रेडिन, पॉल : (२ एप्रिल १८८३ – २१ फेब्रुवारी १९५९). अमेरिकेतील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ व भाषातज्ञ. त्याचा जन्म लूज (पोलंड) येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याच्या लहानपणीच त्याचे माता पिता नोकरीनिमित्त अमेरिकेत न्यूयॉर्क येथे स्थायिक झाले (१८८४). त्याने सिटी कॉलेज (न्यूयॉर्क) मधून पदवी घेतली (१९०२). पुढील शिक्षण त्याने कोलंबिया विद्यापीठात घेतले. फ्रँट्स बोॲसच्या मार्गदर्शनाखाली त्याने पीएच्. डी. पदवी संपादन केली (१९११). पुढे नोकरीनिमित्त त्याचे भ्रमण सुरू झाले तथापि त्याने कोणत्याच एका महाविद्यालयात वा विद्यापीठात सलग अशी अध्यापकाची नोकरी केली नाही. तत्कालीन प्राध्यापकांत एक उडाणटप्पू विक्षिप्त विद्वान अशी त्याची ख्याती होती. कॅलिफोर्निया, केंब्रिज, शिकागो, ब्रांडीस (वॉलथॅम) इ. विद्यापीठांत काही वर्षे प्राध्यापक म्हणून त्याने काम केले. अखेर त्यास ब्रांडीस विद्यापीठात मानवशास्त्र विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापकही करण्यात आले. तत्पूर्वी काही वर्षे त्याने कॅनडाच्य भूशास्त्रीय सर्वेक्षण विभागात क्षेत्रीय मानवशास्त्रज्ञ म्हणून काम केले.
विद्यार्थिदशेतच त्याने आदिम समाजांच्या संस्कृतीविषयी संशोधन करण्याचा ध्यास घेतला आणि उर्वरित सर्व आयुष्य त्यांच्या संशोधन अभ्यासात व्यतीत केले त्यात प्रामुख्याने त्याने उत्तर अमेरिकेतील विन्नबेगो, ऑजिव्वे, फॉक्स, झापोटेक, वॉपॉ, विंट्यून, वाव्ही इ. अमेरिकन इंडियन जमातींचा क्षेत्रीय अभ्यास केला. विन्नवेगो जमातीवरील त्याचे संशोधन विशेष उल्लेखनीय असून त्याचा मूलभूत उद्देश अमेरिकन इंडियन जमातींतील लोकविद्या, त्यांचा धर्म, त्यांची भाषा आणि एकूण सांस्कृतिक जडणघडण यांचा तौलनिक अभ्यास करणे हा होता. आपल्या संशोधन अभ्यासाची मीमांसा आणि तत्संबंधीचे निष्कर्ष त्याने लेखनाद्वारे मांडले. त्याने विपुल ग्रंथलेखन केले. त्यांपैकी मॉनॉथीइझम अमंग प्रिमिटिव्ह पीपल्स (१९२४), कॅशिंग थंडर (१९२६), द प्रिमिटिव्ह मॅन अँज फिलॉसॉफर (१९२७), स्टोरी ऑफ द अमेरिकन इंडियन (१९२७), सोशल अँथ्रपॉलॉजी (१९२७), द मेथड अँड थिअरी ऑफ इथ्नॉलॉजी (१९३३), प्रिमिटिव्ह रिलिजन (१९३८), द कल्चर ऑफ द चिन्नबेगो अँज डिस्क्राइम्ब्ड बाय देमसेल्व्हज (१९४९), द ट्रिकस्टर (१९५६) इ. ग्रंथ विशेष मान्यता पावले. पहिल्याच ग्रंथात त्याने एकेश्वर वाद हा आदिम मानवामध्येही रूढ होता हे दाखविले आणि एकेश्वरवाद केवळ सुसंस्कृत मानवाचेच वैशिष्ट्य नव्हे, हे मत प्रतिपादन केले. कॅशिंग थंडर या ग्रंथात द आटोबायग्राफी ऑफ चिन्नबेगो इंडियन या ग्रंथाच्या आधारे त्यांच्या संस्कृतीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. या ग्रंथाचा उपयोग करून त्याने द कल्चर ऑफ द चिन्नबेगो … हा बृहद्ग्रंथ लिहिला.
विविध जमातींच्या क्षेत्रीय अभ्यासाबरोबरच त्याने उत्तर अमेरिकेतील इंडियन जमातींच्या बोलीभाषांचा अभ्यास केला. त्यांतील भाषांचे त्याने वर्गीकरण करून त्यातील एकात्मता दर्शविली. द जेनेटिक रिलेशनशिप ऑफ द नॉर्थ अमेरिकन इंडियन लँग्वीजीस (१९१९) या ग्रंथात त्याने याविषयीचे आपले संशोधनात्मक सिद्धांत मांडले आहेत. अशा प्रकारचे मौलिक संशोधन करणारा पॉल हा कदाचित पहिला सामाजिक मानवशास्त्रज्ञ असावा या बाबतीत त्याला आपले गुरू फ्रँट्स बोॲस यांच्याकडून प्रेरणा मिळाली असावी.
त्याच्या प्रारंभीच्या लेखनावर फ्रँट्स बोअँसचा प्रभाव असला, तरी नंतरच्या त्याच्या लेखनात त्याचा स्वतःचा असा ठसा उमटला आहे. त्यामुळेच रेडिनच्या लेखनाने पुढील भिन्न क्षेत्रांतील तज्ञांना आकर्षित केले आहे. त्यांत जॉन ड्यूई (तत्त्वज्ञ), कार्ल युंग (मनोरुग्णतज्ञ), जॉन क्रो रॅन्सम (कवी), ल्यूइस मम्फर्ड (समाजशास्त्रज्ञ) वगैरे थोर विद्वानांचा अंतर्भाव होतो.
शास्त्रीय प्रणालींच्या इतिहासातील रेडिन हा एक अत्यंत प्रागतिक मानवशास्त्रज्ञ होता. त्याने संस्कृती व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास यांसारख्या मानवशास्त्रातील महत्त्वाच्या कार्यक्षेत्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि आदिम समाजांचा एक संस्कृती−विशेष आदिम धर्म हा धागा धरून क्षेत्र अभ्यासाद्वारे मांडला. आदिम मानवाच्या धार्मिक समजुती आणि कर्मकांड यांत आर्थिक घटकांना कसे महत्त्वाचे स्थान आहे, हे रेडिननेच स्पष्टपणे दाखवून दिले आहे. न्यूयॉर्क येथे तो मरण पावला.
संदर्भ : 1. Diamond. Stanley, Ed. Culture in History : Essays in Honor of Paul Radin, London,1960.
2. Hays, H. R. From Ape to Angle : An Informal History of Social Anthropology, London, 1958.
3. Ogburn, W. F. Nionkoff, M. F. Sociology, Boston, 1950.
देशपांडे, सु. र.