्रयोगशाळांमधील औद्योगिक संपर्क व विस्तार विभाग हे उद्योग व संशोधन यांच्या दरम्यान कल्पनांची देवाणघेवाण व्हावी म्हणून मदत करतात. हे विभाग प्रयोगशाळांत विकसित झालेल्या प्रक्रिया व उत्पादने यांची प्रात्येक्षिके करून दाखवितात आणि विकासाची माहिती उद्योगाला सतत मिळत रहावी म्हणून ही माहिती प्रसिद्ध करतात.               

भारताबाहेरून आर्थिक मदत मिळणारे संशोधन प्रकल्पही या संशोधन आस्थापना हाती घेतात आणि परदेशी संशोधक व संस्था यांच्याशी निकटचे   व्यायसायिक सहकार्य करतात. कच्चा माल व अंतिम उत्पादने यांच्यासाठी असणारे विनिर्देश (आवश्यक प्रमाणभूत गुणधर्म) तसेच कार्यपद्धतींच्या नियमावल्या तयार करण्यासाठी पुष्कळ आस्थापनांचा ⇨भारतीय मानक संस्थेशी निकटच्या संबंध येतो. उद्योगातील सेवेत असलेल्या तंत्रज्ञांच्या हितासाठी काही प्रयोगशाळांतून विशिष्ट विषयांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्यात येतात.

             

पदव्युत्तर अध्ययन व संशोधन यांसाठी पुष्कळ राष्ट्रीय प्रयोगशाळांना एका वा अधिक भारतीय विद्यापीठांकडून मान्यता मिळाली आहे तर काही प्रयोगशाळा संशोधन व व्याख्याने यांविषयीच्या कार्यक्रमांमध्ये भारतीय व परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करतात.

यांशिवाय वरील कौन्सिलाच्या पब्लिकेशन्स अँड इन्फर्मेशन डायरेक्टोरेट आणि इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर या नव्या दिल्लीतील आस्थापना वैज्ञानिक व तांत्रिक माहितीच्या प्रकाशनाचे व तिचा प्रसार करण्याचे काम करतात. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सायन्स टेक्नॉलॉजी अँड डिव्हलपमेंट स्टडीज ही नवीन आस्थापना नव्या दिल्लीत स्थापन करण्यात आली असून ती विज्ञान व तंत्रविद्याविषयक धोरण आणि विज्ञानाचे समाजाशी असणारे संबंध या क्षेत्रांतील अध्ययन करण्यासाठी स्थापिली आहे.            

मद्रास व दिल्ली येथे या कौन्सिलाचे दोन कार्यसमूह असून तेथे कित्येक प्रयोगशाळांची विस्तार व क्षेत्रीय केंद्रे आहेत. हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे असा नवा कार्यसमूह उभारण्यात येत आहे.              

या कौन्सिलची दहा बहुतंत्रविद्या हस्तांतरण केंद्रे आहेत तंत्रविद्येची निर्मिती करणारे व तिचा वापर करणारे यांच्यामध्ये असलेली संपर्कविषयक दरी भरून काढणे हे या केंद्रांचे उद्दिष्ट आहे. अहमदाबाद, हैदराबाद, बंगलोर, पाटणा, त्रिवेंद्रम, भोपाळ, मुंबई, लखनौ, कलकत्ता व शिलाँग येथे ही केंद्रे आहेत.               

टी रिसर्च असोसिएशन (कलकत्ता) व इलेक्ट्रिकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशन (मुंबई) या दोन सहकारी संशोधन संस्थांचे कार्य या कौन्सिलाच्या देखरेखीखाली चालते. या संस्था सदस्य उद्योगसंस्थांच्या वतीने उद्योगातील प्रश्नांच्या दृष्टीने युक्त असे मूलभूत व अनुप्रयुक्त संशोधन हाती घेतातच शिवाय बाजारपेठेच्या पाहण्या, ग्राहक-चाचण्या, गुणवत्ता नियंत्रण व ⇨संक्रियात्मक अन्वेषण ही कामेही करतात.               

राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये आपापसात हमखास जास्तीत जास्त सहयोग व्हावा म्हणून कौन्सिलाच्या प्रयोगशाळा व सहकारी संशोधन संस्था यांचे पुढील पाच समन्वयी कौन्सिलांच्या अखत्यारीतील गटात एकत्रीकरण केले आहे. भौतिकीय व भूविषयक विज्ञाने, रासायनिक विज्ञाने, जीवविषयक विज्ञाने, अभियांत्रिकीय विज्ञाने व माहितीविषयक विज्ञाने ही समन्वयी कौन्सिले पुढील कामे करतात : प्रयोगशाळांदरम्यानच्या, उद्योगांदरम्यानच्या आणि प्रयोगशाळा-विद्यापीठ यांच्या दरम्यानच्या नेमून दिलेल्या कार्य-प्रकल्पांना उत्तेजन देणे, अग्रक्रमांनुसार कामे वाटून देणे आणि सहयोगी प्रकल्पांच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे.               

नोंदीच्या उर्वरित भागात विविध व इतर आस्थापनांविषयी माहिती दिलेली आहे.               

नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी(NPL) : १९५० साली नवी दिल्ली येथे स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेत पुढील क्षेत्रांमधील संशोधनाची व विकासाची कामे केली जातात : (१) परिशुद्ध (अचूक) मापन व मूलभूत स्थिरांक, (२) सामग्रीचा विकास व वैशिष्ट्यनिश्चिती, (३) रेडिओ भौतिकी व वातावरणीय भौतिकी, (४) सौर-ऊर्जा वापर, (५) शीत अभियांत्रिकी, (६) उच्चदाब विज्ञान व तंत्रविद्या, (७) अनुप्रयुक्त प्रकल्प (उदा., संदर्शन प्रयुक्ती, विद्युत् स्थितिकी, विद्युत् छायाचित्रण) व (८) संघनित द्रव्य-भौतिकीतील सैद्धांतिक अध्ययन.               


आंतरराष्ट्रीय एकक पद्धतीनुसार [⟶ एकके व परिमाणे] भौतिकीय मापनाची एकके (उदा. मूलभूत−मीटर, किलोग्रॅम इ. व साधित−प्रेरणा, दाब इ,) प्रत्यक्ष बनविणे आणि या एककांच्या निदर्शक अशा मापनाच्या राष्ट्रीय मानकांची योजना, अभिरक्षा व देखभाल करणे या जबाबदाऱ्या प्रयोगशाळेला पार पाडाव्या लागतात. तसेच येथे अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य प्रारणाविषयीच्या) व श्राव्यातीत (मानवी श्रवणाच्या कक्षेच्या जरा वर कंप्रता−एका सेकंदात होणारी कंपनसंख्या−असलेल्या कंप्रता ज्यात अंतर्भूत असतात अशा संकेत, साधने या आविष्कार यांविषयीच्या) मानकासंबधीचे काम सुरू आहे.               

मूलभूत राशींची अत्याधुनिक मानके उपलब्ध करून देण्याची सोय या प्रयोगशाळेत आहे (उदा., सिझियमवर आधारलेल्या आणवीय कालमापकाने सेकंद निश्चित करणे). काल व कंप्रता संकेत कार्यालयीन दिवशी येथून अहोरात्र प्रक्षेपित केले जातात. शासनाचे विभाग, संरक्षण, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांतील उद्योग, संशोधन आणि विकासाची कामे करणाऱ्या संस्था इत्त्यादींचे जास्तीत जास्त अचूक असे अंशन परीक्षणाचे [⟶ अंशन व अंशन परीक्षण] काम ही प्रयोगशाळा हाती घेते. सर्व देशातील अंशन परीक्षण सेवेच्या सुसूत्रतेचे व अंमलबजावणीचे कामही या प्रयोगशाळेकडे सोपविण्यात आले आहे.               

येथे राखण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मानकांची आंतरराष्ट्रीय पातळीवर अनुरेखन केले जाण्याची व्यवस्था करण्यात येते आणि त्यासाठी ठराविक काळाने इंटरनॅशनल ब्यूरो ऑफ वेट्स अँड मेझर्स व इतर देशांच्या काही राष्ट्रीय मानक प्रयोगशाळा यांच्यामार्फत अंशन परीक्षण केले जाते. मापनांची आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेझर्स, वगैरे विभागांत व समित्यांत भारताची प्रतिनिधी म्हणून ही प्रयोगशाळा काम करते.               

देशी कच्चा माल वापरून उपयुक्त द्रव्ये विकसित करण्यावर येथे विशेष भर देण्यात येतो. उदा., परंपरागत मृत्तिका उद्योगाची तंत्रविद्या वापरून विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिय द्रव्ये (फेराइटे, दाबविद्युत् द्रव्ये, विद्युत् अपारक द्रव्ये इ.) तयार केली आहेत. याखेरीज विद्युत्‌ संवाहक मृत्तिका वस्तू तसेच तंतू, विद्युत्‌ अग्रे यांसारखी कार्बनाची उत्पादन, ⇨प्रकाशविद्युत् चालक वापराची व ऊर्जा साठविण्याच्या प्रयुक्त्यांसाठी लागणारी द्रव्ये (उदा., विविध प्रकारच्या सौर विद्युत्‌ घट वा सोडियम-गंधक संचायक घटमाला यांसाठी लागणारी द्रव्ये) बनविण्याचे प्रयत्न होत आहेत. सौरऊर्जेच्या उष्णतेतील रूपांतराचाही अभ्यास करण्यात येत असून सौरऊर्जेच्या संग्राहक व केंद्रीकरण करणाऱ्या दृष्टीने वास्तुशिल्प कसे असावे हे समजण्यासाठी येथे एक सौरगृह बांधले आहे. ⇨पातळ पटल तंत्रविद्येचा वापर करून विविध प्रशासकीय घटक बनविण्याचे प्रयत्न चालू आहेत. सूक्ष्म इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींसाठी लागणारी द्रव्ये व प्रक्रिया यांच्या पद्धतशीर अध्ययनास सुरूवात झाली आहे. संघटन, विशुद्धी, स्फटिकत्व व परिपूर्णता यांच्याद्वारे विविध द्रव्यांची वैशिष्ट्यनिश्चितीसाठी करण्याच्या सोयी या प्रयोगशाळेत आहेत (उदा., खास इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, वर्णपटमापक इत्यादी). या वैशिष्ट्य निश्चितीसाठी येथे काही उपकरणे (उदा., अवरक्त वर्णपट प्रकाशमापक, प्रकाश-ध्वनिकीय वर्णपटमापक इ.) विकसितही करण्यात आलेली आहेत.               

येथील रेडिओ वैज्ञानिक गटाने वातावरणविषयीच्या शास्त्रीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाची तज्ञता वा विशेष कौशल्य संपादन केले आहे (उदा., अतिनीच कंप्रता ते सूक्ष्मतरंगापर्यंतचे रेडिओ प्रसारण). वातावरणीय प्रक्रिया व रसायनशास्त्र यांचे अध्ययन हे या गटाचे खास वैशिष्ट्य आहे. रेडिओ प्रसारणाच्या परिस्थितीविषयीचे अल्प व दीर्घकालीन अंदाजही याच्याकडून मिळतात. सौर, चुंबकीय व आयनांबरीय [⟶ आयनाबंर] प्रदत्ताच्या (माहितीच्या) जलद विनिमयासाठी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रणालीचा एक भाग या दृष्टीने सहयोगी प्रादेशिक इशारा उपकेंद्र म्हणून हा गट काम करतो. वातावरणातील नायट्रिक ऑक्साइड, ओझोन व इतर घटक तसेच आयनीभवन (विद्युत्‌ भारित अणू, रेणू, वा अणूगट यांत होणारे रूपांतर) यांचे रॉकेटे व बलून यांतून पाठविलेल्या उपकरणांच्या साहाय्याने मापन करण्यासाठी योजलेल्या भारतीय मध्य वातावरण कार्यक्रमातही हा गट सहभागी आहे. अंटार्क्टिकावरच्या मोहिमांनाही याने मदत केली आहे.                   

ज्यांचे बहिःसारण (अर्धमऊ स्वरूपातील द्रव्य मुद्रेच्या छिद्रातून रेटून त्याला इष्ट तो आकार देण्याची क्रिया) करणे अवघड आहे, अशा द्रव्यांचे बहिःसारण व महाकठीण द्रव्यांचे (उदा., एका-स्फटिकी हिरे) संश्लेषण (कृत्रिम रीतीने तयार करणे) यांकरिता या प्रयोगशाळेत सुविधा उभारल्या आहेत. देशातील इतर संधोधन व विकास गटांनाही या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.              

शीत अभियांत्रिकीच्या क्षेत्रात हवा, नायट्रोजन व हीलियम यांचे द्रव बनविण्यासाठी लागणारी पायाभूत तयारी पूर्ण झाली आहे. डोळ्याची शस्त्रक्रिया व इतर वैद्यकीय वापरांसाठी शीतएषण्या बनविण्यात आल्या असून अतिसंवाहकता आणि अतिसंवाहक द्रव्ये यांविषयीच्या संशोधनाचे व विकासाचे काम चालू आहे. नकला काढावयाची स्थिरविद्युतीय यंत्रे येथे बनविण्यात आली असून झेरो क्ष-किरण चित्रण, तसेच इलेक्ट्रॉनीय धूळ संकलक या गाळण्या विकसित करण्यात येत आहे. एकरंगी व रंगीत द्रवस्फटिक आणि विद्युत्वर्णीय द्रव्ये यांचा वापर करून येथे संदर्शन प्रयुक्तांचाही विकास करण्यात आला आहे.               

प्रयोगशाळेच्या सुसज्ज यांत्रिक व काच कार्यशाळा आणि ग्रंथालय असून तेथे एकस्वी (पेटंट) निरीक्षण केंद्र पण आहे. संगणकाची प्रयोगशाळेने स्वतःच विकसित केलेली सुविधाही स्थापण्यात येत असून योजना आखणे, संनियंत्रण व मूल्य निर्धारण, प्रशिक्षण व तंत्रविद्या हस्तांतरण यांसारख्या माहिती-आधारित कार्यांना बळकटी आणण्यावर अधिकाअधिक भर देण्यात येत आहे.               

आयनोस्फेरिक डेटा, सोलर, जिओफिजिकल डेटा ही मासिके आणि एनपीएल टेक्निकल बुलेटिनसमीक्षा (हिंदी) ही त्रैमासिके प्रयोगशाळेतर्फे प्रसिद्ध होतात.               

सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिटयूट (CEERI) : १९५३ साली पिलानी (राजस्थान) येथे स्थापन झालेल्या या संस्थेची कार्ये ढोबळपणे पुढील तीन मुख्य क्षेत्रांत विभागली आहेत : (१) खास उपयोगाच्या निर्यात नलिका व सूक्ष्मतरंग नलिकांवर विशेष भर, (२) अर्धसंवाहक प्रयुक्त्या [⟶ इलेक्टॉनीय प्रयुक्ति] व (३) इलेक्टॉनीय प्रणाली. अशा प्रकारे येथील संशोधनाची व विकासाची कामे देशापुढील भावी गरजांची पूर्ती करतील आणि भारतातील इलेक्ट्रॉनीय उद्योग स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन ठरतील.               

संस्थेची एक ⇨सूक्ष्मप्रक्रियक विकास प्रयोगशाळा, एक संगणक केंद्र व एक कार्यशाळा असून येथे संगणकाच्या मदतीने बृहद् व अतिबृहद् संकलित मंडलांचे अभिकल्प बनविणे, संकलित मंडलांच्या आच्छादनांची निर्मिती, काचकामासाठी फुंकण्याची क्रिया, धातूंवरील अंतिम संस्करण वगैरेंच्या सुविधा उपलब्ध आहेत.               


संस्थेची नवी दिल्ली व मद्रास येथे दोन विस्तार केंद्रे असून संशोधन व विकास कामांशिवाय ही केंद्रे आपापल्या भागातील उद्योगांना व इलेक्ट्रॉनिकीचा वापर करणाऱ्यांना तेथल्या तेथे मदत देतात.               

खास उपयोगांसाठी लागणाऱ्या निर्यांत नलिकांचे अभिकल्पन व विकास हे संस्थेचे महत्त्वाचे काम आहे. येथे स्थिर कंप्रतेचे परंपरागत असे खास उपयोगाचे कित्येक मॅग्नेट्रॉन विकसित करण्यात आले आहेत. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. (साहिबाबाद) या कारखान्याला इलेक्ट्रॉन नलिका उभारण्याच्या कामी संस्थेने तंत्रिक सल्ला दिला आहे.               

अर्धसंवाहक प्रयुक्तींविषयीच्या तंत्रविद्येच्या बाबतीतील एक उत्कृष्ट केंद्र म्हणून संस्थेची ख्याती आहे. संस्थेने भारतामध्ये सर्वप्रथम जाड पटलयुक्त संमिश्र (हायब्रिड) सूक्ष्ममंडले बनविली आहेत. संस्थेने बदलत्या धारितेच्या (व्हेरॅक्टर) द्विप्रस्थांच्या बनावटीची प्रक्रिया इष्टतम करून उत्पादन ८०% पर्यंत नेले आहे. उच्च विद्युत् दाब शक्ती ट्रॅंझिस्टर जोडून त्यांची प्रत्यक्ष क्षेत्रात चाचणी घेतली आहे. अशा प्रकारे विकसित केलेले तंत्रज्ञान व कुशलता संस्था इतर खाजगी वा सार्वजनिक उद्योगांना पुरविते.               

सागरी व खाण उद्योगांसाठी लागणारी आणि सूक्ष्मप्रक्रियांद्वारे वा सूक्ष्म संगणकाद्वारे नियंत्रित होणारी साधनसामग्री संस्थेने विकसित केलेली आहे. देशातील ३५ पेक्षा जास्त साखर कारखान्यांत ही सामग्री वापरण्यात येत आहे. नवी दिल्ली येथील केंद्रात विकसित केलेल्या सूक्ष्मक्रियावर आधारलेल्या ३२ वाहक तारांच्या दूरध्वनी विनिमय-केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे.               

भारतीय रेल्वेच्या विशिष्ट एंजिनांसाठी बनविलेल्या इलेक्ट्रॉनीय परिवर्तकाची चाचणी घेण्यात येत आहे, तर खाणकामातील इंजिनांच्या परिवर्तकाचा विकास करण्यात येत आहे. रंगीत दूरचित्रवाणी ग्राही पण येथे विकसित केलेला आहे. मद्रास केंद्राने अभिकल्पित व विकसित केलेल्या व्हायब्रोटोन उपकरणाला (खाद्यपदार्थांच्या डब्यातील निर्वात अवस्था तपासण्यासाठी बिनधोकपणे निर्वाताचे मापन करणाऱ्या उपकरणाला) इन्व्हेन्शन्स प्रमोशन बोर्ड अवॉर्ड मिळाले आहे. याच केंद्राने कागद उद्योगासाठी गुणवत्ता नियंत्रणाची उपकरण योजना विकसित केली आहे.               

संस्था ब्रॅडफर्ड विद्यापीठ (ब्रिटन) व कॅलिफोर्निया विद्यापीठ (बर्कली, अमेरिका) यांच्याशी संशोधन व विकासाच्या कामांत सहकार्य करीत आहे. संस्थेचा औद्योगिक अभियांत्रिकी का खंडित उत्पादन गट हा तंत्रविद्या प्रयोगशाळेकडून उद्योगाकडे हस्तांतरित करणाऱ्या मध्यस्थाचे काम करतो, तर संस्थेचा माहिती, योजना व संपर्क गट हा इतर संस्था, उद्योग व सहकारी विभाग यांच्याशी संपर्क ठेवतो आणि ग्रंथालय व नोंदणी गट हा वैज्ञानिकांना ज्ञान अद्ययावत राखण्यासाठी मदत करतो आणि चर्चासत्रे व परिषदा आयोजित करतो.             

सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIO) : १९५९ साली स्थापन झालेली ही प्रयोगशाळा चंदीगड येथे असून येथे वैज्ञानिक उपकरणांचे अभिकल्पन व विकास यांविषयीचे संशोधन करण्यात येते. इलेक्ट्रॉनिकी, प्रकाशकी, अनुप्रयुक्त भौतिकी, वैद्यकीय इलेक्ट्रॉनिकी, प्रक्रिया नियंत्रण, पृष्ठीय वैश्लेषिक उपकरणयोजना आणि पर्यावरणीय संनियंत्रण यांसारख्या विविध क्षेत्रांतील संशोधनाचे व विकासाचे काम येथे चालते. या क्षेत्रांतील असंख्य उपकरणे या प्रयोगशाळेने अभिकल्पित करून बनविली आहेत आणि यांसाठी लागणारे विशेष तंत्रज्ञान व्यापारी तत्त्वावर उत्पादन करण्यासाठी उद्योगांना पुरविण्यात आले आहे. आयातीला पर्याय म्हणूनच केवळ अशी उपकरणे येथे बनविण्यात येत नाहीत तर देशाचा आर्थिक व सामाजिक फायदा दृष्टीसमोर ठेवून ती बनविण्यात येतात. वैज्ञानिक उपकरणांच्या देशी उद्योगाच्या वाढीला या प्रयोगशाळेची खूप मदत झाली असून या प्रयोगशाळेने पुरविलेल्या विशेष तंत्रज्ञानामुळे अचूक उपकरणे व घटक यांचे उत्पादन करणारे पुष्कळ नवीन उद्योग देशात उभे राहिले आहेत.               

इलेक्ट्रॉनीय उपकरणयोजना व प्रणाली या क्षेत्रात संशोधन, अभिकल्प व विकास यांविषयीची अनेक उपकरणे तयार करण्यात आली आहेत. उदा., विविध अंकीय मापके [कंप्रता

⟶ पीएच मूल्य], घड्याळे, तापमानदर्शक, सूक्ष्म प्रक्रियकावर आधारलेला भट्टी तापमान नियंत्रक इत्यादी.               

वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत ही देशातील एकमेवाद्वितीय प्रयोगाशाळा असून तेथे अनेक वैद्यकीय उपकरणांविषयीचे (उदा., श्वासातील अल्कोहोलाचे विश्लेषण व गर्भाच्या हृदयाचे स्पंद संनियंत्रण करणारी उपकरणे) विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. तसेच या उपकरणांची दुरूस्ती व देखभाल करण्याची आणि औद्योगिक संघटनांना सल्ला देण्याची सोयही संस्थेने केली आहे. प्रकाशीय संशोधन, अभिकल्पन व विकासाद्वारे येथे अनेक प्रकाशीय उपकरणे व घटक बनविण्यात आले आहेत. उदा., बुद्‌बुद् कोठी [⟶ कण अभिज्ञातक] क्रमवीक्षक, सूक्ष्मपट वाचक, स्वयंचलित पारदर्शिका प्रक्षेपक वगैरे.               

वैश्लेषिक, यांत्रिक, धातुवैज्ञानिक प्रक्रिया व पर्यावरणीय प्रदूषण नियंत्रण यांसाठी लागणाऱ्या उपकरणांच्या अभिकल्पाचे व विकासाचे कामही येथे होते. अशा प्रकाराची अनेक उपकरणे बनविण्यात आली आहेत. उदा., पाण्याचे विश्लेषण करावयाचा उपकरण संच, अंकीय फेरेगणक, श्राव्यातीत कठिनता परीक्षक वगैरे. या प्रयोगशाळेने इलेक्ट्रॉन व आयन-शलाकांवर आधारलेली विविध उपकरणेही तयार केलेली आहेत. उदा., रासायनिक विश्लेषणासाठी इलेक्ट्रॉन वर्णपटदर्शक तसेच सूक्ष्म इलेक्ट्रॉनिकी, रासायनिक प्रक्रिया व धातुविज्ञान या क्षेत्रांत लागणारी उपकरणे.               

या प्रयोगशाळेने आता सूक्ष्म इलेक्ट्रॉनिकी, तंतू प्रकाशकी, अवकाश व संरक्षण−उपयोगी प्रकाशकी आणि कर्करोग चिकित्सेकरिता वैद्यकीय उपकरणे या क्षेत्रांतील सर्वाधिक सुविकसित अशी उपकरणे बनविण्याचे काम हाती घेतले आहे. स्विस फाउंडेशन फॉर टेक्निकल असिस्टन्स या प्रतिष्ठानाच्या मदतीने प्रयोगशाळेने १९६३ साली इंडो-स्विस ट्रेनिंग सेंटर सुरू केले असून त्याद्वारे परिशुद्ध उपकरण तंत्रविद्येचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी येथे तीन प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. तसेच उद्योग व संस्थांतील विशिष्ट लोकांसाठी प्रशिक्षणाची येथे सोय आहे.               

या प्रयोगशाळेद्वारे असंख्य उपकरणांसाठी दुरूस्ती, देखभाल, परीक्षण व अंशन परीक्षण या बाबतींत सेवा पुरविण्यात येतात. त्यासाठी तिची देशात विविध ठिकाणी नऊ सेवा व देखभाल केंद्रे आहेत. आपल्या खास क्षेत्रांच्या बाबतीतील (उदा., अभियांत्रिकीय अभिकल्प, मार्गदर्शी संयंत्र उभारणी) सल्ला-सेवा प्रयोगशाळा देते, आवश्यक ते विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उद्योगाद्वारे वा शासनाद्वारे पुरस्कृत केलेले प्रकल्पही प्रयोगशाळा हाती घेते.               

सीएसआयओ कम्युनिकेशन्स या त्रैमासिकद्वारे प्रयोगशाळा आपल्या येथील विकासकामाची माहिती प्रसिद्ध करते, डिरेक्टरी ऑफ सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट अँड काँपोनंट्स ही निर्देशिका प्रयोगशाळेने प्रसिद्ध केलेली असून तिच्यात उपकरणे व त्यांचे घटक तयार करणाऱ्या भारतीय उत्पादकांची माहिती दिलेली आहे.               


नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NGRI) : १९६१ मध्ये हैदराबाद येथे स्थापन झालेल्या या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : (१) पृथ्वीच्या शिलावरणाची संरचना आणि अवकाश व काल यांच्या संदर्भात झालेल्या त्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास यांविषयी नवीन माहिती मिळविणे, (२) खनिजसंपत्ती व भूमिजल यांच्या समन्वेषणाच्या पद्धती व उपकरणे तयार करणे भूकंप आणि संबंधित आविष्कार (उदा., ताणाखालील दगडी बांधकामे पडणे) यांच्यात उदभवणाऱ्या भौतिकीय प्रक्रियांचा अभ्यास करणे आणि (४) पृथ्वीच्या अंतरंगात विविध पातळ्यांवर असलेल्या खडकांच्या स्थानबद्दलाची व भौतिक गुणधर्मांची माहिती मिळविण्यासाठी विद्युत् चंबकीय, उष्मीय आणि गुरूत्त्वीय क्षेत्रांचे मापन करून विश्लेषण करणे. स्वतःच्या संशोधन व विकास या कार्यांशिवाय ही संस्था आपल्या तज्ञ सेवा इतर संघटनांना पुरस्काराच्या वा सहकार्याच्या तत्त्वावर पुढीलसारख्या कार्यासाठी उपलब्ध करून देते : भूमिजल, खनिजे, अभियांत्रिकीय समस्या, खाणकाम यांच्यासाठी यांच्यासाठी करावी लागणारी भूभौतिकीय सर्वेक्षणे गंभीर (खोल) भूकंपीय तरंगाचे परावर्तन मापन, हवाई भूमीतिकीय सर्वेक्षणे, खनिजसंपत्तीचे आकलन (अंदाज) करणे वगैरे.               

या संस्थेचे संशोधन व विकासाचे चालू प्रकल्प अशा तऱ्हेने आखण्यात आलेले आहेत की, विविध प्रकल्प गटांची फले एकत्रितपणे वापरून वरील उद्दिष्टे साध्य होतील. संस्थेत प्रत्यक्ष क्षेत्रात वापरावयाच्या भूभौतिकीय उपकरणांचा विकास करण्यात येत असून भूभौतिकीय समन्वेषणात अधिक खात्री व अचूकता येण्याच्या हेतूने विविध कार्यक्रम (उदा., कठीण खडकातील विभंग-पट्टे ओळखण्याच्या पद्धती) हाती घेण्यात आले आहेत. खनिजांसाठीच्या एकात्मिक समन्वेषण पद्धती प्रस्थापित करण्यासाठी अल्पकालीन प्रकल्प हाती घेतले आहेत (उदा., आंध्र प्रदेशातील कडप्पा द्रोणीचा).

