रायालो माला : राजस्थानातील खडकांचा एक गट. अरवली पर्वत रांगांच्या मध्याजवळील भागात कँब्रियन-पूर्व (सु. ६० कोटी वर्षांपेक्षा आधीच्या) काळातील खडकांच्या थरांना घड्या पडून एक प्रचंड समधोवली [जटिल रचना असलेली पन्हळासारखी घडी ⟶ घड्या, खडकांतील] बनली असून तिचे तीन भाग पडतात. यांपैकी मधल्या भागाला रायालो माला म्हणतात. या मालेचे खडक ⇨अरवली संघातील खडकांवर तर ⇨ दिल्ली संघाचे खडक या मालेतील खडकांवर विसंगतपणे वसलेले आहेत. अशा प्रकारे या मालेतील खडक ⇨ आर्कीयन काळातील मानले जातात.
चुनखडक – संगमरवर हे या मालेतील प्रमुख खडक असून त्यांच्या थरांची जाडी ६०० मी.पर्यंत आहे. यांचा रंग बहुतकरून पांढरा आहे. हिच्या तळाशी वालुकाश्म, क्वॉर्टझाइट अथवा पिंडाश्म या खडकांचे पातळ थर आढळतात. रायालोजवळील अलवर-जयपूर भाग, मक्राना, रास व गोडवार येथे हिच्या खडकांचे प्रमुख दृश्यांश (उघडे पडलेले भाग) असून नाथद्वारा, राजसमंद आणि कांक्रोळी ते पारबानेरा व जहाजपूर टेकड्यांपर्यंतच्या प्रदेशात हिचे दृश्यांश आढळतात. अजमेर जिल्ह्यातही हिचे खडक असून उदयपूरच्या पूर्वेचा भगवानपुरा चुनखडकही या मालेतील मानतात.
अलवर भागात स्फटिकी, पांढऱ्या शुभ्र, कठीण व डोलोमाइटी [⟶ डोलोमाइट] संघटनाच्या संगमरवराचा ६०० मी.पर्यंत जाडीचा थर असून त्यात पिवळसर, गुलाबी व तपकिरी संगमरवरही आढळतात. याच्या माथ्याकडील थरांमध्ये ⇨ चर्ट आढळत असून अधूनमधून लोखंडाच्या हेमॅटाइट या धातुकाचे (कच्च्या रूपातील धातूचे) छोटे साठेही आहेत.
सुप्रसिद्ध मक्राना संगमरवर याच मालेतील असून ८ किमी. लांबीच्या पट्ट्यात त्याच्या बुटक्या, अरुंद व समांतर टेकड्या आहेत. याच्या थरांच्या जाडीत बराच फरक आढळतो. हा खडक पांढरा, मध्यम ते भरड कणी व कॅल्साइटी असून त्यात अधूनमधून करडे पट्टे आढळतात. गुलाबी व निळसर करड्या रंगाच्या छटांचे संगमरवरही येथे आढळतात. सुमारे ३०० – ४०० वर्षांपासून हा खणून काढण्यात येत असून ताजमहाल, व्हिक्टोरिया मेमोरियल (कलकत्ता) व मोगलांच्या इमारतींसाठी तो वापरला आहे.
रासजवळ ८० X १·६ किमी. एवढा संगमरवराचा पट्टा असून तो निळसर करडा, भरड कणी व भिन्न संघटनांचा आहे. गोडवार (जोधपूर) येथील संगमरवर मक्रानासारखा पण भरड कणी आहे, तर सरंगवा येथे संगमरवराचा १·६ किमी. लांब पट्टा आहे. उदयपूर, नाथद्वारा, राजसमंद व कांक्रोळी क्षेत्रांतील राजनगर संगमरवर स्फटिकी, पांढरा शुभ्र डोलोमाइटी असून तो उदयपूर व चितोडगढ येथील राजवाड्यांसाठी वापरला आहे. मेवाडमधील भगवानपुरा संगमरवर सूक्ष्मकणी, कठीण आणि अस्फटिकी डोलोमाइटी असून त्याची जाडी ३०० मी.पर्यंत आढळते. त्यात पांढऱ्याशिवाय करडा, गुलाबी, किरमिजी व तपकिरी या रंगांच्या छटाही आढळतात. त्यात चर्ट व तांबडे जॅस्पर या खनिजांची भिंगे आहेत. पार-बानेरा क्षेत्रातील चुनखडकाच्या जोडीने हिरवी अँफिबोले आढळतात तर जहाजपूर व सबळपुरा भागांत चुनखडकांचे ३०० मी.पर्यंत जाडीचे थर आहेत.
ठाकूर, अ. ना.