राळा : (हिं. कांगनी गु. कांग क. नवने सं. कंगू इं. फॉक्सटेल मिलेट, इटालियन मिलेट लॅ. सेटारिया इटालिका कुलग्रॅमिनी). ही वनस्पती मूळची पूर्व आशियातील (बहुधा चीन मधील) असून ती सध्या भारत, चीन, जपान, दक्षिण अफ्रिका, दक्षिण व पूर्व यूरोप आणि उत्तर अमेरिकेत लागवडीत आहे. चीनमध्ये ही वनस्पती इ. स. पू. २७०० वर्षे लागवडीस होती. अश्मयुगात तिचा प्रवेश यूरोपात झाला असे मानण्यात येते. हे ९०-१०५ सेंमी. उंचीचे पिवळसर व जोमदार खोडाचे वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारे) गवत आहे [⟶ ग्रॅमिनी]. पाने साधी, लांबट, भाल्यासारखी, अनेक व खरबरीत फुलोरा [परिमंजरी ⟶ पुष्पबंध] दाट कणीशासारखा, १५−३०×२−४ सेंमी. व राठ केसांचा असतो. तुसे ४ व केसरदले ३ कणिशकातील चौथे फूल द्विलिंगी व फलोत्पादक असते. सस्यफलातील [⟶ फळ] दाणा दीर्घवृत्ताभ (लंबगोलाकार), १·८ ते २·५ मिमी. लांब, तांबडा किंवा पांढरा, गुळगुळीत व चकचकित असतो. दाणे मूत्रल (लघवीचे प्रमाण वाढविणारे), स्तंभक (आकुंचन करणारे), संधिवातावर, गरोदरपणातील गर्भाशयाच्या विकारावर व प्रसूतीवेदना कमी करण्यास बाहेरून लावण्याच्या औषध योजनेसाठी उपयुक्त असतात.
चौगले, द. सी.
भारतात राळ्याची लागवड मुख्यत्वेकरून आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांत आणि थोड्या फार प्रमाणात तमिळनाडू, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये होते. सर्वांत जास्त क्षेत्र आंध्र प्रदेशात (सु. ५ लक्ष हेक्टर) असून त्या खालोखाल ते कर्नाटकात (सु. २ लक्ष हेक्टर) आहे. इतर सर्व राज्यांत मिळून ते सु. ५०,००० हेक्टरपर्यंत असते. महाराष्ट्रात त्याची लागवड विशेषकरून नासिक, अहमदनगर, सोलापूर व धुळे या जिल्ह्यांत होते. वैरणीचे पीक म्हणूनही त्याची आंध्र प्रदेश, तमिळनाडू व गुजरातमध्ये लागवड करतात.
हवामान : हे कोरडवाहू पीक असून त्याची लागवड वर्षांतून केव्हाही करता येते. वार्षिक पर्जन्यमान ५० ते ७५ सेंमी. असलेले प्रदेश या पिकाच्या लागवडीसाठी योग्य असतात. अवर्षणाच्या काळात हे पीक तग धरून राहते व थोडेफार उत्पन्न देते. ज्या भागात पाऊस अनियमित व थोड्या प्रमाणात पडतो (उदा., आंध्र प्रदेशाचा पश्चिम भाग) तेथे या पिकाची लागवड करणे पसंत करतात. हिमालयात १,८०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात व पंजाबात ३,३०० मी. उंचीच्या व वार्षिक १२५ सेंमी. पावसाच्या भागातही याची लागवड होते.
जमीन : हलक्यापासून भारीपर्यंतच्या सर्व प्रकारच्य जमिनींत हे पीक घेतले जाते व जमिनीच्या प्रकाराप्रमाणे कमी जास्त उत्पन्न मिळते. पावसाचे मान सर्वसाधारण बेताचे असल्यास तांबड्या दमट जमिनीत हे पीक चांले येते मात्र पाणथळ जमीन या पीकाला योग्य नाही.
