सर हेन्‍री रॉलिन्सनरॉलिन्सन, सर हेन्‍री क्रेझिक : (११ एप्रिल १८१०−५ मार्च १८९५). ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ, प्राच्यविद्या पंडित आणि कुशल प्रशासक. त्याचा जन्म उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात चॅडलिंग्टन (ऑक्सफर्डशर) येथे झाला. त्याचे शिक्षण वॉरिंग्टन व एलिंग येथे झाले. त्यानंतर तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करी सेवेत एक सैनिक म्हणून रुजू झाला आणि भारतात मुंबई येथे आला (१८२७−३३). पुढे तो स्वकर्तृत्वाने मेजर झाला व त्याने इराण (१८३३−३९) आणि अफगाणिस्तान (१८३९−४२) येथे लष्करात विशेष नैपुण्य दाखविले. अफगाण युद्धात (१८४२) त्याने विशेष पराक्रम दाखवून नाव मिळवले. त्यामुळे त्याची तूर्की साम्राज्याखालील अरबस्तानात राजदूत (एजंट) म्हणून नियुक्ती झाली (१८४४). पुढे बगदादला त्याला कॉन्सल पदावर पदोन्नती निळाली. आपल्या या सेवाकालातच त्याने प्राच्यविद्यांना अभ्यास केला आणि प्राचीन वस्तूंचे विविध नमुने, विशेषतः मूर्ती जमविल्या. बेहिस्तून येथील पहिल्या डरायस द ग्रेटच्या त्रिलिपीतील शिलालेखाचे त्याने वाचन केले आणि प्रथमच क्यूनिफॉर्म लिपीच्या अक्षरवटिकेचा उलगडा केला (१८४६).

त्यांचे हे संशोधन पर्शियन क्यूनिफॉर्म इन्स्क्रिप्शन अँट बेहिस्तून (१८४६−५१) या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्यात शिलालेखाचे पूर्ण भाषांतर, व्याकरणविषयक विश्लेषण आणि टीपा आहेत. यामुळे इराणच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश पडला. पुढे त्याने इतर तज्ञांच्या सहकार्याने मेसोपोटेमियातील क्यूनिरफॉर्म लिपीतील लेख उजेडात आणले. त्याच्या संशोधनामुळे ॲसिरिया आणि बॅबिलन येथील उत्खनांना चालना मिळाली. ऑस्टेन हेनरी लेअर्डनंतर त्याची येथील उत्खननांवर प्रमुख म्हणूनही नियुक्ती झाली. त्याने १८५५ मध्ये स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली व तो इंग्लंडला परत आला. तो ब्रिटिश संसदेवर निवडून आला (१८५८−६३ व १८६७). त्याला इंडिया कौन्सिलचा सभासद करण्यात आले. पुढे १८९१ मध्ये त्याला सरदारकी देण्यात आली. तो रॉयल एशियाटिक सोसायटी (१८७८−८१) व रॉयल जिऑग्राफिकल सोसायटी (१८७१ व १८७४) या संशोधनात्मक संस्थांचा अध्यक्ष होता. या काळात त्याने अनेक अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक शोधनिबंध या संस्थांच्या नियतकालिकांतून प्रसिद्ध केले. याशिवाय त्याने ए कॉमेन्ट्री ऑन द क्यूनिफॉर्म इन्स्क्रिप्शन ऑफ बॅबिलोनिया अँड ॲसिरिया (१८५०) व आउटलाइन ऑफ द हिस्टरी ऑफ ॲसिरिया (१८५२) आणि इंग्लंड अँड रशिया इन द ईस्ट हे ग्रंथ लिहिले. त्याच्या लेखनात व्यापक माहिती, अचूक विश्लषण आणि इतिहासाचे ज्ञान दिसून येते. त्याची काही विधाने वादग्रस्त ठरली असली, तरी त्याचे संशोधन हे मूलगामी स्वरूपाचे व अजोडच म्हणावे लागेल. याशिवाय क्यूनिफॉर्म इन्स्किप्शन्स ऑफ वेस्टर्न एशिया (पाच खंड) या ग्रंथाचा तो सहलेखक आहे. जॉर्ज रॉलिन्सबरोबर त्याने हिस्टरी ऑफ हीरोडोटस (चार खंड) या ग्रंथाचे संपादन केले (१८५८-१८६०). तो लंडन येथे मरण पावला.

त्याने आपला वस्तुसंग्रह ब्रिटिश म्यूझियमला दिला. त्याचे चारित्र्य जॉर्ज रॉलिन्सनने लिहिले आहे. एफ्. जे. गोल्डस्मिथ आणि आर्. एन्. कस्ट यांनी रॉलिन्सनविषयक त्याच्या मृत्यूनंतर दोन विस्तृत चरित्रात्मक लेख अमुक्रमे जिऑग्राफिकल जर्नल (खंड ५) आणि ॲन्युअल रिपोर्ट ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी (१८९५) या नियतकालिकांतून प्रसिद्ध केले. ब्रिटानिका एन्सायक्लोपिडिया (९ वी आवृत्ती) यात त्याने काही नोंदी लिहिल्या आहेत.

संदर्भ : Lloyd, S. Foundations in the Dust, Oxford, 1955,

देशपांडे, सु. र.