रेडिओ दूरदर्शक : आकाशातील विविध दिशांनी येणाऱ्‍या, रेडिओ प्रारणाचे (साधारणपणे १ मिमी. ते ३० मी. तरंगलांबीच्या विद्युत् चुंबकीय तरंगांच्या रूपातील ऊर्जेचे) मापन करण्यासाठी वापरण्यात येणारे ज्योतिषशास्त्रीय उपकरण. यात एक उच्च दिशिक आकाशक (इतर दिशांपेक्षा एखाद्या विशिष्ट दिशेने येणारे रेडिओ तरंग अधिक परिणामकारकपणे ग्रहण करू शकणारा आकाशक अँटेना) व संबंधित इलेक्ट्रॉनीय साधनसामग्री यांचा समावेश असतो.

अवकाशामध्ये ज्या विविध भौतिकीय घटना किंवा प्रक्रिया घडत असतात त्यांमुळे त्याच्या विभिन्न विभागांमधून निरनिराळ्या प्रकारांच्या प्रारणांचे (तरंगरूपी ऊर्जेचे) उत्सर्जन होत असते. या प्रारणांमुळेच त्याचे निरीक्षण करून त्याच्या स्वरूपाविषयी ज्ञान मिळविणे शक्य होते. उदा., सूर्य व तारे यांपासून प्रकाश व उष्णता यांचे उत्सर्जन होत असते. त्यांवरून आपण त्यांचे निरीक्षण करून त्यांचे तापमान उच्च प्रतीचे असले पाहिजे, असा निष्कर्ष काढू शकतो. त्यांच्या अंतर्गत भागात अणुकेंद्रीय किंवा इतर प्रकारच्या विक्रिया होत असल्यामुळे त्यांचे तापमान इतक्या उच्च पातळीवर ठेवले जात असावे, असे अनुमान पण करू शकतो. अवकाशातील जड वस्तू या उत्सर्जित (किंवा परावर्तित) करीत असलेल्या प्रकाश ऊर्जेमुळेच आपण पाहू शकतो. उत्सर्जित प्रारण फक्त दृश्य प्रकाशाच्या स्वरूपातच असते असे नाही. त्यामध्ये क्ष-किरण, जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील), अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) किरण व रेडिओ कंप्रता (सु. ६ ते ३०,००० मेगॅहर्ट्झ कंप्रतेच्या म्हणजे दर सेकंदास होणाऱ्‍या कंपनसंख्येच्या) तरंगांचा पण समावेश होतो, असे प्रयोगाने आढळले आहे. १९६० सालानंतर ज्योतिषशास्त्रात जे विशेष लक्षणीय शोध लागले आहेत ते प्रकाशाव्यतिरिक्त अशा प्रारणांच्या अभ्यासाच्याद्वारेच लागले आहेत, असे लक्षात येते. यांपैकी क्ष-किरण, जंबुपार किंवा अवरक्त किरण या प्रारण प्रकारांचे पृथ्वीच्या सभोवताली   असणाऱ्‍या वातावरणाद्वारे शोषण होत असल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उपकरणांच्या साहाय्याने त्यांचा अभ्यास करणे शक्य होत नाही. उंच पर्वत शिखरावर गेले असता रॉकेटावर अथवा उपग्रहावर योग्य उपकरणे ठेवून त्यांद्वारे हे कार्य करणे शक्य असते. रॉकेटाच्या साहाय्याने पृथ्वीपासून दूर अंतरापर्यंत उपकरणे पाठवून या प्रकारचे निरीक्षण कार्य एफ्. टी. हॅडॉक, डी. वॉल्श व ए. ई. लिली यांनी केले. आधुनिक काळात रेडिओ तरंगांचा अभ्यास करून महत्त्वाचे संशोधन कार्य करण्यात आले. या संशोधन क्षेत्राला ⇨रेडिओ ज्योतिषशास्त्र असे म्हणतात. ज्योतिषशास्त्राच्या या शाखेकरिता रेडिओ दूरदर्शक हे मूलभूत असे साधन झाले आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर उपयोगात येत असलेल्या रेडिओ दूरदर्शकामध्ये सामान्यपणे १ मिमी. पेक्षा जास्त व ३० मी.पेक्षा कमी अशा तरंगलांबीचाच वापर केला जातो. १ मिमी.पेक्षा कमी तरंगलांबीच्या रेडिओ तरंगांचे पृथ्वीच्या वातावरणामधील पाण्याची वाफ, कार्बन डाय-ऑक्साइड, ऑक्सिजन इ. द्रव्यांमुळे शोषण होते. पृथ्वीभोवती असलेल्या ⇨आयनांबरामध्ये ३० मी. पेक्षा जास्त तरंगलांबीच्या रेडिओ तरंगांचे मोठ्या प्रमाणात क्षीणन होते. रेडिओ दूरदर्शक वापरण्यामध्ये एक फायदा असतो व तो म्हणजे सधूम धुके, धूळ किंवा आंतरग्रहीय अवकाशामध्ये पसरलेल्या सूक्ष्म द्रव्यकणांमधून प्रकाश जाऊ शकत नाही पण रेडिओ तरंग जाऊ शकतात. आधुनिक काळात रेडिओ दूरदर्शकाच्या तंत्रात पुष्कळ प्रगती झाली असल्यामुळे त्यांची संवेदनक्षमता व विभेदनक्षमता (निकटचे दोन उद्‌गम भिन्न असल्याचे ओळखण्याची क्षमता) उच्च प्रतीच्या झाल्या आहेत. प्रकाशीय दूरदर्शकापेक्षा रेडिओ दूरदर्शक हजारपटींनी अधिक सूक्ष्म असे तपशील स्पष्ट करून दाखवू शकतो. याच्या योगे अवकाशातील एखाद्या जड वस्तूची स्थाननिश्चिती पाचपटींनी जास्त अचूकपणे करता येते. प्रकाशीय दूरदर्शकाला अल्प दीप्तीमुळे ज्या वस्तू दिसू शकत नाहीत म्हणजे ज्या दूरदर्शकाच्या पल्ल्याबाहेर आहेत अशा जड वस्तूंपासून मिळणारे रेडिओ तरंग रेडिओ दूरदर्शकाच्या साहाय्याने ग्रहण करता येतात व त्यांची छायाचित्रे पण मिळविता येतात. अशा प्रकारे छायाचित्रित केलेल्या १/५ रेडिओ उद्‌गमांच्या स्थानापाशी कोणतीही जड वस्तू दिसत नाही. यांवरून हे उद्‌गम पृथ्वीपासून दूर अंतरावर असल्यामुळे ते दिसू शकत नाहीत, असा निष्कर्ष काढता येतो. दूर अंतरावरील दीर्घिकांमध्ये (तारामंडळांमध्ये) पृथ्वीपासून अत्यंत वेगाने गमन करणारे   ⇨कासार, रेडिओ तरंगांचे आवर्ती (म्हणजे ठराविक कालानंतर परत परत) प्रेषण करणारे ⇨पल्सार, अवकाशात अमोनियासारख्या रेणूच्या निर्मितीबद्दलचा पुरावा, एवढेच नव्हे तर विश्वाची सुरूवात ज्या महास्फोटापासून झाली त्या वेळी निर्माण झालेल्या रेडिओ प्रारणाचे अभिज्ञापन (अस्तित्व ओळखणे) या व इतर अनेक गोष्टी रेडिओ ज्योतिषशास्त्रीय संशोधनामधून ज्ञात झाल्या आहेत.

