रुद्रभट्ट : (सु. बारावे शतक). एक कन्नड स्मार्त ब्राह्मण कवी. होयसळ वंशातील राजा वीर बल्लाळच्या (कार. ११७२−१२९९) चंद्रमौळी नावाच्या मंत्र्याचा हा आश्रित असावा. याने जगन्नाथ विजय (११८०) नावाचे चंपूकाव्य रचले. विष्णुपुराण, महाभारत व भागवत या ग्रंथांतील कृष्णजन्म ते बाणासुरवधापर्यंतची कथा १८ भागांत वर्णिली आहे. कन्नडमध्ये चंपूकाव्य रचण्याचा पहिला मान रुद्रभट्टाचा असून आपल्या काव्याचा उद्देश स्पष्ट करताना सुरुवातीलाच त्याने म्हटले आहे, की ‘परंज्योती मुकुंदाला हृद्यात स्थापन करून त्याच्या निर्मल तत्त्वाचा बोध घेण्यासाठीच हे काव्य रचायला मी तयार झालो.’
भक्ती हीच सर्व ज्ञानाचे मूलतत्त्व आहे, ही भागवत धर्माची दृष्टी येथे आढळते. संस्कृतप्रचुर भाषा, असाधारण काव्यशक्ती, चमत्कृतिपूर्ण आलंकारिक शैली यांच्या साहाय्याने रुद्रभट्टाने कृष्णभक्तीचा महिमा मोठ्या भावुकतेने यात वर्णिला आहे. प्रा. मुगळींच्या मते तो हरिहरांत भेद मानीत नव्हता. रुद्रभट्टाची विशाल दृष्टी, उन्नत आदर्श आणि उपनिषदांतील तत्त्वज्ञानाचा त्याने केलेला स्वीकार यांचा प्रत्यय या चंपूकाव्यात येतो.
मळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)