रामाचा सेतू : भारत–श्रीलंका यांदरम्यानच्या सागर भागातील ३० किमी. लांबीची प्रवाळ खडकांची रांग. तिलाच ॲडम्स ब्रिज (आदमचा पूल) किंवा सेतुबंध असेही म्हणतात. भारताच्या आग्नेय किनाऱ्यावरील रामेश्वरम् (पांबन) बेट व श्रीलंकेतील मानार बेट यांना जोडणारी ही खडकांची रांग काही ठिकाणी तुटलेली आहे. रामायणातील युद्धकांडात वर्णन केलेला, लंकेवर स्वारी करण्यासाठी नल वानराकरवी रामाने व वानरसेनेने बांधलेला सेतू तो हाच, असे मानले जाते. यावरूनच रामाने लंकेत प्रवेश करून रावणाचा पराभव केला व सीतेची सुटका केली, अशी कथा आहे. भूवैज्ञानिक अभ्यासानुसार मात्र रामाचा सेतू ही खडकांची रांग म्हणजे प्रवाळांपासून तयार झालेली प्रवाळशैलभित्ती आहे. सेतूचा काही भाग पाण्याच्या पृष्ठभागावर असून पाण्याखाली असलेला भाग सस.पासून चार मी. पेक्षा अधिक खोल नाही. भरतीच्या वेळी या सेतूवरील पाण्याची पातळी केवळ १·२ मी. इतकीच वाढते. सेतूच्या दक्षिणेस मानारचे आखात व उत्तरेस पाल्क उपसागर असून त्यांतून होणाऱ्या वाहतुकीसाठी या सेतूला तीन ठिकाणी खाचा पाडलेल्या आहेत. रामेश्वरम् बेट व मानार बेट यांदरम्यान या सेतूला समांतर दिशेत फेरी वाहतूक चालते. मोठ्या बोटींना मात्र पश्चिमेकडून बंगालच्या उपसागरात जाण्यास श्रीलंकेला वळसा घालावा लागतो.

चौधरी, वसंत