भूजलविज्ञानाच्या क्षेत्रात जलभूत स्तरांच्या आकारमानाविषयी अंदाज करण्याच्या दृष्टीने कार्य चालू आहे. किनारी त्रिभुज प्रदेशातील जलभूत स्तरांमधील गोड्या व खाऱ्या पाण्यांमधील परस्परसंबंधाचा तसेच कडप्पा द्रोणीतील कुहरयुक्त कार्बोनेटी खडकांचा अभ्यास हाती घेण्यात येणार असून संतृप्त पट्‌ट्यातील भूमिजल प्रवाहाचे अध्ययन करण्यासाठी उपयोगी पडेल असे उपकरण विकसित करण्याची योजना आहे.               

संस्थेत विकसित केलेल्या अनेक उपकरणांचे औद्योगिक उत्पादन व विपणन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. खनिजे आणि भूमिजल यांच्या समन्वेषणासाठी ही उपकरणे देशातील अनेक संघटना वापरीत आहेत. त्यांच्यामुळे कमी खोलीवरील भूभौतिकीय समन्वेपणाची क्षमता वाढली आहे.               

संस्थेच्या हवाई सर्वेक्षण गटाने मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केल्याने हवाई भूभौतिकीय सर्वेक्षणाच्या क्षेत्रात देश स्वावलंबी झाला आहे तसेच समन्वेषणाद्वारे मिळालेल्या भूभौतिकीय प्रदत्ताचे अर्थबोधन करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण काम संस्थेने केले आहे.               

संस्थेने गंभीर भूकंपीय परावर्तनविषयक अध्ययन १९७२ साली सुरू केले. यामुळे भूकवचाच्या ठोकळ्यांची संरचना व मोहोरोव्हिसिक सीमेपर्यंतच्या (भूकवचाच्या तळापर्यंतच्या) थरांचे स्थानांतरण यांचे तपशीलवार रेखाटन करणे शक्य झाले आहे.               

ईशान्य भागातील छोट्या भूकंपाच्या विश्लेषणाद्वारे भूकंपाच्या प्रक्रियांचा भौतिकीच्या दृष्टीने अभ्यास करण्याचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला आहे. स्थान व काळ या बाबतींत अपेक्षित अचूकतेने भूकंप होण्याविषयी भाकीत करण्याची समाधानकारक पद्धती तयार करणे हा यामागील हेतू आहे. मोठ्या कृत्रिम जलाशयांमुळे उद्‌भवणाऱ्या भूकंपाविषयीची माहिती गोळा करण्यात येत आहे.               

संस्थने सागरी भूभौतिकीविषयक एक कार्यक्रम आखला आहे. हिंदी महासागरातील शिलावरणाचे गंभीर भूकंपीय परावर्तनांच्या साहाय्याने अध्ययन करणे आणि या शिलावरणाच्या संदर्भात हिंदी महासागरातील गुरुत्वीय व चुंबकीय विक्षेपांचे (त्रुटींचे) परीक्षण करणे हे या कार्यक्रमामागील हेतू आहेत.               

संस्थेत अनेक उच्च तांत्रिक सोयी आहेत. उदा., ट्रिटियम, कार्बन (१४), ⇨पुराचुंबकत्व इ. मोजण्याच्या सोयी, सूक्ष्मसंगणक प्रणाली, उच्च दाबाला असणारे खडकांचे भौतिकीय गुणधर्म व खडकांचा नैसर्गिक किरणोत्सर्ग (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याची क्रिया) यांचे मापन करण्याच्या सुविधा, खडकांचे वय मोजण्याची सुविकसित प्रयोगशाळा वगैरे.               

संस्थेच्या आवारात भूकंपवैज्ञानिक व भूचुंबकीय वेधशाळा पुष्कळ वर्षांपासून कार्यरत आहेत. हैदराबादजवळ चौतुप्पल तामिळनाडूतील एतैयपुरम येथेही वेधशाळा असून सर्व वेधशाळांतून मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या माहितीची आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाण करण्यात येते. संस्थेचे ग्रंथालय समृद्ध [२०० ज्ञानपत्रिका (जर्नल), ७,३०० बांधीव खंड व १२,६०० ग्रंथ] असून वेधशाळांच्या माहितीशिवाय संस्था जिओफिजिफल रिसर्च बुलेटीन हे त्रैमासिक प्रसिद्ध करते. दाब स्त्रोतशास्त्र व भूरसायनशास्त्र, अंकीय भूकंपी कार्यक्रम-संच (सॉफ्टवेअर), संगणक साहाय्यित अभिकल्प वगैरे क्षेत्रांत संस्थेने महत्त्वाकांक्षी भावी कार्यक्रम आखले आहेत. [⟶ भूभौतिकी].               

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) : १९६६ साली पणजी येथे स्थापन झालेल्या य संस्थेची प्रमुख उद्दिष्टे अशी ओहत : भारताभोवती असलेल्या समुद्रातील सजीव व निर्जीव साधनसंपत्तीचे समन्वेषण करणे आणि समुद्रातील साधनसंपत्तीचा समुपयोग करण्यासाठी तंत्रविद्येचा विकास करणे. हिंदी महासागराविषयींच्या माहितीचे मध्यवर्ती केंद्र होण्याचा या संस्थेचा हेतू आहे. अंटार्क्टिका महासागर व त्यातील साधनसंपत्ती यांविषयी महासागर वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी अंटार्क्टिक संशोधनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात आणि सागरतळावरील खनिजांविषयीच्या कार्यक्रमात संस्था सक्रियपणे भाग घेते. संस्था संशोधन व विकासाचे पुरस्कृत प्रकल्पही हाती घेते आणि समुद्राशी निगडित असलेल्या समस्यांच्या बाबतीत सल्लागारी सेवा पुरविते.               

संस्थेची संशोधन व विकासाची कामे भौतिकीय महासागरविज्ञान, रासायनिक महासागरविज्ञान, जैव महासागरविज्ञान, सागरी प्रदूषण, भूवैज्ञानिक महासागरविज्ञान वगैरे १२ विभागात/शाखांत विभागलेली असून हिची मुंबई, कोचीन व वॉल्टेअर येथे विभागीय केंद्रे आहेत. संस्था स्वतःचे ‘गवेषणी’ आणि महासागरविकास खात्याचे व संस्थेच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाखालील ‘सागर कन्या’ या संशोधन जहाजांच्या मदतीने महासागराच्या संशोधनाचे कार्य करते.               

जादा सागरी अन्ननिर्मितीच्या दृष्टीने सागरी सजीव साधनसंपत्तीचे सर्वेक्षण, मासेमारीची नवीन ठिकाणे शोधणे आणि झिंगे, मृदुकाय प्राणी व समुद्रतृण यांच्या संवर्धनाची तंत्रे विकसित करणे, हा येथील संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहे. सागरी पर्यावरणातील नैसर्गिक व मानवाद्वारे होणाऱ्या बदलांच्या संदर्भात जीववैज्ञानिक प्रक्रियांचा अभ्यास करण्यात येतो. सागरी खनिजांच्या समन्वेषणासाठी संस्था विविध प्रकारे भूवैज्ञानिक व भूभौतिकीय अनुसंधाने करते. यातून अनेक धातूंनी युक्त गोटे व इल्मेनाइटाचे साठे यांचा शोध लागला व काही विशिष्ट प्रकारचे नकाशे बनविता आले. संस्थेने पाण्याखालील सर्वेक्षणही केली आहेत. फोरॅमिनीफेरांचे अध्ययन केले गेले आहे.               


कार्बनी रसायने व औषधी द्रव्य मिळविण्याच्या दृष्टीने उपयुक्त सागरी जीवांचा शोध संस्था घेते. महत्त्वाच्या पोषक व इतर रासायनिक घटकांची वाटणी कशी झाली आहे, याचा अभ्यास संस्था करते. कारण जीवांच्या उत्पत्तीशी या घटकांचा संबंध असतो. प्रदूषक पदार्थ, प्रदूषणाचे कारण व त्याचा सागरी जीवांवरील परिणाम यांच्या अध्ययनाद्वारे संरक्षक उपाय योजून सागरी पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे प्रयत्न संस्था करते. नदीमुखांतील व किनारी भागातील नौकानयन सुरक्षितपणे करता येण्यासाठी किनाऱ्यावरील होणाऱ्या झिजेचे नियंत्रण करण्याचे प्रयत्न केले जातात.               

समुद्र, जमीन-समुद्र आणि हवा-समुद्र यांच्या दरम्यान होणाऱ्या आंतरक्रिया तसेच खालच्या पातळीवरून पाणी वरच्या पातळीकडे येण्याची क्रिया यांमध्ये उद्‌भवणाऱ्या भौतिकीय प्रक्रियांचा अभ्यास संस्था करते. मॉन्सून वारे, चक्री वादळे, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, वादळी लाटा वगैरेंविषयीची माहिती यातून मिळते.               

संस्थेच्या उपकरणयोजना कार्यक्रमात महासागरवैज्ञानिक (विशेषकरून सूक्ष्मप्रक्रियक प्रणालीवर आधारलेल्या) उपकरणांचे अभिकल्प, विकास व जुळणी यांविषयीचे काम हाती घेण्यात आले आहे. येथे विकसित करण्यात आलेली हवामानाचा मागोवा घेणारी एक स्वयंचलित प्रणाली अंटार्क्टिकावर उभारण्यात आली असून इतरही खास उपकरणे येथे बनवण्यात आली आहेत. उदा., प्रवाहमापक, पाण्यातील तापमापक, लवणतापमापक इत्यादी. संस्थेचे संगणक केंद्रही या विभागाला जोडलेले आहे.               

जहाजाच्या पाण्यातील भागाला सागरी प्राणी चिकटून होणारे नुकसान तसेच सागरी पाण्यात लाकूड कुजणे व धातू गंजणे यांविषयीची माहिती येथे गोळा केली जाते. संस्थेतील प्रशिक्षण विभागाची प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना आहे. द इंडियन नॅशनल ओशनोग्राफिक डेटा सेंटर हे संस्थेचे केंद्र हिंदी महासागराविषयीची माहिती मिळविण्याचे, ती साठविण्याचे व तिचा प्रसार करण्याचे केंद्र आहे. जगातील अशा केंद्रांशी संपर्क राखणे, सूक्ष्मसंदर्भ ठेवणे, माहिती प्रकाशित करणे इ. कामेही हे केंद्र करते. संस्थेचे सु. ३०० संशोधन ज्ञानपत्रिका असलेले सुसज्ज ग्रंथालय आहे.               

विशेषतः महाराष्ट्र व गुजरात लगतच्या भागातील प्रदूषण नियंत्रणाचा अभ्यास हे मुंबईच्या विभागीय केंद्राचे वैशिष्ट्य आहे तसेच या भागातील महासागरवैज्ञानिक अध्ययनही येथे होते. आंतरराष्ट्रीय हिंदी महासागर मोहिमेत गोळा केलेले प्राणिप्लवकांचे (जलाशयाच्या भिन्न थरांत राहून प्रवाहाच्या गतीबरोबर वाहत जाणाऱ्या प्राण्यांचे) नमुने कोचीनच्या विभागीय केंद्रात ठेवले आहेत. शिवाय या केंद्रात केरळातील प्रतिप्रवाहांचे परिस्थितीविज्ञान, प्रदूषणाच्या काही बाबी, प्राणिसंवर्धन (उदा., झिंगे), किनाऱ्याची झीज इत्यादींविषयीचे संशोधनकार्यही चालते. वॉल्टेअर व त्यालगतच्या किनारी प्रदेशाजवळील सागरी क्षेत्राचे भूभौतिकीय अध्ययन हे वॉल्टेअर विभागीय केंद्राचे वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. पोर्ट ब्लेअर, मद्रास व गुजरात येथे विभागीय केंद्रे उघडण्याची संस्थेची योजना आहे.               

इंटरगव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक कमिशन, यूनेस्को यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांकडून मदत मिळणाऱ्या प्रकल्पांतही ही संस्था सहभागी होते. महासागर व एन आय ओ न्यूजलेटर ही त्रैमासिके, कलेक्टेड रिप्रिंट्‌स (संस्थेतील कर्मचारी वर्गाने प्रसिद्ध केलेल्या संशोधन निबंधाचा संग्रह) हे वार्षिक अहवाल संस्था प्रसिद्ध करते. [⟶ महासागर व महासागरविज्ञान].              

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) : १९५० साली पुण्याला स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेने रसायनशास्त्र व रासायनिक अभियांत्रिकी यांच्या प्रगत अध्ययनाला वाहून घेतले आहे. सु. १९७५ पर्यंत औद्योगिक दृष्ट्या तातडीचे असलेले अल्पकालीन प्रकल्प, तर तदनंतर दीर्घकालीन सामाजिक व औद्योगिक महत्त्वाचे प्रकल्प संस्थेने हाती घेतले होते. आता या दोन्हींत समतोल साधण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मूलभूत संशोधन हेही प्रयोगशाळेच्या एकूण कार्यक्रमाचा भाग असून त्यालाही प्रोत्साहन देण्यात येते.

               

येथील संशोधन व विकासाची कामे रसायनशास्त्राच्या पुढील आठ विभागांत केली जातात : जीवरसायनशास्त्र, अकार्बनी कार्बनी (संश्लेषित वा कृत्रिम), कार्बनी (नैसर्गिक पदार्थ), बहुवारिक (साध्या रेणूंच्या संयोगाने बनलेल्या प्रचंड रेणूंचा पदार्थ), रासायनिक अभियांत्रिकी, प्रक्रिया-विकास आणि भौतिक रसायनशास्त्र. या खेरीज नियोजन, समन्वय, मूल्यमापन, संपर्क व प्रसिद्धी यांविषयची कामे पहाण्यासाठी तांत्रिक सेवांचा स्वतंत्र विभाग आहे.               

उत्प्रेरणासंबंधीच्या संशोधनाचा उपयुक्त व अखंड कार्यक्रम राबविणारी ही देशातील एक अग्रेसर संस्था आहे. येथे विकसित झालेल्या पुष्कळ उत्प्रेरण प्रक्रिया उद्योगांत वापरल्या जात आहे. येथे ‘एन्सिलाइट’ नावाच्या झिओलाइट उत्प्रेरकांचा नवा वर्गच विकसित करण्यात आला आहे. तसेच डायमिथिल-ॲनिलिनाच्या उत्पादनाची सुधारित उत्प्रेरकी प्रक्रियाही या प्रयोगशाळेने सिद्ध केली आहे.               

औषधी व मध्यस्थ औषधीद्रव्ये यांचे संशोधन हे या प्रयोगशाळेचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. ज्ञात औषधांच्या उत्पादनाचे नवे, कल्पक व कमी खर्चाचे संश्लेषण मार्ग शोधण्यावर भर देण्यात येतो. अशा प्रकारे येथे विकसित झालेले तंत्रज्ञान इतरत्र वापरले जात आहे. औषधांप्रमाणे कृषिरसायनांच्या येथे विकसित झालेल्या तंत्रांचा इतरत्र व्यापारी तत्त्वावर वापर होत आहे.              

बहुवारिकांचे विज्ञान व अभियांत्रिकी यांविषयीच्या संशोधनाचे पुढील हेतू आहेत : धातू व मिश्रधातूंच्या ऐवजी वापरावयाची बहुवारिके मिश्रबहुवारिके बनविणे, परत मिळविता येणाऱ्या साधनसंपत्तीपासून बहुवारिके बनविण्याच्या प्रक्रिया विकसित करणे आणि बहुवारिकांचे वर्तन समजण्यासाठी त्यांच्या मूलभूत गुणधर्मांचा अभ्यास करणे. बहुवारिकांविषयीच्या येथील काही प्रक्रिया उद्योगधंद्यात वापरल्या जात आहेत, काही प्रक्रिया विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत, काही प्रक्रिया व्यापारी तत्त्वावरील उत्पादनासाठी विकसित केल्या जात आहेत आणि काही विशिष्ट बहुवारिकांसाठी प्रकिया विकसित करण्याची योजना आहे. या क्षेत्रातील काही महत्त्वाचे प्रकल्प खनिज तेल क्षेत्र बहुवारिके, जलशोषक बहुवारिके, नियंत्रितपणे सोडता येणारी पीडकनाशके, अभियांत्रिकीय प्लॅस्टिके, मोक्याची बहुवारिके वगैरेंविषयीचे आहेत.               

धान्याच्या व नगदी पिकांच्या श्रेष्ठतर वाणांचा विकास करणे, हा येथील वनस्पति-ऊतक संवर्धनविषयक [⟶ ऊतक संवर्धन] अभ्यासाचा हेतू आहे. विशेषतः पिके नष्ट करणारे व्हायरस व रोगकारक किडी यांचा नाश करणे, गर्भ-संवर्धन व उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणांत आकस्मिक बदल होणे) यांद्वारे वनस्पति-प्रजनन करणे आणि सूक्ष्म-अभिवृद्धीद्वारे नव्या प्रकारांचे गुणन करणे यांसाठी हा अभ्यास केला जातो. यात प्रयोगशाळेला यश आले आहे. उदा., साग, निलगिरी, डाळिंबे, वेलदोडा, हळद व आले यांच्या सूक्ष्म-अभिवृद्धीतील यश, मका व ज्वारीपासून अंकुरणक्षम कीण-संवर्ध सर्वप्रथम या प्रयोगशाळेने वेगळे केले, तसेच गव्हात सुधारणा करण्याच्या कार्यक्रमांत ऊतक संवर्धन वापरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.               

जगातील संघटना व विख्यात विद्यापीठांनी या प्रयोगशाळेला संशोधनाचे प्रगत केंद्र म्हणून मान्यता दिली असून आंतरराष्ट्रीय सहकार्य हे हिचे एक महत्त्वाचे कार्य बनले आहे. उदा., उष्णता पंपाच्या विकासासाठी सॉलफर्ड विद्यापीठाने (ब्रिटन) हिच्याची सहकार्य केले आहे.               


येथे आधुनिक वैश्लेषिक आणि संगणनविषयक सोयी आहेत. उदा., क्रमवीक्षक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, उत्प्रेरक चाचणी यंत्र, प्रगत एसएन−२३ संगणक प्रणाली वगैरे. येथील वैज्ञानिकांना अनेक पुरस्कार, पदके, पारितोषिके व अधिछात्रवृत्त्या मिळाल्या आहेत. उदा., होमी जे. भाभा पुरस्कार, के. जी. नाईक सुवर्णपदक, शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक इत्यादी.               

सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CECRI) : १९५३ साली कराईकुडी येथे स्थापन झालेल्या या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट विद्युत् रसायनशास्त्र आणि विद्युत् रसायन तंत्रविद्या यांविषयीचे औद्योगिक व अनुप्रयुक्त संशोधन करणे हे आहे. आतापर्यंत आयात कराव्या लागणाऱ्या उत्पादनांसाठीच्या प्रक्रिया आणि देशाच्या गरजांना अनुरूप व समर्पक अशा नवीन प्रक्रिया विकसित करण्याच्या दृष्टीने हे संशोधन करण्यात येते. येथील संशोधन व विकास यांच्या कामांचे नऊ विभाग आहेत : (१) विद्युत्‌ घटमाला व विद्युत्‌ उद्‌गम, (२) विद्युत्‌ जल धातुविज्ञान, (३) विद्युत्‌ रासायनिक सामग्रीविज्ञान व विद्युत्‌ भौतिकी, (४) विद्युत्‌ उत्ताप धातुविज्ञान, (५) विद्युत्‌ रसायने, (६) विद्युत्‌ रासायनिक उपकरणयोजना आणि साधन सामग्री यांचे अभिकल्प, (७) औद्योगिक धातूंवरील अंतिम संस्करण, (८) संक्षारणाचे (गंजण्यासंबंधीचे) विज्ञान व अभियांत्रिकी आणि (९) आंतरशास्त्रीय विद्युत्‌ रसायनशास्त्र (उदा., विद्युत्‌ जीवविज्ञान). सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांतील संघटनांनी पुरस्कृत केलेल्या संशोधनाला संस्था अग्रक्रम देते. संस्थेने विकसित केलेल्या प्रक्रिया तसेच इतर विद्युत्‌ रासायनिक व संबंधित समस्या यांबाबतीत संस्था उद्योगांना सल्लागारी सेवा पुरविते.               

संस्थेने अनेक द्रव्यांसाठी (उदा., विद्युत्‌ विच्छेद्य मॅग्नेशियम, लेड डाय-ऑक्साइड विद्युत्‌ अग्रे इ.) मार्गदर्शी संयंत्राच्या पातळीपर्यंतचा अभ्यास केला आहे. समुद्राच्या लवणशेषापासून मॅग्नेशियम धातूचे विद्युत्‌ विच्छेदनाद्वारे उत्पादन करण्याचे व्यापारी संयंत्र तसेच गॅलियम मिळविण्याचे प्रयोगशाळेच्या पातळीवरचे संयंत्र संस्था उभारीत आहे. टिटॅनियम आधारद्रव्याची अविद्राव्य धनाग्रे विकसित करून संस्थेने मोठा पल्ला गाठला आहे. दाहक (कॉस्टिक) सोडा व क्लोरेट यांच्या उत्पादनात देशी बनावटीची विद्युत्‌ अग्रे वापरल्याने ऊर्जा कमी लागते असे दिसून आले आहे. संस्थेने ब्रह्मदेशात कॅल्शियम कार्बाइडाचे संयंत्र उभारून ते सुरू करण्याच्या कामी सल्ला देऊन मदत केली आहे.               

संस्थेने हवा विध्रुवणकारी घटांसाठी सच्छिद्र विद्युत्‌ अग्रे बनविली असून कमी तापमानाला चालणाऱ्या शिसे-अम्ल विद्युत्‌ घटमालांचे नियमित उत्पादन होत आहे आणि इतर विद्युत्‌ घटमाला (उदा., निकेल-कॅडमियम, चांदी-जस्त) प्रणालीही संस्थेने विकसित केल्या असून इतर काही (उदा., जस्त-क्लोरीन, सोडियम-गंधक) विकसित करण्यात येत आहेत. कार्बनी रासायनिक उत्पादनाच्या (उदा., कॅल्शियम ग्लुकोनेट) क्षेत्रात परिभ्रमी विद्युत्‌ अग्र तंत्राचा वापर हे संस्थेचे महत्त्वाचे कार्य होय.               

विद्युत्‌ विच्छेद्य क्रोमियमाचे उत्पादन, कथिलाच्या मोडीतून कथिल व जस्ताच्या राखेपासून जस्त परत मिळविणे आणि धातूची चूर्णे बनविणे यांविषयीच्या प्रक्रिया संस्थेने विकसित केल्या आहेत. सोडियम धातू, मिश मिश्रधातू यांचे अशा प्रकारे नियमित उत्पादन होत आहे.               

येथे विविध संक्षारणरोधक पदार्थ व प्रक्रिया तयार करण्यात आल्या असून काहींचे नियमितपणे व्यापारी उत्पादन होत आहे. प्रबलित सिमेंट काँक्रीटमधील पोलाद, ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंची विद्युत् अग्रे वगैरेंसाठी त्यांचा उपयोग होतो. संक्षारणविषयक काही प्रमुख प्रकल्प व पुरस्कृत प्रकल्प यांविषयीचे काम चालू आहे.               

विद्युत्‌ रासायनिक सामग्रीविज्ञानाच्या आणि विद्युत्‌ भौतिकीच्या क्षेत्रात विकसित केलेल्या प्रकिया फॉस्फोर (शोषिलेल्या प्राथमिक ऊर्जेपैकी काही भागाचे उत्सर्जित प्रदीप्त प्रारणात रूपांतर करणारी द्रव्ये), अवरक्त अभिज्ञातक (अवरक्त प्रारणाचे अस्त्वित्व ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रयुक्त्या) व टिन ऑक्साइड विद्युत् रोधक यांच्या विकासाशी निगडित आहेत. कॅडमियम सल्फाइडाचे प्रकाश-संवाहक विद्युत् घट लघू उद्योग क्षेत्रात तयार करण्यात येत आहेत. बहुजिनसी सौर विद्युत् घटांविषयी येथे संशोधन होत आहे.               

अगंज पोलादावर तांब्याचा लेप देण्याची येथील प्रक्रिया उद्योगात वापरात असून ॲल्युमिनियमाच्या तारेवर निकेलाचे अखंडपणे बिलेपन करणाऱ्या संयंत्राचा अभिकल्प बनवून त्याची जुळणी करण्यात आली आहे. अंतिम संस्करण क्षेत्रात धातूवर विद्युत्‌ रासायनिक अंकन करण्याची प्रक्रिया येथे तयार केली आहे. पर्यावरणातील प्रदूषणाच्या नियमनाच्या अध्ययनात उपयुक्त अशी विवेचक विद्युत्‌ अग्रे संस्थेने बनविली आहेत. भारतीय मानकाच्या विनिर्देशनानुसार शिसे-अम्ल विद्युत् घटमालांचे परीक्षण संस्था करते. मंडपम्‌ कॅंप येथे उष्ण कटिबंधीय संक्षारण-परीक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.               

संस्थेत दरवर्षी कित्येक अल्पकालीन अभ्यासक्रम घेण्याची सोय आहे. तसेच बाहेरील संघटनांद्वारे पुरस्कृत असे अभ्यासक्रमही ही संस्था चालविते. १९८५ पासून पूर्वीच्या चार नियतकालिकांचे एकत्रीकरण करून बुलेटीन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे द्वैमासिक चालू करण्यात आले आहे. संघटना उद्योजकांची संमेलने भरविते व विद्युत् रसायन-शास्त्राची चर्चासत्रे घेते. मदुराई कामराज विद्यापीठ आणि अलगप्पा अभियांत्रिकी व तंत्रविद्या महाविद्यालय (कराईकुडी) येथील विद्युत् रासायनिक अभियांत्रिकीचे उद्योगप्रवण पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम घेण्याच्या कामात ही संस्था सहकार्य देते.               

सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट (CSMCRI) : भावनगर येथे १९५४ साली स्थापण्यात आलेल्या या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट पुढील चार क्षेत्रातील मूलभूत व अनुप्रयुक्त अशा संशोधन या विकासाची कामे करणे हे आहे : (१) लवण (मीठ) आणि इतर संबंधित अकार्बनी रसायने, (२) मचूळ व सागरी पाण्याचे निर्लवणीकरण, (३) सागरी शैवलांचे सर्वेक्षण, संवर्धन व उपयोग करून घेणे आणि (४) औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा देशी व विदेशी वनस्पती तसेच लवण वनस्पती यांची लागवड करून किनारी भागातील वालुकामय उंचसखल भाग व लवणमय मृदा यांचा सदुपयोग करून घेणे.               

संस्थेचे संशोधन व विकास याविषयीचे कार्य नऊ विभागांत विभागले असून मंडपम्‌ (तामिळनाडू) व बेऱ्हामपूर (ओरिसा) येथे संस्थेची क्षेत्रीय केंद्रे आहेत. शिवाय ओखा, झांजमेर, हाताब व नारी ही प्रायोगिक स्थळे असून त्यांची व्यवस्था भावनगरहून पाहण्यात येते.               

ब्रोमीन, पोटॅशियम खते, उच्चतापसह दर्जाचे मॅग्नेशिया, व्युत्क्रमी तर्षण, विद्युत्‌ अपोहन [⟶ पाणीपुरवठा] वगैरेंची मार्गदर्शी संयंत्रे संस्थेने बनवून चालवून पाहिली आहेत तर पोटॅशियम क्लोराइडाचे असे संयंत्र चालवून पहाण्यात येत आहे.