फेरपालट व मिश्रपीक : हे स्वतंत्र पीक अथवा. इतर अनेक पिकांबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात. आंध्र प्रदेशात व तमिळनाडूत ते कापसाच्या पिकात आणि कर्नाटकात नाचणी अथवा कापसाच्या पिकात मिश्रपीक म्हणून घेतात. स्वतंत्र पीक म्हणून घेतल्यास त्यानंतरचे पीक नाचणी किंवा जोंधळा घेतात. महाराष्ट्रात खरीप हंगामात इतर पिकांत उतवडा म्हणून हे पीक घेतले जाते.
खत : भारी काळ्या जमिनीत या पिकाला सहसा खत देत नाहीत. इतर प्रकारच्या जमिनीत व विशेषतः बागायती पिकाला खत दिल्यास उत्पन्नात निश्चितपणे वाढ होते. मिश्रपीक म्हणून पेरल्यास निराळे खत लागत नाही.
पेरणी : हे पीक वर्षातून केव्हाही घेता येत असले, तरी मे, जून-जूलै, ऑगस्ट-सप्टेंबर आणि बागायती पिकासाठी जानेवारी-फेब्रुवारी हे पेरणीचे सर्वसाधारण हंगाम आहेत. बी फोकून अथवा ओळीमध्ये पाभरणीने सर्वसाधारण हंगाम आहेत. बी फोकून अथवा ओळीमध्ये पाभरीने पेरतात. महाराष्ट्रात दोन ओळी २५ ते ३० सेंमी. अंतरावर पेरणी करतात. स्वतंत्र पिकासाठी हेक्टरी ५−८ किग्रॅ. आणि मिश्र पिकासाठी ३ ते ६ किग्रॅ. बी लागते.
रोग व किडी : या पिकावर ⇨काणी रोग, ⇨केवडा रोग, ⇨तांबेरा व ⇨करपा हे कवकीय (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे होणारे) रोग आणि ⇨ज्वारी व ⇨बाजरी या पिकांवर आढळून येणाऱ्याक किडी पडतात.
कापणी व उत्पन्न : हे पीक पेरणीपासून ९० ते १२० दिवसांत तयार होते. द. भारतात सबंध पीक कापून व इतर भागांत फक्त कणसे कापून मळणी करतात. कोरडवाहू पिकाचे हेक्टरी उत्पन्न ४०० ते १,००० किग्रॅ. व बागायती पिकाचे १,८०० किग्रॅ. पर्यंत मिळते. तमिळनाडूत को-२ या सुधारित प्रकाराचे उत्पन्न २,२०० किग्रॅ.पर्यंत मिळते.
राळ्याच्या दाण्यात ११·२% जलांश, १२.३% प्रथिने, ४·३% वसा (स्निग्ध पदार्थ) व ६०·९% कार्बोहायड्रेटे असतात. प्रथिनामध्ये ⇨लायसिन या ॲमिनो अम्लाचा अभाव असतो, त्यामुळे गव्हापेक्षा राळ्याचे पोषण मूल्य कमी आहे. हिवाळ्यात उघड्यावर राहिलेले दाणे खाण्यात आल्यास ते विषारी असतात व त्यामुळे गिलायुशोथ [गिलायूंची दाहयुक्त सूज ⟶ टॉन्सिल] होण्याचा संभव असतो.
उपयोग : दाण्याच्या पिठाच्या भाकरी करतात अथवा सडून कोंडा काढून दाण्याचा भात करतात. हे धान्य नुसतेच खाण्यात आल्यास जुलाब होण्याचा संभव असतो. अशक्त व रुग्णांना दाणे दूधात शिजवून देतात. दाण्यांचा उपयोग पाळीव पक्ष्यांचे खाद्य म्हणूनही होतो.
कणसे काढून घेतलेली ताटे जनावरांना खाऊ घालतात. अमेरिकेत हे पीक खास वैरणीसाठी लावतात. पीक फुलावर असताना कापूस सावलीत वाळविल्यास त्याची चांगल्या प्रकारची वैरण तयार होते.
पहा : गवते.
संदर्भ : 1. Aiyer, A. K. Y. N. Field Crops of India, Bangalore 1958.
2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.
चौधरी, रा. मो. गोखले, वा. पु.
“