रासायनिक विश्लेषण : रसायनशास्त्राची ही एक महत्त्वाची शाखा आहे. एखाद्या पदार्थाच्या नमुन्यात उपस्थित असलेली घटक मूलद्रव्ये वा मूलद्रव्यांचे गट ओळखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विश्लेषणाला गुणात्मक रासायनिक विश्लेषण म्हणतात. याकरिता वापरण्यात येणाऱ्या तंत्रांची जटिलता नमुन्याच्या स्वरूपावर अवलंबून असते. काही वेळा विशिष्ट मूलद्रव्ये वा त्यांचे गट ओळखणे एवढाच विश्लेषणाचा उद्देश असतो आणि मग त्याकरिता ⇨ज्योत प्रकाशमापनासारख्या साध्या परीक्षा वापरता येतात. पदार्थाच्या नमुन्यातील एका वा अधिक घटकांचे परिमाण वा टक्केवारी निश्चित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या विश्लेषणाला परिमाणात्मक वा राश्यात्मक रासायनिक विश्लेषण म्हणतात. या विश्लेषणाकरिता आवश्यकतेनुसार भौतिक अथवा रासायनिक पद्धती वापरण्यात येतात. वरील दोन्ही विश्लेषणाच्या प्रकारांचे अधिक वर्णन तसेच त्याकरिता वापरण्यात येणारी विविध तंत्रे व पद्धती, या विश्लेषणांचे उपयोग आणि महत्त्व इत्यादींसंबंधीची माहिती ‘वैश्लेषिक रसायनशास्त्र’ या नोंदीत विस्ताराने दिलेली आहे.
ठाकूर, अ. ना.