राशिचक्र : (ग्रहपथ झोडिॲक). ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर भूगोलावर सूर्य, चंद्र व सूर्यकुलातील बहुतेक ग्रह ⇨क्रांतिवृत्ताच्या दोन्ही बाजूंस सु. आठ-आठ अंश मिळून १६° रुंदीच्या पट्ट्यात सरकत असलेले दिसतात, या पट्ट्यास राशिचक्र असे म्हणतात. या पट्ट्याच्या मधोमध सूर्याचा मार्ग येतो. कुबेर या ग्रहाच्या कक्षेची पातळी व क्रांतिवृत्त यांमध्ये सु. १८ अंशांचा कोन असल्याने तो ग्रह काही वेळा थोडाफार राशिचक्राच्या बाहेर जातो. इतर ग्रहांच्या कक्षांच्या पातळ्या क्रांतिवृत्ताशी ८ अंशांहून कमी कोन करीत असल्याने ते नेहमी ग्रहपथावरच कोठे तरी असतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या सुमारास वसंत संपात बिंदू [⟶ संपात] राशिचक्रावर जेथे होता तेथपासून पूर्वेकडे राशिचक्राचे ३० – ३० अंशांचे १२ समान भाग पाडले. या प्रत्येक भागाला राशी म्हणतात आणि त्या भागातील तारे जोडून निर्माण होणाऱ्या प्राणी व मानव यांच्या आकृत्यांवरून राशींना नावे देण्यात येतात. खगोलातील ग्रहाचे स्थान दाखविण्यास व सांगण्यास राशींची फार मदत होते. वर्षाचे चार ऋतू मानल्यास प्रत्येक ऋतूमध्ये सूर्य तीन राशी ओलांडून जातो.
राशींची नावे सुमेरियन किंवा बॅबिलोनियन लोकांनी प्रचारात आणली असावीत. इतरत्र काही काळ वेगळी नावे देण्यात आली होती, तरी पुढे मेषादि नावेच रूढ झाली. ही नावे भारतात कोठून आलीत अथवा ही नावे भारतीय नाहीतच, असे नक्की सांगता येत नाही. चीनमध्ये उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, मेंढा, वानर, कोंबडा, कुत्रा व अस्वल अशी राशींची नावे होती. मेषादि नावे हिपार्कस यांच्या काळात (इ. स. पू. सु. १३०) रूढ झाली व त्या वेळी वसंत संपात बिंदू मेष राशीत होता. हल्ली त्याचे स्थान निरयन [→ निरयनसायन उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात वा मीन राशीत येते परंतु राशींच्या रूढ कल्पनेमध्ये व त्यांच्या क्रमात बदल झालेला नाही. कारण ताऱ्यांच्या संदर्भात राशी लक्षात ठेवणे सोपे जाते. राशिचक्र हे खऱ्या किंवा काल्पनिक प्राण्यांचे आकार एकापुढे एक दिसणारे वर्तुळाकार पट्ट्यांचे आहे. बारा नावांपैकी तूळ हे एकच नाव वेगळे आहे. हिपार्कस यांना अकराच राशी माहीत होत्या म्हणजे वृश्चिक तारकासमूहाने दोन भाग व्यापलेले होते व त्याचे दोन भाग करून तूळ रास बनविण्यात आली. सूर्य या भागाच्या आरंभी असताना शरद् संपात असल्यामुळे आणि त्या वेळी दिवस व रात्र समसमान असल्याने या भागाला तुला हे नाव देण्यात आले असावे व त्यावरून मराठीत तूळ नाव आले.
वसंत संपात बिंदू क्रांतिवृत्तावर दरवर्षी सु. ५०·२ विकला पश्चिमेकडे सरकत असल्याने सध्या तो मीन राशीत आहे. या बिंदूपासून पूर्वेस ३०-३० अंशांचे भाग कल्पिले, तर होणाऱ्या राशींना सायन राशी म्हणतात आणि रूढ राशींना निरयन राशी म्हणतात. तारे संपात बिंदूप्रमाणे सरकत नसल्याने निरयन राशीतील तारे व ते जोडून बनणारे आकार त्याच नावाच्या सायन राशीत दिसणार नाहीत. त्यामुळे ताऱ्यांच्या संबंधात ग्रहादिकांचे स्थान सांगण्यास निरयन राशीच उपयुक्त वाटतात. प्रत्येक राशीची काही चिन्हे (खुणा) ठरवून दिलेली आहेत मात्र ती केव्हा व कशी ठरली हे सांगता येत नाही (पहा कोष्टक). धूमकेतू व काही ⇨लघुग्रह सूर्यकुलात असूनही ते नेहमी याच पट्ट्यात असतात असे नाही. सूर्याच्या सायन राशिप्रवेशानुसार शासकीय भारतीय राष्ट्रीय पंचांग तयार करण्यात आले आहे. सूर्याचा निरयन अथवा सायन राशिप्रवेश हा दीर्घकाळपर्यंत ठराविक तारखेस होतो. अर्थात, सूर्याच्या एका फेरीस ३६५ दिवसांहून थोडा अधिक कालावधी लागत असल्याने या तारखांमध्ये कधी कधी एका दिवसाचा फरक होऊ शकतो. राशींची नावे, त्यांची चिन्हे व त्यांच्यातील सूर्याचा प्रवेश यांविषयीची माहिती कोष्टकात दिली आहे. मराठी विश्वकोशात प्रत्येक राशीवर स्वतंत्र नोंद दिलेली आहे.
लेखक : गोखले, मो. ना.