ऐतिहासिक दृष्ट्या रेडिओ ज्योतिषशास्त्राची सुरूवात कार्ल जान्स्की यांच्या निरीक्षणापासून झाली. त्यांनी एक परिभ्रमणशील (अक्षाभोवती फिरविता येणारा) दिशिक आकाशक वापरून इ.स. १९३२ मध्ये असे दाखविले की, आकाशकाचे तोंड आकाशगंगेच्या मध्याकडे वळविले असता त्याला जोडलेल्या रेडिओ ग्राहीमध्ये (रेडिओ तरंग ग्रहण करणाऱ्‍या इलेक्ट्रॉनिक साधनामध्ये) एक सीत्कारी स्वरूपाचा रेडिओ संकेत सतत मिळत राहतो. अवकाशातून येणारे रेडिओ कंप्रता उत्सर्जित संकेत बहुतांशी सिंक्रोट्रॉन स्वरूपाचे (सिंक्रोट्रॉन प्रारण) असतात. जेव्हा इलेक्ट्रॉन वा विद्युत् भारित कण प्रकाशतुल्य वेगाने चुंबकीय क्षेत्रात सर्पिल परिभ्रमण करतात तेव्हा त्यांपासून अखंडित कंप्रता पट्ट्यातील रेडिओ तरंगांचे उत्सर्जन होते. कणांना ही ऊर्जा कोठून मिळते किंवा ते कोणत्या कार्यकारण परंपरेमुळे असे उत्सर्जन करण्यास उद्युक्त होतात याविषयी संपूर्ण खुलासा आज उपलब्ध नाही. [⟶ रेडिओ ज्योतिषशास्त्र].

 

स्थिर व फिरता थाळी आकाशक : कोणत्याही प्रकारच्या रेडिओ दूरदर्शक योजनेमध्ये पुढील तीन महत्त्वाचे भाग आवश्यक असतात   (पहा. आ. १) : (१) एका ठराविक दिशेतून येणारी आपाती रेडिओ ऊर्जा गोळा करून तिला केंद्रित करणारा मोठ्या आकारमानाचा दिशिक गुणधर्मांचा थाळी आकाशक, (२) केंद्रित ऊर्जेचे अभिज्ञापन व विवर्धन करण्याकरिता एक इलेक्ट्रॉनीय ग्राही (अथवा ऊर्जा संकलक), (३) प्रदत्त संदर्शन (प्राप्त झालेली माहिती दर्शविणारी) योजना. रेडिओ दूरदर्शकाच्या साहाय्याने अवकाशामधून विविध दिशांतून येणाऱ्‍या रेडिओ कंप्रता ऊर्जेचे अभिज्ञापन व मापन करता येते. वरील साधी मूलभूत योजना तिच्या कमी प्रतीच्या विभेदनक्षमतेमुळे प्रकाशीय दूरदर्शकाप्रमाणे इष्ट जड वस्तूची प्रतिमा देत नाही, तर तिचे कार्य एखाद्या प्रकाश तीव्रता मापकासारखे होत असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

प्राथमिक स्वरूपाचा रेडिओ दूरदर्शक नेहमी वापरल्या जाणाऱ्‍या प्रकाशीय परावर्तक दूरदर्शकासारखा [⟶ दूरदर्शक] असतो. मात्र यात आरशाऐवजी रेडिओ प्रारणांचे ग्रहण करण्यासाठी वापरण्यात येणारा आ. १. रेडीओ दूरदर्शकाचे मूलभूत घटक विभाग : (१) रेडीओ तरंग, (२) दिशिक थाळी आकाशक, (३) आधार बैठक, विद्युत चलित्र (मोटर), (५) दिशादर्शक, (६) चलित्र नियंत्रक, (७) ग्राही, (८) संदर्शक. थाळी जड असल्याने तिचे परिभ्रमणं करण्यासाठी विद्युत् चलित्राचा उपयोग केला जातो. कोणत्याही क्षणी आकाशकाचा उन्नत कोन (आकाशकाच्या अक्षाचा क्षितिज पातळीशी होणारा कोन) किती आहे हे दाखविणारी दिशादर्शक ही योजना असते.परावर्तक (आकाशक) धातूच्या पत्र्याचा किंवा तारेच्या जाळीचा अन्वस्तज [अन्वस्त हा वक्र अक्षाभोवती फिरवून मिळणारे पृष्ठ [⟶ अन्वस्त] आकाराचा असतो. त्याच्या केंद्रस्थानी एक संवाहक असून त्यावर परावर्तित रेडिओ तरंग ग्रहण केले जातात. आकाशकाच्या पृष्ठभागावरून परावर्तन झाल्यावर केंद्रापाशी येणाऱ्‍या सर्व तरंगांची कला (एखाद्या समाईक संदर्भाच्या सापेक्ष असणारी स्थिती) एकच असेल अशा तऱ्‍हेने आकाशकाचा व्याप व आकार ठरविलेले असतात. केंद्रावर पडलेले तरंग दुर्बल असल्याने त्यांचे १० ते २,००० पट विवर्धन करावे लागते व त्यानंतर कमी कंप्रतेत रूपांतर करून त्यांचे अभिलेखन करतात.


अवकाशातील एकमेकांपासून जवळात जवळ असणाऱ्‍या व दूरदर्शकाने स्पष्टपणे वेगळ्या दिसणाऱ्‍या दोन बिंदुरूप रेडिओ उद्‌गमांमधील कोनीय अंतर

θ

57 λ 

या सूत्राने मिळतो. 

यात λही  रेडिओ प्रारणाची तरंगलांबी व D हा आकाशकाचा व्यास आहे. या कोनावरून दूरदर्शकाची विभेदनक्षमता ठरते. एका ठराविक रेडिओ तरंगलांबीच्या प्रारणाचे निरीक्षण करताना दूरदर्शकाची विभेदनक्षमता वाढविण्यासाठी म्हणजे वरील सूत्रातील कोनीय अंतर लहानात लहान करण्यासाठी दूरदर्शकाचा व्यास वाढविणे आवश्यक असते. आकाशकाचा व्यास वाढविल्याने दुर्बल रेडिओ प्रारणास दूरदर्शक अधिक संवेदनशील होतो. या कारणाने एकाच वेधशाळेत भिन्न भिन्न तरंगलांब्यातील प्रारणाच्या अभ्यासाकरिता वेगवेगळे दूरदर्शक वापरले जातात.

दृश्य प्रकाशाची तरंगलांबी एका सेंमी.च्या दशलक्षांशाच्या सुमाराची असते, तर रेडिओ तरंगलांबी एक मिमी. ते काही मीटर यांच्या दरम्यान असते. नेहमीच्या प्रकाशीय दूरदर्शकाची विभेदक्षमता सु. १ सेकंद (कोनीय) असते, तर सामान्य रेडिओ दूरदर्शकाची सु. १ मिनिट (कोनीय) असते. यामुळे आरंभीच्या रेडिओ दूरदर्शकांच्या साहाय्याने फक्त प्रभावी तेजस्वी वस्तूंचे निरीक्षण करणे शक्य होत असते. प्रकाशीय दूरदर्शकाच्या विभेदनक्षमते इतकी किंवा तिच्या जवळपास असणारी विभेदनक्षमता रेडिओ दूरदर्शकाने मिळविण्यासाठी आकाशकाचा व्यास ६ किमी. इतका मोठा करावा लागेल. रेडिओ दूरदर्शकाची उपयुक्तता वाढविण्यासाठी त्याच्या आकाशकाचा व्यास वाढवून मोठ्यात मोठा करणे आवश्यक ठरते पण व्यास मोठा करण्यास बऱ्‍याच मर्यादा पडतात. यातून मार्ग काढण्यासाठी व्यतिकरणमापन या तंत्राचा अवलंब करण्यात येतो (या तंत्राचे वर्णन पुढे दिलेले आहे).

