रूटाइल : खनिज, स्फटिक चतुष्कोणीय, प्रचिनाकार व प्रचिनांवर उभ्या रेखा स्तंभाकार किंवा क्वचित सुईसारखे स्फटिक , यमल (जुळे स्फटिक) पुष्कळ. यमलनपृष्ठ (010) यमल साधे, संस्पर्शी व कोपराच्या आकाराचे किंवा पुनरावृत्त आठापर्यंत घटक असलेले व एका पातळीत कडे झालेले. क्वचित यमलनपृष्ठ (301) व बाणाच्या डोक्याच्या आकाराचे संस्पर्शी यमल [⟶ स्फटिकविज्ञान]. पाटन : (101) व (110) स्पष्ट, (111) अस्पष्ट. ठिसूळ. भंजन खडबडीत किंवा किंचित शंखाभ. कठिणता ६−६·५. वि. गु. ४·१८−५·२. चमक जवळजवळ हिऱ्यासारखी, रंग सामान्यतः तपकिरी तांबडा, क्वचित पिवळसर, निळसर, जांभळट व काळसर, क्वचित गवती हिरवा. कस फिकट तपकिरी पारदर्शक ते अपारदर्शक ते अपारदर्शक. पारदर्शक प्रकारात झळाळी व तेजस्विता आढळते [⟶ खनिजविज्ञान]. अम्लात विरघळत नाही. रा, सं. TiO2. यात १० टक्यांपर्यंत लोखंड असू शकते व त्यामुळे वि. गु. ५·५ पर्यंत वाढते. कधीकधी थोडे निओबयम व टँटॅलम पण त्यात आढळते. याच संघटनाची पण भिन्न स्फटिकरचनेची ⇨बुकाइट ⇨ॲनॅटेज ही याची नैसर्गिक समरूपे याच्यापेक्षा कमी स्थिर आहेत.
ग्रॅनाइट, पेग्माइट, पट्टिताश्म, सुभाजा, सायेनाइट, डायोराइट, स्फटिकी चुनखडक, अँफिबोलाइट इ. खडकांत हे गौण खनिज म्हणून आढळते. समुद्रकिनाऱ्यावरील (उदा., भारत, ऑस्ट्रेलिया, फ्लॉरिडा) तसेच जलोढीय वाळूच्या प्लेसर निक्षेपांत (साठ्यांत) हे अवशिष्ट कणांच्या रूपात आढळते. तसेच मृत्तिका, शेल, पाटीचा दगड इत्यादींत रूटाइलाचे सुईसारखे स्फटिक आढळतात. ऑस्ट्रेलिया हा रूटाइलाचा प्रमुख उत्पादक देश असून त्याशिवाय ब्राझील, श्रीलंका, स्वित्झर्लंड, नॉर्वे, इटली, कॅमेरून इ. देशांतही हे आढळते. नॉर्वेत ॲपेटाइटयुक्त शिरांत आढळणाऱ्या, रूटाइलाचे खाणकाम करण्यात येते. भारतात समुद्रकिनाऱ्यापवरील वाळूत हे मुख्यतः आढळते. या वाळूतून ⇨इल्मेनाइट काढून घेताना हे वेगळे होते. केरळ किनाऱ्यावरील वाळूत याचे प्रमाण २·३ टक्के तर तमिळनाडू १·६ टक्के एवढे आढळते. यांशिवाय हे ओरिसा, महाराष्ट्र (सिंधुदुर्ग व रत्नागिरी), बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान व प. बंगाल येथे थोड्या प्रमाणात आढळते. भारतात रूटाइलाची आयात मुख्यत्वे ऑस्ट्रेलियातून करण्यात येते.
ब्राझील व मादागास्कर येथे क्वॉर्ट्झाच्या स्फटिकांत रूटाइलाचे लांब, नाजुक, दुधी काचेसारखे पारभासी सूक्ष्म स्फटिक समाविष्टांच्या रूपात आढळतात. अशा क्वार्ट्झ खनिजाला रूटाइलयुक्त क्वॉर्टझ किंवा व्हीनसेन हेअरस्टोन असे म्हणतात. रूटाइलाच्या सूक्ष्म स्फटिकांची व्यवस्थित अंतर्गत मांडणी झाल्याने फ्लोगोपाइप, माणिक व नील या खनिजांचे तारांकित प्रकार झालेले असतात. क्वॉर्ट्झामधील आंतरवृद्ध रूटाइल स्फटिकांच्या जाळ्यासारख्या समूहाला सेजिनाइट असे म्हणतात.
रूटाइल पुरेशा प्रमाणात असल्यास ते टिटॅनियमाचे धातुक (कच्ची धातू) म्हणून उपयुक्त ठरते. टिटॅनियमाची संयुगेही तयार करतात. काच, पोर्सलीन, विशिष्ट पोलादे, तांब्याच्या मिश्रधातू, पांढरे रंगलेप, एनॅमल, फरश्या, प्लॅस्टिके, कागद, शाई, काही सौंदर्यप्रसाधने वगैरेंमध्ये रंगदायी द्रव्य वा रंगद्रव्य म्हणून रूटाइलाचा वापर करण्यात येतो. वितळजोडकामाच्या गजांवर लेप देण्यासाठीही हे वापरतात. लोखंड वा पोलादातील ऑक्सिजन व नायट्रोजन काढून टाकण्यासाठी लागणारे फेरोटिटॅनियम व पांढरा धूर निर्मिणाऱ्या द्रव्यांसाठी लागणारे टिटॅनियम टेटॅनियम टेट्राक्लोराइड यापासून बनवितात. रूटाइलयुक्त कॉर्टझ शोभिवंत दगड म्हणून वापरतात.
रूटाइल कृत्रिम रीतीनेही तयार करतात. ते नैसर्गिक रूटाइलापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे असून त्याचा रत्न म्हणून उपयोग करतात मात्र रत्न म्हणून त्याची कठिनता पुरेशी जास्त नाही. यात विविध धातूंची ऑक्साइडे मिसळून विविध रंगांची संश्लेषित रत्ने तयार करतात.
रूटाइलातून पलीकडे जाणारा प्रकाश गडद तांबडा दिसतो म्हणून तांबडा या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून याचे रूटाइल हे नाव पडले आहे.
पहा : टिटॅनियम.
ठाकूर, अ. ना.
“