रामपुरत्तु वारियर : (सु. १७०३ –सु. १७६३). मल्याळम् कवी. कुचेलवृत्तम् वंचिप्पाट्‌टु ह्या प्रसिद्ध काव्याचा जनक. ⇨ कुंचन नंप्यार (सु. १७०५ – सु. १७६५) याचा तो समकालीन. केरळच्या कोट्टयम् जिल्ह्यातील पाल भागात असलेल्या रामपुरम् ह्या गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला. माता-पिता पार्वती वार्यस्यार व पद्‌मनाभन् नंपूतिरी. मंदिरातील देवतांसाठी फुलांच्या माळा तयार करण्याचा त्याचा व्यवसाय होता. फलज्योतिष व संगीत यांचे त्याला उत्तम ज्ञान होते, तसेच संस्कृतचाही तो प्रकांड पंडित होता. त्रावणकोरच्या मार्तंडवर्माच्या दरबारात तो आश्रित कवी म्हणून होता.

त्रावणकोर नरेश मार्तंडवर्मा (१७२९ – ५७) याच्या समवेत नावेतून परतीचा प्रवास करत असता राजाच्या आज्ञेवरून रामपुरत्तूने नावेतच उस्फूर्तपणे कुचेलवृत्तम् वंचिप्पाट्‌टु हे काव्य रचल्याची आख्यायिका आहे. त्याच्या ह्या काव्यावर खूष होऊन राजाने त्याला आपल्या आश्रयास ठेवून घेतले व त्याला उदार हस्ते विपुल संपत्ती व जमीन बक्षिस दिली.

कवीने स्वतःस कुचेल म्हणजे सुदामा व मार्तंडवर्मास कृष्ण कल्पून हे आत्मचरित्राचा स्पर्श असलेले उत्कृष्ट काव्य रचले. प्रसिद्ध अशा पौराणिक कथेवर आधारलेल्या ह्या काव्यात कुचेल व कृष्ण यांच्यातील अकृत्रिम मित्रप्रेमाच्या भावनेचा अतिशय कौशल्याने आविष्कार झाला असल्याने ते वाचकांच्या मनाची पकड घेते. वंचिप्पाट्‌टु (वंची = नौका व प्पाट्‌टु = गीत) ह्या उत्कृष्ट संगीतमय लय असलेल्या वृत्तात हे नौकागीत रचले असल्याने ते केरळच्या खाडीखाडीतून सर्वत्र ऐकायला मिळते. अत्यंत प्रसन्न, सुबोध शैलीतील तसेच आत्मनिष्ठतेचा ठायीठायी स्पर्श झालेले हे काव्य केरळमध्ये फार लोकप्रिय आहे. सर्वसामान्य माणसास ते सहज आकलन होते आणि त्यातील मित्रप्रेमाची महती गाणारी परिचित पौराणिक कथा व दारिद्र्याचे कारुण्याने ओथंबलेले वर्णन अंतःकरणास जाऊन भिडते. कुचेल, त्याची पत्नी, कृष्ण यांच्या भावना साध्या सरळ भाषेत अत्यंत प्रत्ययकारकपणे यात वर्णिल्या आहेत. हे काव्य मल्याळम् साहित्याचा अमोल ठेवा मानले जाते.

जयदेवाच्या गीतगोविंदचा रामपुरत्तूने मापाष्टपदी नावाने साध्या, सरळ आणि नादमय मल्याळम् भाषेत अनुवाद केला असल्याचे अलीकडील संशोधनातून उघडकीस आले आहे. याशिवाय नैषधम् तिरुवातिरप्पाट्‌टु, एरावणवधम्‌ तुळ्ळलप्रभातकीर्तनम् ह्या कृतीही त्याच्या नावावर सांगितल्या जातात तथापि हे मत विवाद्य आहे.

भास्करन्, टी. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)