आ. २. फिरत्या थाळी आकाशकाच्या द्वारे रेडीओ ऊर्जेचे केंद्रीकरण : (१) S या उद्‌गमाकडून येणारे समांतर तरंग, (२) S’ या S च्या दिशेत नसलेल्या उद्‌गमाकडून येणारे समांतर तरंग, (३) परावर्तक थाळी आकाशक, (४)ग्राही. S व * या उद्‌गमांकडून येणारे तरंग अनुक्रमे F व * येथे केंद्रित होतात. * हा ग्राहीच्या बाजूला असल्याने त्याचे ग्रहण होत नाही.अवकाशातील निरनिराळ्या विभागांचे सर्वेक्षण करण्याकरिता रेडिओ दूरदर्शकाच्या विविध प्रकारच्या योजना व्यवहारात वापरल्या जातात. एका पद्धतीमध्ये परावर्तक थाळी आकाशक क्षैतिज (क्षितिज समांतर) किंवा उदग्र (उभ्या) अक्षाभोवती हवा तसा फिरवून त्याला इष्ट दिशेत स्थिर करण्याची व्यवस्था असते (आ. २). इंग्लंडमधील जॉड्रेल बँक येथील ७६ मी. व्यासाचा रेडिओ दूरदर्शक या प्रकारचा आहे. दुसऱ्‍या पद्धतीच्या दूरदर्शकामध्ये (उदा., प्वेर्तरीको येथील ३०५ मी. व्यासाचा दूरदर्शक) परावर्तक थाळी स्थिर असते पण तिच्या केंद्रस्थानी असणाऱ्‍या इलेक्ट्रॉनीय ग्राहीचे स्थान मात्र हवे तसे बदलून अवकाशातील एका ठराविक विभागाचे निरीक्षण करता येते (आ. ३). तिसऱ्‍या पद्धतीमध्ये मुख्य थाळी आकाशक स्थिर असतो. अवकाशामधून एका ठराविक दिशेत येणारी रेडिओ ऊर्जा एका फिरत्या सपाट दुय्यम परावर्तकाच्या साहाय्याने थाळी आकाशकाकडे परावर्तित केली जाते (आ. ४). अशी योजना सिद्ध करणे यांत्रिक दृष्ट्या जास्त सुलभ असते व तिच्याकरिता खर्च पण कमी येतो. अशा प्रकारची योजना प्रथम रशियामध्ये पूलकव्ह येथे सिद्ध करण्यात आली. त्यानंतर अशी योजना अमेरिके ओहायओ राज्य विद्यापीठात व फ्रान्समध्ये नॅन्सी आ. ३. प्वेर्त रीको येथील स्थिर थाळी आकाशक (१) व त्यावरील हालविता येण्याजोगा इलेक्ट्रॉनीय ग्रही (२) यांनी बनलेला आरेसिबो रेडीओ दूरदर्शक.येथे उभारली गेली. रशियामध्ये उत्तर कॉकेशस पर्वतात उभारलेल्या रटान-६०० या योजनेमध्ये याच तत्त्वाचा उपयोग करून असे अनेक विचलनक्षम व प्रत्येकी १० मी. उंचीचे सपाट परावर्तक एका सु. ६०० मी. व्यासाच्या वर्तुळाच्या परिघावर प्रस्थापित केले आहेत. वर्तुळावरील परावर्तकांच्या स्थानाची संगणकाच्या साहाय्याने सतत जुळणी करून आकाशकाच्या निवडलेल्या भागाकडून येणारे रेडिओ तरंग मध्यवर्ती ग्राही आकाशकाकडे केंद्रीत केले जातात.

या योजनेच्या आणखी एका प्रकारामध्ये परावर्तक अन्वस्तीय वृत्तचितीच्या (आ. ५) आकाराचा असतो. या परावर्तकामुळे त्यावर पडणारी रेडिओ ऊर्जा एका रेषेवरील आ. ४. फिरत्या साहाय्यक सपाट परावर्तकाचे कार्य : (१) थाळी आकाशक, (२) फिरता साहाय्यक सपाट परावर्तक, (३) ग्राही.निरनिराळ्या बिंदूंवर एकत्रित होते. केंद्रित ऊर्जेचे ग्रहण करण्याकरिता अनेक लहान रेडिओ ग्राही या रेषेवर ठेवलेले असतात. प्रत्येकामधून मिळणारा संकेत स्वतंत्र केबलद्वारे मध्यवर्ती स्थानकाकडे पाठविला जातो. यामधील कलांमध्ये जर योग्य प्रकारे फरक केला, तर अवकाशातील निरनिराळ्या विभागांमधून येणाऱ्‍या रेडिओ ऊर्जेचे मापन करता येते. अशा प्रकारची योजना भारतामध्ये ऊटकमंड येथे बसविली आहे. या योजनेमध्ये पृथ्वीच्या परिभ्रमण गतीचा पण उपयोग करून घेतला आहे. थाळी आ. ५. अन्वस्तरीय वृत्तचित्तीच्या आकाराचा परावर्तक : (१) परावर्तक, (२) रेषीय केंद्र.आकाशकाचा अक्ष जर पृथ्वीच्या परिभ्रमण अक्षाशी समांतर असेल, तर एका दिवसाच्या अवधीमध्ये पूर्व-पश्चिम दिशेत असणाऱ्‍या सर्व रेडिओ उद्‌गमांपासून थाळीला ऊर्जा गोळा करणे शक्य होते. हा दूरदर्शक १९६६ मध्ये निलगिरी पर्वतात समुद्रसपाटीपासून २,२०० मी. उंचीवर उभारलेला असून त्याची लांबी ५३० मी. आहे. यात २४ चौकटी असून प्रत्येकीची रूंदी ३० मी. आहे. या सर्व चौकटींचे एकत्रितपणे १४० कोनात परिभ्रमण करता येते. हा दूरदर्शक ३२४–३२९ मेगॅहर्ट्झ या ठराविक कंप्रता पट्ट्यात कार्य करतो. टाटा इन्सिटट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेतील गोविंद स्वरूप या रेडिओ ज्योतिर्विदांच्या मार्गदर्शनाखाली या दूरदर्शकाचा अभिकल्प (आराखडा) व उभारणी करण्यात आली. या दूरदर्शकाची जगातील मोठ्या दूरदर्शकांमध्ये गणना होते.


थाळी आकाशकाची रचना : तसे पाहिले असता प्रकाशीय परावर्तक दूरदर्शक व थाळी रेडिओ दूरदर्शक यांच्या कार्यपद्धतीमध्ये बरेच साम्य आहे. थाळीच्या पृष्ठभागामुळे आपाती रेडिओ तरंग आडवले जाऊन परावर्तन क्रियेमुळे त्यांचे एका बिंदूपाशी केंद्रीकरण केले जाते. याकरिता थाळीचा आकार हा महत्त्वाचा असतो, कारण यावर कोठेही तरंग पडले, तरी त्या सर्वांचे एकाच बिंदूपाशी केंद्रीकरण होणे आवश्यक असते. याकरिता थाळीच्या पृष्ठभागाचा आकार अन्वस्तज असला पाहिजे, असे दाखविता येते. थाळीच्या निरनिराळ्या बिंदूंपासून परावर्तित होणारे रेडिओ तरंग केंद्रबिंदूपाशी एकाच कलेत येण्यासाठी तिचा पृष्ठभाग अतिशय अचूकपणे तयार करावा लागतो. यंत्राद्वारे प्रक्रीया करून कोणताही पृष्ठभाग अभिकल्पानुसार करावयाचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यामध्ये विविध कारणांमुळे काही प्रमाणात त्रुटी राहतेच. परिणामी थाळीच्या पृष्ठभागाचा काही स्थानिक भाग त्याच्या आदर्श किंवा अपेक्षित आकारापासून निराळा असा होतोच. आकाशक तयार करण्याच्या यांत्रिक क्रियेत ज्या त्रुटी सीमा अनुज्ञात असतात त्यांमुळे किंवा आकाशकाच्या पृष्ठभागाच्या विविध भागांमध्ये होणारे असमान प्रसरण किंवा आकुंचन यामुळे व शेवटी आकाशकाच्या त्याच्या स्वतःच्या वजनामुळेच त्याच्या निरनिराळ्या भागांत जी विकृती उत्पन्न होते त्यामुळे असा फरक निर्माण होऊ शकतो. या सर्व कारणांमुळे प्रत्यक्ष आकाशकाची रेडिओ ऊर्जा केंद्रीत करण्याची क्षमता त्याच्याकरिता अपेक्षित असलेल्या मूल्यापेक्षा बरीच कमी (सु. ३०-४०%) असू शकते.

