रेमासे : हे उपास्थियुक्त (कूर्चायुक्त) मत्स्य वर्गातील बॅटॉइडी या गणात समाविष्ट केले आहेत. आधुनिक शार्क मासे हे यांचे जवळचे नातेवाईक होत. यांचे शरीर चापट असून डोळ्यामागे पाच रंध्रे असतात. ही रंध्रे क्लोमकक्षात (कल्ल्याच्या कक्षात) उघडतात व त्यांना श्वासरंध्रे म्हणतात. मुख डोक्याखाली अधर (खालच्या) पृष्ठावर असते. पक्षांची (परांची) बाजूने व पुढून वाढ झालेली असते. यांची शरीररचना व आकार समुद्रतळाशी राहण्यास अनुकूल असाच असतो.
श्वासरंध्रांतून घड्यांत जाणारा पाण्याचा प्रवाह क्लोमांवरून जातो. यामुळे पाण्यात असलेला ऑक्सिजन श्वसनक्रियेस मिळतो. यांच्या काही जातींत माद्या पिलांना जन्म देतात तर काही जातींत माद्या लांबोळ्या कवचात अंडी घालतात. काही जातींच्या नरांत मुशी माशासारखे मैथुनांग असते.
बॅटॉइडी या गणाचे खालील कुलांत विभाजन केले आहे.
(१) टॉर्पेडिनिडी : यात विद्युत् अंग असलेल्या रे माशांचा समावेश होतो. हे मासे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यांच्या पृष्ठभागावर अंस पक्ष (कमरेवरील पर) व डोके यांच्या दरम्याने उभे षट्कोणी स्तंभ असलेले विद्युत् अंग असते. या अंगास स्पर्श झाला, तर जोराचा विजेचा धक्का बसतो. यामुळे कधीकधी लहान प्राणी मरतात. माशांचे कातडे गुळगुळीत असते. डोके, धड व अंस पक्ष मिळून एक गोल तबकडीसारखा आकार होतो. याचे शेपूट लहान पण भक्कम असते. या माशांच्या सु. २० जाती माहीत आहेत. हे सर्व समुद्रात राहतात. याचे वजन सु. १०० किग्रॅ. पर्यंत असू शकते. टॉपेंडो नोबिलियाना ही जाती उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर उत्तर कॅरोलायनापासून नोव्हास्कोशापर्यंत, तसेच पश्चिम आफ्रिका व स्कॉटलंड यांच्या किनाऱ्याजवळही आढळते. दुसरी जाती टॉ. कॅलिफोर्निका ही पॅसिफिक महासागरात उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आढळते.
(२) ऱ्हिनोबॅटिडी : यात गिटार माशांचा समावेश आहे. हे मासे मुशीसारखे दिसतात. विद्युत् अंग नसलेल्या या रे माशांचे कातडे खडबडीत असते व कधी कधी त्यावर काटे असतात. यांचे अंस पक्ष लहान असून धड निमुळते होत जाते व शेवटी त्याचे शेपटात रूपांतर होते. या गिटार माशांच्या सु. २० जाती आहेत.
(३) प्रिस्टिडी : यात करवत माशांचा समावेश आहे. यांचे मुस्कट लांब तलवारीच्या पात्यासारखे असून त्याच्या दोन्ही बाजूंस मजबूत दात असतात. करवत हे यांचे भयंकर अस्त्र आहे. यांच्या पाच जाती ज्ञात आहे. प्रिस्टिस पेक्टिनेटस हा करवत मासा मेक्सिकोच्या आखातात, वेस्ट इंडिजमध्ये व अटलांटिक महासागरात न्यू जर्सीच्या किनाऱ्यावर आढळतो. पूर्ण वाढ झालेला करवत मासा सहा मी. लांब असतो. लहान आकाराचे करवत मासे खाद्य आहेत. [⟶ करवत मासा].
(४) राजिडी : (पाकट मासे). यांचे अंस पक्ष मोठे असतात व त्यांचा विस्तार मुस्कटापासून शेपटापर्यंत असतो. राजा प्रजातीतील पाकट माशांच्या जाती सर्वसाधारणपणे आढळतात. या जातींपैकी काही खोल पाण्यात राहणाऱ्या आहेत. हे मासे अंस पक्षाच्या सहाय्याने पोहतात. यांचे दात लहान असतात. काही जातींत ते अणुकुचीदार तर काहींत बोथट असतात. शेपटीच्या मागील भागावर काही जातींत अधर पृष्ठावर दोन लहान पक्ष असतात. मृदुकाय प्राणी, कवचधारी प्राणी व लहान मासे हे यांचे भक्ष्य होय. यांची अंडी लांबट, आकाराने मोठी व चिवट कवच असलेली अशी असतात. अंड्यांवर प्रतान (तणाव) असतात व त्यांच्या साह्याने ती दगडास चिकटविली जातात.
मोठ्या पाकट माशाचे वजन २५० किग्रॅ. इतके असते. सर्वांत आकाराने मोठा पाकट मासा (राजा लेव्हीस) अटलांटिक महासागरात आढळतात. याची लांबी २ मी. इतकी असू शकते. याशिवाय यूरोपच्या किनाऱ्यावर आणि पॅसिफिक महासागरातही पाकट मासे आढळतात. जगात दरवर्षी सु. ८०,००० टन पाकट मासे पकडले जातात. यांतील सर्वांत जास्त जपान, फ्रान्स, स्पेन व ग्रेट ब्रिटन या देशांत पकडले जातात. [⟶ पाकट].
(५) डॅसिॲटिडी : (नांगीधारक मासे). यांचे शेपूट चाबकासारखे असते म्हणून यांना इंग्रजीत व्हीप टेल्ड रे म्हणतात. शेपूट लांब व नाजूक असून त्यावर काटे असतात. हे काटे विषग्रंथीला जोडलेले असतात. अशी शेपटी इतर प्राण्यांस मारली, तर जखम होते व त्या जखमेत विष भिनले जाते, त्यामुळे तो प्राणी दगावतो. हे व्हीप टेल्ड रे मासे साधारण कोमट पाणी असलेल्या समुद्रात सापडतात. असे काही रे मासे दक्षिण अमेरिकेतील नदीमुखातही आढळले आहेत. नांगी असलेल्या रे माशांचे दात पुष्कळ असून ते लहान व बोथट असतात.
(६) मायलिओबॅटिडी : (गरुड मासे). यांना इंग्रजीत ईगल रे म्हणतात. यांचे दात अष्टकोणी व चपटे असतात व त्यांची संख्या कमी असते. दातांचा उपयोग खाल्लेल्या मृदुकाय प्राण्यांचे दलन करण्यास होतो.
(७) मॉब्युलिडी : (राक्षस मासे). यांना इंग्रजीत डेव्हिल रे म्हणतात. आकाराने हे सर्वांत मोठे मासे होत. मँटा आणि मॉब्युला ह्या याच्या दोन मुख्या प्रजाती आहेत. यांची लांबी सु. ६ मी. असते. यांच्या शेपटीवर काटा नसतो. अंस पक्षाचा अग्रभाग डोक्याच्या पुढे असतो व याची गुंडाळी होते. ही गुंडाळी शिंगासारखी दिसते. गुंडाळी उलगडल्यावर दोन्ही बाजूचे अंस पक्ष एकमेकांस चिकटतात व त्यांचा आकार घमेल्यासारखा होतो. यांची उपजीविका लहान माशांवर होते.
पहा : विद्युत् अंगे.
कुलकर्णी, सतीश वि. इनामदार, ना. भा.