रॉबर्टसन, डेनिस होम : (२३ मे १८९० – २१ एप्रिल १९६३). प्रख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. जन्म सफल परगण्यातील लोस्टॉफ्ट या गावी. त्याचे वडील हॅलीबरी गावाचे धर्मोपदेशक व मुख्याध्यापक होते. ईटन व केंब्रिज महाविद्यालयातून त्याचे शिक्षण झाले. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर डेनिसने अनेक पदके, बक्षिसे व सन्मान प्राप्त केले. अर्थशास्त्राच्या ट्रायपॉस मध्ये त्याने सन्मान्य अशी प्रथम श्रेणी प्राप्त केली (१९१२). वयाच्या बाविसाव्या वर्षी विद्यार्थिदशेत असताना डेनिसने ए स्टडी ऑफ इंडस्ट्रियल फ्लक्च्यूएशन्स (१९१५) या महत्त्वाच्या पुस्तकाचा बराच भाग लिहिला होता. पहिल्या महायुद्धत डेनिस हा ईजिप्त व पॅलेस्टाइन या भागात होता व त्याला युद्धातील मोलाच्या कामगिरीमुळे ‘मिलीटरी क्रॉस’ हा सन्मान मिळाला होता.
डेनिसने केंब्रिजस्थित ट्रिनिटी महाविद्यालयात अधिछात्र म्हणून आपल्या अध्यापकीय कारकीर्दीस प्रारंभ केला. केंब्रिज विद्यापीठात त्याने अर्थशास्त्राचा प्रपाठक म्हणून काही काळ काम केले (१९३०–३८). लंडन अर्थशास्त्र संस्थेमध्ये त्याने अर्नेस्ट अध्यासनाचा प्राध्यापक म्हणूनही काही काळ अध्यापन केले (१९३८ – ४४). १९४४ पासून निवृत्तीपर्यंत (१९५७) तो केंब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक होता. दुसऱ्या- महायुद्धात रॉबर्टसन ब्रिटिश शासनाच्या वित्तमंत्र्यालयाचा सल्लागार म्हणूनही काम करीत होता. सेवानिवृत्तींनंतर तो गुणश्री प्राध्यापक होता. दुसऱ्या महायुद्धकाळात रॉबर्टसनवर सोपविण्यात आलेली ग्रेट ब्रिटन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या दोन देशांमधील वित्तीय संबंध हाताळण्याची जबाबदारी त्याने कुशलतेने पार पाडली. त्याचप्रमाणे ब्रेटनवुडस् येथील चलनविषयक परिषदेमध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. १९५३ मध्ये त्याला ‘सर’ हा बहुमान लाभला.
रॉबर्टसनचे लेखन विपुल असून सरकारी धोरणावर त्याचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते. त्याचे महत्त्वाचे ग्रंथ खालीलप्रमाणे : (१) ए स्टडी ऑफ इंडस्ट्रियल फ्लक्च्युएशन्स (१९१५) (२) मनी (१९२२) (३) द कंट्रोल ऑफ इंडस्ट्री (१९२३) (४) बँकिंग पॉलिसी अँड प्राइस लेव्हल (१९२६) (५) इकॉनॉमिक फ्रॅगमेंटस : एसेज अँड द अँड्रोसिस (१९३१) (६) एसेज इज मॉनेटरी थिअरी (१९४०) (७) युटिलिटी अँड ऑल दॅट (१९५२) (८) ब्रिटन इन द वर्ल्ड इकॉनॉमी (१९५४) (९) इकॉनॉमिक कॉमेंटरीज (१९५६) (१०) लेक्चर्स ऑन इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स (१९५७−५९)-त्रिखंडात्मक ग्रंथ. याशिवाय रॉबर्टसनचे अनेक उत्कृष्ट लेख प्रसिद्ध आहेत.