आकाशकाच्या आकारामध्ये नव्याने काही त्रुटी निर्माण होऊन त्यामुळे त्यामध्ये फरक पडण्याची शक्यता असते. याकरिता या पृष्ठभागाची काही ठराविक काळानंतर परत परत तपासणी करणे आवश्यक असते. या कार्याकरिता ⇨लेसर किरण उपयुक्त ठरतात.

आकाशक तयार करण्याच्या यांत्रिक क्रियेकरिता त्रुटी सीमा λ/10 पेक्षा कमी असाव्यात असा निर्बंध योग्य ठरतो (λ – रेडिओ तरंगलांबी). जर निरीक्षण करावयाची रेडिओ तरंगलांबी पुरेशी मोठी असेल, तर थाळी संपूर्ण धातुपत्र्यांची न बनविता ती जाळीची बनविली, तरी सुद्धा चालते. मात्र याकरिता वरील अट पूर्ण होणे आवश्यक असते. भारतामधील ऊटकमंड येथील दूरदर्शकामध्ये अशा प्रकारच्या जाळीचा परावर्तक वापरलेला आहे.

एकच थाळी आकाशक वापरण्यात काही फायदे आहेत. पाहिजे त्या दिशेत त्याचे तोंड फिरविण्याकरिता विद्युत् चलित्र योजना बसवून तिच्या साहाय्याने अवकाशातील कोणत्याही विभागाचे सुलभपणे निरीक्षण करणे शक्य असते. इतर योजनांच्या तुलनेत यामध्ये जास्त रूंद कंप्रता पट्ट्यातील रेडिओ तरंगांचे ग्रहण करता येते. थाळी आकाशकाला दिशिक गुणधर्म असतो व रेडिओ तरंगलांबी जशी कमी होत जाते त्या प्रमाणात हा गुणधर्म जास्त प्रभावी होतो. आकाशकाची रेडिओ ऊर्जा गोळा करण्याची क्षमता D2 वर अवलंबून असते (D–थाळीचा व्यास). त्यामुळे जेवढा आकाशक मोठा त्या प्रमाणात त्याची संवेदनक्षमता वाढत जाते. आकाशकाची विभेदनक्षमता λ/D या सूत्राने मिळते व तिचे मूल्य विशेष उच्च प्रतीचे नसते. अवकाशामध्ये जर दोन रेडिओ उद्‌गम एका ठराविक अंतरापेक्षा एकमेकांच्या जवळ असतील, तर त्यांचे विभेदन ही योजना करू शकत नाही. थाळीचे आकारमान जसजसे वाढते तसतशी दूरदर्शक तयार करण्याकरिता लागणाऱ्‍या खर्चात नैकरेषीयपणे (एकघाती नसलेल्या रीतीने) प्रचंड वाढ होते, असे आढळून आले आहे.

ज्या प्रमाणात आकाशकाचे आकारमान वाढते त्यापेक्षा अधिक प्रमाणात तो सज्ज करण्याकरिता लागणारा खर्च वाढत जातो. कारण असा जड आकाशक स्थिरपणे बसविण्याकरिता त्याला भरपूर भक्कम आधार द्यावा लागतो. या कार्याकरिता लागणारा खर्च कमी करण्याकरिता एक पर्यायी उपाय आहे. ही योजना पश्चिम जर्मनीतील एफेल्सबर्ग येथील १०० मी. व्यासाच्या रेडिओ दूरदर्शकामध्ये वापरण्यात आली आहे. या योजनेत तबकडीला दिलेले आधार फार भक्कम नाहीत. त्यामुळे आकाशक आपल्या वजनामुळे निरनिराळ्या भागांत थोडाफार खचतो किंवा त्याच्या आकारात विकृती पण निर्माण होऊ शकते. या सर्व गोष्टींमुळे आकाशकाचा केंद्रबिंदू विचलित होतो. इलेक्ट्रॉनीय ग्राहीच्या स्थानामध्ये योग्य असा बदल घडवून आणून या परिणामाचे परिमार्जन करण्याची या योजनेत व्यवस्था ठेवलेली असते. आकाशकाच्या केंद्रबिंदूत होणाऱ्‍या विचलनाचे मूल्य व स्वरूप यांचे निरीक्षण करून त्याकरिता आवश्यक अशा बदलाचे गणन संगणकामार्फत करून स्वयंचलित योजनेद्वारे आवश्यक असा बदल या योजनेत घडवून आणला जातो.

मोठ्या आकारमानाच्या अवजड आकाशकाचे तोंड इष्ट दिशेत फिरविण्याकरिता खास यंत्रणा उपलब्ध करून द्यावी लागते. जर थाळी आकाशकाचा व्यास फार मोठा नसेल, तर त्याकरिता पश्चिम-पूर्व (अथवा विषुववृत्तीय) आधार बैठक उभारणे सोईचे ठरते. पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमण गतीमुळे एकाच दिशेत स्थिर ठेवलेला आकाशक चोवीस तासांमध्ये पृथ्वीभोवतालच्या सर्व अवकाशाचे सर्वेक्षण करतो. जर एखाद्या विशिष्ट रेडिओ उद्‌गमाचा सतत मागोवा घ्यावयाचा असेल, तर ते कार्य काही काळपर्यंत (सु. १२ तास) आकाशक पश्चिम दिशेत एका ठराविक त्वरेत विचलित करून करता येतो. या पद्धतीमध्ये पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमुळे उद्‌गमाच्या उन्नतांशामध्ये पडणाऱ्‍या फरकाची सतत भरपाई केली जाते. मोठ्या आकारमानाच्या आकाशकाच्या बाबतीत आकाशकाकरिता उदग्र व क्षैतिज दिशांत अशी दोन प्रकारची परिभ्रमणे आवश्यक असतात. यासाठी विद्युत् चलित्रे उपयोगात आणली जातात आणि त्यांवरील नियंत्रण संगणकाद्वारे करण्यात येते. यामुळे या दोन्ही गतीचे अनुयोजन अचूकपणे करणे शक्य होते.

 

रेडिओ दूरदर्शकाची स्थाननिश्चिती : अवकाशातून येणारे रेडिओ संकेत दुर्बल (≈ १०–२० वॉट) शक्तिमूल्याचे असतात. त्यामुळे त्यांमध्ये इतर अनाहूत संकेतांचे मिश्रण होऊन त्यांपासून माहिती मिळविण्याच्या कार्यात व्यत्यय येणार नाही, अशी दक्षता घ्यावी लागते. रेडिओ प्रेषण स्थानके, दूरचित्रवाणी, रडार स्थानके, कृत्रिम संदेशवहन उपग्रह इत्यादींपासून मिळणाऱ्‍या संकेतांमुळे असा उपद्रव निर्माण होण्याचा संभव नेहमीच असतो. या प्रकारचा व्यत्यय टाळण्याकरिता रेडिओ दूरदर्शकाची स्थापना दूर, एकाकी अशा परिसरात करतात. ही जागा जर एखाद्या खोऱ्‍यात (अथवा दरीत) असेल, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाची वक्रता व सभोवताली असणारे डोंगर यांमुळे अशा अनाहूत संकेतांचे मोठ्या प्रमाणात शोषण होऊन त्यांच्या तीव्रतेमध्ये मोठी घट होते. पृथ्वीभोवती असणाऱ्‍या आयनांबरापासून परावर्तित होणारे किंवा पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधील विषमतेमुळे (उदा., तापमान) प्रकीर्णित होणारे (विखुरले जाणारे) रेडिओ संकेत किंवा मनुष्यनिर्मित कृत्रिम उपग्रहापासून उत्सर्जित होणारे संकेत यांपासून होणारा उपद्रव पूर्णपणे टाळता येत नाही. मात्र मिळालेल्या प्रदत्तावर संगणकाच्या द्वारे योग्य प्रक्रिया करून इष्ट संकेत बऱ्‍याच शुद्ध स्वरूपात मिळविता येतो.


