रामण्णा, राजा : (२८ जानेवारी १९२५–). भारतीय शास्त्रज्ञ. भारतीय अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष. भारतामध्ये अणुकेंद्रीय तंत्रविद्येचा विकास करण्यात महत्त्वाचे कार्य.
रामण्णा यांचा जन्म म्हैसूर येथे आणि प्राथमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. त्यांनी मद्रास विद्यापीठाची बी. एस्सी. व लंडन विद्यापीठाची पीएच्.डी या पदव्या मिळविल्या. १९४९ साली ते टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई येथे रुजू झाले. १९५३ साली ते भाभा अणुसंशोधन केंद्र (पूर्वीचे अणुऊर्जा आस्थापना) येथे अणुकेंद्रीय भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. जून १९७२ पासून जून १९७८ पर्यंत ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य होते. जुलै १९७८ मध्ये ते केंद्रीय संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे महासंचालक आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन खात्याचे सचिव झाले. जानेवारी १९८१ मध्ये ते पुन्हा भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक, भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाच्या संशोधन व विकास विभागाचे सदस्य झाले. सप्टेंबर १९८३ – फेब्रुवारी १९८७ या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते.
रामण्णा यांचे संशोधन कार्य अणुकेंद्रीय विक्रिया व न्यूट्रॉन ऊष्मीकरण आविष्कार, विशेषतः स्पंदित न्यूट्रॉन तंत्राचा विकास या विषयांत आहे. त्यांनी अणुकेंद्रीय भंजन (अणुकेंद्राचे तुकडे होण्याविषयीच्या) भौतिकीचा विविध दृष्टिकोनांतून अभ्यास केला आणि एका नवीन भंजन सिद्धांताचे प्रतिपादन केले. अप्सरा, सायरस व पूर्णिमा या संशोधन विक्रियकांचा, कलकत्ता येथील चल ऊर्जा सायस्लोट्रॉन या ⇨ कणवेगवर्धकाचा तसेच कल्पकम येथील शीघ्र प्रजनक चाचणी विक्रियकाचा [ ⟶ अणुकेंद्रीय अभियांत्रिकी] आराखडा तयार करणे, प्रतिष्ठापना करणे व कार्यान्वित करणे या सर्व बाबतींत रामण्णा यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. १९७४ साली पोखरण येथे शांततेकरिता अणुकेंद्रीय चाचणी घडवून आणणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाचे ते प्रमुख होते.
अणुऊर्जेचे शांततामय उपयोग या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या पातळीवर घेण्यात आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या समित्यांवर अध्यक्ष म्हणून काम केले. १९६१ साली ते नॉर्वे देशाच्या ‘नोरा’ या नवीन अणुकेंद्रीय विक्रियाकाच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष होते. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या महासंचालकांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. १९८६ साली ते इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या व्हिएन्ना येथे झालेल्या तिसाव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष होते.
रामण्णा इंडियन फिजिक्स ॲसोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात भौतिकी विभागाचे अध्यक्ष, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे अध्यक्ष (१९७६) व इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे उपाध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री (१९६८), पद्मभूषण (१९७३) व पद्मविभूषण (१९७५) हे किताब तसेच शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (१९६३), मध्यप्रदेश सरकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कार (१९८३), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे मेघनाद साहा पदक (१९८४), ओम प्रकाश भसीन पुरस्कार (१९८५), इंडियन फिजिक्स ॲसोसिएशनचा आर्. डी. बिर्ला पुरस्कार (१९८५) आणि अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या हे बहुमान मिळाले.
रामण्णा यांना संगीताची आवड असून ते उत्तम पियानोवादक आहेत. त्यांना रॉयल स्कूल ऑफ म्यूझिकचे प्रमाणपत्र मिळालेले आहे.
सूर्यवंशी, वि. ल.
“