रॉबिन्स, फ्रेड्रिक चॅपमन : (२५ ऑगस्ट १९१६−)अमेरिकन बालरोगतज्ञ व सूक्ष्मजीववैज्ञानिक. बालपक्षाघाताच्या (पोलिओच्या) व्हायरसांची विविध मानवी संवर्धित ऊतकांत (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या−पेशींच्या−समूहांत) वाढ करता येते हा शोध लावल्याबद्दल रॉबिन्स यांना ⇨जॉन फ्रँक्लिन एंडर्स आणि ⇨टॉमस हकल वेलर यांच्या समवेत १९५४ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले.
रॉबिन्स यांचा जन्म ऑबर्न (ॲलाबॅमा) येथे झाला. मिसूरी विद्यापीठाच्या ए. वी. (१९३६) व बी. एस्. (१९३८) आणि हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमधून एम्. डी. (१९४०) या पदव्या त्यांनी संपादन केल्या. १९४२ पर्यंत त्यांनी बॉस्टन येथील चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये सूक्ष्मजंतुविज्ञानाचे निवासी वैद्य म्हणून काम केले. त्यानंतर ते अमेरिकेच्या सेनादलात दाखल झाले. सेनादलाच्या पंधराव्या वैद्यकीय प्रयोगशाळेत त्यांनी व्हायरस व रिकेट्सियाजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून अमेरिका, उत्तर आफ्रिका व इटली येथे चार वर्षे काम केले. या काळात संसर्गजन्य यकृतशोथ (यकृताची दाहयुक्त सूज), प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर) व क्यू ज्वर [⟶ प्राणिजन्य मानवी रोग] यांवर संशोधन केले आणि त्याबरोबरच निदानात्मक व्हायरस प्रयोगशाळेची देखरेख केली.
त्यानंतर १९४६ मध्ये पुन्हा नागरी जीवन सुरू होताच बॉस्टन येथील चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटरमधील आपले प्रशिक्षण त्यांनी पुढे चालू ठेवून १९४८ मध्ये पूर्ण केले. १९५० पर्यंत त्याच संस्थेच्या संसर्गजन्य रोगांविषयीच्या संशोधन विभागात एंडर्स यांच्याबरोबर संशोधन करताना ते नॅशनल रिसर्च कौन्सिलचे व्हायरसजन्य रोग विषयाचे वरिष्ठ अधिछात्र होते. एंडर्स यांच्याबरोबर काम करीत असताना रॉबिन्स यांनी बालपक्षाघातास कारणीभूत असणाऱ्या व्हायरसाची संवर्धित ऊतकात वाढ करण्यासंबंधी व त्यातील तंत्राचा अन्यत्र उपयोग करण्यासंबंधी विशेष संशोधन केले. हा व्हायरस तंत्रिका (मज्जा) ऊतकाच्या बाहेर वाढू शकतो आणि वस्तुतः तो शरीराच्या तंत्रिकाबाह्य ऊतकात अस्तित्वात असतो व नंतर तो मेंदूच्या तळाकडील भागात व मेरुरज्जूच्या काही भागांत आक्रमण करतो, असे रॉबिन्स आणि त्यांच्या सहकऱ्यांनी प्रस्थापित केले. या संशोधनामुळे बालपक्षाघातावरील लस तयार करण्यास, प्रकृष्ट निदान पद्धती विकसित होण्यास व विविध नवीन व्हायरस अलग करण्यास मदत झाली. यांशिवाय रॉबिन्स यांनी गालगुंड, सामान्य परिसर्प [⟶परिसर्प] व गायींच्या देवी यांस कारणीभूत असलेल्या व्हायरसांची अभ्यास केला.
इ. स. १९५२ मध्ये हाव्हर्ड मेडिकल स्कूल, चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटर, बॉस्टन लाइंबा-इन हॉस्पिटल आणि मॅसॅचूसेट्स जनरल हॉस्पिटल येथे सहयोगी वैद्य, सहयोगी, संचालक, संशोधन अधिछात्र इ. विविध पदांवर त्यांच्या नेमणुका झाल्या. पुढे त्याच वर्षी ते क्लीव्हलँड (ओहायओ) येथील वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसन मध्ये बालरोगविज्ञानाचे प्राध्यापक आणि क्लीव्हलँड मेट्रोपॉलिटन जनरल हॉस्पिटलच्या बालरोगविज्ञान व संपर्कजन्य रोग विभागाचे संचालक झाले. १९६६ मध्ये ते केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे अधिष्ठाते व १९८० पासून गुणश्री अधिष्ठाते झाले.
नॅशनल ॲकेडेमी ऑफ सायन्सेस व अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी या संस्थांचे ते सदस्य असून वैद्यकीय शिक्षण, बालरोगविज्ञान, संपर्क व संसर्गजन्य रोग इत्यादींविषयक विविध समित्यांचे सदस्य, अध्यक्ष वा सल्लागार आहेत. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना जॉन कॅरोल, मिसूरी व न्यू मेक्सिको या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या, तसेच दुसऱ्या महायुद्धातील उल्लेखनीय सेवेबद्दल ब्राँझ स्टार (१९४५), मीड जॉन्सन पुरस्कार (१९५३) व मेडिकल म्युच्युअल ऑनर पुरस्कार (१९६९) हे बहुमान मिळाले. व्हायरस व रिकेट्सियाजन्य रोगांसंबंधीचे (विशेषतः भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील क्यू ज्वर व संवर्धित ऊतकांतील बालपक्षाघाताच्या व्हायरसांची वाढ यांसंबंधीचे) त्यांचे संशोधनपर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
भालेराव, य. त्र्यं.