रॉस, जेम्स क्लार्क : (१५ एप्रिल १८००−३ एप्रिल १८६२). ध्रुव प्रदेशांचा ब्रिटिश समन्वेषक व नौदल अधिकारी. जन्म लंडन येथे. याच्या वडिलांचे नाव जॉर्ज. आर्टिक प्रदेशाचा प्रसिद्ध समन्वेषक जॉन रॉस याचा हा पुतण्या वयाच्या बाराव्या वर्षीच शाही नौदलात भरती झाला. १८१८ मध्ये जॉन रॉसने काढलेल्या ‘नॉर्थवेस्ट पॅसेज’च्या शोधमोहिमेत त्याने भाग घेतला होता. पुढच्याच वर्षी विल्यम पॅरीने योजिलेल्या आर्टिक प्रदेशाच्या चार मोहिमांत (१८१९ ते १८२७) रॉसने भाग घेवून एस्किमोंच्या जीवनाचा खूप अभ्यास केला. या त्याच्या कर्तृत्वामुळे ८ नोव्हेंबर १८२७ रोजी त्याला ‘कमांडर’ म्हणून बढती मिळाली. १८२९−३३ या काळात त्याच्या चुलत्याने आखलेल्या याच प्रदेशाच्या मोहिमेत त्याने पुन्हा भाग घेऊन कॅनडातील बृथिया द्विपकल्पाचा अभ्यास केला व पृथ्वीवरील चुंबकीय उत्तर ध्रुव या द्विपकल्पावर असल्याचे दर्शविले (१८३१). सांप्रत हा ध्रुव येथून जवळच असलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स बेटावर निश्चित करण्यात आला आहे. त्याने यानंतर काही लहान मोहिमाही पूर्ण केल्या.
रॉस १८३९ च्या सुमारास टास्मानिया बेटावरील होबार्ट येथे असताना त्याने दक्षिणेकडील लांबचलांब किनारा असलेल्या बेटाविषयी (अंटार्क्टिका खंड) काही माहिती ऐकली होती. त्याच्या शोधासाठी रॉसने १८३९−४३ या काळात स्वतःच्या नेतृत्वाखाली ‘एरेबस’ व ‘टेरर’ या जहाजांतून मोठी मोहीम काढली. या मोहिमेत अंटार्क्टिका मधील चुंबकीय निरीक्षणे व त्यांच्या अभ्यास करणे हा महत्त्वाचा उद्देश होता. या मोहिमेत त्याने ज्या मार्गाने प्रवास केला, तो मार्ग विसाव्या शतकातील अंटार्क्टिका मोहिमांत दक्षिण ध्रुवावर जाण्याचा सर्वांत जवळचा ठरला. १८४१ मध्ये त्याने ज्या समुद्रातून अंटार्क्टिकावर प्रवेश केला, त्याला ⇨रॉस समुद्र असे नाव देण्यात आले. या मोहिमेत त्याने अंटार्क्टिकाचा शास्त्रीय द्दष्टिकोनातून अभ्यास केला व ७८० ९’ ३० दक्षिण अक्षांशापर्यंत संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेशातून प्रवास केला. त्याने या प्रदेशातील उंच भागाला (स. स. पासून सु. ४,०८४ मी.) व्हिक्टोरिया लँड व शिखरांना आपल्या जहांजाच्या नावावरून मौंट एरेबस (ज्वालामुखी शिखर ३,७३६ मी.) तसेच मौंट टेरर ही नावे दिली. दक्षिण ध्रुव व रॉस समुद्र यांदरम्यान बर्फाचा सु. ७० मी. उंचीची प्रचंड हिमतट असल्याने त्याने सिद्ध केले व त्याचा अभ्यास केला. हा भाग ‘रॉस आइस शेल्फ’ नावाचे प्रसिद्ध आहे. या हिमतटाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारा रॉस हा पहिला समन्वेषक ठरला. हिमतटामुळे मात्र त्याला दक्षिण ध्रुवाकडे जाण्याची योजना रद्द करावी लागली. १८४२ मध्ये रॉसने वेडेल उपसागरातून जास्तीत जास्त दक्षिणेत जाण्याचा प्रयत्न केला. या सफरीत त्याने अंटार्क्टिक द्वीपकल्पावरील ग्रॅहॅम्स लँडचे समन्वेषण केले. कडाक्याच्या थंडीचा काही काळ या काळात भागातील फॉकलंड राहून सप्टेंबर १८४८ मध्ये रॉस इंग्लंडला परतला.
या संशोधन कार्यामुळे रॉसला खूपच प्रतिष्ठा प्राप्त झाली. ब्रिटिश नौदलात त्याचा मान वाढला. लंडन व पॅरिस येथील भूगोलविषयक संस्थानी त्याला सुवर्णपदके बहाल केली. १८४४ मध्ये त्याला ‘सरदार’ हा किताब देण्यात आला. त्याने १८४७ मध्ये ए व्हॉयिज ऑफ डिस्कव्हरी अँड रिसर्च इन् द सदर्न अँड अंटार्क्टिक रीजन्स हे पुस्तक लिहिले. १८४८ मध्ये रॉयल सोसायटीचा एक सन्माननीय सभासद म्हणून त्याची निवड झाली. नॉर्थवेस्ट पॅसेजच्या शोधात १८४५ साली बेपत्ता झालेल्या सर जॉन फ्रँक्लिनच्या शोधासाठी रॉसने १८४८-४९ मध्ये पहिली मोहिम काढली, पण तीत त्याला अपयश आले. त्या काळात आर्क्टिक प्रदेशातील माहितीबाबत रॉसचे मत अधिकृत जाई. तो इंग्लंडमधील एल्झरी येथे निधन पावला.
चौंडे, म. ल.
“