रिचर्ड्सन, सॅम्युएल : (? १६८९−४ जुलै १७६१). आरंभीच्या इंग्रज कादंबरीकारांपैकी एक प्रभावी कादंबरीकार. डर्बीशरमधील मॅक्वर्थ येथे जन्मला. थोडेसे शिक्षण घेतल्यानंतर, लंडनमधील एक मुद्रक जॉन वाइल्ड ह्याच्या छापखान्यात तो उमेदवारी करू लागला. १७२१ मध्ये स्वतःचा छापखाना सुरू केला आणि यथावकाश यशस्वी मुद्रक म्हणून नावलौकिक मिळवला.
रिचर्ड्सनच्या कादंबरीलेखनाची सुरुवात अगदी अकल्पितपणे झाली. निरनिराळ्या विषयांवर आदर्श पत्रे लिहून त्यांचा संग्रह प्रसिद्ध करण्याची कल्पना दोन पुस्तकविक्रेत्यांनी त्याच्या समोर मांडली. त्या दृष्टीने काम करीत असताना पत्ररूप कादंबरी लिहिण्याची प्रेरणा त्याला मिळाली आणि पामेला ऑर व्हर्च्यू रिवाडेंड (१७४०) ही कादंबरी त्याने लिहिली.
पामेला ही एका तरुण उमरावाच्या घरात−‘स्क्वायर बी’ हे त्याचे नाव−त्याच्या आईची सेविका म्हणून काम करणारी एक तरुणी. हया उमरावाच्या आईचा मृत्यू झाल्यानंतरही ती त्या घरात काम करीत असते पण हा उमराव तिचा शीलभंग करण्याचा सतत प्रयत्न करतो. पामेला मात्र त्याला दाद देत नाही. तो तिच्यावर बलात्कार करण्याचाही प्रयत्न करतो पण संकटातून ती आपली सुटका करून घेते. आपले शील जपण्यासाठी पामेलाने केलेल्या प्रतिकारामुळे तो उमराव अखेरीस प्रभावीत होतो. त्याच्या मनात पामेलाविषयी प्रेम निर्माण होते. तो तिला लग्नाची रीतसर मागणी घालतो, तेव्हा पामेला त्याला होकार देते. त्यानंतर तिच्याशी लग्न करून हा उमराव एका सज्जनाचे जीवन जगू लागतो.
ह्या कादंबरीला इंग्लंडमध्ये नव्हे, तर इंग्लंडबाहेर मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. फ्रेंच झाली. फ्रेंच आणि डच ह्या भाषांत ती अनुवादिली गेली आहे. तथापि पामेलाच्या व्यक्तिरेखेतून रिचर्ड्सन ज्या प्रकारची नैतिक शिकवण देऊ पाहत होता, ती टीकाकारांच्या टीकेचे लक्ष्य बनली. त्यांना ही नायिका अत्यंत धूर्त आणि धोरणी वाटली. पैसा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी विवाहाची संधी हाताशी येईपर्यंत स्वतःच्या शीलाला जपणारी विवाहाची संधी हाताशी येईपर्यंत स्वतःच्या शीलाला जपणारी नायिका विख्यात इंग्रज कादंबरीकार ⇨हेन्री फील्डिंग ह्याला दांभिक वाटली आणि पामेला… चे उपरोधप्रचुर विडंबन करण्यासाठी त्याने आपली जोसेफ अँड्रूज (१७४२) ही पहिली कादंबरी लिहिली. पामेला इन हर एक्झाल्टेड कंडिशन (१७४१) हा पामेला … चा दुसरा भाग मात्र फारसा यशस्वी ठरला नाही.
