रॉबिन्सन, एडविन अर्लिंग्टन : (२२ डिसेंबर १८६९−५ एप्रिल १९३५). अमेरिकन कवी. जन्म हेड टाइड, मेन येथे. त्याच्या जन्मानंतर लवकरच त्याचे कुटुंबीय हेड टाइड, मेनपासून काही अंतरावर असलेल्या गार्डनर ह्या गावी राहण्यास गेले. ‘टिलबरी टाउन’ ह्या नावाने हे गाव त्याच्या कवितांतून येते. प्रतिकूल आर्थिक स्थिती, अमली पदार्थांच्या आहारी गेलेला भाऊ, मृतात्मांशी संपर्क साधण्याचा छंद असणारे वडील अशा कारणांमुळे वैफल्यदायक झालेल्या कौटुंबिक वातावरणात तो वाढला. तो लहान असताना, बहुधा त्याच्या शिक्षकाने त्याच्या कानफटात मारल्यामुळे त्याचा एक कान अधू झाला होता आणि कर्णेंद्रियाच्या व्यवस्थेमुळे आपण वेडे होऊ, ह्या भीतीने त्याला जन्मभर पछाडलेले होते. त्याचा स्वभावही हळवा, दुबळा, एकलकोंडा झालेला होता. हाव्हर्ड येथे त्याने काही काळ शिक्षण घेतल्यानंतर (१८९१−९३) कुठे कुठे नोकऱ्या केल्या परंतु तो नेहमीच विपन्नावस्थेत असे. मित्र त्याला मदत करीत. अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट ह्यांनी न्यूयॉर्क येथील कस्टम कार्यालयात एक विनाश्रम पद देऊ करून त्याला काही साहाय्य केले होते. न्यूयॉर्क शहरी त्याचे निधन झाले.
द टॉरेंट अँड द नाइट बिफोर (१८९६) हा रॉबिन्सनचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे द चिल्ड्रन ऑफ द नाइट (१८९७), द टाउन डाउन द रिव्हर (१९१०), कॅप्टन क्रेग (१९१२), द मॅन अगेन्स्ट द स्काय (१९१६) ह्यांसारखे त्याचे काव्यग्रंथ प्रसिद्ध झाले. ‘टिलबरी टाउन’ मध्ये राहणाऱ्या आणि मनोगंड व नैराश्य ह्यांनी खचून गेलेल्या अनेक व्यक्तींचे सूक्ष्म चित्रण त्याने आपल्या कवितांतून केले आहे.
राजा आर्थरच्या जीवनावरील मर्लिन (१९१७), लान्सलट (१९२०) आणि ट्रिस्ट्रम (१९२७) ही त्याने लिहिलेली तीन खंडकाव्येही उल्लेखनीय आहेत. त्यांतील मध्ययुगीन व्यक्तींभोवतीचे अद्भुतरम्य वलय दूर करून, त्याही चारचौघांप्रमाणेच मनोविकारांना बळी पडणाऱ्या माणसांपैकी होत, असे त्याने दाखविले आहे. रोमन बार्थलो (१९२३) आणि ॲमरँथ (१९३४) ही त्याची मनोविश्लेषणात्मक काव्ये काहीशी क्लिष्ट आहेत.
कलेक्टेड पोएम्स (१९२१), द मॅन हू डाइड ट्वाइस (१९२४) आणि उपर्युक्त ट्रिस्ट्रम हे त्याचे तीन काव्यग्रंथ पुलिट्झर पारितोषिकास पात्र ठरले. रॉबिन्सने नाट्यात्मक एकभाषितेही लिहिली. त्यांतील रेंब्रां टू रेंब्रा ह्या एकभाषितात त्याच्या प्रतिभेचा परमोत्कर्ष आढळतो. मानवी नातेसंबंध, वैफल्य, एकाकीपणा ह्यांची खोलात जाऊन घेतलेली प्रचीती त्याच्या कवितेत आढळते. उपरोधप्रचुरता हा त्याचा आणखी एक लक्षणीय विशेष. त्याची शैली अर्थगर्भ, पण उघडीबोडकी अशी आहे. आधुनिक अमेरिकन कवितेचा रॉबिन्सन हा एक प्रणेता मानला जातो.
संदर्भ : 1. Anderson, W. L. Edwin Arlington Robinson: A Critical Introduction, Cambridge (Mass), 1968.
2. Barnard, Ellsworth, Ed. Robinson: Centenary Essay, Athens, 1969.
3. Cary, Richard, Uncollected Poem and Prose of Edwin Arlington Robinson, 1975.
4. Morris, Lloyd, Poetry of Edwin Arlington Robinson, New York, 1923, reprint 1969.
5. Van Doren, Mark, Edwin Arlington Robinson, 1927, reprint 1975.
6. Yvor, Winters, Edwin Arlington Robinson. 1971.
नाईक, म. कृ.