इलेक्ट्रॉनीय ग्राही : आकाशकाने ज्या बिंदूपाशी रेडिओ ऊर्जा केंद्रीत केलेली असते त्या ठिकाणी त्याचे अभिज्ञापन, विवर्धन आणि मापन करण्याकरिता जो इलेक्ट्रॉनीय ग्राही ठेवलेला असतो त्यामध्ये दोन भाग असतात. यांपैकी पूर्व-विवर्धक या पहिल्या विभागात आपाती संकेताचे १०-१,००० पटींनी विवर्धन केले जाऊन त्याचे कमी कंप्रतेच्या संकेतात रूपांतर केले जाते. पूर्व-विवर्धक म्हणून ⇨मेसर किंवा प्रचलीय विवर्धक (अतिउच्च कंप्रता आणि सूक्ष्मतरंग रेडिओ संकेतांकरिता वापरण्यात येणारा अतिशय संवेदनाक्षम विवर्धक) यांचा उपयोग केला जातो. कारण या दोन्ही प्रयुक्तींमध्ये गोंगाटाचे (व्यत्ययकारी व अनिष्ट विद्युत् प्रवाहांचे वा दाबांचे) परिणाम कमी असते. ही उपकरणे जर द्रवरूप हीलियम वायूने थंड केलेल्या आवरणामध्ये ठेवली, तर त्यांमधील गोंगाटाचे प्रमाण आणखी कमी होते [⟶ मेसर]. दूरदर्शकापासून नियंत्रक स्थानकाकडे या संकेताचे केबलद्वारे सरळ   रीतीने प्रेषण करता येईल अशा मूल्याची मध्यस्थ कंप्रता वापरली जाते. 

 

दूरदर्शक आकाशकाचे प्रकार : रेडिओ दूरदर्शक आकाशक योजनांचे पुढील प्रकारे वर्गीकरण करता येते : (१) थाळी स्वरूपाचा एकाकी परावर्तक आकाशक, (२) व्यतिकरणमापक आकाशक : या योजनेमध्ये एकापेक्षा अधिक आकाशक असून ते इलेक्ट्रॉनीय रीत्या एकमेकांशी संलग्न केलेले असतात, (३) कलाबद्ध आकाशक रचनाव्यूह. यांपैकी पहिल्या उपकरण योजनेचे सविस्तर वर्णन वर दिलेले आहे. तिच्या साहाय्याने कोणत्याही एका ठराविक दिशेतून पृथ्वीकडे येणाऱ्‍या रेडिओ कंप्रता ऊर्जेचे मापन केले जाते. अवकाशातील रेडिओ उद्‌गम किती अंतरावर आहे किंवा त्याचे आकारमान किती आहे, याविषयीची माहिती या योजनेने मिळत नाही. व्यतिकरण आकाशकाच्या मदतीने रेडिओ उद्‌गमाचे अंतर व त्याचे स्थूल आकारमान यांविषयीची माहिती मिळविता येते. दोन जवळजवळ असणाऱ्‍या रेडिओ उद्‌गमांचे विभेदन किंवा उद्‌गमाच्या संरचनेविषयीची माहिती कलाबद्ध आकाशक रचनाव्यूह योजना वापरून मिळविता येते. या उपकरण योजनेच्या साहाय्याने प्रकाशीय दूरदर्शकाप्रमाणे इष्ट जड वस्तूची प्रतिमा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था असते.

या संदर्भात असे म्हणता येते की, ज्या प्रमाणात आकाशक योजनेचे दिशिक गुणधर्म प्रकर्षित होतात त्या प्रमाणात त्याची विभेदनक्षमता वाढून रेडिओ उद्‌गमाच्या संरचनेविषयी माहिती मिळविण्याची क्षमता वाढते. ही कल्पना पुढील दाखल्यावरून स्पष्ट होईल. ट्रँझिस्टर रेडिओ ग्राहीमधील आकाशकाला फेराइटाचा आंतरक (गाभा) असल्यामुळे त्यामध्ये दिशिक गुणधर्म प्रकर्षाने मिळतो. कोणत्याही एका रेडिओ स्थानकापासूनचा कार्यक्रम अशा रेडिओ ग्राहीद्वारे मिळविण्याकरिता हा रेडिओ ग्राही एका ठराविक दिशेत तोंड करून ठेवला असतानाच मिळतो, हा अनुभव सुपरिचित आहे. याचाच अर्थ असा होतो की, रेडिओ ग्राही दिशेवरून रेडिओ स्थानकाची दिशा निश्चित करणे शक्य होईल. कलाबद्ध आकाशक रचनाव्यूहामध्ये दिशिक परिणाम महत्तम प्रमाणात मिळत असल्यामुळे अशा व्यूहरचनेद्वारा निरीक्षण करून रेडिओ उद्‌गमाच्या संरचनेविषयीची माहिती मिळविता येते. व्यतिकरणमापक तत्त्वाचा उपयोग करून पण हे कार्य साधता येते.

 

व्यतिकरणमापक दूरदर्शक : दोन किंवा अधिक लहान रेडिओ दूरदर्शक एकमेकांशी इलेक्ट्रॉनीय रीत्या संलग्न केले असता त्यांपासून व्यतिकरणमापक दूरदर्शक तयार होतो. या तत्त्वाचा उपयोग १९४७ मध्ये ऑस्ट्रेलियामधील एल्. एल्. मॅकरेडी, जे. एल्. पॉसी व आर्. पेन-स्कॉट यांनी प्रथम केला. दोन दूरदर्शकांच्या आकाशकांपासून मिळणाऱ्‍या संकेतांची या पद्धतीमध्ये परिणामी बेरीज केली जाते. रेडिओ उद्‌गम जसा अवकाशामधून पुढे जात राहतो तसे त्यापासून मिळणारे रेडिओ संकेत काही परिस्थितींमध्ये एकमेकांचा प्रभाव द्विगुणित करतात, तर काही परिस्थितींमध्ये एकमेकांचा प्रभाव नाहीसा करतात. त्यामुळे अभिज्ञापन करणाऱ्‍या रेडिओ ग्राहीमध्ये व्यतिकरण पट्ट मिळतात. रेडिओ उद्‌गम अवकाशात मार्गक्रमण करीत असताना ज्या प्रकारे या व्यतिकरण पट्टात बदल होत जातो, त्यावरून रेडिओ उद्‌गमाचे आकारमान व त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर या दोहोंविषयी माहिती मिळू शकते. या उपकरणाची विभेदनक्षमता उच्च प्रतीची असते. तिचे मूल्य दोन घटक दूरदर्शकांतील अंतराएवढा व्यास असणाऱ्‍या थाळी आकाशकाएवढे असते पण संवेदनक्षमता कमी प्रतीची असते. मात्र या पद्धतीने रेडिओ उद्‌गमाचे छायाचित्र मिळू शकत नाही.

या प्रकारच्या दूरदर्शकामध्ये गोंगाटाचे प्रमाण कमी असते कारण अनाहूत गोंगाट संकेत हे परस्पर आ.६. द्वारक संश्लेषणापासून मिळणाऱ्‍या प्रदत्ताचे विविध प्रकार करता येणारे संदर्शन : (अ) तीव्रता वितरण (आ) समोच्चतादर्शक नकाशा (इ) रेडीओ छायाचित्र.

असंबंधित व इतस्ततः स्वरूपाचे असल्यामुळे त्यांचे सरासरी मूल्य कोणत्याही कालावधीकरिता शून्य असेल, अशी अपेक्षा करता येते. दोन कलामेलित (कलांमध्ये एकरूपता असणारे) संकेत एकत्रित करून तो इलेक्ट्रॉनीय ग्राहीला पुरवला, तर त्यामधील गोंगाटाच्या प्रमाणात घट होईल, हे उघड आहे.

