रिष्टसमुच्चय : दिगंबर जैन आचार्च ⇨दुर्गदेव (अकरावे शतक) ह्याने मरणकरंडिका नामक एका परंपरागत ग्रंथाच्या आधारे मृत्युसूचक अपशकुन, स्वप्ने इ. अरिष्टांचे विवेचन करण्यासाठी जैन शौरसेनीत लिहिलेल्या ग्रंथ. ह्याची रचना १०३२ मध्ये कुंभेरगढ (भरतपूर) येथे झाली. ह्या ग्रंथात एकूण २६१ गाता आहेत.
दुर्गदेशाने अरिष्ठांचे तीन प्रकार सांगितले आहेत : पिडस्थ, पदस्थ आणि रूपस्थ. बोटे तुटणे, अश्रुधारा सातत्याने वाहणे, शरीर फिकट होणे ह्यांसारखी अरिष्टे पिंडस्थ होत. पदस्थ अरिष्टांत सूर्यचंद्रांची वा दीपज्योतीची विविध रूपे दिसणे, दिवस रात्रीप्रमाणे किंवा रात्र दिवसाप्रमाणे भासणे इत्यादींचा समावेश होतो. आपली सावली आपल्याला न दिसणे तसेच अर्धीच सावली वा दोन सावल्या दिसणे ही रुपस्थ अरिष्टांची उदाहरणे.
अरिष्टांनंतर स्वप्नांचे वर्णन येते. स्वप्ने दोन प्रकारची : देवेंद्रकथित आणि सहज, अंगुलिप्रश्न, अलक्तप्रश्न, गोरोचनाप्रश्न, प्रश्नाक्षरप्रश्न, शकुनप्रश्न, अक्षरप्रश्न, होराप्रश्न आणि ज्ञानप्रश्न अशा आठ प्रश्नरिष्टांचेही सविस्तर विवेचन ह्या ग्रंथात आहे.
ए. एस्. गोपाणी ह्यांनी हा ग्रंथ संपादिला आहे (१९४५).
तगारे, ग. वा.