संस्थेच्या संशोधनाचा व विकास कार्याचा लाभ लवण व सागरी रसायन उद्योगांप्रमाणेच शैवले व इतर वनस्पती यांचा कच्चा माल म्हणून वापर करतात अशा उद्योगांनाही आपल्या उत्पादनांची गुणवत्ता व उत्पादन सुधारण्यासाठी झाला आहे. संस्थेच्या कार्यामुळेच भारताचे दर एकक क्षेत्रफळामागील मिठाचे सरासरी उत्पन्न पुष्कळ वाढले आहे. विविध दर्जाचे मीठ (उदा., औद्योगिक, दुग्धव्यवसायातील) आता देशातच तयार होते. अशाच प्रकारे शैवल-रसायने (आगर-आगर, अल्जिनिक अम्ल) व औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची सिलिकेटेही आता देशात बनू लागली आहेत. संस्थेच्या अनेक प्रक्रिया आता उद्योगधंद्यात वापरल्या जात आहेत (उदा., ब्रोमीन, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट वगैरेसाठीच्या प्रक्रिया). सौर ऊर्जेवर चालणारे ऊध्वर्पातन (द्रवाचे बाष्पात रूपांतर करून आणि मग ते थंड करून द्रवीभवन करणारे) यंत्रही संस्थेने तयार केले आहे.               

हल्लीचे येथील प्रमुख संशोधन प्रकल्प हे सौर मिठागरे (खाऱ्या पाण्याचा कमाल उपयोग करून घेणे), लवण अभियांत्रिकी (यांत्रिकीकरण, नवीन यंत्रसामग्री, परंपरागत साधनात सुधारणा), पटल तंत्रविद्या (सागरी पाण्याचे सरळ ऊध्वर्पातन करण्यासाठी लागणारी पटले बनविणे) व उत्प्रेरण (उत्प्रेरण प्रणालींचा विकास) यांच्याशी निगडित आहेत.            

संस्था आंतरराष्ट्रीय (स्वायत्त सौर वीज केंद्र) व राष्ट्रीय (ग्वायूल व होहोबा या वनस्पतींचे अनुसंधान) सहकारी प्रकल्पात भाग घेते. लवण, पाणी व मृदा नमुने, सोडा ॲश, चुनखडक, खनिजे, खास रेझीन इत्यादींच्या परीक्षणाचे व विश्लेषणाचे काम संस्था करते. क्ष-किरण विवर्तन विश्लेषणाचे, चूर्णाचे पृष्ठफळ निश्चित करणे, सूक्ष्म दर्शकीय मापनाद्वारे कणाचे आकारमान ठरविणे वगैरेसाठी संस्थेत सोयी उपलब्ध आहेत. सीएसएमसीआरआय न्यूज लेटर हे त्रैमासिक संस्था प्रसिद्ध करते.               

रिजनल रिसर्च लॅबोरेटरी – (RRL), हैदराबाद : ही प्रयोगशाळा १९५६ साली कौन्सिलच्या अखत्यारीखाली आली. या प्रयोगशाळेचे बहुतेक कार्य हे अनुप्रयुक्त स्वरूपाचे असून पुढील हेतू साध्य करण्यासाठी ते केले जाते : विशिष्ट तंत्रज्ञानाचा विकास करणे, रासायनिक व तत्संबंधित उद्योग उभारण्यास मदत करणे आणि विशेष करून आंध्र प्रदेश व त्यालगतच्या प्रवेशात आढळणाऱ्या देशी कच्च्या मालाचा उपयोग करून घेणे.               

या प्रयोगशाळेने पुढील उद्दिष्टे समोर ठेवली आहेत : (१) मुख्यतः देशी कच्चा माल, साधनसंपत्ती व कुशलता यांचा आधार घेऊन या प्रयोगशाळेने तयार केलेल्या प्रक्रिया, उत्पादने, अभिकल्प आणि अभियांत्रिकीय विशेष ज्ञान यांच्यावर आधारलेले उद्योग उभारण्यास मदत होईल अशा प्रकारचे रासायनिक व संबंधित क्षेत्रातील संशोधनाचे आणि विकासाचे कामे करणे (२) देशाच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीसाठी वैज्ञानिक व तांत्रिक माहिती पुढील प्रकारे पुरविणे : (अ) सध्या असलेल्या व्यापारी संयंत्रांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तांत्रिक साहाय्य करून, (आ) सुसज्ज औद्योगिक संशोधन प्रयोगशाळेच्या सुविधा पुरवून, उदा., उद्योजकांना मार्गदर्शक संयंत्रांची सोय उपलब्ध करून देऊन, (इ) चालू व विस्ताराच्या कार्यक्रमांच्या संदर्भात तांत्रिक क्षमता व तज्ञता विकसित केली आहे, त्या क्षेत्राच्या बाबतीत केंद्रीय व राज्य शासनांना सल्ला देणे आणि (४) ज्या क्षेत्रांतील ज्ञानाच्या प्रगतीत येथील शास्त्रज्ञ महत्त्वाची भर टाकू शकतात, त्या क्षेत्रांतील मूलभूत संशोधनाचे काम करणे.              

कार्बनी रसायनशास्त्र (दगडी कोळसा, तेले आणि वसा, पृष्ठलेपन द्रव्ये), अकार्बनी रसायनशास्त्र व उत्प्रेरण रासायनिक अभियांत्रिकी (सदृशीकरण, पर्याप्तीकरण व नियंत्रण), यांत्रिक अभियांत्रिकी (अभिकल्प व विकास), कीटकविज्ञान, विषविज्ञान वगैरे येथील प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. रासायनिक उद्योगांच्या दृष्टीने प्रयोगशाळेने कार्बनी रसायने व मध्यस्थ पदार्थ (उदा., बेंझिल गटाची रसायने) यांविषयी महत्त्वाचे संशोधन कार्य केले आहे. या प्रयोगशाळेने विकसित केलेले विशिष्ट तंत्रज्ञान, प्रक्रिया, अभिकल्प, मूलभूत अभियांत्रिकी इत्यादींचा वापर करून अनेक तऱ्हेची रसायने (उदा., ग्लायॉक्झाल, मोनोक्लोरोॲसिटिक अम्ल), फॉस्जीन, पीडकनाशके (उदा., मोनोक्रोटोफॉस, डायझिनॉन), तणनाशके (उदा., ब्युटाक्लोर), औषधी द्रव्ये (उदा., डायझेपाम, ट्रोमारिल) वगैरेंचे उत्पादन करण्यात येत आहे.               

धूररहित घरगुती इंधन बनविण्यासाठी कमी प्रतीच्या कठीण वा मंद दगडी कोळशाचे कमी तापमानाला कार्बन समृद्धीकरण करण्याविषयी विस्तृत अध्ययन करण्यात येत आहे. यावर आधारलेले व ९०० टन कोळसा प्रतिदिनी वापरणाने व्यापारी संयंत्र सिंगारिनी कोलायरीज कंपनीने नासपूर (आंध्र प्रदेश) येथे उभारले आहे. संपूर्ण वायूकरणाचे मार्गदर्शी संयंत्रही संस्थेने उभारले असून त्या भागातील दगडी कोळशाचे परीक्षण तेथे करण्यात येते. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे मोठ्या संयंत्रांचा अभिकल्प तयार करण्यात येईल.               

तेले व वसा आणि पृष्ठलेपन यांविषयीचेही प्रयोगशाळा हे एक प्रमुख संशोधन केंद्र आहे. विपुल प्रथिनयुक्त सरकीचे पीठ बनविण्याची प्रक्रिया येथे विकसित केली असून हायड्रोजनीकृत व निर्जलीकृत एरंडेल, संक्षारणरोधी रंगलेप, लेपद्रव्ये इत्यादींसाठी लागणारी विशिष्ट तंत्रज्ञान येथे संशोधनातून विकसित झाले आहे.               

खनिज उत्पादने आणि अकार्बनी रसायने या क्षेत्रांत दगडी व लोणारी कोळसा आणि नारळाची करवंटी यांपासून सक्रियित कार्बन बनविण्याची तंत्रविद्या संस्थेने विकसित केली आहे. करवंटीवर आधारित असे संयंत्र हैदराबादला उभारले आहे. स्थानिक भागात उपलब्ध अशा मृत्तिकांचा विरंजक मृत्तिका, गाळणक्रिया इत्यादींसाठी वापर करण्याच्या पद्धती तसेच अनेक अकार्बनी रसायने (उदा., सोडियम अझाइड, निर्जल कॅल्शियम सल्फेट इ.) बनविण्याचे विशिष्ट तंत्रज्ञान येथे विकसित केले आहे. या प्रयोगशाळेने विकसित केलेल्या विशिष्ट तंत्रज्ञानानुसार थेरूबाली (ओरिसा) येथे सिलिकॉन कार्बाइडाचे संयंत्र उभारले आहे. पोलाद व बीड यांवर काचेचे अस्तर देण्याची प्रक्रिया, विविध उत्पादनांच्या (उदा., सूक्ष्मतरंग फेराइट) प्रक्रिया व खास प्रकारच्या (उदा., दस्तऐवज, चित्रकला, गाळणी यांकरिता वापरण्यात येणाऱ्या) कागदांसाठीचे विशिष्ट तंत्रज्ञान येथे विकसित केले आहे.               

अभिकल्प व अभियांत्रिकी या क्षेत्रांतही संस्था संशोधन करते. येथे प्रक्रिया विश्लेषण व संश्लेषण यांसाठी संगणकीय पद्धती वापरल्या जातात. सर्वसाधारण प्रदत्त संस्करण आणि कार्यक्रम-संच विकास यांबाबतीत संस्था नोसिल, लार्सन अँड टूब्रो इ. विख्यात संघटनांना सल्लागारी सेवा पुरविते. संशोधन कार्यक्रम सूत्रबद्ध करणे, कामाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे, तांत्रिक-आर्थिक अहवाल तयार करणे व तंत्रविद्येच्या हस्तांतरणावर लक्ष ठेवणे यांसाठीची मूलभूत माहिती संस्थेतील संशोधन, नियोजन व समन्वय गट देतो.

               

मार्गदर्शी संयंत्र, कार्यशाळा, उपकरण योजनाविषयक सुविधा व विविध एकक क्रिया करण्यासाठी लागणारी सामग्री या दृष्टीने ही प्रयोगशाळा सुसज्ज आहे. काही विशेष सुविधाही येथे उपलब्ध आहेत उदा., द्रव्यमान वर्णपटमापक, अंकीय संगणक वगैरे.               

रिजनल रिसर्च लॅबोरेटरी (RRL) जोरहाट : १९५९ साली स्थापलेल्या या प्रयोगशाळेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : (१) भारताच्या ईशान्य प्रदेशातील प्रचंड साधनसामग्रीचा प्रभावीपणे उपयोग करून घेणे व या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करणे, (२) या प्रदेशापुढील संशोधनाचे प्रश्न सोडविण्यास मदत करणे आणि (३) या प्रदेशाचा औद्योगिक विकास व औद्योगिकीकरण यांना मदत होईल असे दीर्घकालीन प्रश्न हाती घेणे. ज्यांकडे खास लक्ष द्यावे लागेल अशा प्रश्नांच्या बाबतीत ही प्रयोगशाळा या भागातील केंद्रशासित प्रदेश व राज्ये यांच्या संघटना आणि राष्ट्रीय प्रयोगशाळा यांच्यात दुवा जोडण्याचे कामही करते.               


येथील संशोधन व विकासाची कामे अनुप्रयुक्त स्थापत्य अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, दगडी कोळसा, औषधी व आर्थिक महत्त्वाच्या वनस्पती, कागद, खनिज तेल व नैसर्गिक वायू वगैरे सु. ५७ क्षेत्रात संघटित केली आहेत. या प्रदेशातील खनिजे, कृषि-औद्योगिक, वन आणि ऊर्जा या साधनसंपत्तीचा पर्याप्तपणे उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने प्रयोगशाळा उत्पादने व प्रक्रिया विकसित करते उदा., मृत्तिकेपासून ॲल्युमिनियम सल्फेट मिळविणे खनिज तेल पूर्वेक्षणात भूसूक्ष्मजीववैज्ञानिक व भूरसायनशास्त्रीय तंत्र वापरणे, फॉस्फोमिडॉन क्विनॉल फॉस इ. पीडकनाशकांसाठी विशेष तंत्रज्ञानाचा विकास करणे चहाच्या अपशिष्टांपासून कॅफीन बनविणे, औषधी आणि आर्थिक महत्त्वाच्या देशीविदेशी वनस्पतींची (उदा., सिट्रोनेला, गोराडूसारखी पिके, लेमनग्रास इ.) या भागात विस्तृतपणे व फायदेशीर लागवड करण्याच्या दृष्टीने संशोधन व विकासाची कामे संस्था करते. कागद व पुठ्ठ्याच्या बाबतींत प्रयोगशाळेने विकसित केलेले विशेष तंत्रज्ञान व्यापारी उद्योगात आले आहे. उदा., कार्बन कागदाशिवाय नकला काढावयाचा कागद, कागदाची पाटी वगैरे. क्रियाशील यीस्ट, औद्योगिक एंझाइमे इ. जीवरासायनिक उत्पादने मिळविण्याचे प्रयत्न येथे करण्यात येत आहेत. बांधकाम व बांधकाम सामग्रीच्या बाबतीत संस्था अनुसंधान करते, उदा., लहान सिमेंट संयंत्रे, कृषीतील टाकाऊ पदार्थापासून पन्हाळी पत्रे, भाताच्या कोंड्यापासून सिमेंटसारखे द्रव्य इत्यादी.               

या भागाच्या उच्च भूकंपीयतेविषयी संशोधन व विकासाची कामे प्रयोगशाळा करते. यासाठी सर्वसाधारण भूकंप-प्रवण अशा भागात भूकंपीय संनिरीक्षण केंद्राचे जाळे उभारण्यात येत आहे. या प्रयोगशाळेतील वैश्लेषिक सेवा सार्वजनिक व खाजगी उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी येथे खास उपकरणे उपलब्ध आहेत, उदा., निरनिराळे वर्णपटमापक, वर्णलेखक वगैरे. प्रयोगशाळेजवळ सुसज्ज कार्यशाळा, मार्गदर्शी संयंत्रे, एकक क्रियांसाठी लागणारी उपकरणे व साधने आहेत. विविध द्रव्यांचे विश्लेषण व परीक्षण, रासायनिक उद्योगाच्या उभारणीच्या शक्यतेचे अहवाल बनविणे व इमारत, पूल वगैरेंकरिता जागा निवडणे यांबाबतीत प्रयोगशाळा सल्लागारी सेवा देते. इतर संशोधन व विकासविषयक संस्थांशी सहकार्य, पुरस्कृत प्रकल्प स्वीकारणे आणि निवडक क्षेत्रांतील (उदा., नैसर्गिक उत्पादनांचा रासायनिक अभ्यास) मूलभूत व समन्वेषक संशोधन हाती घेणे ही कामेही प्रयोगशाळा करते. प्रयोगशाळेत नियोजन गट (उदा., कार्यक्रमांचे नियोजन) आणि माहिती व संपर्क गट (उदा., उद्योगांशी संपर्क ठेवणे) आहेत. वार्षिक अहवाल, आरआरएल न्यूज (मासिक) व प्रयोगशाळेच्या कामाशी संबंधित असलेल्या संशोधनपर निबंधांची माहिती देणारे करंट टायटल्स ही या प्रयोगशाळेची प्रकाशने होत. इटानगर (अरुणाचल प्रदेश) येथील हिची शाखा औषधी व सुवासिक वनस्पती, औषधी वनस्पतींचे रासायनिक विश्लेषण, बांधकाम सामग्रीचे परीक्षण व भूकंप यांविषयीचे कार्य करते. या शाखेखेरीज प्रयोगशाळेचे पाच प्रायोगिक मळे व दहा भूकंप संनिरीक्षण केंद्रे आहेत.               

पाण्यातील हायासिंथ वनस्पतींपासून चांगल्या प्रतीचा कागद बनविण्याची प्रक्रिया विकसित करून ढाका (बांगला देश) येथे तिची प्रात्यक्षिक (निदर्शक संयंत्र) शाखा स्थापली आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रविद्या विभागाच्या पुरस्काराने प्रयोगशाळेने विज्ञान-प्रवर्तन केंद्र स्थापन केले असून त्यामार्फत ईशान्य भागातील निवडक विद्यार्थ्याच्या तुकड्यांसाठी विज्ञान-प्रवर्तनाचे अभ्यासक्रम घेण्यात येतात.               

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (IIP) : १९५९ साली डेहराडून येथे स्थापलेली ही संस्था पुढील संशोधन व विकास विषयक कामे करते : खनिज तेलाच्या परिष्करण प्रक्रियेचा विकास, कच्च्या तेलाचे मूल्य निर्धारण व संभरण साठ्याची अंदाजे किंमत ठरविण्याचे प्रयत्न करणे खनिज तेल, इंधने व वंगणे यांच्या एंजिनातील वापराविषयीच्या बाबी पर्यायी इंधने, उत्सर्जन नियंत्रणविषयक अध्ययन, औद्योगिक ज्वलन विशेषतायुक्त उत्पादनांचा विकास, ट्रिबॉलॉजी (सापेक्ष गतीमध्ये होणारे घर्षण, वंगणक्रिया व पृष्ठभागाची झीज यांचे आविष्कार व यंत्रणा यांचा अभ्यास), खनिज तेल उत्पादनांचे संरक्षण खनिज तेल रसायने, समावेशके, बहुवारिके यांसाठीच्या प्रक्रियांचा विकास जलसंस्करण प्रक्रिया, परिष्करण उद्योगातील उत्प्रेरक, विशिष्ट कार्यकारी रसायनांचे संश्लेषण, कच्च्या तेलाचा रासायनिक दृष्ट्या अभ्यास, तांत्रिक-आर्थिक शक्यतेचा अभ्यास, प्रक्रिया अभिकल्प, खनिज तेल उत्पादनाच्या मागणीचे भाकीत (अंदाज) करणे, परिष्करण प्रक्रियेच्या पर्याप्तीकरणाची संगणक तंत्रे वापरणे, खनिज तेल उद्योगाच्या माहितीचा प्रसार, खनिज तेल उत्पादनांची मानके निश्चित करण्यासाठी साहाय्य आणि खनिज तेल उद्योग व संबंधित संघटनांसाठी प्रशिक्षण संवर्ग.               

संस्थेच्या संशोधनावर भारतातील खनिज तेल उद्योगाविषयीचे नियोजनात्मक धोरण ठरते. कोचीन, मद्रास, हाल्डिया व मथुरा येथील परिष्करणाचे कारखाने तर बोंगईगाव येथील परिष्करण व खनिज तेल रसायनांचा कारखाना हे उभारण्यास या संस्थेची मदत झाली. संस्थेने स्वतः व इतरांच्या सहकार्याने काही प्रक्रिया विकसित केल्या आहेत. प्रक्रियांचा व विशेष तंत्रज्ञानाचा वापर इतर संघटना (उदा., इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, मद्रास रिफायनरीज वगैरे) उद्योगांत करून घेत आहेत. परिष्करणासाठी लागणाऱ्या देशी मृत्तिका विकसित करून संस्थेने त्यांची आयात थांबविली. कच्ची तेले व उत्पादने यांच्या मूल्यमापनाच्या सोयी येथे असून त्यांद्वारे परिष्करण कारखान्याच्या अभिकल्पाची माहिती मिळते. एकूण २५ पेक्षा अधिक देशीविदेशी तेलाच्या नमुन्यांचे मूल्यमापन संस्थेने केले असून बाँबे हायच्या कच्च्या तेलाविषयीचे क्रूड हॅंडबुक हे पुस्तक तयार केले आहे. इंधने व वंगणे यांच्या मूल्यमापनाच्या सुविधा येथे आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार आता येथे खनिज तेल उत्पादनांचे संरक्षण व पर्यायी इंधनांचा (उदा., अल्कोहॉल) विकास यांवर भर देण्यात येत आहे. स्वयंचलित वाहनातून बाहेर पडणाऱ्या उत्सर्गांचे मापन करण्यासाठी धूरमापक उपकरण संस्थेने बनविले आहे. तसेच केरोसीनचा सुधारलेला वातींचा स्टोव्ह व कमी हवा-दाबाचा औद्योगिक ज्वालक बनवून संस्थेने इंधनाच्या बचतीस मदत केली आहे. औद्योगिक वंगणक्रियेविषयीच्या मूलभूत अनुप्रयुक्त अध्ययनासाठी संस्थेने ट्रिबॉलॉजी प्रयोगशाळा उभारली आहे.               

खनिज तेल प्रक्रिया विकास समन्वय गटाच्या मदतीने येथे निरनिराळ्या प्रकारच्या मेणांच्या उत्पादनाविषयी विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. उत्प्रेरक, कच्च्या तेलाचे रसायनशास्त्र वगैरेंचे मूलभूत अध्ययनही येथे करण्यात येते. तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कामही संस्था करते. विविध संघटनांतील ७०० हून जास्त अभियंत्यांना १९८५ पर्यंत येथे खास प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणाची ही सोय शेजारच्या इंडोनेशिया, थायलंड, बांगला देश इ. देशांनाही उपलब्ध करून देण्यात येते. नवी दिल्ली व बडोदे येथे संस्थेची क्षेत्रीय केंद्रे आहेत.               


सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CFTRI) : म्हैसूर येथे १९५० साली स्थापलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट पिकाच्या कापणीनंतर अन्नधान्याचे संरक्षण, संवर्धन व संस्करण कार्यक्षमपणे करण्यासाठी आवश्यक अशी तंत्रे विकसित करणे हे आहे. संस्था पुढील क्षेत्रांत कार्य करते : (१) देशाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने कृषि-उत्पादनांचा पर्याप्तपणे उपयोग करून घेणारे अन्नपदार्थ व प्रक्रिया, दुर्बल लोकांसाठी पोषक अन्न, देशी उद्योगांसाठी अन्नावर प्रक्रिया करण्याची यंत्रसामग्री आणि अन्नपदार्थ व प्रक्रियित वस्तू यांच्या आवेष्टनाची तंत्रे यांचा विकास करणे (२) अन्न उद्योगात मागे रहाणारे टाकाऊ पदार्थ, उपपदार्थ यांचा उपयोग करून घेणे (३) निर्यातीस योग्य अशी जादा मूल्यदायी उत्पादने बनविणे (४) कापणीनंतरची कृषिउत्पादनांची हाताळणी, साठवण, संस्करण व वापर यांसाठीच्या एकात्मिक पद्धती विकसित करणे, उत्पादनांचा वापर करून घेणे (५) शासकीय व उद्योगातील तंत्रज्ञांना व वैज्ञानिकांना प्रशिक्षण देणे (६) तंत्रविद्येचे हस्तांतरण (७) अन्नविषयक विज्ञान व तंत्रविद्या यांची माहिती आणि (८) उद्योगधंद्यात उत्पादित झालेल्या अन्नपदार्थांचे वैश्लेषिक गुणवत्ता नियंत्रण करणे, गुणवत्ता नियंत्रणाची खात्री होण्याच्या दृष्टीने अन्नपदार्थ उत्पादनांच्या विश्लेषण व परीक्षण यांसाठीच्या संशोधन विकासाच्या क्षमता व साधनसामग्रीच्या सोयी या संस्थेत उपलब्ध झाल्या आहेत. १९७८ पासून येथे दक्षिणेतील राज्ये, पाँडिचेरी, लक्षद्वीप व महाराष्ट्र यांच्यासाठी असलेल्या ॲपेलेट सेंट्रल फूड लॅबोरेटरीचे काम चालू असून न्यायालये, बंदर-अधिकारी, आरोग्य मंत्रालये व इतर संघटनांना विश्लेषणविषयक साहाय्य येथून मिळते.               

संयुक्त राष्ट्रांनी या संस्थेस अन्न संरक्षण व संस्करण यांविषयीच्या प्रगत संशोधनाचे केंद्र म्हणून मान्यता दिलेली आहे. आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका भागांतील विकसनशील देशांमधील संशोधकांना व व्यवस्थापकांना येथून मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध होऊ शकतात. १९७६ साली येथे प्रशिक्षण व संशोधन यांसाठी खाटीकखाना आणि १९८१ साली इंटरनॅशनल स्कूल ऑफ मिलिंग टेक्नॉलॉजी सुरू करण्यात आले. येथील इंटरनॅशनल फूड टेक्नॉलॉजी सेंटरमार्फत अन्नतंत्रविद्येतील दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर अल्पकालीन अभ्यासक्रम देशीविदेशी प्रशिक्षणार्थीसाठी घेतले जातात. तंत्रविद्येचे हस्तांतरण हे संस्थेचे एक मुख्य काम असून भारतीय उद्योगांत येथील १५० पेक्षा अधिक प्रक्रिया/उत्पादने/तंत्रविद्या यांचा वापर करून घेण्यात आला आहे. दरवर्षी सु. ५,००० पेक्षा अधिक तांत्रिक प्रश्नांना उत्तरे व त्या आनुषंगिक सेवा संस्थेमार्फत देण्यात येतात. येथे निरीक्षण केंद्रही असून संस्थेची मुंबई लखनौ, हैदराबाद, मंगरूळ, लुधियाना व नागपूर येथे क्षेत्रीय केंद्रे आहेत. तसेच नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे केंद्रही येथे आहे. या केंद्रामार्फत अन्नपदार्थांविषयीचा माहितीचा प्रसार व तांत्रिक माहितीची छपाई हे कार्य करण्यात येते.               

येथे विविध तंत्रे (उदा., अन्नपदार्थांना धुरी देणे), विशेष तंत्रज्ञान (उदा., बिनविषारी खनिज कीटकनाशके), प्रक्रिया (उदा., भात सुकविणे) व उत्पादने (उदा., इडली, डोसा यांची तयार मिश्रणे) विकसित करण्यात आली असून त्यांचा उद्योगधंद्यात वापर होत आहे.               

भात सडण्याच्या व पिठाच्या छोट्या गिरण्याही येथे विकसित करण्यात आल्या आहेत. बालकान्न, लिपिडे, पोषक पूरक अन्न (उदा., एनर्जी फूड), सोयाबीनचा वापर इत्यादींच्या बाबतीतही संस्थेने संशोधन व विकासविषयक कामे केली आहेत. फळांवर संस्करण करणे तसेच ती हाताळणे, साठविणे व त्यांची वाहतूक करणे फळांपासून विविध पदार्थ बनविणे आणि याबाबतीत संशोधन व सल्ला देणे या गोष्टीही संस्था करते. प्राणिज पदार्थांवर संस्करण करणाऱ्या उद्योगांना साहाय्यकारी संशोधन येथे केली जाते (उदा., अंड्याचे चूर्ण, माशांपासून बॅक्टोपेप्टोन इ.), संहत स्वादकारके बनविण्यात येथील संशोधनाची मदत झाली आहे. मसाल्याचे पदार्थ, कोको, चहा व कॉफी यांत सुधारणा करण्याचे व त्यापासून इतर उपयुक्त पदार्थ (उदा., चहापासून एन-ट्राय ॲकोंटॅनॉल) मिळविण्याचे प्रयत्नही येथे केले जातात.               

संस्थेने अन्न संस्करणासाठी अनेक प्रकारची साधने (उदा., बाष्पित्र, घूर्णीय शुष्कक, कोको बटर दाबयंत्र इत्यादी) विकसित केली आहेत.               

सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट (CDRI) : १९५१ साली लखनौ येथे स्थापलेल्या या संस्थेने पुढील उद्दिष्टे समोर ठेवली आहेत : (१) संततिनियमनाची नवीन साधने बनविणे (२) राष्ट्रीय अग्रक्रमाच्या रोगांसाठी नवीन औषधी व रोगप्रतिकार द्रव्ये विकसित करणे (३) औषधे शोधण्यासाठी जमिनीवरील वनस्पती, सागरी वनस्पती व प्राणी आणि परंपरागत उपचार यांचे पद्धतशीर अनुसंधान करणे (४) रोगांच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मूलभूत जीववैद्यकीय अभ्यास करणे (५) आयात करण्यात येणारी मोठ्या प्रमाणातील औषधे व आवश्यक मध्यस्थ पदार्थ, किण्वनाची (आंबविण्यासारखी क्रिया घडवून आणणारी) रसायने व जैव उत्पादने यांसाठी लागणारी तंत्रविद्या विकसित करणे आणि (६) औषधांविषयीचे संशोधन, विकास व उत्पादन यांविषयीच्या माहितीचा प्रसार करणे.               