व्यतिकरणमापकाचा ‘परस्परसंबंधक’ या नावाचा आणखी एक प्रकार आहे. यामध्ये दोन आकाशकांकडून मिळणाऱ्‍या संकेतांचे गुणन करून मिळणारा परिणामी संकेत इलेक्ट्रॉनीय ग्राहीला पुरवला जातो. या प्रकारामध्ये गोंगाटाचे प्रमाण आणखी कमी होते, असे दाखविता येते.


द्वारक संश्लेषण पद्धतीचा दूरदर्शक : रेडिओ उद्‌गमाची संरचना मिळविण्याकरिता ⇨सर मार्टिन राइल यांची द्वारक संश्लेषण पद्धत वापरली जाते. या पद्धतीचा शोध लावल्याबद्दल राइल यांना १९७४ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. अवकाशामधील रेडिओ उद्‌गमापासून मिळणाऱ्‍या उत्सर्जित ऊर्जेचे मूल्य अंदाजे काही आठवडे किंवा महिने एवढ्या कालखंडाकरिता स्थिर रहात असते, या गोष्टीचा उपयोग या पद्धतीमध्ये केला जातो. एखाद्या रेडिओ उद्‌गमाचे बारा तासांकरिता सतत दूरदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण करून त्याच्या विविध भागांतील तेजस्वितेच्या वितरणाचा अभ्यास करता येतो. राइल यांच्या द्वारक संश्लेषण पद्धतीमध्ये व्यतिकरणमापक दूरदर्शकाच्या तत्त्वाचाच उपयोग केला होता पण १९७१ मध्ये त्यांनी उभारलेल्या अशा दूरदर्शकाच्या योजनेत दोन घटक आकाशकांऐवजी एकंदर आठ आकाशकांचा उपयोग केला होता. यांपैकी चार स्थिर असून चार चाके लावलेल्या गाडीवर बसविले असल्यामुळे त्याची परस्परांपासूनची अंतरे बदलता येत होती. हे सर्व आकाशक पूर्व-पश्चिम या पृथ्वीच्या परिभ्रमण दिशेत प्रस्थापित केले होते. या सर्व आकाशकांच्या मिळून चार व्यतिकरण जोड्या होतात आणि यांपैकी प्रत्येक जोडी एका वेळी अवकाशातील रेडिओ उद्‌गमाच्या एका विभागामधील तीव्रता वितरणाच्या एका फूर्ये घटकाचे मूल्यमापन करते. बारा तासांच्या अवधीत योजनेतील घटक दूरदर्शकांमधील अंतर अनेक वेळा बदलून इष्ट उद्‌गमाच्या निरनिराळ्या विभागांतील तीव्रता वितरणाचे मापन केले जाते. हा सर्व प्रदत्त दृक् फितीवर (व्हिडिओ टेपवर) मुद्रित करून ठेवतात. त्यांचे संकलित विश्लेषण संगणकाच्या द्वारे केले असता त्यापासून रेडिओ उद्‌गमाचे रेडिओ छायाचित्र मिळविता येते. संगणकामध्ये प्रदत्त संख्याव्यूहाच्या स्वरूपात संग्रहित केला जातो. त्यापासून तीव्रता वितरण [आ. ६ (अ)], समोच्चतादर्शक नकाशा [आ. ६ (आ)] किंवा रेडिओ छायाचित्र [आ. ६ (इ)] या निरनिराळ्या स्वरूपांत संदर्शन मिळू शकते. आकृतीमध्ये ट्यूको ब्राए यांनी १५७२ मध्ये वेध घेतलेल्या अतिदीप्त नवताऱ्‍याच्या अवशेषाकरिता मिळालेला प्रदत्त दाखविला आहे. जॉड्रेल बँक दूरदर्शक योजनेत पश्चिम मिडलँड्समधील सहा थाळी दूरदर्शक एकमेकांशी संलग्न करून १५४ किमी. व्यासाच्या एकाकी थाळीएवढी क्षमता असणारी रेडिओ दूरदर्शक योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

व्यतिकरणमापकामध्ये दोनच घटक दूरदर्शक असावेत असा निर्बंध असत नाही, उदा., नेदर्लंड्समधील ग्रोनिंगेन येथील वेस्टरबोर्क ऑब्झर्व्हेटरीमध्ये २५ मी. व्यासाचे १२ आकाशक १·६ किमी. लांबीच्या पायारेषेवर ठेवले आहेत. यांपैकी २ चल आहेत. मिळालेल्या प्रदत्तावर प्रक्रीया करण्याकरिता मध्यवर्ती स्थानकाच्या जवळ संगणक जोडलेला असतो. प्रयोगामध्ये दूरदर्शकाचे तोंड एका रेडिओ उद्‌गमाकडे करून ठराविक प्रदत्त मिळविला, तर दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर त्या उद्‌गमाचे रेडिओ छायाचित्र संदर्शित करण्याची योजना यामध्ये केलेली असते. ऑस्ट्रेलियामध्ये होबार्ट (टास्मानिया), टीडबीनबीला (कॅनबरा) व कार्नाव्हीन (पश्चिम ऑस्ट्रेलिया) या ठिकाणी असणारे रेडिओ दूरदर्शक उपग्रहाच्या साहाय्याने एकमेकांशी संलग्न करून त्यांपासून ३,००० किमी. कार्यकारी आकारमानाचा दूरदर्शक सज्ज करण्याची योजना १९८८ पर्यंत अंमलात आणली जाणार होती.

 

क्रूसाकृती व्यतिकरणमापक योजना : द्वारक संश्लेषण पद्धतीप्रमाणे रेडिओ उद्‌गमाच्या संरचनेविषयी अचूक माहिती मिळविण्याकरिता अतिबृहत्-पायारेषा किंवा क्रूसाकृती व्यतिकरणमापक योजना पण वापरता येतात.

यांपैकी क्रूसाकृती प्रणालीचा उपयोग बी. वाय्. मिल्स यांनी ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीजवळ प्रथम करून दाखविला. एकमेकांशी काटकोन करून क्रूसाकृती बनविणाऱ्‍या दोन घटक रेषांवर या योजनेमध्ये अनेक आकाशक एकमेकांपासून सारख्या अंतरावर प्रस्थापित केले होते. प्रत्येक रेषेवर असणाऱ्‍या सर्व आकाशकांपासून एक संकलित रेडिओ संकेत मिळविला होता. दोन रेषांतील आकाशकापासून अशा रीतीने मिळविलेल्या दोन संकेतांचे गुणन करून त्यांच्या मूल्यावरून निरीक्षण करीत असलेल्या मर्यादित विभागाची तीव्रता मिळविण्यात आली. या पद्धतीचा उपयोग सूर्याच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करण्याकरिता प्रथम केला गेला. या योजनेच्या साहाय्याने एका वेळी सूर्याच्या फक्त १०% पृष्ठभागापासून उत्सर्जित होणाऱ्‍या प्रारणाच्या तीव्रतेचे मापन केले गेले. यावरून या योजनेच्या विभेदनक्षमतेविषयी कल्पना येईल.

