रॉबिन : हे नाव पुष्कळ पक्ष्यांना दिलेले आढळते. लहान आकारमान व तांबूस छाती ही त्यांची ठळक लक्षणे होत. अमेरिकन रॉबिन [टर्डस मायग्रेटोरियस ⟶ कस्तूर], पेकिन रॉबिन (लिओथ्रिक्स ल्यूटिया) आणि कॉसिफा व संबंधित प्रजातीतींल पुष्कळ दक्षिण आफ्रिकी रॉबिन ही त्यांची उदाहरणे होत. रॉबिन हे नाव मर्यादित अर्थाने एरिथॅकस रुबिक्युला या जातीला देतात. ब्रिटन, आझोर्सच्या पूर्वेस इराण व मोरोक्को आणि उत्तरेस नॉर्वे व रशिया असा तिचा प्रसार आहे.

यूरोपियन रॉबिन सु. १४ सेंमी. लांब असून त्याची छाती व कपाळ तपकिरी नारिंगी वरची बाजू तपकिरी-ऑलिव्ह आणि पोट पांढरे असते. पिलाच्या छातीवर गर्द तपकिरी व पिवळसर तपकिरी रंगाचे विविध प्रकारचे ठिपके असतात. मूलतः हा जंगलात राहणारा पक्षी आहे पण तो बराच धीट झालेला असून माणसाच्या जवळपास वावरू लागला आहे. उद्धट व अक्कडखोर वागण्याबद्दल तो सर्वत्र परिचित आहे. उत्तर यूरोपात तो स्थलांतर करतो पण दक्षिण यूरोपात तो अंशतः तसे करता किंवा तो तेथील स्थाईक आहे. भिंती, वृक्ष इत्यादींमध्ये असलेल्या भोकांत किंवा बिळांत याचे घरटे असते. त्यात पांढरट, ५-६ अंडी १३-१४ दिवस उबविते, तेव्हा नर तिला भरवितो. १२−१४ दिवसांनी पिले उडू लागल्यावर दुसऱ्या विणीतील परिपालन सुरू होते. बहुतेक वर्षभर तो उच्च रवात शीळ वाजविल्यासारखे गातो व विविध प्रकारचे आवाज काढतो. तो मुख्यतः किडे खातो.

अमेरिकन रॉबिन २५ सेंमी. लांब असतो. त्याची छाती विटकरी लाल, वरची बाजू काळसर करडी व चोच पिवळी असते. याच्या डोळ्यांभोवती, हनुवटीखाली व शेपटीच्या बाहेरील पंखांच्या टोकांवर मोठ्या पांढऱ्या खुणा असतात. माद्या फिकट रंगाच्या असतात व इतर कस्तुरांप्रमाणे याच्या पिलांच्या छातीवर ठिपके असतात. हे पक्षी स्थलांतर करतात. अमेरिकेच्या उत्तरेकडील जंगलांतील हा एक लाजाळू पक्षी आहे पण इतरत्र त्याला माणसाच्या सहवासाची चांगलीच सवय झालेली आहे.

त्याचे घरटे वनस्पती व काडी−कचऱ्याचे असून त्याला आतून चिखलाचे घोटीव अस्तर असते. ते वृक्ष, खुली छपरे, पूल इ. ठिकाणी असते. त्यात मादी ३−५, निळसर हिरवी अंडी घालते. ती उबविण्याचे काम मादी करते. बारा दिवसांनी अंडी फुटून त्यांतून त्यांतून पिले बाहेर पडतात. नर व मादी दोघेही पिलांची काळजी घेतात. १४−१६ दिवसांनंतर पिले उडू लागतात. एका हंगांमात २-३ वेळा वीण होते

आनंदाने गाणे गायल्यासारखे तो थांबून थांबून आणि कमीजास्त तीव्रतेचे सूर काढतो. गांडुळे, कीटक, फळे व धान्य हे त्याचे अन्न होय.

इंडियन रॉबिन हा ‘खोबड्या चोर’ व मॅग्पाय रॉबिन हा ‘दयाळ’ या नावाने ओळखला जातो. या दोन्हींवर याच नावांनी मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत.

जमदाडे, ज. वि.