ही संस्था म्हणजे अनेक विषयांची प्रयोगशाळा असून जीवरसायनशास्त्र, अंतस्रावी ग्रंथिविज्ञान, किण्वन तंत्रविद्या, सूक्ष्मजीवविज्ञान, औषधिक्रियाविज्ञान, विषविज्ञान इ. संशोधन विकासविषयक कामांचे एकूण १३ विभाग येथे आहेत. येथील तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये पुढील गोष्टी येतात : प्रयोगशालीय प्राणी (१६ जातींचे ५० हजार प्राणी, पैकी ५०० माकडे) वनस्पतिसंग्रह (औषधी वनस्पतींच्या ५,००० जातींचे नमुने) तांत्रिक माहिती, औद्योगिक संपर्क आणि नियोजन विभाग सूक्ष्मसंदर्भ व ग्रंथालयीन सेवा तसेच एकस्व तपासणी केंद्र, जीवसांख्यिकी व सांख्यिकी आणि उपकरणविषयक सेवा. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रविज्ञा विभागाच्या मदतीने चालविण्यात येणाऱ्या द रिजनल सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंटस्‌ सेंटरमधील उपकरणयोजना विषयक सेवा या संस्थेशिवाय विद्यापीठे, संशोधन संस्था व औषधि-उद्योग यांनाही मिळतात. या केंद्रात वर्णपटविज्ञानाच्या विविध शाखा, ⇨वर्णलेखन, ज्योत प्रकाशमापन, रासायनिक विश्लेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या निरनिराळ्या पद्धती वगैरेंकरिता लागणाऱ्या उपकरणांची सोय आहे. द नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्सतर्फे करंट हायलाइट्स (आर अँड डी), इंडस्ट्री हायलाइट्‌स, पेटंट अवेअरनेस आणि करंट इंडियन टायटल्स ही औषधविषयक मासिके प्रसिद्ध होतात.

अल्पकालीन व दीर्घकालीन अशा अनेक प्रकल्पांमध्ये संस्थेच्या संशोधन-विकासाचे कार्यक्रम आखले जातात. या प्रकल्पाची १४ क्षेत्रे आहेत. पैकी ११ क्षेत्रांत नवीन औषधे (उदा., हिवताप, कर्करोग, पटकी इत्यादींशी निगडित) विकसित केली जातात तर एका विभागात उष्ण कटिबंधात संसर्गी रोग व जननक्षमता नियंत्रणाशी निगडित नवी औषधे शोधण्यात येतात आणि उरलेल्या क्षेत्रांत औषधी व रासायनिक उद्योगांसाठी विशिष्ट तंत्रज्ञान विकसित केले जाते.               


नवीन औषध विकास कार्यक्रमाखाली दर वर्षी सु. ७५० नवीन संश्लेषित संयुगे आणि २०० वनस्पति-अर्क यांची विविध रोगांच्या संदर्भात (उदा., हत्तीरोग, अमीबाजन्य विकार इत्यादींच्या विरोधी) चाचणी घेण्यात येते. क्रियाशील संयुगांचे औषधिक्रियाविज्ञान विषारीपणा, मानवी सुरक्षितता व औषधि-गतिकीय दृष्टींनी तपशीलवार अध्ययन केले जाते व नैदानिक चाचण्या घेण्यात येतात. अशा तऱ्हेने अनेक औषधी द्रव्ये विकसित करण्यात आली असून काहींच्या चाचण्या घेण्याचे काम चालू आहे (उदा., पटकीची सुधारित लस, स्थानिक शुद्धिहारक). येथे दोन प्रतिरक्षा-निदानीय संचही विकसित करण्यात येत आहेत. त्यातील एक अमीबाजन्य विकारातील रक्तद्रव परीक्षेसाठी व दुसरा हत्तीरोगातील त्वचा परीक्षेसाठी आहे. नवीन औषधे विकसित करण्याच्या कार्यक्रमाचा मूलभूत संशोधन हा एक आवश्यक भाग असून अधिक चांगल्या औषधांचा सयुक्तिक अभिकल्प तयार करण्याचा मार्ग उपलब्ध व्हावा हा त्यामागील हेतू आहे. औषधे व औषधी द्रव्यांसाठी (उदा., इंडोमेथॅसीन, पॅरॅसिटॅमॉल, नायट्रोफ्यूराने इत्यादींसाठी) लागणाऱ्या प्रक्रिया तसेच डासांच्या डिंभांच्या (अळ्यांच्या) नाशकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची प्रक्रिया येथे विकसित करण्यात आली.               

आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभाग, जागतिक आरोग्य संघटना, वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च (अमेरिका), लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन, क्वीन एलिझाबेथ कॉलेज (लंडन), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (अमेरिका), स्टिव्हन्स रिसर्च इन्स्टिट्यूट व ऑझ्‌बर्न मरीन रिसर्च इन्स्टिट्यूट (अमेरिका), बोस इन्स्टिट्यूट (कलकत्ता), इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद अँड सिद्ध या संस्थांशी वरील संस्था संपर्क राखून असते. मुंबई व लखनौ येथे संस्थेच्या क्षेत्रीय शाखा आहेत.               

सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट(CLRI) : रु १९५३ साली अड्यार (मद्रास) येथे स्थापन झालेल्या या संस्थेची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) चामडे, चामड्याच्या व चामड्याचा उपयोग केलेल्या वस्तू व उपसाधने आणि यांसाठी लागणारी यंत्रे यांच्याविषयीचे संशोधन व विकास कार्य करणे (२) कातडी, कोलॅजेन (एक प्रकारचे तंतुमय प्रथिन), कातडी कमविण्याचे कारक व क्रिया, अंतिम संस्करण आणि त्यासाठी लागणारी द्रव्ये, बहुवारिके, बाहेर पडणाऱ्या पाण्याचे संस्करण व खाटीकखान्यातील उपपदार्थ यांविषयी मूलभूत व अनुप्रयुक्त संशोधन करणे (३) विकसित केलेले तंत्रज्ञान उद्योगाकडे हस्तांतरित करणे (४) उद्योगाच्या ग्रामीण, मध्यम व मोठ्या क्षेत्रांच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने प्रादेशिक केंद्रातील संशोधन व विकास यांच्या सुविधांचे आधुनिकीकरण व अद्ययावतीकरण करणे (५) चर्म-तंत्रज्ञान व चामडी वस्तू यांविषयीचे प्रशिक्षण देणे. भारतीय चर्मोद्योगाच्या गरजा भागविण्यासाठी या संस्थेतील नमुनेदार चर्मसंस्करणीमार्फत नवी तंत्रे विकसित केली जातात. या व इतर चर्मसंस्करण्यांत तसेच प्रादेशिक केंद्रातून येथील प्रक्रियांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येते. प्रादेशिक केंद्रे आपल्या भागातील उद्योगांना तांत्रिक साहाय्य देतात. नवीन चर्मोद्योग कारखाना उभारण्याच्या वा अस्तित्वात असलेल्या कारखान्याच्या उत्पादनात विविधता आणण्याच्या प्रकल्पाची तपशीलवार योजना, अर्थसंकल्पन व मूल्यमापन केल्यावरच या संस्थेत त्यावर संशोधन केले जाते. इतर संस्थांना व औद्योगिक शाखांना संस्था संशोधन व विकास कामांत सहकार्य देते. मद्रास येथील अण्णा विद्यापीठाच्या बी. टेक्., एम्. टेक् व पीएच्.डी. या पदव्यांसाठी असलेल्या चर्मतंत्रविद्येच्या अभ्यासक्रमांना ही संस्था सहकार्य देते. चर्मोद्योग व संबंधित उद्योगांना उत्तेजन देऊन त्यांचा विकास करण्याच्या हेतूने काम करणाऱ्या इतर संस्थांशी व मंडळांशी (उदा., विविध राज्यांतील चर्मोद्योग विकास निगम, खादी व ग्रामोद्योग आयोग वगैरे) संपर्क ठेवते. विविध पातळ्यांवरचे प्रशिक्षणाचे अभ्यासक्रमही येथे घेण्यात येतात. कातड्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे देशभर प्रयत्न होण्यासाठी संख्या सहकार्य करते. खाटीकखान्यातील उपपदार्थ व कोलॅजेन यांपासून उपयुक्त पदार्थ विकसित करण्यात येतात (उदा., कोंबड्यांचे अन्न). कातडी कमविण्याचे विविध वनस्पतिज अर्क खनिज आणि संश्लेषित द्रव्ये येथे विकसित करण्यात येतात. विशिष्ट प्रकारची द्रव्ये बनविण्याच्या प्रक्रियांवर संशोधन करण्यात येते. तसेच निर्यात वाढीला उपयुक्त ठरतील अशा प्रक्रिया विकसित करण्याचे प्रयत्न संस्था करते. चामड्यांच्या वस्तूंवर अंतिम संस्करण करण्यासाठी लागणारी विविध उपसाधने येथे विकसित केली जातात. [उदा. भरणद्रव्ये, आसंजके चिकटविणारे पदार्थ), रंगद्रव्ये इ.]. कातडी कमविताना होणारे प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न संस्था करीत असून संस्थेने राणीपेट येथील चर्मसंस्करण केंद्रात आदर्श निःसरण संस्करण (बाहेर पडणारऱ्या निरूपयोगी द्रवावर संस्करण करणारे) संयंत्र उभारले आहे. कोलॅजेनाचे संरचनात्मक स्वरूप, परंपरागत द्रव्यांच्या साहाय्याने कातड्यांच्या संरक्षणाचे व कमविण्याचे नवे कारक इत्यादींचे मूलभूत अध्ययन संस्थेत करण्यात येते.              

चर्म संशोधन व चर्मनिर्मिती यांसाठी लागणारी यंत्रे, उपकरणे व साधनसामग्री तसेच आरामशीर पादत्राणे यांच्या अभिकल्पाचे आणि विकासाचे काम संस्था हाती घेते. विविध भागांतील चर्मोद्योगाची क्षमता व गरज पाहून औद्योगिक विकासाच्या दृष्टीने संस्था मार्गदर्शन करते. प्रक्रियेची प्रात्यक्षिके, खास व्याख्याने, फॅशन प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय चर्म-उत्सव व तांत्रिक चर्चासत्रे यांचे संस्था आयोजन करते. संस्थेची कानपूर, मुंबई, जालंदर, राजकोट व कलकत्ता येथे क्षेत्रीय केंद्रे असून संस्था पुढील नियतकालिके प्रसिद्ध करते : करंट लेदर लिटरेचर (मासिक), ट्रेंड्‌स इन लेदर वल्र्ड अँड मॅन्युफॅक्चरसर् कॉर्नर (मासिक), लेदर सायन्स (मासिक), थोल विरनानम (तमिळ त्रैमासिक) चर्म विग्यान (हिंदी त्रैमासिक), राहबेर-ई-चिर्म (उर्दू त्रैमासिक), चर्म विज्ञान (मराठी त्रैमासिक), लेदरलार्स आणि लेदर डायजेस्ट. नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर लेदर अँड अलाइड इंडस्ट्रीज हे केंद्र संस्थेच्या ग्रंथालयाचे, मुद्रणाचे आणि संबंधित प्रकाशनाचे काम करते. चर्मोद्योगासंबंधीच्या विविध अंगांवर केंद्राने कित्येक लघुपुस्तके व प्रबंधिका प्रसिद्ध केलेल्या आहेत.               

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायॉलॉजी (IICB) : १९५६ साली वरील कौन्सिलाच्या अखत्यारीखाली आलेल्या या संस्थेचे मुख्यालय कलकत्ता येथे असून हिचे मुख्य उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे. अजून न सुटलेल्या वैद्यकीय प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या दृष्टीने मूलभूत जीववैज्ञानिक शाखांमधील विषयांचे संशोधन करणे आणि ते करताना सध्याच्या देशाच्या जीववैज्ञानिक आणि वैद्यकीय गरजांशी संबंधित असलेल्या प्रकल्पांवर भर देणे. ही संस्था अनेक विज्ञान शाखांचे (उदा., जीवतंत्रविद्या व जननिक अभियांत्रिकी, एंझाइम रसायनशास्त्र, जीवभौतिकी, नैसर्गिक पदार्थ रसायनशास्त्र इ.) संशोधन केंद्र बनली असून येथील कार्याची पुढील प्रमुख क्षेत्रे आहेत : (१) जीवरासायनिक अभियांत्रिकी, (२) एंझाइम अभियांत्रिकी, (३) वैद्यकीय (औषधविषयक) रसायनशास्त्र व (४) प्रायोगिक वैद्यक.               


येथील जीवरासायनिक अभियांत्रिकीच्या प्रकल्पांमध्ये विविध क्षेत्रांविषयीचे काम हाती घेतले जाते उदा., रुग्णालये व खाटीकखाने यांतील निरुपयोगी पदार्थांपासून रोगनिदान, चिकित्सा व संशोधन यांसाठी उपयोगी पडणाऱ्या जीवरसायनांची निर्मिती, बीज पक्व होण्याच्या क्रियेचा जीवरासायनिक अभ्यास वगैरे. एंझाइम अभियांत्रिकीविषयीचे कार्यक्रम एंझाइमांची निदानीय व चिकित्सात्मक कारक म्हणून उपयोग करून घेण्याभोवती केंद्रित करण्यात आलेले आहेत. विकारांमुळे जेथे विशिष्ट एंझाइमांची उणीव निर्माण झालेली असते, त्या ऊतकांत (पेशी समूहांत) सरळ सुधारित एंझाइमे चिकित्सात्मक उपयोगाच्या दृष्टीने समाविष्ट केली जातात. औषधी द्रव्य म्हणून ज्यांच्याविषयी उत्सुकता आहे असे नैसर्गिक पदार्थ वेगळे करणे आणि त्यांची वैशिष्ट्ये निश्चित करणे तसेच वैद्यकीय दृष्टीने क्रियाशील असलेले कारक संश्लेषणाद्वारे तयार करणे यांविषयीच्या संशोधनाशी औषधविषयक रसायनशास्त्राचा संबंध येतो (उदा., जननक्षमता व शुक्राणुजनन यांविरुद्धचे कारक पदार्थ, अल्कलॉइडे, सागरी द्रव्ये). प्रायोगिक वैद्यकाच्या बाबतीत विस्तृतपणे संशोधन आणि अनुसंधान करण्यात येते (उदा., मज्जासंस्थेचे विकार परजीवीजन्य, आतड्याचे आणि गुप्त रोग अणुकेंद्रीय वैद्यक). संस्था राष्ट्रीय महत्त्वाच्या कित्येक अखिल भारतीय सहकार्य कार्यक्रमांमध्येही सहभागी होते (उदा., देशी वनस्पतींपासून औषधे बनविणे). जिलेटिनाच्या प्रकाशकीय गाळण्यासाठी संस्थेने विकसित केलेली प्रक्रिया उद्योगांत वापरली जात आहे. या संस्थेत संशोधनासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, व्हिडिओ कॅमेरा, द्रव्यमान वर्णपटमापक, संगणक इ. सुविधा उपलब्ध आहेत. तसेच संस्थेचे सुसज्ज ग्रंथालय व आधुनिक प्राणिगृह आहे. वैद्यकीय आणि जीववैज्ञानिक विज्ञान शाखांतील परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा व बैठका ही संस्था पुरस्कृत करते.               

सीएसआयआर सेंटर फॉर बायोकेमिकल्स (CCB) : दुर्मिळ जीवरसायने तयार करण्याच्या हेतूने वरील कौन्सिलाने अनुदान-नि-मदत या तत्त्वावर १९६६ साली दिल्ली येथे हे केंद्र स्थापन केले. १९७७ साली ते कौन्सिलाने आपल्याकडे घेतले असून तेव्हापासून ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायॉलॉजी (कलकत्ता) या संस्थेच्या अखत्यारीत स्वायत्त प्रयोगशाळा म्हणून कार्य करीत आहे.               

जीववैज्ञानिक संशोधनात व वैद्यकात वापरावयाची जीवरसायने व ⇨प्रतिजने हे केंद्र बनविते शिवाय राष्ट्रीय प्रयोगशाळांत वा संशोधन संस्थांत विकसित करण्यात आलेल्या तंत्रांवर आधारित असलेले प्रमाणित प्रकल्प हाती घेण्याची जबाबदारीही केंद्रावर आहे. येथील जीवरसायने (उदा., एंझाइमे, को-एंझाइमे, लिपिडे इ.) व परागकण, धूळ इत्यादींमुळे उद्‌भवणाऱ्या श्वसनविकारांचे निदान व प्रतिरक्षा चिकित्सा यांसाठी वापरण्यात येणारी प्रतिजने यांचा लाभ देशातील जीववैज्ञानिक क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिकांना व ॲलर्जी-तज्ञांना होतो.               

जननिक अभियांत्रिकीतील संशोधनाला उपयुक्त अशी मर्यादक एंडोन्यूक्लिएजे [विशिष्ट न्यूक्लिओटाइड श्रेणी ओळखणारी व डीएनए शृंखला कापू शकणारी एंझाइमे ⟶ रेणवीय जीवविज्ञान] आणि इतर रसायने बनविण्याचे तसेच न्यूक्लिओटाइडांच्या ज्ञात श्रेण्यांच्या संश्लेषणाचे काम येथे सुरू आहे. औद्योगिक टाकाऊ जैव पदार्थाचे मिथेनात रूपांतर, चहाच्या बियांपासून खाद्यतेल मिळविणे वगैरे क्षेत्रांतही संशोधन-विकासाची कामे येथे करण्यात येतात. उपरुग्ण निदानी संचांच्या प्रामाणिकरणाचे व चाचणीचे काम करून केंद्राने ते बाजारात आणले आहे व त्यांचे तंत्रज्ञान एका कंपनीकडे हस्तांतरित केले आहे. जीवविज्ञानीय पदार्थांवर आधारलेल्या उद्योगांना केंद्र सल्लागारी सेवा पुरविते.

नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NBRI) : लखनौ येथील ही संस्था १९५३ साली वरील कौन्सिलाकडे आली. आर्थिक दृष्टीने उपयुक्त अशा अपरंपरागत व ज्यांचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो अशा वनस्पतींचा शक्यतो सर्वोत्कृष्ट उपयोग करून घेण्याविषयीची संशोधन व विकासाची कामे येथे करण्यात येतात. यांसाठी अशा वनस्पतींचे प्रवेशन, नित्याच्या लागवडीखाली आणणे, संरक्षण, आनुवंशिक श्रेणीत उन्नती (वाढ) तसेच अभिवृद्धी आणि नवीन वनस्पति-संपदांसाठीच्या उत्पादन तंत्रांचा विकास या गोष्टी करण्यात येतात. संस्थेच्या कामांची विभागणी अकरा विभागांत करण्यात आली असून संशोधन व विकासाच्या कामांत पुढील कामे येतात : वनस्पति-वैज्ञानिक व वनस्पती रासायनिक मूलभूत आणि अनुप्रयुक्त संशोधने विशिष्ट तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व विस्तार आणि माहितीचे संकलन व प्रसार.               

संस्थेचे चांगली मांडणी केलेले वनस्पति-उद्यान (२७ हे. क्षेत्र, वनस्पतींचे १ लाख नमुने, १५ हजार पीकविषयक संग्रह-फळे व बिया), मोठे ग्रंथालय (३५,९०० पुस्तके व नियतकालिकांचे बांधीव खंड १३,५०० पुनर्मुद्रिते, ४०२ छायाचित्रण मुद्रिते व ५४५ देशीविदेशी नियतकालिके), एकस्व निरीक्षण केंद्र आणि बांथ्रा येथील क्षेत्रीय केंद्र (१ हेक्टर मानवनिर्मित वन, १० हेक्टरचे एक संशोधन केंद्र, दोन नागवेलीच्या संरक्षिका, मध्यवर्ती ओषधि-उद्यान इ.) तसेच सुसज्ज प्रयोगशाळा आहे. उद्यानात देशीविदेशी रानटी आणि लागवडीखाली असलेल्या २,००० वनस्पती असून तेथे दोन वृक्षोद्याने, एक गुलाबवाटिका, संरक्षिका तसेच निवडुंग, पाम, नेचे आणि रसाळ वनस्पतींचे एकेक गृह आहे.               

पुष्पसंवर्धनाचा उद्योग वैज्ञानिक पायावर संघटित करण्यासाठी संस्था एकविचाराने प्रयत्न करते (उदा., सुवासिक आणि बिगर सुवासिक शोभिवंत वनस्पतींचे नाविन्यपूर्ण प्रकार बनविणे). संस्थेने बुगनविलिया, गुलाब, निशिगंध इ. शोभिवंत लोकप्रिय वनस्पतींचे ९० पेक्षा जास्त प्रकार (कल्टिव्हार) बनविले आहेत. फुलांचा हंगाम वाढविणे, लागवडीची नवीन तंत्रे अवलंबिणे, शोभिवंत रानटी वनस्पती लागवडीखाली आणणे, ऊतक-संवर्धनाने ऑर्किडांची अभिवृद्धी करणे वगैरे बाबतींत संस्थेने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. अपायकारक शैवलांच्या नियंत्रणाच्या पद्धती येथे विकसित करण्यात आल्या आहेत.               

संस्थेतील औषधी वनस्पतींविषयीचे संशोधन व विकासाचे कामही महत्त्वाचे असून याविषयी करण्यात आलेली काही कामे पुढीलप्रमाणे होत : असंख्य ⇨ओषधीय औषधांचे अचूक वनस्पतिवैज्ञानिक अभिज्ञान व पैकी काहींसाठी मानके बनविणे अफूचे संकरित वाण बनविणे अत्तर व सुवासिक पाणी बनविण्याच्या नव्या उपकरणाचा आराखडा तयार करणे वगैरे.               

संस्थेने चौधारी घेवड्याची व्यापारी प्रमाणावरची व काही भूछत्रांची कुटीर पातळीवरील लागवड करण्याची तंत्रे विकसित करून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी दिलेली आहेत. नांग्याशेर, रबर इत्यादींसारख्या आर्थिक महत्त्वाच्या असाधारण वनस्पतींसाठी संस्थेने कृषितंत्रविद्या तयार केली आहे. खेड्याची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीने आपल्या फायदेशीर संशोधनाचा प्रसार व्हावा म्हणून संस्था प्रात्यक्षिक, प्रयोग आणि जाणीव निर्माण करणे यांचे कार्यक्रम आखते. त्यानुसार लखनौजवळच्या खेड्यांत द्राक्ष, चौधारी घेवडा आणि भूछत्रे यांची लागवड करण्यात येत आहे. संस्थेने अनेक एकस्वे घेतली असून त्यांपैकी कस्तुरी भेंडीच्या विषयांतील सुगंधी द्रव्ये अलग करण्यासाठी प्रक्रिया आणि सुगंधी पाणी आणि अत्तरे ऊर्ध्वपातनाने तयार करण्यासाठीचे उपकरण ही दोन भाडेपट्ट्याने वापरण्यास दिली आहेत. तसेच संस्थेने विकसित केलेल्या अनेक प्रकियाही वापरल्या जात आहेत.               

संस्थेमार्फत परीक्षण, मूल्यमापन व इतर सुविधा पुरविण्यात येतात. उदा. वनस्पतींचे अभिज्ञान, आर्थिक महत्त्वाच्या वनस्पतिज पदार्थांचा पुरवठा इत्यादी. एनबीआरआय न्यूज लेटर व ॲप्लाइड बॉटनी ॲबस्ट्रॅक्टस ही त्रैमासिके आणि वार्षिक अहवाल संस्था प्रसिद्ध करते. संस्था पुष्पप्रदर्शने आणि अल्पकालीन शैक्षणिक-नि-प्रशिक्षण अभ्यासक्रम यांचे आयोजन करते आणि उद्यानविद्येतील अत्याधुनिक तंत्रांच्या बाबतीत तांत्रिक सहाय्य व सल्ला देते.               

रिजनल रिसर्च लॅबोरेटरी (RRL), जम्मू-तावी : १९५७ साली वरील कौन्सिलाकडे आलेल्या या प्रयोगशाळेचे मुख्य उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे. भारताच्या वायव्य प्रदेशाचा औद्योगिक विकास करणे आणि त्यासाठी साधनसंपत्तीचा पर्याप्तपणे उपयोग करून घेण्याकरिता उद्योगाचे प्रश्न समजून घेणे व सोडविणे तसेच या प्रदेशातील आतापर्यंत उपयोगात न आणलेल्या साधनसंपत्तीचे समन्वेषन व समुपयोग करणे. हे उद्दिष्ट पुढील गोष्टींनी साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवीन तंत्रविद्येचा विकास करणे उत्पादकता/गुणवत्ता साधण्यासाठी सल्लागारी, परीक्षण, साधनसामग्रीचे अभिकल्पन/जुळणी व इतर संबंधित सुविधा पुरविणे आणि वैज्ञानिक व तांत्रिक साहित्य प्रसिद्ध करणे. येथील कामांची विभागणी रासायनिक अभियांत्रिकी व अभिकल्प, कार्बनी रसायनशास्त्र, अनुप्रयुक्त सूक्ष्मजीवविज्ञान, वनस्पति-सर्वेक्षण व वनस्पतिसंग्रह वगैरे १७ शाखांत करण्यात आली असून येथे मार्गदर्शी संयंत्र सुविधा (किण्वन, अन्न, खनिजे, वनस्पतिजन्य रसायने, पुठ्ठे वगैरेंसाठी), समस्थानिक प्रयोगशाळा, उपकरणयोजना व सर्वेक्षण विभाग आणि तांत्रिक गृह आहे.


प्रयोगशाळेची सुसज्ज कार्यशाळा आहे. प्रक्रियांच्या मार्गदर्शी संयंत्राद्वारे करण्यात येणाऱ्या अभ्यासासाठी लागणारी साधने येथे बनविण्यात येतात. शिवाय उद्योजकांना लागणाऱ्या साधनांच्या आराखड्याचे व जोडणीचे काम करण्यासाठी या कार्यशाळेची सोय उपलब्ध करून देण्यात येते. अशा प्रकारे या कार्यशाळेच्या मदतीने अनेक (उदा., गोराडूसारख्या वनस्पतींपासून डायोसजेनीन हे उपयुक्त द्रव्य मिळविण्यासाठीची) संयंत्रे बनविण्यात आली आहेत.

प्रयोगशाळेच्या कार्याशी निगडित असलेल्या क्षेत्रांतील पुरस्कृत संशोधन संस्था हाती घेते. शिवाय छोट्या लघुउद्योग क्षेत्रांतील तंत्रवैज्ञानिक गरजा ओळखून काढण्याचे काम प्रयोगशाळा करते. त्यासाठी सर्वेक्षण, संमेलने, चर्चा, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजिण्यात येतात. तांत्रिक विचारणांकडे लक्ष देण्यात येते. संस्था आरआरएल न्यूज लेटर, वार्षिक अहवाल याशिवाय प्रसंगविशेषी पुस्तके, पुस्तिका व लघुपुस्तके प्रसिद्ध करते (उदा., कल्टिव्हेशन अँड युटिलायझेशन ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमेटिक प्लॅंट्स).               

