रासायनिक उपकरणे : रसायनाशास्त्राचा अभ्यास करताना विशेषेकरून प्रयोगशाळेत विश्लेषणासारखे प्रायोगिक काम करण्यासाठी वापरावी लागणारी उपकरणे. रसायनशास्त्राचे अध्ययन करताना घन, द्रव व वायू या अवस्थांमधील निरनिरळ्या पदार्थांवर वेगवगेळे प्रयोग करावे लागतात व ते करताना विविध प्रकारची उपकरणे वापरावी लागतात. यांपैकी काही उपकरणे सर्वसामान्य प्रकारची (उदा., चंबू, नळ्या, बूच इ.) असतात, तर काही अशी सर्वसामान्य उपकरणे एकत्र जोडून बनविलेली खास प्रकारची उपकरणे असतात. (उदा., द्रव मिश्रणातील घटक द्रव अलग करण्यासाठी वापरण्यात येणारे ऊर्ध्वपातन पात्र, वायू तयार करण्याचे कीप उपकरण) व काही अतिशय गुंतागुंतीची असतात. विक्रियेचे तापमान व तिच्यात भाग घेणाऱ्या विक्रियाशील पदार्थांची संक्षारकता (रासायनिक परिणामाद्वारे झीज घडवून आणण्याची क्षमता) ही लक्षात घेऊन उपकरणे निवडतात.
द्रव्याच्या तिन्ही अवस्थांमध्ये विक्रिया घडू शकतात. त्यामुळे विद्रावण (विरघळविणे) ⇨निष्कर्षण, ⇨अवक्षेपण, ⇨बाष्पीकरण, ⇨संघनन, ⇨अधिशोषण, ⇨शोषण, ⇨ऊर्ध्वपातन, ⇨गाळण क्रिया इ. अनेकविध क्रिया-प्रक्रियांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी लागणारी काही सर्वसामान्य उपकरणे अशी होत : परीक्षानळी, चंचुपात्र, तरकाटा [⟶ द्रवघनतामापक], चंबु, बुचे रबर, काच व प्लॅस्टिकच्या नळ्या व नलिका यू (U) नलिका, तापमापक, मुशी, शोष नळी [⟶ अनुमापक], मोजनळी, मोजपात्र, बन्सन ज्वालक जलकुंड, चिमटे, सांडशी, फुंकनळी, खलबत्ता, चमचे, काचेच्या उथळ बश्या, वातचोषक, बकपात्र, नसराळी, गाळण पत्र, तिपाई, तापनियंत्रक, केंद्रोत्सारण यंत्र [⟶ केंद्रोत्सारण], जलशीतक, बाष्पन थाळी, शुष्कन स्तंभ [⟶ शुष्कीकरण], निष्कर्षण पात्र, विभाजक स्तंभ [⟶ ऊर्ध्वपातन], तापक, वायुजनित्र, धावन बाटली, शोषक पंप, धातूची जाळी, ॲस्बेस्टसाचे पुठ्ठे वगैरे.
यांपैकी विशेष प्रकारची उपकरणे बनविण्यासाठी सर्वसामान्य उपकरणे नळ्या, नलिका, बुचे इत्यादींच्या मदतीने जोडावी लागतात आणि जोड वाताभेद्य व जलाभेद्य करण्यासाठी त्यांवर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा लेप द्यावा लागतो. काचेच्या नळ्या वाकवाव्या व ओढाव्या लागतात व त्यांना विशिष्ट आकार द्यावे लागतात. अलीकडच्या काळात योग्य प्रकारे जोडता येणारी विशिष्ट काचेची उपकरणे उपलब्ध झाली आहेत. त्यांची आकारमाने काटेकोर असल्याने ती सहजपणे जोडता येतात. त्यामुळे बुचे लावणे, त्यांना छिद्रे पाडणे, जोड तयार करणे इ. कामे करावी लागत नाहीत. ती वापरताना जोडांच्या जागी वंगण म्हणून सिलिकोन ग्रीज लावतात. त्यामुळे उपकरण पूर्णपणे वाताभेद्य (व जलाभेद्य) होते.
प्रयोगशाळेतील कामांमध्ये वेळोवेळी बदल होत आले आहेत. या प्रगतीमुळे अत्यल्प प्रमाणातील (काही मिग्रॅ.) द्रव्यावर प्रयोग करणे शक्य झाले असून त्यासाठी सूक्ष्म चंचुपात्र, सूक्ष्म मोजनळी, अत्यंत संवेदनशील तराजू इ. उपकरणे वापरावी लागतात. ही उपकरणे साधारणपणे अशाच मोठ्या उपकरणांच्या छोट्या प्रतिकृती असतात.
यांशिवाय रसायनशास्त्राच्या अध्ययनात प्रयोगशाळेमध्ये काही भौतिक राशींविषयींची (उदा., घनता, तापमान, द्रव्यमान वगैरे) मापने व निरीक्षणे करावी लागतात. त्यांकरिता तराजू, तापमापक वर्णपटमापक [⟶ वर्णपटविज्ञान], ध्रुवणमापक [⟶ ध्रुवणमिति] श्यानतामापक [⟶ श्यानता] इ. उपकरणांची गरज असते.
हल्ली भारतात प्रयोगशाळेसाठी लागणारे काच सामान (चार मोठे कारखाने) प्लॅटिनम, निकेल, चिनी माती, अगंज पोलाद इत्यादींची उपकरणे, संवेदनशील तराजू (बनारस, मुंबई), तापमापक (कलकत्ता, मुंबई), गाळण पत्र (काल्पी, उ.प्रदेश), सूक्ष्मदर्शक, दूरदर्शक, वायुवर्णलेखक [⟶ वर्णलेखन], pH मापक [⟶ पीएच मूल्य], वर्णपट प्रकाशमापक [⟶ प्रकाशमापन], वर्णपटलेखक, ध्रुवणलेखक, द्विध्रुवणमापक व विविध प्रकारची आधुनिक इलेक्ट्रॉनीय उपकरणे बनतात.
मराठी विश्वकोशात ‘शास्त्रीय उपकरणे’ अशी स्वतंत्र नोंद असून रसायनशास्त्र व रासायनिक अभियांत्रिकीशी संबंधित असलेल्या नोदींमधून अनेक उपकरणांची तपशीलवार माहिती आलेली आहे, उदा., अनुमापन निष्कर्षण वगैरे.
ठाकूर, अ. ना.