 

अतिबृहत्-पायारेषा व्यतिकरणमापक : व्यतिकरणमापक दूरदर्शकामधील दोन आकाशकांमधील अंतर वाढविले, तर त्या प्रमाणात दूरदर्शकाची विभेदनक्षमता वाढत जाते. दूरदर्शकापासून माहिती मिळविण्याकरिता या दोन आकाशकांमधून ग्रहण केल्या जाणाऱ्‍या संकेतांच्या कलांविषयी अचूक माहिती उपलब्ध होणे आवश्यक असते. आकाशकांमध्ये जर खूप अंतर असेल, तर प्रत्येक आकाशकाकडून कलाविषयक माहिती असलेला विद्युत् संकेत प्रेषण तारांमार्गे एका मध्यवर्ती स्थानकाकडे पाठविला गेल्यास त्याचे या मार्गावर मोठ्या प्रमाणात क्षीणन होते. परिणामी त्याजोगे मिळणाऱ्‍या अंतिम निष्कर्षात काही प्रमाणात अनिश्चितता निर्माण होते. या कारणाकरिता आधुनिक काळात ⇨आणवीय कालमापकांच्या द्वारे एकाच वेळी एकमेकांपासून खूप दूर अंतरावर असणाऱ्‍या दोन आकाशकांमध्ये स्वतंत्रपणे संकेत ग्रहण करून ते फितींवर प्रथम मुद्रित केले जातात. या दोन फितींवरील प्रदत्त एका मध्यवर्ती स्थानकावर आणून त्यावर संगणकाच्या साहाय्याने प्रक्रिया केली जाते व त्यापासून योग्य ती माहिती मिळविली जाते. अशा प्रकारे समकालीकृत संकेत मिळवून त्यायोगे रेडिओ उद्‌गमाविषयी माहिती मिळविण्याच्या पद्धतीस ‘अतिबृहत्-पायारेषा व्यतिकरणमापन’ असे म्हटले जाते. यायोगे २×१०–४ सेकंद या प्रतीची कोनीय विभेदनक्षमता मिळू शकते. १९८८ मध्ये जगातील निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या पाच ते दहा थाळी आकाशकांचा या पद्धतीने उपयोग करून १०० मायक्रोसेकंद (१ मायक्रोसेकंद १०–६ सेकंद) इतकी कोनीय विभेदनक्षमता मिळविण्यात आली. ही विभेदनक्षमता रेडिओ दूरदर्शकाने यापूर्वी प्राप्त झालेल्या विभेदनक्षमतेच्या दोन ते तीन पट व सर्वोत्कृष्ट प्रकाशीय दूरदर्शकापेक्षा १०,००० पट चांगली आहे.


रडार मापन : रेडिओ दूरदर्शकाच्या वर वर्णन केलेल्या उपयोगाचे स्वरूप अक्रिय प्रकारचे आहे. प्रकाशीय दूरदर्शकाकरिता जी निरीक्षण कार्यपद्धती वापरली जाते त्याच प्रकारची पद्धत रेडिओ दूरदर्शकाकरिता पण वापरली जाते. अवकाशात दूर अंतरावर असणाऱ्‍या रेडिओ उद्‌गमापासून येणाऱ्‍या रेडिओ तरंग ऊर्जेचे ग्रहण किंवा विश्लेषण करून त्यापासून भौतिकीय माहिती मिळविली जाते अथवा त्यापासून निष्कर्ष काढले जातात.

सूर्यमालेतील ग्रह, चंद्र, पृथ्वीकडे येणाऱ्‍या उल्का यांसारख्या जडवस्तू पृथ्वीपासून पुरेशा जवळ असल्याने रेडिओ दूरदर्शकामधून ⇨रडारप्रमाणे त्यांवर उच्च कंप्रतेचे रेडिओ तरंग किंवा स्पंद प्रेषित करून त्यांच्या परावर्तनाचा शोध घेणे शक्य होते. या निरीक्षणापासून या जड वस्तूंची स्थाननिश्चिती, त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर, त्यांचा वेग व गतिदिशा यांबद्दल माहिती मिळविता येते. या पद्धतीला सक्रिय किंवा रडार पद्धत असे म्हणतात.

 

भावी विकासाची दिशा : भविष्यामध्ये रेडिओ दूरदर्शकाच्या थाळी आकाशकाचे आकारमान एकतर वाढविण्याकडे नाही तर तो   जास्त अचूक बनविण्याकडे प्रवृत्ती राहील, असे दिसते. आकाशकाचे आकारमान वाढले तर तो जास्त संवेदनक्षम होतो व त्यामुळे तो अवकाशात जास्त दूरपर्यंत पाहू शकतो. आकाशक जर जास्त अचूकपणे बनविला गेला, तर त्यायोगे जास्त अचूक असे मापन करणे अर्थातच शक्य होते. आकाशकाचे दिशिक गुणधर्म वाढविण्याकरिता प्रयत्न झाले आणि या प्रयत्नांबरोबर द्वारक संश्लेषण पद्धत व तीमधील मापनाकरिता सुविकसित अंकीय इलेक्ट्रॉनीय पद्धतीचा उपयोग केला गेला, तर त्यामुळे दूरदर्शकाच्या विभेदनक्षमतेत खूप वाढ होण्याची शक्यता आहे. विभेदनक्षमता जशी वाढते तसा उपकरणाच्या योगे मिळालेल्या रेडिओ छायाचित्रामधील तपशील जास्त स्पष्ट होतो. कित्येक शेकडो मीटर लांबीचे आकाशक उपग्रहापासून लोंबत सोडून त्याद्वारे पृथ्वीवर वातावरणामुळे व इतर काही कारणांमुळे जे रेडिओ तरंग मिळू शकत नाहीत त्यांचे निरीक्षण करणे शक्य होईल असे वाटते. एकमेकांपासून ठराविक अंतरावर असणाऱ्‍या उपग्रहांवर आकाशक ठेवून त्याद्वारे अतिबृहत्-पायारेषा व्यतिकरणमापने मिळण्याची सुविधासुद्धा उपलब्ध होणे शक्य आहे.

पारंपरिक प्रकाशीय ज्योतिषशास्त्राला रेडिओ ज्योतिषशास्त्राने केवळ संवेदनक्षमतेतच नव्हे, तर विभेदनक्षमतेत सुद्धा मागे टाकले आहे, असे वरील वर्णनावरून स्पष्ट होते. अवकाशातील ज्या जड वस्तू प्रकाशीय ज्योतिषशास्त्राला दिसू शकत नाहीत त्यांचे निरीक्षण व मापन रेडिओ दूरदर्शकाद्वारे करता येते. विश्व एकसारखे प्रसरण पावत असल्यामुळे रेडिओ व प्रकाशीय दूरदर्शकांच्या अवकाशातील कार्यक्षेत्रावर अंतिम मर्यादा पडतात. पृथ्वीपासूनच्या सर्वांत दूर असणाऱ्‍या दीर्घिका पृथ्वीपासून सर्वांत जास्त वेगाने दूर जात असल्यामुळे त्यांपासून उत्सर्जित होणाऱ्‍या प्रकाश व रेडिओ कंप्रतांचे ⇨डॉप्लर परिणामानुसार अवमूल्यन होते. ज्या दीर्घिकांपासून प्रकाशास पृथ्वीवर पोहचावयास दोन अब्ज वर्षे लागतात अशा दीर्घिकांचा वेग इतका मोठा असतो की, त्यापासून दृश्य प्रकाश आपणास मिळणारच नाही, असे दाखविता येते. दृश्य विश्वाची अंतिम निरीक्षण मर्यादा या मूल्याची असते, असे म्हणता येते. रेडिओ तरंगांकरिता ही मर्यादा चार अब्ज प्रकाशवर्षे एवढी असते. याचा अर्थ असा होतो की, या मर्यादेपलीकडील विश्वाचे दर्शन करून घेणे मनुष्याला शक्य होणार नाही, असे सध्या तरी वाटते.

कोष्टक क्र. १ व २ मध्ये जगातील विविध देशांतील महत्त्वाच्या रेडिओ दूरदर्शकांची यादी दिली आहे आणि त्याविषयीचा काही महत्त्वाचा तपशील पण दिला आहे.

भारतात पुण्याजवळ नारायणगाव येथे एक अतिप्रचंड रेडिओ दूरदर्शक उभारण्याची योजना आखण्यात आलेली आहे. या दूरदर्शकाचा अभिकल्प टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेटल रिसर्च या संस्थेतील शास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे. अवकाशातून येणाऱ्‍या एक मी. तरंगलांबीच्या प्रारणाचे या दूरदर्शकाच्या साहाय्याने वेध घेता येतील. हा दूरदर्शक ३८–१५० मेगॅहर्ट्‌झ, ३२५ मेगॅहर्ट्‌झ व ६१० मेगॅहर्ट्‌झ या कंप्रतांच्या तरंगांचा वापर करणार आहे. या दूरदर्शकात ३४ एकसारखे, वळविता येण्याजोगे ४५ मी. व्यासाचे व पोलादाच्या तारेच्या जाळीचे बनविलेले अन्वस्तीय आकाशक वापरले जातील. या आकाशकांनी व्यापलेल्या जागेचे क्षेत्रफळ सु. २५ चौ. किमी. असेल. यांपैकी १६ आकाशक Y आकारांच्या व्यूहरचनेचे भुज असतील व प्रत्येक भुज सु. १४ किमी. लांब असेल. याच्या साहाय्याने अतिशय थोडे आर्क-सेकंद कोनीय अंतर असलेल्या दोन रेडिओ उद्‌गमांचे विभेदन करता येईल. तसेच आकाशगंगेतील व आकाशगंगेच्या बाहेरील रेडिओ उद्‌गमांचे नकाशे तयार करणे शक्य होईल. हा दूरदर्शक १९९२ मध्ये कार्यान्वित होईल, असा अंदाज आहे.