मध्यम व मोठ्या उद्योगांसाठी प्रयोगशाळेत विविध तंत्रे विकसित केली जातात, उदा., संपूर्ण पाहून वृक्षाचा उपयोग करून घेण्याचे तंत्र. येथील संशोधनाचे प्रमुख कार्यक्रम हे छोटे उद्योगपती व उद्योजक यांना मदत करण्याच्या दृष्टीने आखलेले असतात. (उदा.,कॅल्शियम ग्लुकोनेट, जिबरेलिक अम्ल यांसारखी औद्योगिक महत्त्वाची उत्पादने विकसित करणे). महत्त्वाच्या वनस्पतिज रसायनांचे प्रोजेस्टेरॉन, कॉल्चिसीन) उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया येथे विकसित करण्यात आल्या आहेत, तर भारतीय वनस्पतींपासून नवीन औषधी द्रव्ये मिळविण्याचे कामही करण्यात येत आहे. या प्रदेशातील खनिजसंपत्तीचा आर्थिक समुपयोग करून घेण्याविषयीचे संशोधन व इतर संशोधन प्रकल्पांचे कामही येथे चालू आहे (उदा., वनस्पतिज कीटकनाशके, शेती व वनातील टाकाऊ पदार्थांचा उपयोग करणे). ग्रामीण विकासाचा संबंध असणाऱ्या प्रकल्पांना येथे वरचा अग्रक्रम देण्यात येतो.               

औषधे, खनिजे वगैरेंच्या परीक्षांच्या सोयी औषधी द्रव्यांचे मानकीकरण, बेण्यांचा पुरवठा, अल्पकालीन प्रशिक्षण अभ्यासक्रम, बाजारपेठांचे सर्वेक्षण व तांत्रिक-आर्थिक क्षमता अहवाल तयार करणे ही कामे येथे होतात. या प्रयोगशाळेची एक शाखा श्रीनगर येथे, विस्तार केंद्र पालमपूर येथे आणि प्रायोगिक मळे चथा, जम्मू व बेरिनाग येथे आहेत. श्रीनगरच्या शाखेचा दर्जा वाढवून तेथे नवी संशोधन-विकासाची कामे (उदा., हॉप्स, भूछत्रे, फर व लोकर, रेशमाचे किडे) इत्यादींसंबंधीची कामे केली जातात.               

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लॅंट्स (CIMAP) : संशोधन आणि विकासाचे/उद्योगसंस्थापनेचे काम करणारी ही संस्था १९५९ साली लखनौला स्थापन झाली. हिचे कार्य औषधी आणि सुवासिक वनस्पतींचे प्रवेशन, लागवड, उत्पादन, संस्करण, उपयोग करून घेणे आणि विपणन करणे यांच्याशी निगडित असून या वनस्पतींचा प्रत्यक्ष वापर व उपयोगिता यावर खास लक्ष देण्यात येते, संस्थेच्या सुसज्ज प्रयोगशाळा असून कुक्रैल वनालगतच्या २१ हेक्टरच्या भूखंडावर एक संशोधन मळा, एक मार्गदर्शी संयंत्र व एक काचगृहही आहेत.               

संस्थेचे काम (१) रसायनशास्त्रीय (२) कृषिविषयक व जीववैज्ञानिक आणि (३) माहिती, संपर्क व विस्तार या तीन मुख्य विभागांतर्फे केले जाते. संस्थेची पुढील प्रादेशिक केंद्रे/मळे आहेत : (१) बंगलोर (बेलूर येथे १० हेक्टरचा, नॅशनल एरॉनॉटिकल लॅबोरेटरीचा २८ हेक्टरचा, कोडीमंचेनहळ्ळीचा १२·५ हेक्टरचा आणि कूर्ग येथील १०१ हेक्टरचा मळा) (२) पंतनगर (उत्तर पदेश, १०४·५ हेक्टर) (३) श्रीनगर (बोनेराव यारिखा येथील मळे) (४) कोडईकानल (तमिळनाडू ४० हेक्टर) (५) तुंग (जि. दार्जिलिंग) आणि (६) बोदुप्पल (हैदराबाद, १२ हेक्टर).               

औषधी व सुवासिक वनस्पतींसाठीच्या विविध एकक क्रिया करणाऱ्या येथील बहुद्देशीय मार्गदर्शी संयंत्राचे काम १९८३ साली सुरू झाले. ६० किग्रॅ. कच्चा माल हाताळण्याची क्षमता असलेले अगंज पोलादाचे निष्कर्षण पात्र, काचेचे अस्तर असलेले विक्रीया पात्र व ऊर्ध्वपातन उपकरण ही येथे आहेत. औषधी व सुवासिक वनस्पतींच्या लागवडीची कृषितंत्रे विकसित करणे हा संस्थेचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. येथे विकसित झालेली व वापरात असलेली अशी तंत्रे २३ वनस्पतींशी (उदा., जिरॅनियम, दवणा, गवती चहा) निगडित आहेत. अशा वनस्पतींपासून अंतिम पदार्थ मिळविण्याची प्रक्रिया तंत्रे विकसित करणे हे संस्थेचे एक महत्त्वाचे कार्य असून अशी संस्थेची तंत्रे सहा पदार्थांशी संबंधित आहेत (उदा., पुदिन्यापासून मेंथॉल, गुलाबापासून गुलाब तेल, वाळ्याचे तेल).               

प्रमुख औषधी वनस्पती व बाष्पनशील तेलांच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने संस्था विदेशी वनस्पतींचे प्रवेशन, त्यांच्या कृषितंत्राचा आणि प्रक्रिया तंत्राचा विकास यांविषयीचे प्रयत्न करीत आली आहे (उदा., अफू व जपानी पुदिना).               

संस्था मूलभूत विज्ञान विभाग प्रस्थापित करण्याचे जोमाने प्रयत्न करीत असून त्यामुळे जादा उत्पादन देणारे आणि रोग व पीडक यांना विरोध करणारे वाण/जनुकविधा (आनुवंशिक घटना) मिळविण्यास मदत होईल. संस्थेच्या प्रादेशिक केंद्राची वाढ करण्याचे प्रयत्न चालू असून ग्रामीण विकासाचे आदर्श म्हणून व त्या त्या भागातील अशा वनस्पतींवर आधारित छोटे उद्योग उभारण्यास आधार निर्माण होईल, बाष्पनशील तेले व कच्ची औषधी द्रव्ये यांचे भौतिकीय व रासायनिक मूल्यमापन करण्याच्या आधुनिक सोयी संस्थेजवळ आहेत. उदा., विविध वर्णपट प्रकाशमापक, अंकीय ध्रवणमापक, वायुवर्णलेखक, पारगमन इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक इ. उपकरणे. संस्था सीआयएमएपी न्यूज लेटर आणि करंट रिसर्च ऑन मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लॅंट्स ही त्रैमासिके आणि वार्षिक अहवाल प्रसिद्ध करते.               


इंडिस्ट्रियल टॉक्सिकॉलॉजी रिसर्च सेंटर (ITRC) : १९६५ साली लखनौला स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेपुढील उद्दिष्टे अशी आहेत : (१) पद्धतशीर रोगपरिस्थितीवैज्ञानिक सर्वेक्षणे करून औद्योगिक व कृषी कामगारांपुढे उभे राहणारे व्यावसायिक आरोग्यविषयक धोके शोधणे (२) औद्योगिक व पर्यावरणीय रसायनांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने मूल्यमापन करण्याचे काम हाती घेणे (३) औद्योगिक रसायने-पर्यावरणीय प्रदूषक पदार्थ यांच्या क्रियेच्या पद्धतीचे प्रायोगिक अध्ययन करणे (४) पर्यावरणीय प्रदूषकांच्या व त्यांच्यामुळे उद्‌भवणाऱ्या रोगांसाठी सोयीच्या निदानीय परीक्षा विकसित करणे आणि उपचारात्मक/प्रतिबंधक उपाय सुचविणे (५) पर्यावरणीय प्रदूषण विषयीच्या संनियंत्रक अभ्यासाचे संचालन करणे (६) धोकादायक रसायनांची माहिती गोळा करून तिचा प्रचार करणे (७) अनेक विज्ञानशाखांची पार्श्वभूमी असलेल्या वैज्ञानिकांना पर्यावरणीय आणि औद्योगिक विषविज्ञानाविषयी प्रशिक्षण देणे.               

या केंद्राची घेरू (लखनौ) व कानपूर येथे क्षेत्रीय केंद्रे आहेत. येथील संशोधन व विकासाच्या कार्यक्रमांचा रोख पुढील गोष्टींचे उत्पादन व वापर करताना येणाऱ्या व्यावसायिक आणि पर्यावरणीय आरोग्यविषयक प्रश्नांकडे आहे : रंजके, धातू, धूळ, पीडक नियंत्रक रसायने, खते, बहुवारिके व खनिज तेल. औद्योगिक धातु-विषबाधा व अन्नपदार्थातील भेसळ यांबाबतीतील ⇨ग्रामण चिकित्सेचा अभ्यासही यात येतो. अनेक विज्ञानशाखांच्या मार्गांचा अवलंब करून वरील कार्य करण्यात येते (उदा., जीवरासायनिक विषविज्ञान, रोगपरिस्थितीविज्ञान, फुफ्फुस शरीरक्रियाविज्ञान).               

औद्योगिक रसायने व पीडकनाशके यांच्या सुरक्षिततेविषयीचे मूल्यमापन करण्याची मध्यवर्ती सुविधा येथे एप्रिल १९७८ मध्ये स्थापण्यात आली तीद्वारे पीडकनाशके व इतर रसायनांचा दीर्घकालिक व तीव्र विषबाधा आणि सुरक्षिततेचे मूल्यमापन या दृष्टींनी अभ्यास करण्यात येतो. तसेच निवासतंत्रांवरील [⟶ परिस्थितीविज्ञान] प्रदूषक पदार्थांच्या विषारी परिणामांविषयीचे मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित करणे, हेही या सुविधेच्या अंतर्गत असलेले महत्त्वाचे कार्य आहे. बाहेरील संस्था, उद्योग व आरोग्य विभाग यांना याबाबतीत मदत करण्याच्या दृष्टीनेही हे केंद्र प्रयत्न करते.               

गरजेवर आधारलेले संशोधन कार्यक्रम ओळखून काढण्याच्या दृष्टीने येथील रोगपरिस्थितिवैज्ञानिक विभाग वृद्धिंगत केलेला असून संघटित क्षेत्रातील तसेच ग्रामीण व लघु-उद्योग क्षेत्रांतील कामगारांची आरोग्यविषयक सर्वेक्षणे करण्याकरिता या विभागाच्या कामाला गती देण्यात आली आहे. या केंद्रामार्फत कानपूरच्या एका रूग्णालयात बाह्य व्यावसायिक आरोग्य चिकित्सालय चालविण्यात येते.               

रंजके (उदा., मेटॅनिल यलो), पीडकनाशके व कृषिरसायने, बहुवारिके व खनिज तेल रसायन यांची विषबाधा, धुळीने निर्माण होणारे रोग व त्यावरील उपाययोजना यांविषयीचे अध्यन या केंद्रात केले जाते. कीटकांचे रासायनिक, जीवरासायनिक, हॉर्मोनांद्वारे व प्रतिरक्षावैज्ञानिक नियंत्रण करण्याविषयीचे संशोधन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून येथील एक प्रयोगशाळा कार्य करीत आहे. पुष्कळ विविध प्रकारांच्या संभाव्य विषारी पदार्थांचे (उदा., धूळ, सूक्ष्म वनस्पती, सौंदर्यप्रसाधने इ.) मूल्यमापन येथे करण्यात येते. येथे दरवर्षी औद्योगिक निरूपयोगी द्रव पदार्थ व पाणी यांच्या असंख्य नमुन्यांचे विश्लेषण करण्यात येते.               

औद्योगिक, कृषिविषयक, व्यावसायिक व पर्यावरणीय विषारीपणा विषयीच्या प्रश्नांसंबंधीच्या माहितीचे संकलन, संग्रह, संस्करण व प्रसार करण्याचे (उदा., विद्यापीठे, संघटना, आंतरराष्ट्रीय संस्था वगैरेंकडे पाठविण्याचे) काम येथे केले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणी कार्यक्रमान्वये पुरस्कारित केलेल्या ‘संभाव्य विषारी रसायनांच्या आंतरराष्ट्रीय नोंदणी’ जाळ्यास प्रादेशिक माहिती पुरविण्याच्या कामासाठी या केंद्राची नियुक्ती झालेली आहे. लघुपुस्तके, वैज्ञानिक/तांत्रिक अहवाल, प्रबंधिका वगैरे, तसेच इंडस्ट्रियल टॉक्सिकॉलॉजी बुलेटीन हे त्रैमासिक व औद्योगिक विषविज्ञानासंबंधी सतत जाणीव निर्माण करण्यासाठी एक मासिक हे केंद्र प्रसिद्ध करते.               

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था वा संघटना तसेच संशोधन आणि व्यापारी संस्था वा संघटना यांना विषवैज्ञानिक समस्या आणि संभाव्य विषारी द्रव्ये असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात राहण्याविषयीची मानके व मर्यादा विकसित करण्याच्या कामी हे केंद्र सल्ला देते. भारत सरकारच्या पर्यावरणविषयक बाबींच्या कार्यक्रमांना आकार देण्याच्या कामी केंद्र प्रत्यक्ष सहभागी होते.               

सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी (CCMB) : १९७७ साली मुळात हैदराबादच्या रिजनल रिसर्च लॅबोरेटरीची अर्धस्वायत्त शाखा म्हणून हे केंद्र उभारण्यात आले होते व १९८१ पासून स्वयंपूर्ण राष्ट्रीय प्रयोगशाळा म्हणून हे काम करीत आहे. याची पुढील उद्दिष्टे आहेत : (१) आधुनिक जीवविज्ञानाच्या आघाडीच्या व बहुशाखीय क्षेत्रांतील संशोधन करणे आणि या संशोधनकार्याचे संभाव्य व्यावहारिक उपयोग शोधणे (२) देशातील जीवरासायनिक व जीववैज्ञानिक तंत्रविद्येचा मजबूत पायावर विकास होण्यासाठी मदत करण्याच्या दृष्टीने समन्वेषक कार्य करणे (३) आधुनिक जीवविज्ञानातील आघाडीवरच्या क्षेत्रांतील लोकांना प्रशिक्षण देणे, विशेषतः सर्वसाधारणपणे देशात ज्यांच्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसतील अशा खास तंत्राचे अल्पकालीन प्रशिक्षण इतर संस्थांतील कर्मचाऱ्यांना देणे (४) आधुनिक जीवविज्ञानातील बहुशाखीय क्षेत्रांतील नव्या व आधुनिक तंत्रांसाठी देशातील केंद्रीभूत सुविधा पुरविणे आणि या सुविधांचा इतर प्रयोगशाळांतील व संस्थांमधील संशोधक जास्तीत जास्त उपयोग करून घेत आहेत याची खातरजमा करून घेणे (५) केंद्राच्या कार्याशी संबंधित असलेल्या क्षेत्रांमध्ये मूलभूत व अनुप्रयुक्त कार्य करीत असलेल्या देशी-विदेशी संस्थांशी पुरेशा प्रमाणात परस्पर संपर्क साधणे आणि (६) आधुनिक जीव-वैज्ञानिक संशोधनाशी सुसंगत अशी माहिती गोळा करणे, पडताळणे व तिचा प्रसार करणे.               

येथे संशोधनाचे परंपरागत विभाग नाहीत. येथे सक्षम व नेतृत्व गुण असलेल्या व्यक्तींभोवती विविध संशोधन गट तयार झाले आहेत. हे गट अतिशय विस्तृत क्षेत्रांत संशोधन करीत आहेत उदा., प्रथिनांच्या न्यूक्लिइक अम्लांशी होणाऱ्या आंतरक्रिया व या आंतरक्रियांवर धातवीय आयनांचा पडणारा प्रभाव कोशिकांचे (पेशींचे) विभाजन व मारक (कर्क) कोशिकांत रूपांतरण अर्बुदे व कर्करोगाचे विविध प्रकार संपूर्ण कोशिकांचे वर्णपटलेखन स्तनी प्राण्यांच्या शरीर क्रियाविज्ञानातील गंधाचे रासायनिक, जीववैज्ञानिक, वर्तनविषयक व जननिक विश्लेषण, जीवोत्पत्तीच्या वाटचालीतील रासायनिक क्रमविकास ते जीववैज्ञानिक क्रमविकास अशा झालेल्या संक्रमणाचा प्रश्न कोशिकेच्या गणितीय प्रतिकृती वगैरे.               

रेणवीय जीवविज्ञान, कोशिका जीवविज्ञान, आनुवंशिकी, सूक्ष्मजीवविज्ञान, जीवरसायनशास्त्र, जीवभौतिकी व सैद्धांतिक जीवविज्ञान या आधुनिक जीवविज्ञानाच्या बहुतेक शाखांतील संशोधन करण्याची उत्कृष्ट प्रयोगशालीय सुविधा आणि उच्च दर्जाची तंत्रवैज्ञानिक तज्ञता या केंद्रात उपलब्ध आहेत. ⇨मार्गण मूलद्रव्ययुक्त जैव रेणूंचा विकास व निर्मिती करण्याची सुविधा या केंद्राने भारतात प्रथमच १९८७ मध्ये उपलब्ध करून दिलेली असून हे रेणू जननिक अभियांत्रिकी व जीव तंत्रविद्या या क्षेत्रांतील संशोधनात उपयुक्त असलेले एक महत्त्वाचे साधन आहे. वर्षातून दोन वेळा (जानेवारी व जूनमध्ये) केंद्र पी.एच्‌.डी.च्या संशोधन कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांची निवड करते. जगातील अनेक प्रसिद्ध जीववैज्ञानिकांना केंद्र आमंत्रण देऊन बोलाविते हे तज्ञ येथे येऊन व्याख्याने देतात, चर्चेत भाग घेतात किंवा विशिष्ट संशोधन कार्यक्रमांना साहाय्य करतात.

                

इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी (IMTECH) : सूक्ष्मजीव तंत्रविद्या व जननिक अभियांत्रिकी यांमधील आघाडीवरील क्षेत्रांमधील संशोधन करण्याच्या दृष्टीने ही संस्था १९८४ साली चंडीगढला स्थापन करण्यात आली. संस्थेच्या प्रारंभिक प्रयोगशाळेचे काम जानेवारी १९८४ मध्ये सुरू झाले असून मुख्य प्रयोगशाळेची इमारत १९८७-८८ साली पूर्ण होणार होती.


संस्थेची पुढील उद्दिष्टे ओहत : (१) सूक्ष्मजीवतंत्रविद्येसाठी एकात्मिक संशोधन विकास व अभिकल्प यांची पायाभूत तयारी करणे (२) जननिक अभियांत्रिकीसह अनुरूप जीवतंत्रविद्येतील प्रस्थापित व उदयास येत असलेल्या क्षेत्रांतील मूलभूत व अनुप्रयुक्त संशोधन आणि विकास कार्यक्रम हाती घेणे (३) देशात हल्ली उपलब्ध व वापरात असलेल्या चालू सूक्ष्मजीवजन्य प्रक्रियांचे पर्याप्तीकरण करणे (४) सूक्ष्मजीव संवर्धनाच्या व इतर कोशिकाश्रेणींच्या (ज्यांची अमर्यादपणे अभिवृद्धी चालेल अशा कोशिकांच्या) जनुकसंचय साधनांचा व जननिक साठ्यांचा विकास करणे व ते टिकवून ठेवणे जीवरासायनिक अभियांत्रिकी, ⇨सूक्ष्मप्रक्रियक प्रणालीसह उपकरणयोजनेचा विकास आणि प्रक्रिया प्रचलांच्या गणितीय प्रतिकृतींचा विकास यांच्या सुविधा स्थापन करणे (६) प्रक्रिया उपकरणे व जैव-विक्रियक यांच्या अभिकल्पाची सुविधा उपलब्ध करून देणे (७) संशोधक व तंत्रज्ञ यांना सूक्ष्मजीवविज्ञान, सूक्ष्मजीवतंत्रविद्या व जीवरासायनिक अभियांत्रिकी या विषयातील प्रशिक्षण देणे (८) संस्थेच्या गरजा भागविण्यासाठी सूक्ष्म संदर्भ व माहिती यांच्या पुनर्प्राप्तीची व प्रसाराची सुविधा तसेच माहितीची पेढी स्थापन करणे (९) उद्योग व शैक्षणिक संस्थांशी प्रभावी संपर्क स्थापणे व राखणे आणि (१०) औद्योगिक संयंत्रांसाठी अभिकल्प व अभियांत्रिकी यांचा सधन कार्यक्रम बनविण्याची क्षमता निर्माण करणे आणि जीवतंत्रविद्येतील राष्ट्रीय महत्त्वाचे संशोधन व विकासाचे पुरस्कृत काम हाती घेणे.

इ. स. १९८५ मध्ये येथे पाच संशोधन कार्यक्रमांचे काम चालू होते. हळूहळू वरील उद्दिष्टांना अनुरूप असे कार्य सुरू करण्यात येणार आहे. रेणवीय जीवविज्ञान, जननिक अभियांत्रिकी व अनुप्रयुक्त सूक्ष्मजीवविज्ञान या क्षेत्रांतील संशोधन व विकासाच्या कामांसाठी लागणारी आवश्यक साधने, उपकरणे संस्थेजवळ आहेत उदा., किण्वन-उपकरणे, अति-केंद्रोत्सारक, निरनिराळे वर्णलेखक, चाचणी व विश्लेषणाची साधने वगैरे. संशोधनासाठी लागणार्या विविध जीवरसायनांचा व किरणोत्सर्गी रसायनांचा पुरेसा साठा संस्थेजवळ आहे.               

सेंट्रल फ्यूएल रिसर्च इन्स्टिट्यूट (CFRI) : बिहारमधील धनबाद जिल्ह्यात १९५० साली स्थापन झालेल्या या संस्थेत पुढील विषयांचे मूलभूत व अनुप्रयुक्त संशोधन केले जाते : भारतातील इंधनसंपत्तीविषयीचे, विशेषतः दगड कोळसा व लिग्नाइट यांच्याविषयीचे, त्यांची गुणवत्ता व सर्वांत कार्यक्षमपणे वापर करताय येईल असे संभाव्य उपयोग यांच्या दृष्टीने मूल्यमापन करणे.              

येथील संशोधन व विकासाची कामे स्थूलपणे पुढील आठ विभागात किंवा क्षेत्रांत विभागण्यात आली आहेत : (१) साधनसंपत्तीची गुणवत्ता अंदाजणे, (२) दगड कोळशाची प्राप्ती, (३) कोळशाचा सरळ वार, (४) कोळशाचे रूपांतर, (५) उत्पादनात सुधारणा आणि मूल्यनिर्धारण, (६) प्रक्रिया विकास आणि प्रायोगिक तत्त्वावरील कृतिविषयीच्या माहितीचा मोठ्या शाखेच्या अभिकल्पासाठी वापर करण्याविषयीचा अभ्यास, (७) पूरक संशोधन व विकासाची कामे आणि (८) पूरक तांत्रिक कामे (उदा., तंत्रविद्या हस्तांतरण व सल्लागारी, तांत्रिक-आर्थिक मूल्यमापन).               

दगडी कोळसा व त्यापासून मिळविलेल्या इंधनांच्या राशिपरीक्षणासाठी संस्थेजवळ मार्गदर्शी संयंत्र सुविधा व प्रक्रिया-विकास शाखा यांची सोय आहे (उदा., ठोकळे-विटा बनविण्याची, कार्बनीकरणाची, वायवीकरणाची, दायु-स्तरीय ज्वलनाची, हायड्रोजनीकरणाची, गुलिकाकरणाची, खताची अशी विविध संयंत्रे). तसेच संस्थेत संशोधनाची व परीक्षणाची खास साधनसामग्री आहे. उदा., कित्येक प्रकारचे वर्णलेखक, वर्णपटलेखक, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वगैरे.               

भारतातील दगडी कोळशाची व लिग्नाइटाची खाणकामापूर्वी व खाणकामानंतर भौतिकीय व रासायनिक सर्वेक्षणे करण्यासाठी देशातील दगडी कोळसा असलेल्या प्रमुख क्षेत्रांत संस्थेने पुढील सात प्रादेशिक सर्वेक्षण प्रयोगशाळा स्थापल्या आहेत : झरिया (धनबाद), रांची (नामकुय), नागपूर, जम्मू-तावी, राणीगंज (बरद्वान), जोरहाट व व बिलासपूर.        

येथील संशोधन व विकासाच्या कार्यांतून पुढे आलेल्या अनेक प्रक्रियांचा वापर करून घेण्यात येत आहे. उदा., दगडी कोळसा, लिग्नाइट वा नारळाची करवंटी यांपासून सक्रियित कार्बन मिळविणे, अँथ्रॅसिनाचे शुद्धीकरण, हलक्या दर्जाच्या दगडी कोळशापासून ठोकळे बनविणे इत्यादींशी निगडति असलेल्या या प्रक्रिया आहेत.               

येथील पुढील संशोधन व विकासांचे प्रकल्प हे मार्गदर्शी संयंत्राच्या टप्प्यापर्यंत प्रगत झाले आहेत (१९८५) : दगडी कोळशाचे अभिशोधन (फायदेशीर होण्याच्या दृष्टीने गुणधर्मात सुधारणा करणे) व कोकिंग कोळशाचे संरक्षण, खनिज तेलाच्या जागी दगडी कोळसा वा त्यापासून बनविलेल्या इंधनांची योजना करणे दगडी कोळसा व डांबर यांपासून रसायने मिळविणे आणि घरगुती वापराचे इंधन बनविणे. यांशिवाय अनेक मूलभूत प्रकल्पही हाती घेण्यात आलेले आहेत.               

संस्था फ्यूएल सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे त्रैमासिक व सीएफआरआय न्यूज लेटर हे मासिक प्रसिद्ध करते.               

सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट (CGCRI) : १९५० साली कलकत्त्याला स्थापण्यात आलेल्या या संस्थेचे पुढील उद्दिष्ट आहे : काच, मृत्तिका उद्योग, उच्चतापसह (न वितळता उच्च तापमान सहन करू शकणारे) पदार्थ, काचेसारखे एनॅमल आणि अभ्रक या क्षेत्रांमधील राष्ट्रीय महत्त्वाचे वैज्ञानिक आणि औद्योगिक/अनुप्रयुक्त संशोधन करणे. या संस्थेत पुढील बाबींशी संबंधित कामे केली जातात : (१) देशाच्या सामाजिक, संरक्षणविषयी, आर्थिक व औद्योगिक गरजांना अनुरूप अशा तंत्रांचा (तंत्रविद्यांचा) विकास, (२) देशातील संबंधित कच्च्या मालाच्या साधनसंपत्तीचे मूल्यमापन करणे व तिचा उपयोग करून घेणे, (३) खास प्रकारची काच व मृत्तिका उद्योगासाठी लागणारे पदार्थ या क्षेत्रांमध्ये तांत्रिक क्षमता व स्वावलंबन प्राप्त करणे, (४) संबंधित क्षेत्रांमधील देशाच्या सामाजिक, आर्थिक व औद्योगिक गरजांना अनुरूप अशा आयात केलेल्या तंत्रविद्या आत्मसात करणे त्यांचे अनुयोजन करणे आणि त्या अद्ययावत करणे (५) सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांतील संस्थांनी पुरस्कृत केलेले कार्यक्रम हाती घेणे आणि भट्टी वगैरेंची गुणवत्ता, उत्पादनक्षमता, अभिकल्प व कार्यपद्धती यांमध्ये सुधारणा करण्यासाठी उद्योगांना तांत्रिक मदत देणे (६) अनुप्रयुक्त संशोधनाला चालना देण्यासाठी तसेच वैज्ञानिक व तांत्रिक सामर्थ्य उभारण्यासाठी आवश्यक असलेले संबंधित क्षेत्रातील संशोधन करणे आणि (७) काच व मृत्तिका उद्योगांचा विकास करण्यासाठी उद्योगाला व शासकीय विभागांना माहिती, सल्लागारी, परीक्षण इ. रूपांनी तांत्रिक सल्लावजा सेवा देणे. ग्रामीण क्षेत्रातील व कुटीरोद्योगाच्या पातळीवरच्या उद्योगांच्या गरजा भागविण्यासाठी संस्था प्रयत्न करते. हे करताना परंपरागत कुशलता व क्षमता यांचा वापर करण्यावर खास भर देण्यात येतो आणि विशेषतः समाजातील दुर्बल घटकांसाठी रोजगार निर्माण्याची दृष्टी ठेवण्यात येते.               

