यतिचर्या : मोक्ष, स्वर्ग, सिद्धी, पापनाश यांसारखे एखादे अलौकिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी स्वेच्छेने स्वीकारलेली त्यागाची व आत्मपीडनाची विशिष्ट अशी आचरणपद्धती. ऐहिक विषयोपभोगांचा त्याग करणाऱ्या संयमी व्यक्तीला स्थूलमानाने यती असे म्हणतात. सामान्यतः , त्याग [⟶ संन्यास] आणि कायक्लेश [⟶ तप] अशी यतिचर्येची दोन अंगे आहेत.
अपरिग्रह, एकांतवास, उपवास, मौन, ⇨ब्रह्मचर्य आणि विविध प्रकारचे कायक्लेश यांसारख्या आचरणांचा यतिचर्येमध्ये अंतर्भाव होतो. आत्मपीडनामुळे पापनाश होऊन आत्मशुद्धी होते आणि सामर्थ्याची वृद्धी व संचय होतो शरीर नियंत्रित, क्षीण वा नष्ट केल्याखेरीज आत्मिक कल्याण होऊ शकत नाही इ. धारणांमुळे व्यक्ती यतिचर्येकडे वळते. गृहस्थाश्रमाचा पूर्णपणे त्याग करून यतिचर्या पतकरणारे लोक जसे आढळतात तसेच गृहस्थाश्रमात वावरत असतानाच यतिचर्येच्या नियमांचे मर्यादित स्वरूपात पालन करून संयमी जीवन जगणारे लोकही आढळतात. यतिचर्येची केवळ बाह्य लक्षणे धारण करणे फलदायक नाही तसेच, उपभोग व संयम यांपैकी कोणत्याच तत्त्वाचा अतिरेक होता काम नये, असे सामान्यतः मानले जाते. ऐहिक उद्देशांनी केल्या जाणाऱ्या इंद्रियदमनाचीही उदाहरणे आढळतात. उदा., निकाराग्वामधील इंडियन लोक मका पेरल्यापासून कापणीपर्यंत समागम, मीठ, कोको व मद्य वर्ज्य मानतात आणि त्यामुळे शक्तिसंचय होऊन पीक उत्तम येते, अशी त्यांची श्रद्धा असते.
जगातील विविध समाजांतून यतिचर्या कमीअधिक प्रमाणात आढळत असली, तरी तिचे भारताइतके मोठे प्रमाण दुसरीकडे आढळत नाही. भारतात वेदपूर्वकाळापासून यतिचर्या रूढ आहे. वेदात इंद्रशत्रू, जादूटोणा करणारे, यज्ञविरोधी इ. प्रकारे यतींचे वर्णन केले आहे. संन्यासमार्गी असलेल्या या यतींचे आर्यांशी पटले नाही. परंतु आर्यांनी त्यांपैकी काहींना त्रैवर्णिकांत सामील करून घेतले, असे दिसते. वेदसंहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये यतिचर्येला फारसे स्थान नाही. उपनिषदांपासून मात्र यतिचर्येचे महत्त्व खूपच वाढले. मनुस्मृति वगैरे ग्रंथांनी तिचे नियम घालून दिले. वानप्रस्थ व संन्यास या दोन आश्रमांच्या रूपाने ⇨आश्रमव्यवस्थेतही तिला स्थान प्राप्त झाले. देव, असुर, ऋषी इ. तप करील असल्याच्या आणि त्याद्वारे त्यांना वर वा शाप देण्याचे सामर्थ्य, सिद्धी इ. मिळत असल्याच्या अनेक कथा आढळतात. पंचाग्निसाधन, एका पायावर उभे राहणे, बाहू उभारून उभे राहणे, सदैव जागे राहणे इ. प्रकारच्या तपश्चर्येद्वारे यती कायक्लेश सहन करीत असत. जैन धर्मात तपाला फार महत्त्व आहे. बौद्ध धर्मातही निर्वाणप्राप्तीसाठी वासना जिंकणे आवश्यक आहे परंतु गौतम बुद्धांचा कायक्लेशांना विरोध होता. अयशस्वी लोकांना यतिचर्येचे आकर्षण वाटते, असे भीमाने म्हटले आहे.
ग्रीक लोक ऑलिंपिक क्रीडांची तयारी म्हणून त्या क्रीडांपूर्वी काही काळ सुखोपभोगांपासून दूर राहत आणि शरीराला विविध प्रकारच्या अवघड चाचण्यांची सवय लावीत असत. नंतरच्या काळात आध्यात्मिक ध्येय समोर आले. आध्यात्मिक आकांक्षांच्या पूर्तीसाठी शारीरिक वासनांवर नियंत्रण हवे, असे प्लेटोने म्हटले. ख्रिस्ती धर्मात यतिचर्या विविध स्वरूपात आढळते. रोमन कॅथलिक पंथात ब्रह्मचारीच धर्मगुरू होऊ शकतो. सिरियन ख्रिस्ती संप्रदायात साखळदंडांनी कंबर, मान, हात-पाय इ. जखडून घेऊन आत्मपीडन केले जात असे. प्रॉटेस्टंट पंथाने कठोर यतिचर्येला मोक्षसाधन म्हणून मान्यता दिली नसली, तरी आत्मसंयमनाचे महत्त्व सांगितले आहेच.
पारशी, यहुदी व इस्लाम या धर्मांतून यतिचर्येची काही लक्षणे आढळत असली, तरी तिला महत्त्वाचे स्थान नाही. ऐहिक विषय व उत्पादक श्रम यांना महत्त्व देणाऱ्या पारशी धर्माने गार्हस्थ्यजीवन, शेती, पशुपालन इत्यादींचा पुरस्कार केला आहे. एवढेच नव्हे, तर उपवास हे पाप मानले असून हे पाप करणाऱ्या व्यक्तीने काही लोकांना जेवण देण्याचे प्रायश्चित्त घ्यावे असे सांगितले आहे. ईश्वराने दिलेल्या या चांगल्या जगाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही, असे यहुदी धर्मात मानले आहे. या धर्मात उपवासाचे स्थानही मर्यादित स्वरूपाचे आहे. तथापि जेरूसलेमच्या नाशानंतर ईश्वरासाठी बळी देणे अशक्य झाल्यामुळे काही लोकांनी स्वतःही मद्य व मांस घ्यावयाचे नाही, असे ठरविले होते. इस्लाममध्ये रमजानचा उपवास, मद्यपाननिषेध इ. नियम आढळतात. स्लामच्या सूफी संप्रदायात यतिचर्येची काही लक्षणे विशेषत्वाने आढळतात. चीनमधील कन्फ्यूशस व ताओ मत आणि जपानमधील शिंतो धर्म यांमध्येही यतिचर्येला महत्त्वाचे स्थान नव्हते.
संदर्भ : Chakraborti, Haripada, Asceticism in Ancient India, Calculta. 1973.
साळुंखे, आ. ह.
“