रॉदरॲम : ग्रेट ब्रिटनच्या साउथ यॉर्कशरमधील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या २,५२,७०० (१९८५). हे शेफील्डच्या ईशान्येस सु. आठ किमी. वर डॉन व रॉदर या नद्यांच्या संगमावर वसले आहे. १७४६ मध्ये येथे लोखंडाचे कारखाने उभारण्यात येऊ लागल्यापासून रॉदरॲमचा विकास होत गेला एकोणिसाव्या शतकात डॉन खोऱ्यातील शेफील्डपासून मेक्सबरोपर्यंतच्या औद्योगिक पट्ट्याचा रॉदरॲम हा एक भाग बनले.

रॉदरॲमची अर्थव्यवस्था जरी प्रामुख्याने लोखंड-पोलाद व अभियांत्रिकी उद्योगांवर निर्भर असली, तरी आसमंतात कोळसाखाणी तसेच अन्य धातु-खनिजे यांची विपुलता असल्यामुळे पितळ-उत्पादने, विद्युत् उपकरणे, काचसामान, रसायने, मृत्पात्री इ. उद्योगही येथे विकसित झाले आहेत. यांशिवाय मोटारगाड्यांचे सुटे भाग, मिठाई इत्यादींचे उत्पादनही येथे होते.

डॉन नदीच्या जुन्या पुलावर पंधराव्या शतकातील एक लहानसे चर्च आहे गिल्बबर्ट स्कॉट या वास्तुशिल्पीने पुनर्बांधणी केलेले (१८७७) पंधराव्या शतकातील ‘ऑल सेंटस चर्च’ ही येथेच आहे. नवाश्म, ब्रांझ व लोह या तिन्ही युगांतील काही अवशेष तसेच रोमनकालीन किल्ल्याचे काही अवशिष्ट भाग शहराच्या परिसरात आढळून येतात. शहरास आवश्यक अशा सर्व प्रकारच्या सुविधा रॉदरॲममध्ये उपलब्ध आहेत.

पंडित, भाग्यश्री