रिचर्ड्‌स, आयव्ह्‌र आर्मस्ट्राँग : (२६ फेब्रुवारी १८९३−७ सप्टेंबर १९७९). इंग्रजी समीक्षक, कवी आणि अध्यापक. आय्. ए. रिचर्ड्‌स ह्या नावाने विख्यात. इंग्लंडमधील सँडवॅक येथे जन्मला ब्रिस्टल येथील क्लिफ्टन कॉलेज आणि केंब्रिजमधील मॉड्‌लिन कॉलेज येथे त्याचे शिक्षण झाले. १९१५ मध्ये त्याने बी. ए. ची पदवी घेतली. तेथेच त्याने १९२२ ते १९२९ पर्यंत इंग्रजीचे अध्यापन केले. १९३० साली बीजिंग येथील त्सिंग हुआ विद्यापीठात आणि १९३१ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्याने काम केले. तेथे १९३९−४४ या कालखंडात इंग्रजी भाषेसाठी नेमलेल्या मंडळाचा तो संचालक होता आणि १९४४−६३ या काळात इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून त्याने काम केले.

मॉड्‌लिन येथील महाविद्यालयात असताना त्याने फाउंडेशन ऑफ ईस्थेटिक्स (१९२१), द मीनिंग ऑफ मीनिंग (१९२३) आणि द प्रिन्सिपल्स ऑफ लिटररी क्रिटिसिझम (१९२४) हे तीन महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. ह्यांपैकी पहिला सी. के. ऑग्‌डनहा इंग्रजी भाषाशास्त्रज्ञ व जेम्स वुड ह्यांच्या सहकार्याने आणि दुसरा सी. के. ऑग्डन सहकार्याने लिहिला आहे. प्रिन्सिपल्स ऑफ लिटररी क्रिटिसिझम हा त्याचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ. समीक्षेला एक नवी दिशा देणारा मौलिक ग्रंथ म्हणून तो नावाजला गेला. प्रॅक्टिकल क्रिटिसिझम (१९२९) हा त्याचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ. समीक्षक, तत्त्वज्ञ, अध्यापक, मानसशास्त्रज्ञ अशा कोणत्याही नात्याने ज्यांना समकालीन सांस्कृतिक रस असेल, त्यांच्यासाठी नव्या प्रकारच्या सूक्ष्म संदर्भाचा परिचय करून देणे कवितेबद्दल आपणासकाय वाटते, कविता आपणास का आवडते अथवा आवडत नाही, अशा प्रश्नांची उत्तरे ज्यांना शोधून काढावयाची असतील, त्यांना त्यासाठी नवीन तंत्र उपलब्ध करून देणे तसेच अधिक कार्यक्षम अशा शैक्षणिक पद्धतीची पायवाट तयार करणे असे हेतू प्रॅक्टिकल क्रिटिसिझम ह्या ग्रंथाच्या लेखनामागे होते.

प्रॅक्टिकल क्रिटिसिझम व द मीनिंग ऑफ मीनिंग ह्या दोन ग्रंथातील विवेचन पाहिले, तर रिचर्ड्‌स साहित्यकृतीच्या संहितेचे आणि शब्दांच्या विश्लेषणाचे वाटणारे महत्त्व स्पष्ट होते. भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे आणि भाषा शब्दांनी घडते. त्यामुळे साहित्यकृतीचा अर्थ समजून घ्यावयाचा असेल, तर शब्दांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो, असे रिचर्ड्‌सचे मत आहे. विसाव्या शतकात उदयास आलेल्या नवसमीक्षेच्या (द न्यू क्रिटिसिझम) एका महत्त्वाच्या भूमिकेशी ही भूमिका मिळतीजुळती आहे. किंबहूना टी. एस्. एलियटबरोबर रिचर्ड्‌स हाही नवसमीक्षेचा इंग्लंडमधील अग्रदूत मानला जातो. विशेषतः जॉन क्रो रॅनसम विल्यम एम्प्सन ह्यांसारखे नवसमीक्षक रिचर्ड्‌सच्या समीक्षेने प्रभावित झाले होते.

केंब्रिज येथील आपल्या विद्यार्थ्यांना रिचर्ड्‌सने काही कविता−कवींची नावे आणि इतर माहिती व देता−वाचावयास दिल्या आणि नंतर त्यांच्या प्रतिक्रियांचे विश्लेक्षण केले. प्रॅक्टिकल क्रिटिसिझम ह्या ग्रंथात ह्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया नोंदविलेल्या आहेत.

रिचर्ड्‌सला मानसशास्त्रातदेखील रस होता. विविध मानवी आवेगांना एका कलात्मक साकल्यात सुसूत्रतेने सहबद्ध करून कविता मानवी मनात भावनिक समतोल साधण्याचे कार्य करते, अशी त्याची धारणा होती.

ऑग्डनबरोबर काम करीत असताना रिचर्ड्‌स ⇨बेसिक इंग्लिशकडे आकृष्ट झाला. बेसिक इंग्लिश हे आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी इंग्रजी भाषेला देणयात आलेला एक सोपे रूप. इंग्रजी भाषेतील केवळ ८५० शब्दांत बेसिक इंग्लिशची उभारणी करण्यात आलेली आहे. रिचर्ड्‌सने प्लेटोच्या द रिपब्लिकचे बेसिक इंग्लिशमध्ये भाषांतर केले (१९४२). त्याचबरोबर त्याने बेसिक इंग्लिश अँड इटस युसिझ (१९४३) हे पुस्तकही लिहिले. रिचर्ड्‌स कवीही होता. त्याच्या कविता इन्टर्नल कॉलकीझ (१९७१) आणि न्यू अँड सिलक्टिड पोएम्स (१९७८) या दोन संग्रहांत संकलित करण्यात आल्या आहेत. सायन्स अँड पोएट्री (१९२६) हे त्याचे निबंध आणखी काही निबंधांची भर घालून पोएट्रीज अँड सायन्सेस ह्या बदललेल्या नावाने १९७० साली प्रसिद्ध करण्यात आले. ह्याचा मराठी अनुवाद रा. मि. जोशी ह्यांनी काव्ये आणि विज्ञाने ह्या नावाने केला आहे (१९७९). स्पेक्यूलेटिव्ह इन्स्टुमेंटस (१९५५), बियाँड (१९७४) आणि पोएट्रीज (१९७४) हेही त्याचे निबंधसंग्राह प्रसिद्ध झाले आहेत. कॉम्प्लिमेंटरीज (१९७६) मध्ये १९१९ ते १९७५ पर्यंतचे संग्रहित न झालेले निबंध अंतर्भूत करण्यात आले आहेत. यांखेरीज त्याची आणखी काही महत्त्वाची पुस्तके मेन्सिअस ऑन द माइंड (१९३१), कोलरिज ऑन इमॅजिनेशन (१९३४) आणिद फिलॉसफी ऑफ ऱ्हेटरिक (१९३६) ही आहेत.

इंग्लंडमधील केंब्रिज, केंब्रिजशर येथे तो निधन पावला.

कळमकर, य. शं.