संस्थेचे कार्य काचविज्ञान व तंत्रविद्या, उच्चतापसह पदार्थ, मृत्तिका धातू प्रणाली, भट्ट्या व इंधने वगैरे १२ विभागांत विभागले असून नरोडा (गुजरात) व खुर्जा (उत्तर प्रदेश) येथे संस्थेची विस्तार केंद्रे आहेत.


देशी कच्च्या मालापासून लष्करी विवेचक दृष्टीने महत्त्वाच्या आणि आयात वस्तूंना पर्यायी ठरणाऱ्या उत्पादनांच्या विकासाशी संबंधित अशा संशोधन कार्यक्रमांकडे खास लक्ष देण्यात येते. उदा., १९६१ साली सुरू झालेले संस्थेचे प्रकाशकीय काचनिर्मितीचे मार्गदर्शी संयंत्र संरक्षण आस्थापना आणि प्रकाशकीय उपकरण उद्योग यांना प्रकाशकीय काच पुरविते. संस्थेने विकसित केलेल्या अनेक प्रक्रिया व उत्पादने वापरात आहेत उदा., प्रकाशकीय काचनिर्मिती प्रक्रिया, मृत्तिका व काच रंग खास फरश्या व एनॅमले, तंतुरूप काचेसाठी स्वस्त तंत्र, अभ्रकावर आधारित रंगलेप वगैरे.               

मृत्तिका वस्तू भाजण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत करणे, कमी प्रदूषण व किमान मानवी कष्ट हे साध्य करण्याच्या दृष्टीने संस्थेचा एक एकात्मिक बहुशाखीय प्रकल्प कार्यान्वित आहे. संदेशवहन प्रणाली आणि इलेक्ट्रॉनीय उद्योग यांच्यासाठी लागणाऱ्या घटकांच्या विकासाच्या क्षेत्रातही संस्था कार्य करत आहे (उदा., संदेशवहनासाठी प्रकाशकीय काचतंतू.)               

काचेच्या तंतूंनी प्रचलित केलेली संयुक्त द्रव्ये विकसित करण्याचे प्रयत्नही येथे चालू आहेत. ही संयुक्त द्रव्ये लाकूड, ॲस्बेस्टस, लोहेतर द्रव्ये व काही बाबतीत पोलाद यांना पर्यायी ठरू शकतील. सामान्य मृत्तिका व इतर द्रव्यांपासून स्वस्त बांधकाम सामग्री बनविण्याचे प्रयत्नही या क्षेत्रात येतात. तसेच खास द्रव्ये (उदा., सिलिकॉन कार्बाइड व सिलिकॉन नायट्राइड यांसारखे ऑक्साइड नसलेले उच्चतापासह पदार्थ) तयार करण्यात येत आहेत. उद्योगधंद्यात वापर करून घेता यावा या दृष्टीने काही कच्च्या मालाचे (उदा., काचेची वाळू, चुनखडक, कायनाइट इ.) पद्धतशीर मूल्यमापन व अभिशोधन करण्याचे काम ही संस्था इतर संस्थांच्या सहकार्याने करते.               

काच व मृत्तिका उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल व त्यांद्वारे उत्पन्न होणाऱ्या वस्तू यांचे परीक्षण करण्याच्या सुविधा संस्थेत आहेत. या कच्च्या मालाच्या मूल्यमापनाच्या व अभिशोधनाच्या संदर्भात संस्था सल्लागारी सेवा देते. संस्था सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्सिटट्यूट बुलेटीन (त्रैमासिक), डॉक्युमेंटेशन लिस्ट ऑन ग्लास अँड सिरॅमिक्स (मासिक) आणि वार्षिक अहवाल प्रसिद्ध करते.               

नॅशनल मेटॅलर्जिकल लॅबोरेटरी (NML) : धातुविज्ञान व संबंधित क्षेत्रांच्या विविध शाखांमधील संशोधन व विकासाचे काम हाती घेण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवून जमशेटपूर येथे १९५० साली ही प्रयोगशाळा स्थापण्यात आली. धातुके (कच्च्या रूपातील धातू), खनिजे, उच्चतापसह पदार्थ आणि लोह व लोहेतर धातू व मिश्रधातू यांचे संशोधन, विकास, अनुसंधान व परीक्षण याबाबतींतील संघटित कार्य करण्याच्या दृष्टीने ही प्रयोगशाळा सुसज्ज आहे. भारतातील सामान्य व धातुविज्ञानावर आधारलेल्या उद्योगांमधील नानाविध अडचणींवरचे उपाय मिळावेत या दृष्टीने येथील संशोधन व विकास कामांची दिशा निश्चित केली आहे. बाजारपेठेत स्वीकारली जाणे आणि व्यापारी पातळीवर कार्यान्वित करण्यासाठी तंत्रविद्येचे हस्तांतरण करणे या पातळीपर्यंतची उत्पादने व प्रक्रिया विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरील व संयंत्रांतील चाचण्या घेण्यावर भर देण्यात येतो. अनुप्रयुक्त कार्याला पाठबळ देण्यासाठी म्हणून येथे मूलभूत संशोधनही केले जाते.               

देशी साधनसंपत्ती व प्रज्ञा यांचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने या प्रयोगशाळेने केलेले संशोधन व विकासाचे प्रयत्न फलद्रूप झाले असून यातून अनेक उद्योग उभे राहिले आहेत. आधीच्या उद्योगांकडे तंत्रविद्येचे हस्तांतरण करण्यात आले आहे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांमधील संशोधन व विकास करणाऱ्या संघटनांशी ही प्रयोगशाळा सहकार्य करते. धातुवैज्ञानिक क्षेत्रात हिला चांगली ख्याती प्राप्त झाली असून येथील कार्याची विभागणी धातुक शुद्धीकरण व खनिज अभिशोधन, निष्कर्षण धातुविज्ञान, लोखंड व पोलाद तंत्रविद्या, धातुचूर्ण तंत्रविद्या वगैरे १६ विभागात केली आहे.               

विकासकार्य आणि प्रक्रियेची तांत्रिक-आर्थिक शक्यता अभ्यासणे यांच्या अनेक मोठ्या प्रमाणावरच्या सुविधा येथे स्थापण्यात आल्या आहेत (उदा., ताशी ५ टन धातुकावर संस्करण करणारी एकात्मिक खनिज-प्रक्रिया यंत्रणा, अपरांपरागत पद्धतीने लोखंड व पोलाद तयार करणे वगैरे). यांशिवाय येथे पुष्कळ सुविकसित उपकरणयोजनांविषयक सोयी आहेत (उदा., क्रमवीक्षक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, क्ष-किरण अनुस्फुरण वर्णपटमापक इत्यादी). येथील तज्ञतेचा उपयोग देशातील व आंतरराष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक व इतर संघटना करीत आहेत. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांतील पुष्कळ धातुवैज्ञानिक व अभियांत्रिकीय उद्योगांना ही प्रयोगशाळा सल्ला देते आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यास सहकार्य देते. ही प्रयोगशाळा सल्ला देणाऱ्या अभियांत्रिकीय संस्थांशी (उदा., मेटॅलर्जिकल अँड एंजिनिअरिंग कन्सल्टंट्‌स (इंडिया) लि.) सरसकट देवघेव करण्याच्या दृष्टीने सहकार्य करते. धातुकांचे शुद्धीकरण, खनिज अभिशोधन या बाबतींतील प्रयोगशाळेच्या प्रयत्नांमधून देशात पुष्कळ व्यापारी संयंत्रे सुरू झाली आणि काही उभारण्यात येत आहेत. ईजिप्त, नेपाळ, ब्रह्मदेश व सिरिया येथील अनुसंधानात या प्रयोगशाळेने साहाय्य केले आहे.               

परिभ्रमी भट्टी प्रक्रिया आणि भारतीय परिस्थितीमध्ये लोहधातुकाचे सरळ ⇨क्षपण करण्याचा उदग्र बकपात्र मार्गही येथे विकसित करण्यात आला आहे. औष्णिक आणि अणुकेंद्रीय वीज संयंत्रे, खत व रसायन संयंत्रे यासाठी लागणाऱ्या उच्च तापमानीय व विसर्पणरोधी (थोड्याशा प्रतिबलाने होणाऱ्या मंद विरूपणास विरोध करणाऱ्या) द्रव्यांच्या विकासात व परीक्षणात या प्रयोगशाळेने महत्त्वाचे काम केले आहे. अशा प्रकारची चार पोलादे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. साठी तयार करण्यात आली असून काही खास पोलादांच्या निर्मितीच्या प्रक्रियाही विकसित करण्यात आल्या आहेत. व्हॅनेडियमयुक्त लोह धातुके आणि ॲल्युमिना संयुगांतून मिळणारा साखा यांपासून व्हॅनेडियम धातूचे निष्कर्षण करण्याच्या दोन प्रक्रिया, तसेच कथिलाच्या साख्यापासून कथिलाचे व शिशाच्या सांद्रितांपासून शिशाचे निष्कर्षण करण्याच्या प्रक्रियाही येथे विकसित करण्यात आल्या आहेत. तांब्याला पर्यायी ठरू शकणाऱ्या ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातू प्रयोगशाळेने बनविल्या आहेत.               

ग्रॅफाइट मुशी, उष्णतारोधी लोहाच्या मिश्रधातू वगैरेंच्या तंत्रविद्या येथे विकसित करण्यात येत आहेत. औद्योगिक संयंत्रे, पाण्याचे नळ यांमधील धातू व मिश्रधातूच्या संक्षारणाविषयी प्रयोगशाळा अनुसंधान करते व प्रतिबंधक उपाय योजण्यासाठी सल्ला देते. रासायनिक व वर्णपटलेखनविषयक विश्लेषणासाठी आतापर्यंत आयात कराव्या लागणाऱ्या विविध प्रकारच्या प्रमाणभूत संदर्भद्रव्यांची निर्मिती येथे होते.               

ही प्रयोगशाळा चर्चासत्रे, परिसंवाद, औद्योगिक संमेलने, प्रदर्शने वगैरे आयोजित करते. प्रयोगशाळा एनएमएल टेक्निकल जर्नल (त्रैमासिक), डॉक्युमेंटेड सर्व्हे ऑन मेटॅलर्जिकल डिव्हलपमेंट्स (मासिक), वार्षिक अहवाल, प्रबंधिका, परिसंवादांची कार्यवृत्ते इ. प्रकाशित करते. मद्रास, बटाला (पंजाब), हावडा, नरोडा, दिघा (प.बंगाल) आणि कलकत्ता येथे प्रयोगशाळेची क्षेत्रीय केंद्रे आहेत.               


सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CRRI) : १९५२ साली नवी दिल्ली येथे स्थापन झालेल्या या संस्थेने हमरस्त्यांच्या सर्व बाबींच्या (उदा., वाहतूक अभियांत्रिकी, परिवहनाचे नियोजन, रस्त्यावरील सुरक्षितता) अभियांत्रिकीय संशोधनाला वाहून घेताना पुढील उद्दिष्टे समोर ठेवली आहेत : (१) राष्ट्रीय अग्रक्रमांनुसार पर्याप्त आर्थिक दृष्टीने रस्ते व विमानतळांवरील धावपट्ट्या यांच्या विविध प्रकारांचे अनुसंधान, अभिकल्प, बांधकाम व देखभाल यांसाठी तसेच संबंधित सामग्रीविषयीचे मूलभूत व अनुप्रयुक्त संशोधन करणे (२) रस्ता वाहतूक व परिवहन अभियांत्रिकी यांतील सर्व बाबींविषयीचे संशोधन व विकासाचे काम करणे यात अपघातांचा अभ्यास, रस्त्याचा वापर करणाऱ्यांचे मानसशास्त्र व परिवहनाच्या विविध प्रकारांशी निगडित असलेल्या रस्त्यावरील सुरक्षिततेच्या प्रयुक्त्यांचा विकास यांचाही समावेश आहे (३) देशातील ग्रामीण व कमी विकसित प्रदेशाचा सर्वांगीण आर्थिक विकास करण्यासाठी स्वस्त आणि सर्व हवामानातील ग्रामीण रस्ते बांधण्यासाठी श्रमप्रधान पद्धती व श्रमसाधने विकसित करणे (४) परदेशी तज्ञतेची आयात टाळण्यासाठी संबंधित क्षेत्रांतील विविध संघटनांना तांत्रिक सल्ला व सल्लागारी सेवा पुरविणे (५) देशातील रस्तेविकास योजनांची कार्यक्षमपणे अंमलबजावणी होण्यासाठी उजळणी पाठ्यक्रम/कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम यांच्याद्वारे रस्तेविषयक तंत्रज्ञांना प्रशिक्षण देणे (६) हमरस्ते व परिवहन अभियांत्रिकी आणि तत्संबंधित विषयांतील विविध पैलूंमधील साधने व तज्ञता या बाबतींतील सर्व आवश्यक पायाभूत व्यवस्था निर्मिणे व प्रस्थापित करणे (७) रस्ते, रस्ता वाहतूक व विशिष्ट भागातील संबंधित कामे यांविषयीच्या समस्यांच्या वैज्ञानिक अध्ययनाच्या बाबतीत इतर संघटना/विभाग यांना मदत करणे व त्यांचा विकास करणे (८) विस्तार केंद्रांची स्थापना करणे, त्यांची देखभाल करणे व व्यवस्था पहाणे (९) संशोधनाच्या फलनिष्पत्तींचे प्रात्यक्षिक दाखविणे व उपयोग करणे आणि (१०) वैज्ञानिकांची देवाणघेवाण, अभ्यास दौरे, विज्ञान व तंत्रविद्या यांच्या खास क्षेत्रातील प्रशिक्षण, संयुक्त प्रकल्प हाती घेणे आणि रस्ते व रस्ता वाहतूक अभियांत्रिकीच्या सर्व पैलूंशी संबंधित वैज्ञानिक संस्था-संघटना स्थापण्यासाठी तांत्रिक साहाय्य देणे, या गोष्टी साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या मान्यतेनुसार परदेशी वैज्ञानिक आस्थापनांशी/संघटनांशी संपर्क स्थापणे.               

संस्थेतील संशोधन व विकासाच्या कामांचे भू-तांत्रिक अभियांत्रिकी, मृदा स्थिरीकरण व ग्रामीण रस्ते, फरसंबंधी, पूल वगैरे आठ विभाग पाडण्यात आले आहेत. संशोधनासाठी पुरेशा पायाभूत सोयी येथे उपलब्ध आहेत. उदा., ग्रंथालय, कार्यशाळा, माहिती व प्रसार सेवा वगैरे. राष्ट्रीय गरजा व तातडी आणि वापरणाऱ्याच्या गरजा यांना अनुरूप असे संशोधन प्रकल्प संस्था हाती घेते, उदा., भूमिपात, ग्रामीण रस्त्यांकरिता योग्य तंत्रविद्या, डांबरासारखे संयोजक पदार्थ. ठळक भूवैज्ञानिक व जलवायुमानीय परिस्थिती असलेल्या आणि त्या विशिष्ट परिस्थितीतील रस्त्यांविषयीचे प्रश्न असलेल्या देशातील विविध प्रदेशांत चार प्रादेशिक संशोधन केंद्रे स्थापण्याची संस्थेची योजना आहे.

हमरस्ते अभियांत्रिकीतील विविध प्रकारचे आव्हानात्मक प्रश्न सोडविण्यासाठी संस्थेने तज्ञता व पायाभूत सोयी निर्माण केल्या आहेत. रस्त्यांविषयीचे नियोजन व बांधकाम यांच्याशी संबंध येणाऱ्या देशातील संघटनांशी संस्था संपर्क साधून असते. प्रशिक्षण हे संस्थेचे एक महत्त्वाचे काम असून त्यासाठी संस्था वर्षातून सहा उजळणी/प्रशिक्षण वर्ग व ठिकठिकाणी कार्यशाळा घेते. व्यापारी उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या पुष्कळ प्रक्रियांचे एकस्व संस्थेकडे आहे. ही संस्था वार्षिक अहवाल, खास प्रकल्पांचे अहवाल आणि आशियाई व आफ्रिकी देशांत तसेच ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याचा गोषवारा देणारे सीआरआरआय रोड ॲबस्ट्रॅक्ट्स प्रसिद्ध करते.               

सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CBRI) : १९५१ साली रूडकी येथे स्थापन झालेली ही संस्था इमारतींविषयीचे विज्ञान व तंत्रविद्या यांविषयी संशोधन करते. ही संस्था अभियंते, वास्तुविशारद व बांधकाम सामग्रीचे उत्पादक यांना इमारतीच्या बांधकामात वापरली जाणारी सामग्री व प्रक्रिया यांच्याबद्दल अधिक चांगली माहिती उपलब्ध व्हावी म्हणू मदत करते आणि परंपरागत सामग्री व तंत्रे यांच्यात सुधारणा करून साहाय्य करते. इमारतीचे बांधकाम स्वस्त व जलदपणे व्हावे म्हणून येथे नवीन प्रक्रिया, तंत्रे व बांधकाम सामग्री विकसित करण्यात येतात. विकासात्मक परीक्षणही संस्था हाती घेते बांधकाम उद्योगाला तांत्रिक साहाय्य करते आणि वैज्ञानिक व तांत्रिक माहितीचा प्रसार करते.               

संस्थेच्या संशोधन व विकासविषयक कामांची बांधकाम सामग्री, मृदा अभियांत्रिकी, वास्तुकला व भौतिक नियोजन वगैरे सात संशोधन विभागांत विभागणी केली असून यांशिवाय माहिती व नियोजन तसेच बांधकाम व विस्तार यांच्यासाठी स्वतंत्र विभाग संस्थेत आहेत. संस्थेच्या हल्लीच्या कार्यक्रमांमध्ये मुख्यत्वे ग्रामीण व शहरी गृहनिर्माण आणि औद्योगिक इमारतींवर भर दिलेला आहे. इमारतींतील इंधनाची बचत, नैसर्गिक आपत्तींच्या संदर्भातील इमारतींचे बांधकाम इत्यांदीविषयीच्या अनेक कार्यक्रमांची यात भर पडली आहे. मृदा अभियांत्रिकीच्या क्षेत्रात इमारती आणि इतर बांधकामाच्या पायांविषयीच्या अडचणींचा अभ्यास केला जातो. देशातील कित्येक प्रमुख प्रकल्पांमध्ये वापरण्याजोगती उपकरणे संस्थेने बनविली अहोत. बांधकाम सामग्रीच्या संदर्भात संस्था पुढील प्रमुख कामे करते. कमी दर्जाच्या मातीपासून चांगल्या गुणवत्तेच्या विटा बनविणे आणि उद्योगधंद्यात व शेतीमध्ये वाया जाणाऱ्या द्रव्यांचा वापर करून घेणे. इष्टतम, औष्णिक, ध्वनिकीय, वायुवीजन व प्रदीपन यांच्या संबंधीच्या परिस्थितीविषयीची मार्गदर्शक तत्त्वे सुचविण्याच्या दृष्टीने संस्था संशोधन करते. भारतातील सु. १२० ठिकाणची जलवायुमानीय आणि हवामानविषयक परिस्थिती अभ्यासून तिचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामुळे ऊर्जेच्या बाबतीत कार्यक्षम असणाऱ्या इमारतींचे अभिकल्प तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माहिती उपलब्ध झाली आहे.               

इमारतींच्या बांधकामविषयक क्षेत्रात छप्पर व जमिनी यांसाठी लागणाऱ्या व संस्थेने विकसित अनेक पूर्वरचित घटकांमुळे खर्चात व वेळेत बचत होत आहे (उदा., भिंतींसाठी दगडाचे ठोकळे वापरणे). ग्रामीण पर्यावरण सुधारण्यासाठी संस्थेने प्रयत्न केले आहेत. यामुळे सांडपाणी व मलोत्सर्जक पदार्थांची विल्हेवाट लावण्याचे सोपे उपाय पुढे आले आहेत. प्राकृतिक व पर्यावरणविषयक नियोजनात संस्थेने निर्मिलेली मानके वापरण्यात येत आहेत (उदा., देशातील नव्या औद्योगिक वसाहतींची वाढ आणि विकासाचे नियंत्रण करणे). संस्थेची अग्नि-संशोधन प्रयोगशाळा उत्पादकांना मार्गदर्शन करते (उदा., आगसूचक यंत्रणा वा आग विझविण्यासाठी स्वयंचलित फवारा यंत्रणा).               


अहमदाबाद, कलकत्ता, नवी दिल्ली, भोपाळ व हैदराबाद येथे संस्थेची विस्तार केंद्रे आहेत. संस्थेच्या विकास, बांधकाम व विस्तार विभागांकडे अनेक प्रकल्प असून तेथे सुधारित बांधकाम तंत्रे व सामग्री वापरण्यात येत आहे. उद्योगात जेथे नवीन बांधकाम सामग्रीच्या वा प्रक्रियेच्या मूल्यमापनाचा संबंध येतो, तेथील परीक्षणाचे काम संस्था हाती घेते व विशिष्ट प्रश्नांवरील उपाययोजना करण्यासाठी बांधकाम उद्योगाला सल्लागारी सेवा पुरविते. तेथे विकसित झालेली सामग्री व प्रक्रिया यांचा कसा वापर करून घ्यावा याविषयीचे प्रशिक्षण संस्था देते. संस्था सीबीआरआय ॲबस्ट्रॅक्ट (त्रैमासिक), इन्‌फॉर्मेशन बुलेटिन व लायब्ररी बुलेटिन (मासिके), वार्षिक अहवाल, इमारतीविषयीच्या संशोधनाची टिपणे वगैरे प्रसिद्ध करते.

सेंट्रल मायनिंग रिसर्च स्टेशन (CMRS) : १९५६ साली धनबादला स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेत खाणकाम व तत्संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील मूलभूत व अनुप्रयुक्त संशोधन करण्यात येते. खनिजांचे उत्पादन, खाण व खाणकामगारांची सुरक्षितता आणि खाणकामातील क्रियांची कार्यक्षमता व काटकसर या गोष्टींत वाढ करणे तसेच खाणकामगारांच्या आरोग्याला असणारे धोके कमी करणे आणि देशातील खनिजसंपत्तीचे संरक्षण करणे ही येथील संशोधनाची उद्दिष्टे आहेत.               

प्रयोगशाळेच्या कामांची विभागणी पुढील शाखांत केली आहे : (१) भूयामिकी व खाणकामाच्या पद्धती (उदा., दगडी कोळशाचे संरक्षण, दगडी कोळशाव्यतिरिक्त इतर खाणी) (२) खाणीतील पर्यावरण व खाणकामगारांचे आरोग्य (उदा., खाणीतील आगीचा धोका, स्फोट, वायुवीजन) आणि (३) अभियांत्रिकीय अभिकल्प व विकास आणि उपकरणयोजना (उदा., खाणीतील संदेशवहन, खाणकामाची सामग्री).

खाणकामाविषयीची तंत्रे, खाणकामाच्या पद्धती, भूमिगत खाणकामामुळे खाणीवरच्या पृष्ठभागाच्या होणाऱ्या हालचाली, अशा खाणींच्या छतांत व भिंतींना द्यावयाचे आधार, खाणीच्या खड्ड्यात भराव घालणे व त्यासाठी खाणकामातील टाकाऊ पदार्थांचा उपयोग करून घेणे, खाणकामाची स्फोटके, खाणीतील बोगद्यांचे बांधकाम, विशेषतः दगडी कोळशाच्या खाणीतील आग व स्फोट आणि त्यांच्यावरच्या उपाययोजना, खाणीतील वायुवीजन, ताज्या कोळशातील मिथेन, योग्य उपाय सुचविण्याच्या दृष्टीने खाणकामगारांतील व्यवसायजन्य रोगांचे अध्ययन इ. बाबतींतील संशोधन व विकासाची कामे येथे केली जातात.               

खाणीच्या छताला आधार देणे, खडकांच्या थराचे वर्तन, विषारी व धोकादायक वायू ओळखणे व त्यांविषयी अंदाज बांधणे (उदा., मिथेन, कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोजन सल्फाइड), तापमान व हवेचा वेग मोजणे, खाणीतील संदेशवहन वगैरे खाणकामाशी संबंधित असलेल्या पुष्कळ बाबींविषयीचे संशोधन आणि अनुसंधान येथे करण्यात आले असून त्यातून अनेक साधने, उपकरणे, प्रयुक्त्या व तंत्रे विकसित झाली आहेत.               

खाणकामाची विविध साधने व उपकरणे यांच्या कार्याच्या मूल्यमापनाच्या सोयी आणि त्यांचा सुरक्षितपणे वापर व देशातल्या देशात निर्मिती करणे या बाबतींत प्रयोगशाळा सल्ला देते. सुरक्षाविषयक सामग्री खाणीतील आधार, स्फोटके, तारदोर, विस्फोटके (उच्च स्फोटक-द्रव्याचा स्फोट घडवून आणण्यासाठी शीघ्रग्राही प्राथमिक स्फोटक द्रव्याचा उपयोग करणाऱ्या प्रयुक्त्या), शिरस्राणे, टोपीवरचे दिवे, काळे चष्मे, वायु-मुखवटे इत्यादींच्या परीक्षणाची सोय येथे आहे. दगडी कोळसा व खडकांच्या नमुन्यांचे बल, कोळशाचा प्रज्वलन बिंदू इ. निश्चित करण्याच्या व खाणीतील वायू, पाणी, खनिजे वगैरेंच्या विश्लेषणाच्या येथील सोयी इतरांना वापरता येऊ शकतात. १९७७-८३ या काळात या प्रयोगशाळेने आपले विशिष्ट तंत्रज्ञान १५८ उत्पादकांना उपलब्ध करून दिले होते. ही प्रयोगशाळा सीएमआरएस बुलेटीन (द्वैमासिक), सीएमआरएस सर्व्हिस टू इंडस्ट्री (त्रैमासिक), वार्षिक अहवाल व आढावा प्रसिद्ध करते.               

सेंट्रल मेकॅनिकल एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CMERI) : दुर्गापूर येथे १९५८ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे उद्दिष्ट यांत्रिक अभियांत्रिकीय उद्योगांना पुढील प्रकारे मदत करणे हे आहे : (१) नवीन अभियांत्रिकीय उत्पादने व प्रक्रियांचा अभिकल्प व विकास करणे (२) आयात केलेल्या यंत्रसामग्रीचा विकास व तीत सुधारणा करणे आणि (३) अभियांत्रिकीय सामग्रीच्या उत्पादनाचे मूल्यमापन व गुणवत्ता नियंत्रण करणे. या बाबतीत सहयोगी आणि पुरस्कृत संशोधन करून, विकासात्मक परीक्षण करून आणि तांत्रिक सल्लागारी देऊन संस्था अशी मदत करते. येथील संशोधन व विकासाचे काम अनुप्रयुक्त विज्ञान, स्वयंचल अभियांत्रिकी, सामग्रीविज्ञान, उत्पादन अभियांत्रिकी इ. आठ शाखांत विभागले असून देशाच्या चालू गरजांच्या दृष्टीने संस्थेने पुढील तातडीची उद्दिष्टे नजरेसमोर ठेवली आहेत : (१) ऊर्जा व वीज (ऊर्जेचे पर्यायी व जादा उद्‌गम इ.) (२) यंत्रसामग्रीचा (कृषी, खाणकाम, आवेष्टन इ.) विकास (३) लघु-उद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचा (ग्रामीण विकास व समाजकल्याण यात येतात) विकास (४) पर्यावरणीय नियमनासाठी संयंत्र व साधनांचा विकास आणि (५) उत्पादन अभियांत्रिकी व यंत्रणांच्या अपरंपरागत प्रक्रिया.               

अनेक प्रकारची यंत्रसामग्री व साहित्य येथे विकसित करण्यात आले आणि त्यामुळे आयात वस्तूंना पर्याय उपलब्ध झाले, निर्यातीला चालना मिळाली व उत्पादनक्षमता वाढली. औद्योगिक व इतर अवजड यंत्रसामग्रीविषयीचे महत्त्वाचे प्रकल्प येथे हाती घेण्यात आले होते. (उदा., द्रवीकृत इंधन वायूवरचा घरगुती स्टोव्ह, विटांच्या साचाकामाचे यंत्र इत्यादी).               

