युंगजी : सध्याचे कीरिन अथवा जीलिन. चीनच्या ⇨कीरिन प्रांतातील एक औद्योगिक शहर व प्रांताची जुनी राजधानी. लोकसंख्या ८,४५,००० (१९७५ अंदाज). हे शहर सुंगारी नदीच्या डाव्या काठावर चांगचूनच्या पूर्वेस १०० किमी. अंतरावर वसले आहे. कीरिन म्हणजे शुभशकुनी जंगल. टेकड्यांनी व जंगलांनी व्यापलेल्या याच्या परिसरामुळे याला हे नाव देण्यात आले.
कीरिन हे चीनच्या ईशान्य भागातील काही प्रमुख जुन्या गावांपैकी एक असून सुरुवातीच्या काळात या भागात जुचेन टोळ्यांच्या वसाहती होत्या. १६५१ मध्ये अमूर नदीमार्गे होणाऱ्या रशियनांच्या आक्रमणांना रोखून धरण्यासाठी व वाहतुकीसाठी मांचू लोकांनी या गावी लहान जहाजे बांधण्याचा कारखाना उभारला. १६७३ मध्ये येथे एक गढी बांधण्यात येऊन, १६७६ मध्ये मांचू सैनिकी गव्हर्नरचे प्रमुख ठाणे येथे हलविण्यात आले. १८८२ मध्ये गावाभोवती तटबंदी उभारून या प्रदेशाला वरिष्ठ प्रांताचा दर्जा देण्यात आला. सुरुवातीपासूनच हे शहर प्रांताची राजधानी होते. औद्योगिकीकरण, तंबाखू, फर, लाकूड यांचा व्यापार यांमुळे या शहराची झपाट्याने प्रगती होऊन ते गुदामांचे केंद्र (‘जंक बिल्डिंग सेंटर’) म्हणून ओळखले जाऊ लागले. १९१२ मध्ये हे शहर चांगचूनशी लोहमार्गाने जोडले गेल्याने व्यापारदृष्ट्या याची खूप प्रगती झाली. शहराच्या परिसरातील जंगल व कृषिउत्पादनांची ही प्रमुख बाजारपेठ बनली. लहान उद्योगधंद्यांचीही वाढ झाली. १९३१ मध्ये हे शहर जपानच्या ताब्यात गेले. या काळात हे युंगजी या नावाने (१९२९−३७) ओळखले जात होते. तेव्हापासूनच येथे स्वतंत्र नगरपालिका अस्तित्वात आली. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस या शहराचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर मात्र शहराचा पुन्हा विकास झाला आहे. १९५४ नंतर प्रांताची राजधानी चांगचून येथे हलविण्यात आली.
कीरिन हे महत्त्वाचे नदी-बंदर असून शहरात तंबाखू प्रक्रिया, लाकूड उत्पादने (कागद व काडेपेट्या), रसायने (कृत्रिम रबर, कॅल्शियम कार्बाइड), सिमेंट, फरश्या, विटा, जहाजबांधणी इत्यादींचे कारखाने आहेत. या कारखान्यांना फेंगमन येथील सुंगारी नदीवरील जलविद्युत् केंद्रातून वीजपुरवठा केला जातो.
क्षीरसागर, सुधा चौंडे, मा. ल.