राही, अब्दुर्-रहमान : (१९२५− ). काश्मीरी भाषेतील नामवंत कवी आणि समीक्षक. जन्म वझेपूर (श्रीनगर) येथे. वडिलांचे नाव गुलाम महंमद मीर. पत्नी झरीना. अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन ते फार्सी आणि इंग्रजी या दोन विषयांत एम.ए. झाले. पूर्वी प्राध्यापक आणि विषयप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले असून, काश्मीर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले (१९८५). भारतीय ज्ञानपीठाचे सभासद, साहित्य अकादेमी आणि जनरल कौन्सिलचे सदस्य इ. मानाची पदे त्यांनी भूषविली. नवरोज−इ−सभा (१९५५) या त्यांच्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला (१९६२). तसेच उत्कृष्ट काश्मीरी लेखक पुरस्कार (१९७५), ‘जम्मू अँड काश्मीर अकादेमी ऑफ आर्टस, कल्चर अँड लँग्वेजिस’ या संस्थेतर्फे त्यांच्या कार्याचा गौरव (१९७६), कहावत या त्यांच्या पुस्तकाला ‘कल्चरल अकादेमी ऑफ जम्मू अँड काश्मीर’ या संस्थेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून पुरस्कार (१९८०) इ.मानसन्मान त्यांना मिळाले.
राही पुरोगामी विचारसरणीचे आहेत. फार्सी साहित्यातील आदर्शवादाचे प्रतिबिंब त्यांच्या भावगीतांत पडलेले आढळते. राहींची प्रतीभा फुलत असतानाच काश्मीर युध्यव्याप्त प्रदेश बनला आणि ह्याबाबतची तीव्र प्रतिक्रिया म्हणून ते अखेर कम्युनिस्टांच्या वर्चस्वाखाली असलेल्या ‘कल्चरल काँग्रेस’ चे एक संस्थापक−सदस्य झाले.
राहींचे पहिले तीन काव्यसंग्रह कलाम−अ−राही, सनवेने साझ आणि सुमुक सौदा १९५० मध्ये प्रसिद्ध झाले. त्याचबरोबर टिकाकुशल बुध्दी आणि उत्कृष्ट कल्पनाविलास यांमुळे साहित्यजगतात त्यांना एकदम प्रसिध्दी मिळाली. साहित्य अकादेमी पुरस्कार लाभलेला नवरोज−इ−समा हा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे समकालीन काश्मीरी काव्यास मिळालेली एक उत्कृष्ट देणगीच होय. राहींच्या पूर्वीच्या काव्यरचनेत तार्किक जडवादासाठी बोलीभाषेचा वापर केलेला दिसतो. त्यानंतर मात्र त्यांच्यात मनस्वी बदल घडून आला. त्यांच्याबरोबरच कामिल आणि नदिम यांचाही उल्लेख आवश्यक आहे. कौल यांच्या मते ‘‘या तीन कवींनी (त्रयीने) काश्मीरी काव्याच्या बाह्यविष्काराला आधुनिकतेचे सुंदर वळण तर दिलेच, शिवाय आशय आणि शैली यांनी काश्मीरी काव्याला परिपूर्णताही आणली. भाषेचा सर्जनशील वापर, तंत्रशुद्धता, लेखनातील लय, चढउतार, मार्मिक शब्दांचा कुशलतेने केलेला वापर तसेच मनाला भावणार्याह प्रसंगाना मूर्त स्वरूप देण्यासाठी सुयोग्य शब्दांचा वापर, ही त्यांची खास वैशिष्ट्ये होत.’’
राहींची मितव्ययी शैली आणि अनेक कल्पना एकमेकींत गुंफून टाकण्यामुळे नवनवीन शब्दबंध आकारास येतात. उपमा आणि रूपके यांमुळे त्यांची अलीकडच्या काळातील निर्यमक काव्यरचना क्वचित दुर्बोधही वाटते. कोणत्याही विषयातील त्यांचे सखोल ज्ञान आणि अनलंकृत भाषाशैली यांमुळे त्यांच्या लेखनात विविधता आली आहे आणि त्यामुळेच त्यांचे अनेक समकालीन कवी त्यांच्यापुढे निष्प्रभ ठरले.
राहींनी निवडक परदेशी कथा काश्मीरीत अनुवादितही केल्या आहेत.
हाजिनी, मोही−इद्दीन (इं.) कापडी, सुलभा (म.)