शेती व खाद्य पदार्थ संस्करणाच्या यंत्रसामग्रीच्या संदर्भात अनेक संघटनांनी या संस्थेकडून विशिष्ट तंत्रज्ञान घेतले आहे (उदा., खोल विहिरीवरील हातपंप, तांदळाला पॉलिश करण्याचे यंत्र, डबाबंद फळांवर संस्करण करण्यासाठी शिजविण्याचे उपकरण). लघु-उद्योगांना मदत करण्यासाठी संस्थेने यंत्रसामग्री व साहित्य बनविले आहे (उदा., विद्युत्‌ रासायनिक खुणा करायचे यंत्र, लोकरी विणकामाचे यंत्र). तप्त करवत पात्याचे कार्य सुधारणे, सापेक्ष अपघर्षक झिजेला असलेल्या द्रव्याच्या विरोधाचे मूल्यमापन आणि दगडी कोळशाचा तेल राळा जाळण्यासाठी योग्य ज्वलन पद्धतीचा विकास यांविषयीच्या प्रकल्पांचे काम १९८५ साली चालू होते. तसेच इतर काही प्रकल्पही हाती घेण्यात आले होते. अतिशुद्ध सिलिकॉन निर्मितीचे संयंत्र, टर्पिनिऑल मार्गदर्शी संयंत्र, चूर्णांचे मिश्रण व हाताळणी करणारे संयंत्र वगैरे याबाबतीत संस्थेने तांत्रिक सल्ला देण्याचे काम केले आहे. अभियांत्रिकीय उत्पादने व सामग्री यांच्या परीक्षणासाठी व मूल्यमापनासाठी सुविकसित साहित्याने युक्त अशी उत्तम सुविधा तसेच उच्च अर्हताप्राप्त व अनुभवी वैज्ञानिक या संस्थेत उपलब्ध आहेत. विनाशी व अविनाशी परीक्ष, कंपन व गोंगाट विश्लेषण, रासायनिक आणि धातुवैज्ञानिक विश्लेषण वगैरे सेवांची मागणी दरवर्षी वाढत आहे.               

दुर्गापूर, मद्रास, पुणे, लुधियाना व कोचीन येथे संस्थेची प्रादेशिक केंद्रे आहेत. विशेषीकृत क्षेत्रांतील प्रशिक्षण येथे देण्यात येते. अधूनमधून संस्था परिसंवाद व चर्चासत्रे आयोजित करते. संस्थेचे संपर्क कार्यालय कलकत्ता येथे आहे. संस्था मेकॅनिकल एंजिनिअरिंग बुलेटीनसीएमआरआय न्यूज लेटर ही त्रैमासिके, वार्षिक अहवाल, निर्देशिका, निदेशपुस्तक, प्रसिद्धिका, लघुपुस्तक आणि विविध अंतर्गत अहवाल प्रसिद्ध करते.               


नॅशनल एनव्हायरनमेंटल एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट(NEERI) : १९५८ साली नागपूर येथे स्थापन केलेल्या या संस्थेच्या संशोधन व विकास कार्यांमध्ये पर्यावरणविज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रांचा अंतर्भाव केला आहे. देशी कच्चा माल वापरणाऱ्या समुचित तंत्रविद्या विकसित करण्यावर येथे भर देण्यात येतो. संस्थेचे कार्य हवेचे संनियंत्रण व विश्लेषण, हवेचे प्रदूषण नियंत्रण, सांडपाणीविषयक अभियांत्रिकी, औद्योगिक व धोकादायक अपशिष्ट द्रव्ये व रोगपरिस्थितिविज्ञान वगैरे २३ गटांमध्ये संघटित करण्यात आले असून स्वतःच्या कार्याव्यतिरिक्त ही संस्था उद्योग, खाजगी व सार्वजनिक उपक्रम तसेच नगरपालिका यांच्यासाठी अनेक नेमून दिलेली सल्लागारी कामे व पुरस्कृत प्रकल्प हाती घेते. हवेचे प्रदूषण आणि सार्वजनिक पाणीपुरवठा व आरोग्य या क्षेत्रांतील जागतिक आरोग्य संघटनेचे आग्नेय आशियातील सहयोगी केंद्र म्हणून संस्था कार्य करते.             

येथील मूलभूत संशोधन व विकास कामांमुळे अनेक तंत्रे, साहित्य इत्यादींचा विकास झाला. उदा., पाण्यातील जादा फ्ल्युओराइडे काढून टाकण्याचे नलगोंडा तंत्र, पाण्याचा गढूळपणा कमी करणारी गाळण्याची साहाय्यक साधने, हवेच्या प्रदूषणाचे सर्वेक्षण करण्यासाठी हवेचे नमुने घेणारा साधन संच वगैरे. पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी क्लोरिनाच्या गोळ्या व कुप्या, वाऱ्याची दिशा व वेग अभिलेखक इत्यादींच्या उत्पादनाचे विशिष्ट तंत्रज्ञान उद्योजकांना देण्यात आले असून त्यानुसार काहींनी उत्पादन सुरू केले आहे.               

पाण्यातून फ्ल्युओरीन काढून टाकण्याची जगातील सर्वांत मोठी व आंध्र प्रदेशातील कादिरी येथील शाखा या संस्थेने आराखडा तयार करून कार्यान्वित केली आहे. अतिगालन पटलांच्या निर्मितीचा अभ्यास सेल्युलोज ॲसिटेट हे पायाभूत द्रव्य वापरून येथे करण्यात आला आहे. भारतीय परिस्थितीमध्ये ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या दृष्टीने योग्य असलेल्या मंद वालुका-गालनाच्या तांत्रिक मूल्यमापनावरील एक प्रकल्प येथे पूर्ण करण्यात आला आहे. पाण्यावर संस्करण करण्याची चार संपूर्ण संयंत्रे आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यांत प्रत्येकी एक याप्रमाणे उभारून संस्थेने त्यांच्या कार्याचे मूल्यमापन पण केले आहे. येथे हमखास सुरक्षित, पिण्यायोग्य पाणी व पाण्यावर संस्करण करणारी संयत्रे यांच्या साध्या पद्धती विकसित करण्यात येत आहे. जागतिक पर्यावरण संनियंत्रण प्रणाली कार्यक्रमातील जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या गुणवत्ता संनियंत्रण प्रकल्पात संस्था भाग घेत असून त्यामध्ये मुंबई, कलकत्ता व दिल्ली येथील हवेच्या गुणवत्तेचे संनियंत्रण करण्यात येत आहे. हवा प्रदूषाणच्या संनियंत्रणासाठी संस्थेने राष्ट्रीय जाळे पण प्रस्थापित केले आहे.               

संस्थेची अहमदाबाद, मुंबई, कलकत्ता, कोचीन, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कानपूर, मद्रास व नागपूर येथे प्रादेशिक केंद्रे आणि वातावरणातील वायू व प्रदूषक पदार्थांची पातळी ठरविण्यासाठी संनियंत्रण केंद्रेही आहेत. देशात प्रथमच हवेच्या प्रदूषणाचेही दीर्घकालीन कल उपलब्ध झाले असून सर्वसामान्य प्रदूषकांच्या संदर्भात हवेच्या गुणवत्तेचे नियमितपणे बोधन केले जाते. यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नगरविकास प्राधिकरणासारख्या संघटनांना जमिनीच्या वापराविषयीच्या नियोजनात होतो. ताजमहालावर हवेतील सल्फर डाय-ऑक्साइडाच्या होणाऱ्या संभाव्य परिणामाचे निर्धारण करण्यासाठी त्याच्या भोवतालच्या हवेवर एकसारखे लक्ष ठेवण्यात येते.               

निवडक उद्योगांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनांचा लगतच्या हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांविषयीच्या भारत-अमेरिकी प्रकल्पाचे अध्ययन संस्थेने पूर्ण केलेले असून त्या उत्सर्जनांच्या नियंत्रणाविषयी उपयुक्त माहिती उपलब्ध झाली आहे. येथील एक गट वाहितमल व औद्योगिक (उदा., कागद, रेयॉन, रसायने, पोलाद इ.) अपशिष्ट वरील संस्करण व त्यांचा वापर यांविषयी संशोधन करतो. संस्थेने विषारी व अनिवार्य कार्बनी अपशिष्ट यांवरील संस्करण करण्याची पद्धतीही तयार केली आहे. येथील एक गट शहरांतील घनरूप अपशिष्टांची वैशिष्ट्ये ठरविण्याचे व त्यांचे यांत्रिक रीतीने कंपोस्ट बनविण्याच्या स्वयंत्रांचे अभिकल्प बनविण्याचे काम करतो. संस्थेने ५० शहरांसाठी (उदा., पुणे, ठाणे) हे काम केले असून या बाबतीत संस्था आपली तज्ञता व तंत्रविद्या उपलब्ध करून देते विकास प्रकल्पांविषयी निर्णय घेणाऱ्यांना व नियोजनकारांना समृद्ध नैसर्गिक अधिवास व रक्षण, ऐतिहासिक स्मारके यांच्या संरक्षणाच्या उपाययोजना व योजिलेल्या प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाच्या पातळीविषयी अंदाज यांबाबतीत संस्था सहाय्य करते. याशिवाय संस्थेने अनेक विषयांवरचे (उदा., व्हायरस व सूक्ष्म जंतू यांच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याविषयी ) अभ्यास पूर्ण केले आहेत व काहींचे अध्ययन चालू आहे. येथील शास्त्रज्ञांची भारतीय मानक संस्थेच्या ७० समित्यांवर व ३० शासकीय समित्यांवर नियुक्ती झालेली होती. संस्थेच्या प्रादेशिक प्रयोगशाळा राष्ट्रीय जाळ्याचा एक भाग म्हणून हवेची गुणवत्ता नियमितपणे जाणून घेतात. इंडियन जर्नल ऑफ एनव्हायरनमेंट हेल्थ (त्रैमासिक), गाईड व करंट लिटरेचर इन एनव्हार्मेंटल इंजिनिअरिंग अँड सायन्स (मासिक), प्रशिक्षण पाठ्यक्रम नियमपुस्तिका, वार्षिक अहवाल, पुस्तिका, लघुपुस्तिका येथे वेळोवेळी प्रसिद्ध होतात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन डेव्हलपिंग कंट्रीज हे पुस्तकही संस्थेने प्रसिद्ध केले आहे. संस्था संदर्भ व माहिती सेवाही पुरविते.

नॅशनल एरॉनॉटिकल लॅबोरेटरी (NAL) : वैमानिकी-अवकाश अभियांत्रिकी यातील संशोधन व विकासाची कामे करणे आणि या महत्त्वपूर्ण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणे या कामांना मुख्यत्वे वाहून घेतलेली ही प्रयोगशाळा १९५९ साली कोडीहळळी (बंगलोर) येथे स्थापन झाली. प्रत्यक्ष वापर करणारे उद्योग व इतर संशोधन संस्थाच्या सहकार्याने येथील भावी संशोधन व विकासाची कामे हाती घेण्यात येतात.               

वैमानिक-अवकाश संशोधनातील प्रश्नांचे स्वरूप गुंतागुंतीचे व बहुशाखीय असून पुढील क्षेत्रातील संशोधन व विकासविषयक कामांना पुष्टी देण्यासाठी येथे सुविकसित सुविधा व तज्ञता उपलब्ध आहेत : वायुगतिकी, द्रायुयामिकी, सामग्रीविज्ञान, प्रचालन, संरचनात्मक विज्ञाने व पद्धती, अभियांत्रिकी या प्रत्येक क्षेत्राचा या प्रयोगशाळेत स्वतंत्र विभाग आहे. संगणक केंद्र, अभियांत्रिकी सेवा विभाग, आलेखक कला विभाग व वैमानिकी माहिती केंद्र यांचे या विभागांना साहाय्य होते. प्रयोगशाळेच्या कार्यक्रमांच्या नियोजन व व्यवस्थापनविषयक संचालकाला माहिती व समन्वय विभाग आणि प्रकल्प संनियंत्रण व मूल्यमापन गट हे मदत करतात. येथील संगणक केंद्रात बहुकार्यक्रमणाची व काल-सहभागाची सोय असून आलेखक विभागात संगणक-साहाय्यित अभिकल्पाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच ग्रंथ, नियतकालिके आणि इतर सेवा पुरविणारे माहिती केंद्र येथे आहे.               

राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षणाच्या दोन सुविधा (वायुगतिकीय परीक्षणासाठी वातविवरे व संगणक-नियंत्रित पूर्णाकृती शिणवटा परीक्षणासाठी सुविधा) येथे स्थापण्यात आल्या असून त्यांमुळे परदेशी चलनाची बचत, राष्ट्रीय प्रकल्पांविषयीची महत्त्वपूर्ण प्रदत्तनिर्मिती, वाढती सुरक्षितता इ. फायदे होतात. तंतूंनी प्रवलित केलेली प्लॅस्टिके व ऊर्जापरिवर्तक प्रदत्त प्रणाली यांच्यासाठी मार्गदर्शी संयंत्रे प्रयोगशाळेत उभारली आहेत त्यांची उद्योगांनाही मदत होते.               

अवकाश वैज्ञानिक कार्यक्रम व हलकी लढाऊ विमाने यांच्यासाठी संशोधन व विकासाची कामे करणे उड्डाणाच्या काळात योग्य तऱ्हेने काम करतील अशी इलेक्ट्रॉनीय सुविधा विकसित करणे वाऱ्यापासून ऊर्जा मिळविण्याच्या कार्यक्रमांचा पाठपुरावा करणे व वैमानिकीच्या संदर्भातील विविध चाचण्या घेणे ही कामेही येथे केली जात आहेत. येथील वायुगतिकी विभागामध्ये देशातील वैमानिकी-अवकाश वाहनांचे अभिकल्प व विकास यांविषयीचे माहिती (प्रदत्त) निर्मिण्यावर भर देण्यात येतो तर द्रायुयामिकी विभागाचा भर अशा वाहनांशी निगडित असलेल्या मूलभूत स्वरूपाच्या प्रवाहविषयक प्रश्नांवर आहे.               


सामग्रीविज्ञान विभागात पुढील गोष्टी नजरेसमोर ठेवून मूलभूत व अनुप्रयुक्त संशोधन करण्यात येते. वैमानिकी-अवकाश उद्योगाच्या दृष्टीने उपयुक्त अशी अधिक नवी व प्रगत सामग्री, संयुक्त द्रव्ये आणि त्यांच्या विश्लेषणाच्या, परीक्षणाच्या व वैशिष्ट्यीकरणाच्या पद्धती तसेच नाविन्यपूर्ण जोडणी तंत्रे यांचा विकास करणे. प्रचालन विभागाने घूर्णी-यंत्रसामग्री व ज्वलन यांसाठी अष्टपैलू सुविधा उभारल्या आहेत. संरचना विभागात वैमानिकी-अवकाश संरचनाच्या स्थितिक व गतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात येतो. पद्धती अभियांत्रिकी विभागाचा मुख्य हेतू आधुनिक नियंत्रण सिद्धांत, उड्डाण यामिकी, संवेदक तंत्रविद्या, तर्क व शक्ती इलेक्ट्रॉनीय प्रणाली यांमध्ये तज्ञता विकसित करणे, हा आहे.               

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडसारख्या उपक्रमांनी पुरस्कृत केलेले प्रकल्प ही प्रयोगशाळा हाती घेते आणि सल्लागारी सेवा व सुविधा इतरांना उपलब्ध करून देते. प्रयोगशाळा एगएएल न्यूज लेटर हे मासिक व वार्षिक अहवाल प्रसिद्ध करते.               

रिजनल रिसर्च लॅबोरेटरी (RRL), भुवनेश्वर : १९६४ साली स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेत पुढील प्रकारचे संशोधन व विकासाचे काम करण्यात येते आणि सल्लागारी सेवा उपलब्ध करून देण्यात येते : विविध नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेल्या उद्योगांना चालना देण्याच्या व त्यांचा विकास करणाच्या दृष्टीने एकूण देशातील आणि विशेषेकरून पूर्व भागातील प्रचंड व विविध प्रकारच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून घेणे. या प्रदेशातील खनिजांचे मोठे साठे, कमी दर्जाची व सरमिसळ झालेली धातुके, खनिज व धातू उद्योगांतून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ आणि उपपदार्थ यांचा वापर करून घेण्याच्या दृष्टीने येथील संशोधन व विकास कार्यावर भर दिला असून त्या दृष्टीने सुविधा वाढविल्या आहेत. येथे विकसित झालेल्या प्रक्रियांचा उद्योगात वापर करणे आणि आधीच असलेल्या कारखान्यांची कार्यक्षमता वाढविणे या दृष्टीने भट्ट्या व साधनसामग्री यांच्या अभिकल्पावर व विकासावर येथे भर देण्यात येतो.               

येथील प्रमुख प्रकल्प हे राष्ट्रीय व प्रादेशिक अग्रक्रमांशी जुळणारे आहेत. प्रयोगशाळा उद्योग, शैक्षणिक व संशोधन संस्था, शासकीय संघटना आणि उद्योजक यांच्याशी निकटचा संपर्क राखते आणि पुरस्कृत उदा., सौर ऊर्जेच्या वापराकरिता लागणाऱ्या दर्जाच्या सिलिकॉनाची निर्मिती/सल्लागारी/सहकार्य यावर आधारलेले प्रकल्प हाती घेते. ही प्रयोगशाळा वरिष्ठ पातळीवरचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम हाती घेते आणि विश्लेषण, माहिती व ग्रंथालय या सुविधा सामान्य लोक, अध्यापन संस्था व उद्योजक यांना पुरविते. प्रयोगशाळेच्या कार्यक्रमांची विभागणी खनिजविज्ञान, जलीय व विद्युत् धातुविज्ञान, वन व सागरी उत्पादने वगैरे दहा शाखांतून करण्यात आली असून यांमध्ये अनेक क्षेत्रांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. (उदा., कमी दर्जाच्या व सरमिसळ झालेल्या धातुकाचे समृद्धीकरण, खास सामग्री व संयुक्त द्रव्ये यांच्या विकास प्रक्रिया, साहित्य व नियंत्रण प्रणालींचे अभिकल्प बनविणे व विकास करणे).               

येथील खास तज्ञता व सुविधा यांच्यामुळे संस्था पुष्कळ देशीविदेशी संघटनांशी सहकार्य करते. प्रक्रिया व उत्पादने विकसित करण्याच्या कामी प्रयोगशाळेने बरेच भरीव कार्य केले आहे (उदा., निकेलयुक्त जांभ्यापासून निकेल व कोबाल्ट यांचे निष्कर्षण, ऊर्जा वाचविण्याची तंत्रे व प्रक्रिया, दगडी कोळसा व इतर खनिज पदार्थाची द्रवीय वाहतूक). येथे विविध प्रकारची साधने व पायाभूत सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. (उदा., प्लवन स्तंभ, बहूद्देशीय उच्च तापमान परिभ्रमी भट्टी, खास ज्वालक, विश्लेषणाच्या सुविधा).               

स्ट्रक्चरल एंजिनिअरिंग रिसर्च सेंटर (SERC), रूडकी : १९६५ साली स्थापलेल्या या केंद्राची व्याप्ती व कार्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) विविध प्रकारच्या बांधकाम संरचना व संरचनात्मक प्रणाली यांचे अभिकल्प व उभारणी यांसंबंधीची अत्याधुनिक उपलब्ध माहिती व विशिष्ट तंत्रज्ञान यांविषयीची पेढी म्हणून काम करणे (२) राष्ट्रीय अग्रक्रमांना अनुरूप अशा संरचनात्मक अभियांत्रिकीतील सर्व बाबींवर अनुप्रयुक्ति-अभिमुख संशोधन हाती घेणे (३) सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांतील संघटनासाठी पुरस्कृत संशोधन व विकास कार्य स्वीकारणे (४) जटिल बांधकाम संरचनांचे विश्लेषण व अभिकल्प यांचा संबंध येणारी निवडक सल्लागारी कामे हाती घेणे (५) अभियांत्रिकीय कामे करीत असणाऱ्या अभियंत्यांना नवीन कल्पना व तंत्रे यांची माहिती व्हावी म्हणून अल्पकालीन खास अभ्यासक्रम आयोजिणे व त्यांत प्रत्यक्ष अनुभवांवर भर देणे आणि (६) संरचनात्मक अभियांत्रिकीच्या उपयोगांसाठी व्यापक संगणक कार्यक्रम संच विकसित करणे.               

संरचनात्मक अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील देशाच्या विकासात्मक गरजांच्या दृष्टीने संशोधन कार्याला गती देण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे. त्यासाठी कित्येक आघाडीच्या क्षेत्रांत केंद्राने क्षमता संपादन केल्या आहेत (उदा., परतपरत आढळणाऱ्या संरचनांचा पर्याप्त आराखडा, संरचनांचे अचूक संगणकीय विश्लेषण, संरचनात्मक प्रणालीचा एकत्रित विचार करून अभिकल्पाच्या बाबतीत समन्वित मार्ग चोखाळणे).               

उंच इमारती, प्रचंड, व्यापाच्या व जमिनीखालील, बांधकाम संरचना आणि संगणक कार्यक्रम-संच या प्रमुख बाबतींत केंद्राने जोमाने काम केले असून येथे राष्ट्रीय महत्त्वाच्या संशोधन व विकासाच्या प्रकल्पांचे कामही चालू आहे (उदा. मृदा व संरचना यांतील परस्परक्रिया लक्षात घेऊन गगनचुंबी इमारतींचे विश्लेषण व अभिकल्प). अभिकल्पकांना मदत व्हावी म्हणून केंद्राने अनेक निदेशपुस्तके काढली असून केंद्राचे विशिष्ट तंत्रज्ञान १७ कंपन्यांना व्यापारी दृष्टीने वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. (१९८५).               

स्ट्रक्चरल एंजिनिअरिंग रिसर्च सेंटर (SERC), मद्रास : १९६५ साली स्थापन झालेल्या या केंद्रापुढील उद्दिष्टे व कार्ये अशी आहेत : (१) अद्ययावत उपलब्ध माहितीचे समाशोधन (गोळा करून वर्गीकरण व वितरण करणारे) केंद्र म्हणून काम करणे आणि सर्व प्रकारच्या बांधकाम संरचनांच्या अभिकल्पावरील व बांधकामावरील विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करणे (२) संरचनात्मक अभियांत्रिकीच्या सर्व बाबतींतील अनुप्रयुक्ति-अभिमुख संशोधन हाती घेणे (३) विविध प्रकारचे संरचनात्मक अभिकल्प विकसित करण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांतील संघटनांना अभिकल्प सल्लागारी सेवा पुरविणे आणि (४) विश्लेषण, अभिकल्प व बांधकाम यांतील अद्ययावत विकासाची माहिती होऊन प्रत्यक्ष काम करीत असलेल्या अभियंत्यांचा लाभ व्हावा म्हणून संरचनात्मक अभियांत्रिकी व अंकीय संगणन यांवरचे खास अभ्यासक्रम आयोजित करणे.               


केंद्राने संशोधनाची अनेक क्षेत्रे व प्रकल्प हाती घेतले आहेत (उदा., बांधकाम तंत्रे व काँक्रीटची उत्पादने यांचा विकास, पूर्वप्रतिबलित काँक्रिट घटकांची प्रमाणीकरणे, काँक्रीटची संयुक्त द्रव्ये व त्यांच्या अनुप्रयुक्ती यांचा विकास, संगणक-साहाय्यित अभिकल्प व कार्यक्रम-संच विकास वगैरे). केंद्राच्या कित्येक प्रकल्पांमुळे नवीन उत्पादने, तंत्रे व अनुप्रयुक्ती विकसित झाल्या आहेत. यांपैकी काहींची एकस्वे केंद्राने घेतली असून काहींचा उद्योगांत वापर करण्यात आला आहे (उदा., पूर्वप्रतिबलित काँक्रीटचे आगगाडीचे शिळेपाट बनविण्याची देशी तंत्रविद्या, जांभ्याचे ठोकळे, बहुवारिक काँक्रीट यांची संयुक्त द्रव्ये इत्यादी). विश्लेषण, अभिकल्प व आरेखन यांसाठी अनेक देशी संगणक कार्यक्रम येथे विकसित करण्यात आले आहेत. संरचनांच्या प्रायोगिक अनुसंधानासाठी अतिशय सुविकसित सुविधा (उदा., लेसर, होलोग्राफी) येथे उभारल्या आहेत.               

केंद्राच्या कित्येक प्रयोगशाळांमध्ये संरचनात्मक प्रतिकृती व मूळ नमुने याच्या विश्लेषणाचे आणि परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे (उदा., प्रायोगिक भार-प्रतिबल-विश्लेषण, काँक्रीट परीक्षण), केंद्राचे स्तंभ परीक्षण व संशोधन स्थानकही आहे. निवडक नवनवे अभिकल्प व बांधकाम तंत्रे प्रचारात आणण्याच्या दृष्टीने केंद्र सार्वजनिक खाजगी क्षेत्रातील संघटनांना सल्लागारी सेवा पुरविते.               

रिजनल रिसर्च लॅबोरेटरी (RRL), त्रिवेंद्रम : या प्रदेशातील साधनसंपत्तीचा पर्याप्तपणे वापर करण्यासाठी तंत्र विकसित करणे आणि या भागातील उद्योगांना संशोधन, विकास व तंत्रविद्येचे हस्तांतरण या मार्गांनी मदत करणे, ही या १९७६ साली स्थापन झालेल्या प्रयोगशाळेची उद्दिष्टे आहेत. भारताच्या नैर्ऋत्य किनाऱ्याचे हवामान व जमीन ही मसाल्याची व मळ्यातील पिके, रबर, टॅपिओका यांच्या लागवडीच्या दृष्टीने आदर्श आहेत व हे या प्रदेशाचे एक वैशिष्ट्य आहे. झिर्‌कॉन, इल्मेनाइट व माँझोनाइट ही खनिजे असलेली जड वाळू, तसेच चुनायुक्त कवचे, चिनी माती व काचेसाठी लागणारी वाळू या खनिज पदार्थांचे मूल्यवान साठे या भागांत आढळतात. तांबडी मृत्तिका व जांभा खडकही येथे विपुलपणे आढळतो. माहितीचा प्रसार व संबंधित क्षेत्रांतील प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम घेणे हेही काम प्रयोगशाळा करते.               

येथील संशोधन व विकासाची कामे चार विभागांत विभागलेली आहेत. मसाले व मळ्यात निर्माण झालेली पिके यांच्याविषयीच्या पीक कापल्यानंतर ज्या तंत्रविद्यांची गरज आहे त्या तंत्रविद्यांचे संशोधन अन्न विभागात होते ( उदा., मसाले टिकविणे, अधिक खोबरेल मिळविणे). या प्रदेशात विपुलपणे आढळणाऱ्या कृषी व खनिज संपत्ती वापरून नवीन पदार्थ तयार करण्याचे काम सामग्री विभागात चालते (उदा., धातूच्या आधारद्रव्याची संयुक्त द्रव्ये, मिश्रधातू). स्थानिक साधनसंपत्तीपासून काचेच्या व मृत्तिकेच्या वस्तू बनविण्याविषयीचे संशोधन मृत्तिका व काच विभागात चालते. पद्धती नियोजन व संशोधन व्यवस्थापन विभागामध्ये नियोजन, प्रकल्प मूल्यमापन, माहितीचा प्रसार, तंत्रविद्येचे हस्तांतरण व धोरणविषयक अभ्यास ही कामे केली जातात.               

