रीतिरिवाज : (मॅनर्स). दैनंदिन व्यवहारातील अनेक लहानसहान प्रसंगात त्या त्या प्रसंगी संबंधित स्त्री-पुरुषांचे एकमेकांशी अगर इतरांशी वर्तन कसे असावे, कपडे कोणत्या प्रकारचे घालावेत, प्रसंग साजरा करीत असताना त्यातील घटनांचा क्रम कोणता असावा, इत्यादीसंबंधी काही अधिमान्य प्रकार प्रत्येक समाजामध्ये प्रचलित असतात, त्यांनाच रीतिरिवाज असे म्हटले जाते. रीतिरिवाज हे समाजातील सर्वच गट आणि समूह यांना सारखेच असतात असे नाही. मानववंश, धर्म, भाषा, प्रादेशिक पार्श्वभूमी, सामाजिक स्तर आणि राजकीय-शासकीय सीमा यांमुळे अलग पडलेल्या अगर वेगळ्या वाटणाऱ्या समूहांपुरते ते मर्यादित असतात. या भिन्नभिन्न समूहांमध्ये ज्या प्रमाणात सांस्कतिक सात्मीकरण साधले गेले असेल, त्या प्रमाणात रीतीरिवाजामध्ये सारखेपणा दिसून येणे शक्य आहे. रीतीरिवाजांची निर्मिती संस्कृतीप्रमाणेच होते कारण रीतीरिवाजांचे स्वरूप सांस्कृतिकच आहे. साहजिक मानव वंश, धर्म, प्रादेशिक पार्श्वभूमी, भाषा इ. कारणांनी अलग पडणाऱ्या समूहांची भिन्न असते. त्या त्या समूहामध्ये रूढ असलेले रीतिरिवाज पाळणे हे सभ्यतेचे लक्षण समजले जाते. काही गट व्यावसायिक पारंपारिकतेमुळेही अलग पडतात. त्यामुळे त्यांची दैनंदिन संस्कृती आणि त्यातले रीतिरिवाजही विभिन्न असण्याची शक्यता असते.
रीतिरिवाज या संकल्पनेचा आशय ‘परंपरा’, ‘रूढी’, ‘शिष्टाचार’, ‘लोकाचार’ या संकल्पनांहून भिन्न आहे. मागील एक वा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली एखादी महत्त्वाची गोष्ट परंपरा म्हणून गणली जाते. ती केवळ वर्तनाचीच असते असे नव्हे तर ती व्यवसायाची, एखाद्या समारंभात पार पाडावयाच्या भूमिकेची, तसेच वहिवाटीचे संबंध म्हणून इतर व्यावसायिक आणि गिऱ्हाईक यांच्याशी असलेल्या देवाणघेवाणीच्या संबंधांची सुद्धा असू शकते. रीतिरिवाज हे यांतील बारीकसारीक तपशीलांशी निगडित असतात. परंपरा ही वहिवाटीने सांस्कृतिक बाबी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आहे.
परंपरेच्या आशयाला रूढी असे म्हटले जाते. रूढीमध्ये परंपरेने आलेल्या गोष्टींचा समावेश असतो. म्हणून सामाजिक चालीरीतींमध्ये रूढी खोलवर रूजलेल्या असतेत. रीतिरिवाज त्यामानाने परिवर्तनीय असतात. व्यवसायपरत्वे, प्रदेशपरत्वे, संस्कृतिपरत्वे रीतिरिवाज हे वेगवेगळे असतात. यावरून शिष्टजलांच्या रितीरिवाजांना शिष्टाचार आणि सामान्यजनांच्या रीतिरिवाजांना लोकचार असे म्हटले जाते.
रितीरिवाजांना धार्मिक अधिष्ठान असतेच असे नाही. परंतु परंपरेने ते विशिष्ट गट-समूहांमध्ये पाळले जात असल्यामुळे त्यांना नैतिक अधिष्ठान लाभणे स्वाभाविक आहे. रितीरिवाजांना परंपरा असली, विशिष्ट संदर्भात त्यांची उपयुक्तता असली, तरी रूढीइतके ते स्थितिशील अगर अविचल नसतात. समाजामध्ये त्यांचे स्थान काहीसे ⇨फॅशनप्रमाणे असते. पाश्चिमात्य समाजात स्त्रियांचे स्वागत करण्याची पद्घत, अभ्यागत म्हणून स्त्री-पुरुष दोघेही कुणाच्या घरी गेल्यास अगोदर प्रवेश स्त्रीने करावयाचा, जेवणाच्या मेजावरती पाळावयाचे नियम, पदपथावरून पती-पत्नी अगर स्त्री-पुरूष दोघेही जात असताना पुरूषाने रस्त्याच्या बाजूने आणि स्त्रीने आतल्या बाजूने चालावयाची प्रथा इ. प्रकार रीतिरिवाजामध्ये मोडतात. भारतातही जेवणाच्या पंगतीत काही नियम पाळले जातात. अभ्यागतांशी, व्याहीमंडळींशी, घरातील व्यक्तींशी कसे वागावयाचे यासंबंधी रीतिरिवाजही पहावयास मिळतात. भारतीय समाज जातिजमाती मध्ये विभागला गेला असल्यामुळे प्रसंगानुरूप जाति-जातीचे रीतिरिवाज वेगळेच असल्याचे दिसून येते. यांवरून रीतिरिवाज हे शिष्टाचाराप्रमाणे उच्च वर्गापुरते मर्यादित नसतात हे स्पष्ट होते. परंतु रीतिरिवाज हे फॅशनप्रमाणे अनुकरणीय असतात, हेही तितकेच खरे. समाजात अनुकरणाचा प्रवाह नेहमी उच्च स्तरावरून खालच्या स्तराकडे, प्रौढांकडून युवकांकडे आणि नागरी समाजाकडून ग्रामीण समाजाकडे वाहतो. अमेरिकी वसाहतीच्या प्रारंभीच्या काळात रीतिरिवाजांच्या बाबतीत तिथले लोक फ्रेंच समाजाचे अनुकरण करीत असत असा इतिहास आहे. भारतातही उच्च जातीयांचे अनुकरण खालच्या स्तरावरील जाती करीत असत आणि कालांतराने उच्च दर्जा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असत, असेही भारतीय समाजाच्या अभ्यासकांनी म्हटले आहे. एखाद्या उच्च स्तरावरील जातीच्या तुलनेत आत्मनिरीक्षण करून स्वतःचे रीतिरिवाज क्रमाने टाकून देऊन त्या उच्च जातीचे रीतिरिवाज स्वीकारण्याच्या या प्रक्रियेला संस्कृतीकरण असे समाजशास्त्रज्ञांनी संबोधिले आहे. यांवरून रीतिरिवाज हे रूढीच्या तुलनेने परिवर्तनशील असतात हे स्पष्ट आहे.
रीतिरिवाजांना धर्माचे अधिष्ठान मुळीच नसते अगर आवश्यक नसते, ते परिपर्तनशील आणि अनुकरणीय असतात म्हणून सामाजिक वर्गावर्गातील अंतर कमी होण्यास मदत होते. परंतु उच्च स्तरावरील लोकांच्या काही रीतिरिवाजांना आर्थिक सुबत्तेची आवश्यकता असते आणि या सुबत्तेशिवाय त्यांच्या रीतिरिवाजांचे अनुकरण करणे दुरापास्त होऊन बसते. त्यामुळे खालच्या वर्गामध्ये असंतोषही पसरू शकतो.
पहा : रूढि लोकाचार शिष्टाचार.
कुलकर्णी, मा. गु.