क्लॅरिसा ऑर द हिस्टरी ऑफ ए यंग लेडी (क्लॅरिसा हार्लो ह्या नावानेही प्रसिद्ध. ७ खंड, १७४७-४८) ही रिचर्ड्सनची सर्वोत्कृष्ट कादंबरी. हीसुद्धा एक नायिकाप्रधान आणि पत्ररूप कादंबरी आहे. क्लॅरिसा हार्लो ही एक सुंदर आणि सदगुणी युवती. हार्लो कुटुंबीय तिचे लग्न एका श्रीमंत पण मूर्ख माणसाशी ठरवतात. संपत्तीच्या अभिलापेने तिचा भाऊ ह्या लग्नाबद्दल आग्रही असते. तिच्या वडिलांनी ह्या लग्नाचा प्रश्न स्वतःच्या प्रतिष्ठेचा बनविलेला असतो. तिची आई मनाने दुबळी असते आणि तीही कौटुंबिक दडपणाखाली क्लॅरिसाचे मन ह्या लग्नासाठी वळवीत राहते. हे लग्न टाळण्यासाठी क्लॅरिसा लव्हलेस नावाच्या एका उमरावाबरोबर पळून जाते. खलप्रवृत्तीचा हा उमराव मध्यमवर्गीय नीतिमूल्यांचा तिटकारा करीत असतो. ल्व्हलेसला क्लॅरिसाशी लग्न करायचेच नसते त्याला तिच्यावर पूर्ण काबू मिळवायचा असतो. ती पूर्णपणे आपल्यावर अवलंबून राहील अशी परिस्थिती तो निर्मिती करतो आणि तिचा शीलभंगही करतो. नंतर पश्चात्ताप होऊन तो तिच्याशी लग्न करू पाहतो पण क्लॅरिसा त्याला नाकारते. तिला त्याच्याविषयी आता पूर्ण तिटकारा वाटत असतो. शीलभंग झाल्यामुळे तिचे आप्तस्नेही एक चारित्र्यशून्य स्त्री म्हणून तिच्याकडे पाहू लागतात. तथापि हळूहळू वस्तुस्थिती काय, ते सर्वांना कळते. आपल्या नीतिमूल्याबंद्दल कसलीही तडजोड न करणारी क्लॅरिसा मरण पावते, ती सर्वांवर नैतिक विजय मिळवून. वासना आणि नैतिकता ह्यांच्यातील संघर्षाचे प्रत्ययकारी परिणाम ह्या कादंबरीला मिळालेला आहे. ह्या कादंबरीलाही मोठी ख्याती मिळाली. द हिस्टरी ऑफ चार्ल्स ग्रँडिसन (१९५४) ही त्याची कादंबरी मात्र फारशी यशस्वी ठरली नाही.
रिचर्ड्सनच्या सर्व कादंबऱ्या पत्ररूप आहेत. त्याच्या काळातील मध्यमवर्गीय नैतिक मूल्यांचा पुरस्कार त्यांतून आढळतो. कादंबरीतील नैतिक संघर्ष परिणामकारकपणे उभा करण्याच्या दृष्टीने त्याने निवडलेले पत्रांचे माध्यम त्याला फार अनुकूल ठरले. पत्रांतून कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या भावभावनांची सूक्ष्म आंदोलने त्याला टिपता आली. नाटकांत स्वगतांचा किंवा काही आधुनिक कादंबऱ्यांतून आढळणाऱ्या संज्ञाप्रवाहतंत्राचा जो हेतू, तो ह्या पत्रांच्या माध्यमामुळे काही मर्यादेपर्यंत साधला गेला. वाचकांना व्यक्तिरेखांच्या अंतरंगात थेट घेऊन जाण्याचे कार्य ह्या पत्रांनी केले.
अठराव्या शतकाच्या अखेरीस रिचर्ड्सनची कीर्ती ओसरू लागली. तथापि त्याने पामेला … आणि क्लॅरिसा … ह्या कादंबऱ्यांतून केलेल्या मार्मिक मानसचित्रणाची दखल विसाव्या शतकात, समीक्षकांकडून घेतली गेली आहे.
लंडन येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Doody, Margaret A. A Natural Passion : A Study of the Novels of Samuel Richardson, Oxford, 1974.
2. Eaves, Thomas C. Kimpel, Ben D. Samuel Richardson, Oxford, 1971.
3. McKillop, Alan D. Samuel Richardson : Printer and Novelist, Chapel Hill (N. C.) 1936.
4. Watt, Ian P. The Rise of the Novel : Studies in Defoe, Richardson and Fielding, Berkeley, 1957.
कळमकर, य. शं.