प्रयोगशाळेच्या कित्येक प्रक्रिया व पदार्थ उद्योगधंद्यात वापरली जात आहेत (उदा., शहाळ्याचे पाणी बाटली बंद करणे, हिरवी मिरी डबाबंद करणे). खनिजे व खाद्यपदार्थ यांचे रासायनिक विश्लेषण, ओतकामाच्या दृष्टीने वाळूचे मूल्यमापन करणे, सामग्रीचे भौतिक गुणधर्म निश्चित करणे, सामग्रीच्या वैशिष्ट्यीकरणासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकी व क्ष-किरण विवर्तन विश्लेषण या दृष्टींनी प्रयोगशाळा सुसज्ज आहे. प्रयोगशाळा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करते.               

रिजनल रिसर्च लॅबोरेटरी (RRL), भोपाळ : १९९८१ साली स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेची प्रमुख उद्दिष्टे पुढील आहेत : (१) मध्य प्रदेशातील खनिज, वन व कृषीवर आधारलेल्या साधनसंपत्तीचे संशोधन करणे आणि हे करताना सामाग्री व ऊर्जा यांविषयीच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने या साधनसंपत्तीचे नवीन उपयोग शोधण्याला खास स्थान देणे (२) ॲल्युमिनियम विषयक तंत्रविद्येमधील संशोधन व ॲल्युमिनियम दुर्मिळ, खर्चिक व आयात कराव्या लागणाऱ्या सामग्रीच्या ऐवजी वापरता येईल या संशोधनावर भर देणे आणि (३) तंत्रविद्येच्या विकासाविषयीचे पूर्वानुमाने व मूल्यनिर्धारण पद्धती यांसह आधुनिक व्यवस्थापन तंत्रांचा वापर करण्यासाठी करणे. खास व परिशुद्ध सामग्रीच्या क्षेत्रातील कामाशी ही प्रयोगशाळा निगडित आहे. संशोधन, विकास आणि तंत्रविद्या हस्तांतरण यातील या प्रयोगशाळेच्या कार्याचा हेतू या प्रदेशातील विकसित करता येणे शक्य असलेली तंत्रे विविध संख्या/संघटनांच्या लक्षात आणून देणे, हा आहे.               

सातव्या पंचवार्षिक योजनेत उभ्या राहिलेल्या या प्रयोगशाळेत पुढील क्षेत्रांतील संशोधन कार्य चालू आहे : ॲल्युमिनियमावर आधारलेली संयुक्त द्रव्ये तयार करणे. त्यामुळे विशेषतः वाहतूक क्षेत्रात इंधनाची मोठी बचत होईल. मध्य प्रदेशातील खनिज संपत्तीचे मूल्यमापन करणे आणि संशोधन, विकास व औद्योगिक अत्यावश्यक बाबी कोणत्या ते ओळखून काढणे. खनिज साधनसंपत्तीचा अधिक चांगल्या तऱ्हेने उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने प्रक्रिया, उत्पादने व विशिष्ट तंत्रज्ञान यांचा विकास करणे. या प्रदेशात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक तंतूंचा वापर करून देणे. प्रादेशिक साधनसंपत्ती व ॲल्युमिनियम उद्योगातील टाकाऊ पदार्थ वापरून विटा, सिमेंटयुक्त द्रव्ये, छपराचे झटक, नळ इ. बनविणे.               

सामग्रीविज्ञान व तंत्रविद्या, धातुविज्ञान, नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून घेणे आणि संशोधन व विकासविषयक व्यवस्थापन या क्षेत्रांतील पुरस्कृत कार्यक्रम प्रयोगशाळा हाती घेते. येथे सर्वांत आधुनिक वैज्ञानिक व वैश्लेषिक सामग्री व उपकरणयोजना असून या सुविधा वा भागातील अशा संघटनांना व उद्योगांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतात.               

टी रिसर्च ॲसोसिएशन (TRA) : १९६४ साली कलकत्ता येथे स्थापन झालेल्या या संस्थेने पुढील उद्दिष्ट समोर ठेवले आहे : चहाची लागवड, उत्पादन व त्यावरील संस्करण यांच्याशी संबंधित संशोधन व वैज्ञानिक कार्य करणे व त्याला प्रोत्साहन देणे आणि यांतून मिळणाऱ्या फलनिष्पतींचा प्रचार ईशान्य भारतातील सदस्य असलेल्या सु.८०० चहामळ्यांमध्ये करणे. या संस्थेचे टोक्लाई संशोधन केंद्र हे क्षेत्रीय केंद्र जोरहाट येथे असून तेथील संशोधन कार्य अनुप्रयुक्त स्वरूपाचे आहे. या केंद्रातील मृदा व वातावरणविज्ञान, वनस्पतिविज्ञान, कृषिविद्या, जीवरसायनशास्त्र, चहाचे स्वाद परीक्षण वगैरे नऊ संशोधन विभागांत १९८५ साली २५ प्रकल्पांचे (उदा., चहाचे जीवरसायनशास्त्र, चहा संस्करण इ.) काम चालू होते व नाविन्यपूर्ण संशोधन क्षेत्रे शोधण्यात येत होती. संस्थेच्या सल्लागार विभागाचा संबंध क्षेत्रीय पातळीवरील विस्तार संशोधन व तंत्रविद्येचे हस्तांतरण आणि प्रादेशिक समस्या यांच्याशी येतो : भारतीय चहा मंडळातर्फे पुरस्कृत केलेल्या मार्गदर्शी संयंत्राचा संबंध चहाचे उत्पादन आणि झटपट चहाच्या उत्पादनातील गुणात्मक सुधारणा यांच्याशी आहे.               


टोक्लाई येथे पुढील पायाभूत सुविधा आहेत : नियोजन गट, ग्रंथालय व प्रकाशन विभाग, टोक्लाई व बोरभेत्ता येथील (३०० हेक्टर) व इतरत्र असलेले (३० हेक्टर) प्रायोगिक मळे, टोक्लाई व दार्जिलिंग येथील चहाचे लघू कारखाने, अभियांत्रिकीय कार्यशाळा व प्रदत्त संस्करण केंद्र. येथील कामाच्या बाबतींत मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे २४ जणांचे व्यवस्थापन मंडळ आहे. या मंडळाला संशोधन व विकासाच्या कामांच्या बाबतीत सल्ला देण्यासाठी एक वैज्ञानिक सल्लागार समिती आहे. चहाच्या स्वाद-परीक्षणासाठी एक गट आहे. उद्योगाशी संपर्क ठेवण्यासाठी संस्थेच्या अभियांत्रिकी, कृषी व अर्थ यांच्याशी संबंधित तीन उपसमित्या आहेत, तर क्षेत्रीय पातळीवर संपर्क साधण्यासाठी मळेवाल्यांच्या नऊ समित्या असून त्या विविध भागांत त्रैमासिक परिषदा घेतात. तज्ञ व सल्लागार अधिकाऱ्यांनी चहामळ्यांना दिलेल्या भेटींतून मिळालेल्या माहितीने चहा उद्योगाचे प्रश्न लक्षात येतात व नंतर त्यांवर संशोधन केले जाते. शिवाय चहामळेवाले व चहाशास्त्रज्ञ यांच्या परिषदा व बैठका घेण्यात येतात. अशा प्रकारे टोक्लाई येथील संशोधनामुळे चहा उद्योगाचा सर्वांगीण विकास झाला आहे. कारण येथे चहाचे नवे वाण, पाने खुडण्याची नवी तंत्रे, योग्य पाणी व्यवस्थापन, पोषक घटकांचा अभ्यास, पीडक, रोग व तणांचे नियंत्रण इ. प्रकारचे संशोधन झाल्याने अधिक चांगली लागवड व पर्यायाने जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे.               

चहावर संस्करण करण्यासाठी टोक्लाई येथे तयार करण्यात आलेली यंत्रसामग्री जगभर वापरली जात आहे. संस्थेचे दिकोम, ठाकूरबारी, काचार, अगरतला, सालूगरा (तराई) आणि दार्जिलिंग येथे सल्लागार विभाग असून तंत्रविद्येचे प्रभावीपणे हस्तांतरण करण्यासाठी आणि प्रादेशिक संशोधन व विस्तार समस्या हाताळण्यासाठी नग्राकता येथे टोक्लाईचे उपकेंद्र आहे. चहाचे पीक घेताना व चहाचे उत्पादन करताना वापरण्यात येणाऱ्या मृदा, पाणी, कृषि-रसायने इ. अनेक द्रव्यांचे परीक्षण टोक्लाई येथे केले जाते.               

चहामळेवाल्यांसाठी टोक्लाई येथे विविध गोष्टींवरचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतात. तसेच नवीन व अपरंपरागत भागांत चहाचे पीक घेण्यासाठी येथून मदत देण्यात येते. टू अँड ए बड (षण्मासिक), टी एन्सायक्लोपीडीया (संदर्भ निदेशपुस्तक), वार्षिक वैज्ञानिक अहवाल, सल्लागार व खास विवरणपत्रिका, प्रासंगिक वैज्ञानिक लेख, संक्षेपलेख, द्वैमासिक व त्रैमासिक बातमीपत्रिका, परिषदांची कार्यवृत्ते वगैरे संस्थेमार्फत प्रसिद्ध होतात.[⟶ चहा].               

इलेक्ट्रिकल रिसर्च अँड डिव्हलपमेंट ॲसोसिएशन (ERDA) : मुंबई येथे १९७८ साली स्थापन झालेली ही संस्था विद्युतीय सामग्री उद्योगाविषयीची अखिल भारतीय सहकारी संशोधन संस्था असून वरील कौन्सिल व गुजरात राज्य सरकार यांनी हिला मान्यता दिलेली आहे. विद्युत्‌ अभियांत्रिकीच्या अनेक शाखांमधील अनुप्रयुक्त संशोधन व विकासाला वाहून घेणाऱ्या या संस्थेची उद्दिष्टे अशी आहेत : तांत्रिक विकासाला प्रोत्साहन देणे, उपलब्ध सामग्रीचा अधिक चांगला वापर करून घेणे, सामग्रीमध्ये सुधारणा करणे, दुर्मिळ आणि खर्चिक सामग्रीला पर्याय शोधणे, साहित्याचे प्रकार व विकास यांनुसार परीक्षण करणे, साहित्य व सामग्रीचे मूल्यमापन करणे, साहित्याच्या अयशस्वितेची चौकशी करणे, मानकीकरण करणे आणि तांत्रिक माहितीचा प्रसार करणे. येथील कार्य विशेषेकरून लहान व मध्यम उद्योगांच्या दृष्टीने साहाय्यकारी आहे.               

मूलभूत संशोधन व विकासविषयक कामाची उभारणी आणि परीक्षणाची पायाभूत तयारी यांविषयीचा संस्थेच्या उभारणीतील पहिला टप्पा १९८५ साली जवळजवळ पूर्ण झाला होता. सातव्या पंचवार्षिक योजनेत येणाऱ्या मधल्या टप्प्यात संस्थेच्या कार्यांना विज्ञान व तंत्रविद्याविषयक योजनांना अनुरूप अशी दिशा देण्याची अपेक्षा आहे. येथे हाती घ्यावयाच्या संशोधन व विकासविषयक कार्यक्रमांची विभागणी पुढील तीन क्षेत्रांत करण्यात आली आहे : १) विद्युत्‌ उद्योगांशी संबंधित असलेली निरोधक, संवाहक, संस्पर्शक, चुंबकीय व संरचनात्मक सामग्री २) केबली, धारित्रे, रोहित्रे इत्यादींच्या अयशस्वीतेचे विश्लेषण आणि ३) विद्युत् वितरण जाळ्याची अर्थव्यवस्था व विश्वासार्हता.               

विद्युत्‌ सामग्री उद्योगाशी संबंधित असलेल्या १३५ हून जास्त उत्पादने व सामग्री यांच्या परीक्षणाची व मूल्यमापनाची येथे सोय करण्यात आली असून येथील संशोधनामुळे उद्योगांना आपल्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. या उद्योगाशी संबंधित चर्चा सत्रे व परिसंवाद संस्था आयोजित करते. हिच्या संदर्भ संकलन केंद्रातर्फे ॲब्स्ट्रॅक्ट्स ऑफ करंट टेक्निकल लिटरेचर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ईआरडीए न्यूज व संदर्भग्रंथ सूची ही मासिके प्रसिद्ध होतात. यांशिवाय येथून विविध तांत्रिक समस्यांवरील दुसरी प्रकाशने प्रसिद्ध होतात. संस्थेची बडोदा येथे प्रयोगशाळा आहे.               

इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर (INSDOC) : १९५२ साली स्थापलेल्या या केंद्रामार्फत माहितीचा वापर करणाऱ्या सर्वांना संदर्भ संकलन व माहिती सेवा पुरविण्यात येतात. संदर्भ ग्रंथसूचीचे संकलन, विशिष्ट विषयांतील प्रचलित साहित्याची यादी बनविणे, कागदपत्रांच्या प्रती पुरविणे, इतर परदेशी भाषांतील कागदपत्रांचा इंग्रजीत अनुवाद करणे, छायाचित्रण पद्धतीने कागदपत्रांच्या प्रती काढणे व मुद्रण यांविषयीच्या या सेवा आहेत. संदर्भ संकलन साधनांचा पाया विकसित करणे, संगणकाधिष्ठित माहितीचा साठा व पुनर्प्राप्ती करणे, माहिती मिळविण्याची साधने व संदर्भ निर्देशिका तयार करणे आणि प्रसिद्ध करणे माहितीविषयक मनुष्यबल वाढविण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देणे माहितीच्या वापराला उत्तेजन देणे वगैरे कार्येही या केंद्रामार्फत केली जातात.               

येथील राष्ट्रीय विज्ञान ग्रंथालय विज्ञान व तंत्रविद्या यांच्यासाठी संदर्भ संकलन साधनांची पायाभूत उभारणी करीत आहे. येथे रशियन वैज्ञानिक प्रकाशनेही भरपूर आहेत. विविध प्रकारचे सूचिग्रंथ (उदा., भाषांतरांची राष्ट्रीय सूची, निर्देशिका प्रकारची प्रकाशने) तयार करण्यासाठी येथे संगणकांची मदत घेण्यात येते. हे केंद्र इंडियन सायन्स ॲब्स्ट्रॅक्ट्स, कंटेट्‌स लिस्ट ऑफ सोव्हिएट सायंटिफिक पिरिऑडिकल्स व नॅशनल इंडेक्स ऑफ ट्रान्सलेशन्स (मासिके), ॲक्सेशन लिस्ट ऑफ रशियन सायंटिफिक अँड टेक्निकल पब्लिकेशन्स (द्वैमासिक) आणि ॲनल्स ऑफ लायब्ररी सायन्स अँड डॉक्युमेंटेंशन (त्रैमासिक) प्रसिद्ध करते. केंद्राने अनेक संदर्भ निर्देशिका प्रसिद्ध केल्या आहेत व काहींचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. उदा., डिरेक्टरी ऑफ सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया (१९६९), करंट रिसर्च प्रोजेक्ट्‌स इन सीएसआयआर लॅबोरेटरीज (१९७२, १९७६ व १९८१), डिरेक्टरी ऑफ इंडियन सायंटिफिक पिरिऑडिकल्स (१९६८, १९७६), डिरेक्टरी ऑफ सायंटिफिक रिसर्च इन इंडियन युनिव्हर्सिटीज (१९७४), डिरेक्टरी ऑफ टेस्टिंग र्फसिलिटीज इत्यादी.               

माहिती विज्ञानाचा दोन वर्षांचा व इतर प्रसंगोपात अभ्यासक्रम येथे घेण्यात येतात. शालेय पातळीपासून माहितीचा उपयोग करण्यास उत्तेजन देण्याचा प्रयत्न केंद्र करते. यासाठी ग्रंथालय शिक्षण, ध्वनिफीत-पारदर्शिकायुक्त इ. कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत व अभ्यास वर्ग घेण्यात येतात.               

छायाचित्रण पद्धतीने प्रती काढण्याची व सूक्ष्मलेखनाची सेवा पुरविण्याच्या विविध सुविधा येथे आहेत (उदा. नकला काढणे, टंकलेखन, मुद्रण इत्यादींसाठी यंत्रसामग्री). या केंद्राची तीन प्रादेशिक केंद्रे बंगलोर, कलकत्ता व मद्रास येथे असून बंगलोर येथील केंद्र सु. १९६५ पासून चालू आहे. संदर्भ संकलन व माहितीच्या क्षेत्रांमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांशी हे केंद्र सहकार्य करते आणि इंटरनॅशनल फेडरेशन फॉर डॉक्युमेंटेशनवर भारताचे प्रतिनिधित्व करते. हे केंद्र संदर्भ संकलनविषयक मानके तयार करण्यासाठी भारतीय मानक संस्थेशीही सहकार्य करते.               

पब्लिकेशन्स अँड इन्फर्मेशन डायरेक्टोरेट (PID): संशोधन व औद्योगिक बाबी यांच्याविषयीच्या माहितीचे संकलन व प्रसार करणे हे १९५१ साली स्थापन झालेल्या या संचालनालयाचे मुख्य काम आहे. १९८५ साली येथे पुढील कामे होत असत : (१) वैज्ञानिक व तंत्रविद्याविषयक साहित्याचे प्रकाशन : (अ) विज्ञान व तंत्रविद्या यांच्या विविध शाखांतील ज्ञानपत्रिका व विवरणपत्रिका (आ) विश्वकोश (द वेल्थ ऑफ इंडिया), प्रबंधिका व संकीर्ण प्रकाशने आणि (इ) कौन्सिलच्या कार्याविषयीची बातमीपत्रे, पुनर्विलोकने व निदेशपुस्तके. (२) हिंदीमधील तांत्रिक साहित्य आणि इंग्रजी, हिंदी व उर्दू भाषातील लोकानुवर्ती वैज्ञानिक नियतकालिके प्रकाशित करणे. (३) वैज्ञानिक व तांत्रिक माहिती व सेवा पुरविणे आणि (४) विज्ञान विषयक संपादन व तांत्रिक लेखन यांविषयीचे अभ्यासक्रम आयोजिणे.               


येथून पुढील अकरा ज्ञानपत्रिका निघतात : (अ) मासिके : जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, इंडियन जर्नल ऑफ केमिस्ट्री (विभाग ए व बी), इंडियन जर्नल ऑफ प्युअर अँड ॲप्लाईड फिजिक्स, इंडियन जर्नल ऑफ टेक्नॉलॉजी व इंडियन जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल बायॉलॉजी (आ) द्वैमासिके : इंडियन जर्नल ऑफ बायोकेमिस्ट्री अँड बायोफिजिक्स व इंडियन जर्नल ऑफ रेडिओ अँड स्पेस फिजिक्स आणि (इ) त्रैमासिके : इंडियन जर्नल ऑफ मरीन सायन्सेस, इंडियन जर्नल ऑफ टेक्स्‌-टाइल रिसर्च व रिसर्च अँड इंडस्ट्री. प्रत्येक ज्ञानपत्रिकेचे संपादक मंडळ असून ते तीन वर्षांसाठी असते आणि ज्ञानपत्रिकेची धोरणे, व्याप्ती व गुणवत्ता या बाबतींत सल्लागार मंडळ म्हणून हे कार्य करते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात यांच्यातील साहित्याची नोंद होण्याच्या दृष्टीने येथे खास व्यवस्था करण्यात आलेली आहे.               

द वेल्थ ऑफ इंडिया हा विश्वकोश कच्चा माल (११ खंड, २ पुरवण्या ५,००० पृष्ठे, ५,३३० लेख) आणि औद्योगिक उत्पादने (९ भाग २,८०० पृष्ठे २५५ उद्योगांवरील लेख) या दोन मालिकांत प्रसिद्ध झाला असून पहिल्या मालिकेच्या सुधारित आवृत्तीचे काम सुरू झाले आहे. या विश्वकोशातील वनस्पतींची नावे व इतर प्रश्न सुस्पष्ट होण्यासाठी एक संशोधन व नमुना विभाग स्थापण्यात आला असून तेथे ४,००० नमुन्यांचा वनस्पतिसंग्रह तसेच कच्च्या मालाचे १,२७५ वनस्पतिज, १९० प्राणिज व १८५ खनिज नमुने आहेत. याचे हिंदी भाषेतर भारत की संपदा : प्राकृतिक पदार्थ मधील ७ खंड व दोन पुरवण्या प्रसिद्ध झाल्या असून आठव्या खंडाची छपाई १९८५ साली चालू होती. यांशिवाय प्राणी व वनस्पतींच्या शास्त्रीय नावांचा कोश व हिंदी वैग्यानिक और तकनिकी प्रकाशननिदेशिका (१९६६−८०) येथून प्रसिद्ध झाली आहेत.               

संचालनालयात या विश्वकोशाच्या वापरासाठी ५ लाख संदर्भ ग्रंथ व ३,००० माहितीच्या फाइली असून त्यांत सारखी भर पडते. यावर आधारलेल्या सेवेचा एक भाग म्हणून मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लॅंट्स ॲब्स्ट्रॅक्ट्स हे द्वैमासिक प्रसिद्ध होते आणि त्यात ५० देशांतील २२ भाषांतील ६०० ज्ञानपत्रिकांमधील औषधी व सुंगधी वनस्पतींविषयीची माहिती देण्यात येते. भारतीय उद्योगांविषयीची माहिती देणाऱ्या औद्योगिक माहिती सेवेमार्फत रिसर्च अँड इंडस्ट्री हे त्रैमासिक प्रसिद्ध होते. देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंधित अशा विशिष्ट वा एकत्रित विषयांवरील प्रबंधिका प्रसिद्ध करण्याचे कामही हाती घेण्यात आले असून १९८५ पर्यंत अशी एक प्रबंधिका प्रसिद्ध झाली होती. वनस्पतिविज्ञानाच्या १२ व प्राणिविज्ञानाच्या ३ प्रबंधिका प्रसिद्ध झाल्या आहेत. परिसंवादांची कार्यवृत्ते, पुस्तके ही येथील संकीर्ण प्रकाशने होत.               

सीएसआयआर न्यूज (अर्धमासिक, सीएसआयआर समाचार, हिंदी) निदेशिका, स्मरणिका तसेच सायन्स रिपोर्टर व विग्यान प्रगति (हिंदी) ही मासिके आणि सायन्स की दुनिया (उर्दू) हे त्रैमासिक, मुलांसाठी विज्ञानविषयक पुस्तके ही या संचालनालयाची प्रकाशने होत.               

येथे समृद्ध ग्रंथालय (३५,००० ग्रंथ १५,००० अहवाल व सु. १,००० नियतकालिके), संदर्भ संकलन, कला, छायाचित्रण व निर्मिती विभाग आणि प्रकाश जुळणी व मुद्रण यांच्या सुविधा आहेत. इतर राष्ट्रीय प्रयोगशाळा, भारतीय मानक संस्था वगैरेंना हे संचालनालय मदत करते तसेच देशातील आणि दक्षिण व मध्य आशियातील संपादकांच्या सोयीसाठी संचालनालय वैज्ञानिक संपादन व प्रकाशन यांविषयीच्या अल्पकालीन कार्यशाळानी अभ्यासक्रम घेते.               

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डिव्हलपमेंट स्टडीज : (NISTADS) : वरील कौन्सिलाच्या नियोजन विभागाचा एक भाग म्हणून १९७३ साली स्थापन झालेल्या केंद्राचे १९८० साली पूर्ण दर्जाच्या संस्थेत परिवर्तन होऊन त्याला हे नाव देण्यात आले व तेव्हापासून येथे कौन्सिलाची स्वतंत्र आस्थापना म्हणून काम चालू झाले. या संस्थेची उद्दिष्टे अशी आहेत : (१) धोरण निश्चित करणाऱ्यांना विकासाच्या प्रक्रियेचा आराखडा बनवताना मदत होण्याच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रविद्या यांच्या विकासाच्या सामाजिक प्रक्रियांविषयीचे अभ्यास हाती घेऊन विज्ञान व तंत्रविद्या यांविषयीच्या धोरणाच्या क्षेत्रातील माहिती, ज्ञान व तज्ञता निर्माण करणे (२) राष्ट्रीय आस्थापना व संस्था यांच्या पातळ्यांवरील संशोधन व विकासविषयक संघटनांची परिणामकारकता सुधारण्याच्या दृष्टीने तंत्रे व पद्धती यांच्यावरील अध्ययन व क्रियात्मक संशोधन यांच्याद्वारे विज्ञान व तंत्रविद्या घटकांमध्ये व संघटनांमध्ये योग्य त्या नियोजनाच्या व व्यवस्थापनाच्या पद्धतींचे मूल्यमापन करण्यास मदत करणे (३) विज्ञान व तंत्रविद्या यांच्या विकासप्रक्रियेविषयीच्या मूलभूत ज्ञानाचा साठा, त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, नैतिक आणि तात्त्विक बाजूंसह निर्माण करणे (४) वरील कौन्सिल, शासकीय विभाग, विद्यापीठे, उद्योग आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विज्ञानविषयक धोरण ठरविणाऱ्या संस्था यांच्या खास गरजेच्या बाबींचे संशोधन, प्रशिक्षण व सल्लागारी काम हाती घेणे (५) राष्ट्रीय विज्ञान धोरणाच्या दृष्टीने इतर देशांमधील विज्ञान-धोरणाविषयक संघटना आणि संशोधन व विकासाच्या पद्धतींचे व्यवस्थापन यांविषयी अभ्यास करणे (६) विज्ञानामध्ये व्यावसायिकता बिंबविण्याच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रविद्याविषयक धोरण आणि संशोधन व विकासविषयक व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आखणे आणि संशोधन व विकासाच्या संघटन पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी संशोधनातील फलनिष्पतींची देवाण-घेवाण करणे (७) कारागीर व कुशल कारागीर यांच्यासाठी योग्य त्या तंत्रविद्येची निवड/अनुकूल/निर्मिती/हस्तांतरण यांविषयीचे अध्ययन व क्रियात्मक संशोधन विकसित करणे आणि (८) विज्ञान व तंत्रविद्येतील संशोधनाच्या भावी दिशांविषयी अनुमान करणे व नवीन जोरदार चालना देण्याची गरज असलेली तंत्रविद्येची क्षेत्रे जाणून घेणे.               

देशात आणि परदेशांत प्रसिद्ध झालेली पुस्तके, अभिलेखागारे, शासकीय व उद्योगांचे दस्तऐवज यांचा अभ्यास, प्रत्यक्ष क्षेत्राला भेट देणे आणि अध्ययन करणे, प्रश्नपत्रकांची व्यवस्था करणे, व्यक्तिगत मुलाखती वगैरेंच्याद्वारे संस्था संशोधन करते. आशियातील व पॅसिफिक प्रदेशातील देशांची विज्ञान व तंत्रविद्याविषयक धोरणे, विज्ञानाचा इतिहास व तत्त्वज्ञान, तंत्रविद्या व उद्योग वगैरे क्षेत्रांतील संशोधन येथे होत आहे. शिवाय माहितीविषयीची पायाभूत पूर्वतयारी करणे, कौन्सिलाच्या प्रयोगशाळांमध्ये आणि संस्थांमध्ये प्रकल्प अर्थसंकल्पन व परिव्यय लेखाशास्त्र प्रविष्ट करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे, प्रशिक्षणाचे कार्यक्रम आखणे इ. कामेही संस्था करते. संस्थेशी संबंधित असलेल्या खास विषयांवरचे मीमांसक वर्ग, चर्चासत्रे, कार्यशाळा व परिषदा संस्था आयोजित करते. संशोधनपर निबंध, प्रकल्प अहवाल, प्रबंधिका, कार्यवृत्ते व करंट लिटरेचर ऑन सायन्स ऑफ सायन्स ही मासिक ज्ञानपत्रिका संस्था प्रसिद्ध करते.

संस्थेजवळ संगणकविषयक सुविधा असून येथील ग्रंथालयात १९८५ साली ७,००० पुस्तके, २,५०० अहवाल, संशोधनपर लेखांची  १,५०० पुनर्मुद्रिते आणि नियमितपणे जगातून येणाऱ्या सु. २०० ज्ञानपत्रिका आहेत. येथे येऊन काम करणाऱ्या विकसनशील देशांतील विद्वानांना या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

संदर्भ : Kashyap, B. C. and others, Ed., CSIR Handbook 1985 New Delhi.                                                          

ठाकूर, अ. ना.