रूझवेल्ट, थीओडर : (२७ ऑक्टोबर १८५८−६ जानेवारी १९१९). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा सव्वीसावा राष्ट्राध्यक्ष आणि शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी (१९०६). न्यूयॉर्क शहरात त्याचा सधन कुटुंबात जन्म झाला. लहानपणी दमा आणि अशक्तपणा यामुंळे त्रस्त्र झालेल्या थीओडरला घरीच धडे दिले आणि खाजगी रीत्या त्याचे शालेय शिक्षण पार पडले. अठराव्या वर्षी तो हार्व्हर्ड विद्यापीठात दाखल झाला आणि पदवी घेतली (१८८०). चरितार्थासाठी काही करण्याची काळजी त्याच्या मागे नव्हती, तरीहि त्याचे कायद्याची पदवी घेतली (१८८१). शिक्षणाबरोबरच वडिलांनी त्याच्या व्यायाम व खेळाची काळजी घेतली चेस्टनट हिल्स येथील एलिस ली या मुलीशी विवाह केला (१८७९). १८८१ मध्ये न्यूयॉर्क राज्य प्रतिनिधीसभेवर तो प्रथम निवडून आला. आई आणि पत्नी मृत्यू पावल्यानंतर (१८८४) काही काळ तो विजनवासी झाला. १८८६ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण एडिथ कॅरो हिच्याशी त्याचे दुसरा विवाह केला. त्यांना तीन मुलगे आणि दोन मुली झाल्या. एडिथचा त्याच्या एकूण जीवनावर फार प्रभाव होतो. १८८९ मध्ये अमेरिकेच्या लोकसेवा आयोगावर सदस्य म्हणून त्याची नेमणूक झाली. या पदाचा १८९५ मध्ये त्याचे राजीनामा दिला आणि न्यूयॉर्क सिटी पोलिस बोर्डाचे अध्यक्षपद त्याच्याकडे आले. पुन्हा १८९७ मध्ये त्याचे राजीनामा देऊन आरमाराचे उपचिटणीस पद स्वीकारले. १८९८ मध्ये स्पॅनिश-अमेरिकन युद्धात रफ-रायडर्स या लष्करी संघटनेचे त्याने नेतृत्त्व केले. १९०० मध्ये अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तो निवडून आला. पुढील वर्षी राष्ट्राध्यक्ष मॅकिन्ली याचा खून झाल्यामुळे त्याने राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. पुढे राष्ट्राध्यक्ष म्हणून तो निवडून आला. (१९०४). राष्ट्राध्यक्षीय कारकीर्दीत त्याने अनेक उपयुक्त कायदे करून अमेरिकेची जागतिक प्रतिष्ठा वाढविली आणि अंतर्गत राजकारणात काही मौलिक सुधारणा करूण प्रशासन कार्यक्षम केले. याशिवाय त्याने मध्यस्थी करून रशिया-जपानमधील तेढ कमी केली आणि दोघांतील युद्ध थांबविण्याच्या कामी पुढाकार घेतला (१९०५). त्यासाठी आवश्यक ते करार घडवून आणले आणि शांतता प्रस्थापित केली. त्याबद्दल शांततेचे नोबेल पारितोषिक त्यास देण्यात आले (१९०६). आफ्रिका आणि युरोपचा त्याने प्रवास केला. १९१२ मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला तो उभा राहिला, परंतु पराभूत झाला.
राष्ट्राध्यक्ष म्हणून आपण सर्व वर्गांचे प्रतिनिधी आहोत, या धारणेने त्याने ‘स्क्वेर डील’ हा कार्यक्रम आखला आणि राष्ट्राध्यक्षाचे अधिकार विस्तृत करण्याचे काम अंगीकारले. यामुळे सार्वजनिक उद्योगांवरही काही प्रमाणात मर्यादा पडल्या. नैसर्गिक संपत्तीचे रक्षण आणि लोककल्याणकारी योजना यांचा त्याने पाया घातला. राष्ट्राध्यक्षपदाच्या अयशस्वी निवडणुकीनंतर (१९१२) तो सक्रिय राजकारणापासून जवळजवळ अलिप्त राहिला. अल्पशा आजारानंतर तो न्यूयॉर्क येथे मरण पावला.
संदर्भ : 1. Harbaugh, William, The Life and Times of Theodore Roosevelt, Oxford, 1975.
2. Mark, Frederick, Velvet on Iron : The Diplomacy of Theodore Roosevelt, Lincoln. 1979.
साखळकर, एकनाथ
“