हवाई बेटांमधील मौना केआ शिखरापाशी ४,२०० मी. उंचीवर जेम्स क्लार्क मॅक्सवेल नावाचा १ मिमी. पेक्षा कमी तरंगलांबीचा उपयोग करणारा रेडिओ दूरदर्शक उभारण्यात आलेला आहे. या दूरदर्शकाचा अन्वस्तीय आकाशक २७६ ॲल्युमिनियम तक्त्यांचा बनविलेला असून अन्वस्तीय पृष्ठभागाची अचूकता ५० मायक्रॉन ( १ मायक्रॉन =१०–६ मी.) इतकी राहील अशा प्रकारे त्यांची रचना केलेली आहे. या दूरदर्शकाच्या साहाय्याने वायुमेघांचा वेग किलोमीटरचा काही अंश प्रती सेकंद इतका अचूक मोजता येईल, तसेच मृग नक्षत्रातील अभ्रिकेइतक्या अंतरावरील एक प्रकाश-महिन्याइतक्या लहान रेडिओ उद्‌गमांचे विभेदन करणे शक्य होईल. हा दूरदर्शक एडिंबरो येथील   रॉयल ऑव्झव्हॅटरीतर्फे चालविला जाणार आहे.

कोष्टक क्र. १. जगातील फिरत्या थाळीचे महत्त्वाचे रेडिओ दूरदर्शक. 

संस्था 

स्थान 

आकाशकाचा व्यास(मीटर) 

नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी* 

ग्रीन बँक, वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिका 

४३ 

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी            

बिग पाइन, कॅलिफोर्निया, अमेरिका 

४० 

हेस्टॅक ऑब्झर्व्हेटरी 

वेस्टफर्ड, मॅसॅचूसेट्स, अमेरिका 

३७ 

वेल टेलिफोन लॅबोरेटरी 

होल्मडेल, अमेरिका 

३०·५ 

क्रिमियन ॲस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरी 

क्रिमिया, रशिया 

२२ 

ओन्साला लॅबोरेटरी 

गॉथनबर्ग, स्वीडन 

२० 

नॅशनल रेडिओ ॲस्ट्रोनॉमी ऑब्झर्व्हेटरी 

किटपीक, अँरिझोना, अमेरिका 

११ 

स्थिर थाळी, फिरता ग्राही 

  

  

नॅशनल ॲस्ट्रोनॉमी अँड आयॉनोरिफअर सेंटर (कॉर्नेल विद्यापीठाच्या द्वारे कार्यान्वित). 

आरेसीबो, प्वेर्त रीको 

३०५ 

*हा रेडिओ दूरदर्शक १५ नोव्हेंबर १९८८ रोजी पूर्णपणे कोसळला.


कोष्टक क्र. २. द्वारक संश्लेषण योजना रेडिओ दूरदर्शक 

संस्था/योजना 

स्थान 

वर्णन 

नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी 

(व्हेरी लार्ज अरे). 

सकॉरो, न्यू मेक्सिको, अमेरिका 

२५ मी. व्यासाच्या २७ थाळ्या, २१ किमी.वर हालतात (विभेदन ०·१ सेकंद)

रटान-६००

झेलेन-चुक्सकाया, रशिया

आकाशक१०×१८८५

मुलार्ड रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी, केंब्रिज विद्यापीठ

लॉर्डसब्रिज, केंब्रिजशर, इंग्लंड

८ थाळ्या, पायारेषा ५ किमी. (विभेदन ०·५ सेकंद)

नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी

ग्रीनबँक, वेस्ट व्हर्जिनिया. अमेरिका 

२६ मी. व्यासाच्या

३ थाळ्या

व्हेस्टरबॉर्क रेडिओ ऑब्झर्व्हेटरी

व्हेस्टरबॉर्क, नेदरर्लंडस

२५ मी. व्यासाच्या १२ थाळ्या, पायारेषा १·६ किमी. (विभेदन १ सेकंद)

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ                                फंडामेटल रिसर्च

ऊटकमंड, भारत

आकाशक

५३० मी. × ३० मी., पायारेषा ४ किमी.

(चित्रपत्रे ४०, ४० अ, ४० आ).

पहा : रेडिओ ज्योतिषशास्त्र.

संदर्भ : 1. Basov, N. G. Ed. Trans. Oldham, E. V. Radio, Submillimeter and X-ray Telescopes, New York, 1976.

   2. Hey, J. S. The Evolution of Radio Astronomy, New York, 1975.

   3. Hey, J. S. The Radio Universe, Oxford, 1974.

  4. Krauss, J. D. Radio Astronomy, New York, 1966.

  5. Smith, F. G. Radio Astronomy, Drayton, 1974.

  6. Steinberg, J. N. Lequeux, J. Trans. Bracewell, R. N. Radio Astronomy, New York, 1963.

  7. Verschuur, G. L. The Invisible Uni verse, New York, 1974.

                                                शिर्के, जे. एस्. चिपळोणकर, व. त्रिं.


 हवाई बेटांतील मौना केआ शिखरावरील १ मिमी. पेक्षा कमी तरंगलांबीचा उपयोग करणारा जेम्स क्लार्क मॅक्सवेल रेडिओ दूरदर्शकप. जर्मनीतील एफेल्सबर्ग येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीचा १०० मी. व्यासाचा रेडिओ दूरदर्शकआरेसीबो प्वेर्त रीको येथील स्थिर थाळी व फिरता ग्राही प्रकारचा ३५० मी. व्यासाचा रेडिओ दूरदर्शक.आरेसीबो, दूरदर्शकातील परावर्तक थाळीच्या वर सु. १५० मी. असलेला ग्राहीचा फलाट.


 ग्राहीच्या फलाटाकडे जाण्याचा मार्गॲल्युमिनियमाच्या ३८,७७८ तक्त्यांनी बनलेल्या परावर्तक थाळीचा काही भाग पांढरे चौकोन लेसर किरणांनी थाळीच्या भूमितीय आकाराची पाहणी करण्यासाठी ठेवलेले आहेत.जॉड्रेल बँक, इंग्लंड येथील ७६ मी. व्यासाचा रेडिओ दूरदर्शकपार्क्स, न्यू साउथ वेल्स (ऑस्ट्रेलिया) येथील ६४ मी. व्यासाचा व त्याच्याबरोबर वापरता येणारा, तसेच रुळांवरून हलविता येणारा १८.३ मी. व्यासाचा रेडिओ दूरदर्शक.

सिडनी, ऑस्ट्रेलिया येथील १.५ कि.मी. पेक्षा जास्त भुजा असलेला व्यतिकरणमापक रेडिओ दूरदर्शक (मिल्स क्रॉस).

ऊटकमंड येथील ५३० मी. लांबीचा व २४ चौकटींचा रेडिओ दूरदर्शकऊटकमंड येथील पश्चिम क्षितिजाकडे रोखलेला रेडिओ दूरदर्शकऊटकमंड येथील रेडिओ दूरदर्शकातील परावर्तक पृष्ठभाग तयार करण्याकरिता अगंज पोलादाच्या बारीक तारा वापरलेल्या असून त्यांवरून सूर्यप्रकाश परावर्तित होताना दिसत आहे