रॉबर्टसन हा ‘केंब्रिज अर्थशास्त्र संप्रदाया’चा अत्यंत महत्त्वाचा सदस्य म्हणून ओळखला जातो. तो मूळचा ॲल्फ्रेड मार्शलच्या आर्थिक सिद्धांतांचा गाढा अभ्यासक. केंब्रिज येथे जॉन मेनॉर्ड केन्स या नामवंत अर्थशास्त्रज्ञाचे त्याला साहचर्य लाभले. केन्सच्या लेखनावर रॉबर्टसनचा मोठा प्रभाव पडलेला आढळतो. केन्स हा आपला द जनलर थिअरीहा जगद्विख्यात ग्रंथ लिहीत असताना प्रत्येक वेळी हॉट्रे, रॉय हॅरोड या अर्थशास्त्रज्ञांप्रमाणे रॉबर्टसनचाही सल्ला घेत असे.
ब्रिटिश शासनाने १९५७ मध्ये स्थापन केलेल्या ‘किंमती’, उत्पादकता व उत्पन्नविषयक परिषदे’चा रॉबर्टसन हा एक सदस्य होता. चलनवाढ समस्या व तिचा सरासरी उत्पादकतेशी असलेला संबंध यांचा अभ्यास करणे, त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या विकासाचे सातत्याने अवलोकन करणे, ही कार्ये या परिषदेकडे सोपविण्यात आली होती.
रॉबर्टसनच्या ए स्टडी ऑफ इंडस्ट्रियल फ्लक्च्युएशन्स या पहिल्या ग्रंथात वास्तव घटकांपेक्षा चलनविषयी घटकांवर अधिक भर पहिल्या ग्रंथात वास्तव घटकांपेक्षा चलनविषयक घटकांवर अधिक भर देण्यात आला असून बँकांचे पतनिर्मितीचे प्रमाण कमीजास्त होत असल्यामुळे व्यापारचक्रे निर्माण होतात, असे त्याने प्रतिदान केले आहे. मनी या ग्रंथात रॉबर्टसनने चलनविषयक अनेक प्रश्नांचा सविस्तर ऊहापोह केला आहे. किंमतींतील चढउतारांचे विवेचन करताना रॉबर्टसन हा केन्सप्रमाणे ‘द्रव्यराशी सिद्धांता’शी संबंधित ‘रोकड शिल्लक दृष्टिकोना’चा पाठपुरावा करीत असलेला आढळतो. पैशाचे मूल्य हे पैसा रोख स्वरूपात ठेवण्यासाठी लोकांची जी पैशाला मागणी असते, तीवर अवलंबून असते, असे रॉबर्टसनचे मत होते. रॉबर्टसनने व्याजदराचे विश्लेषण करताना ‘कर्ज निधी सिद्धांत’ मांडला आणि या निधीच्या पुरवठा प्रवाहातील बँकठेवींचे महत्त्व प्रकर्षाने विशद केले. किंमत पातळी स्थिर राखण्यासाठी शासकीय नीती जास्तीत जास्त प्रयत्नंशील असावयास हवी. असेही रॉबर्टसनने प्रतिपादन केले आहे. त्याच्या बँकिंग पॉलिसी अँड द प्राइड लेव्हल या ग्रंथात तसेच इकॉनॉमिक फ्रॅगमेंट्स या विविध प्रबंधांच्या एकत्रित संग्रहात बचत व गुंतवणूक ह्या वास्तव घटकांच्या कार्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. रॉबर्टसनने काल-विश्लेषणविषयक जे मूळ विचार आपल्या निबंधांतून मांडले आहेत, त्यांचा पुढील काळातील अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्र विकासाच्या संदर्भात अतिशय उपयोग झाला.
प्रारंभीच्या काळात केन्सने केंब्रिज दृष्टकोनाचा पाठपुरावा केला. १९२९ च्या महामंदीनंतर केन्सने आपले विश्लेषण पुन्हा पारखून घेतले परंतु रॉबर्टसनला केन्सचे नवे सिद्धांत मान्य नव्हते. म्हणून १९३६ नंतर केन्सचा जनरल थिअरी …हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर केन्सप्रणीत सिद्धांत व धोरणे यांवर तो कठोर टीका करीत राहिला. आर्थिक विचारांच्या बाबतीत त्याने मार्शल आणि पिगू यांचे शिष्यत्व पतकरले आणि अखेरपर्यंत तो त्या विचारांशी एकनिष्ठ राहिला.
केंब्रिज येथे रॉबर्टसनचे हृदयविकाराने निधन झाले.
गद्रे. वि. रा.
“