राम : इक्ष्वाकू कुलातील अयोध्येचा राजा दशरथ व पट्टराणी कौसल्या यांच्यापासून झालेला दशरथाच्या चार पुत्रांपैकी ज्येष्ठ पुत्र. अयोध्येच्या रघुवंशातील राजांचा काल, ऐतिहासिक परंपरेनुसार इ. स. पू. सु. २३५० ते १९५० असा मानला जातो आणि त्यावरून इ. स. पू. सु. २००० ते १९५० हा दाशरथी रामाचा काल अभ्यासक निश्चित करतात. रामाची जन्मतिथी चैत्र शु. नवमी (रामनवमी) ही सर्वत्र मानली जाते. डॉ. के. ल. दप्तरी रामाचा काल इ. स. पू. १६०० च्या सुमाराचा मानतात. वाल्मिकिरामायणामध्ये रामाच्या नावाचा निर्देश ‘राम’ असाच आहे रामचंद्र असे कोठेही वाल्मीकिरामायणात म्हटलेले नाही. आदर्श पुत्र, एकपत्नीव्रती, महापराक्रमी, सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा म्हणून रामदाशरथीचे सर्वांत उत्कृष्ट व अद्भुतरम्य चरित्र वाल्मीकी मुनीने रचले ते रामायण होय. भगवान विष्णूच्या दशावतारांमध्ये सातवा अवतार म्हणून राम कालांतराने गणला गेला.
वाल्मीकी मुनीने नारदाला प्रश्न विचारला, की ‘या पृथ्वीमध्ये गुणसंपन्न, सर्वश्रेष्ठ, शूर, दृढव्रत, चारित्र्यवान कोण आहे?’ या प्रश्नाचे या त्रैलोक्यसंचारी देवर्षी नारदाने उत्तर दिले, की ‘इक्ष्वाकू कुलातील राम आदर्श पुरूष आहे.’ सुंदर मस्तक, भव्य ललाट, विशाल नेत्र, मध्यम उंचीचा, सर्व देहावर अवर्णनीय कांती असलेला, विद्यपारंगत, राजनीतिज्ञ, सज्जनांचा संग्रह आणि दुर्जनांचा निग्रह करणारा, धर्म-अर्थ व काम या तिन्ही पुरूषार्थाचे योग्य पद्धतीने सेवन करणारा, प्रजाहितदक्ष व प्रजाजनांना अत्यंत प्रिय, देवासुरांना ज्ञात असलेली सर्व अस्त्रे जाणणारा व संग्रमात अजिंक्य, असा राम हा श्रेष्ठ पुरूष होय.
दशरथाचे कुलगुरू वसिष्ठ या ऋषींनी ‘लोकराम’ म्हणजे लोकांना आवडणारा म्हणून राम असे नामकरण केले. राजा दशरथाच्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा तीन राण्या होत्या. या राण्यांपासून त्याला दीर्घकालपर्यंत संतती झाली नाही. त्याने ऋष्यशृंग मुनींच्या द्वारे संतती प्राप्त होण्याकरिता पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञातील पायस हा प्रसाद तिन्ही राण्यांना वाटून दिला. पट्टराणी कौसल्यापासून राम, राणी सुमित्रेपासून लक्ष्मण व शत्रुघ्न आणि राणी कैकेयीपासून भरत असे चार पुत्र राजा दशरथाला झाले. सर्व पुत्र गुणी, ज्ञानसंपन्न आणि शूर होते. राम हा हत्तीवर व घोड्यावर बसण्यात आणि रथसंचालन करण्यात निपुण होता. लक्ष्मण हा त्याचा अगदी प्रिय भाऊ. मुलांच्या विवाहाचा विचार दशरथ करू लागला, तेव्हा अकस्मात विश्वामित्र मुनी त्याच्या भेटीला आले. राक्षसांपासून त्यांच्या यज्ञभूमीला सतत धोका दिसू लागला. म्हणून यज्ञरक्षणाकरता त्यांनी रामाची मागणी केला. तेव्हा दशरथ राजाने म्हटले, की ‘मला चतुरंग सैन्यासह घेऊन जा. राम हा जेमतेम पंधरा वर्षांचा त्याच्यापेक्षा मीच राक्षसांचे पारिपत्य करीन’. वसिष्ठानी दशरथाची समजूत घालून रामाला लक्ष्मणासह बोलावून विश्वामित्रांकडे सोपवले. विश्वामित्रांनी रामाला बला व अतिबला या युद्धविद्या शिकविल्या. ताटका या राक्षसीचा विश्वामित्र रहात होते त्या प्रदेशात उपद्रव होता. तिचा वध रामाकडून विश्वमित्रांनी करविला आणि विश्वामित्र संतुष्ट झाले. त्यांनी स्वर्गीय देवांच्या सांगण्यावरून रामाला दिव्य अस्त्रे दिली. विश्वामित्रांनी चालू केलेल्या यज्ञाचा विध्वंस करण्याकरता मारीच, सुबाहू इ. राक्षस धावून आले असता, राम-लक्ष्मणांनी सुसज्ज राहून त्यांना पळवून लावले. यज्ञसमाप्ती निर्विघ्न झाली.
यज्ञसमाप्तीनंतर राम-लक्ष्मणांसह विश्वामित्र आणि ऋषीमंडळी मिथिलेला जनकराजाचा यज्ञ पाहण्याकरता निघाली. मिथिलेपाशी आल्यावर विशालपुरी लागली. तेथे असलेल्या गौतमाश्रमाचा विश्वामित्रांनी राम-लक्ष्माणांना परिचय करून दिला. गौतम मुनींची भार्या अहल्या हिचा पूर्वेतिहास सांगितला. गौतम ऋषीने तिला शाप दिला होता, कारण तिने इंद्रालाच गौतम मुनी समजून त्याच्याशी संभोग केला होता. शापामुळे ती अदृश्य स्थितीत तेथेच राहिली होती. रामाच्या भेटीने ती शापमुक्त झाली. इतर रामायणांतम्हटले आहे, की शापाने अहल्येची शिळा बनली. रामाच्या पादस्पर्थाने ती पुन्हा मनुष्यरूपात मुक्त झाली. विश्वामित्रानी राम-लक्ष्मणांचा आणि सम्राट जनकाचा एकमेकांशी परिचय करून दिला. जनकाच्या महालात असलेले शिवाचे श्रेष्ठ धनुष्य जनकराजाने रामाला दाखविले. रामाने ते शिवधनुष्य उचलले. ते सज्ज करण्याच्या प्रयत्नात वाकवीत असता ते मोडले. हे पाहून सर्वजण चकित झाले. आश्चर्यकारक बळ रामाच्या ठिकाणी आहे, ही गोष्ट या धुनर्भंगाने सूचित झाली. जनकाने या अयोध्येच्या राजपुत्राला आपली कन्या सीता हिचे पाणिग्रहण करण्यास सांगितले. विवाह संपन्न झाला. अयोध्येला परतताना परशुरामाशी गाठ पडली. परशुरामाची ऋषींनी पूजा केली. परशुराम रामावर क्रुद्ध झाला होता कारण शैव धनुष्य रामाने मोडले होते. दुसरे चांगले वैष्णव धनुष्य परशुरामाने रामापुढे केले आणि सांगितले, की ‘या धनुष्यावर बाण लावून तुझी ताकद दाखव’. रामाने धनुष्य ताणले, शर लावला आतापर्यंतच्या तपश्चर्येने प्राप्त झालेले परशुरामाचे तेज नष्ट झाले. तो महेंद्र पर्वताकडे निघून गेला. भरत मातुलगृही गेला. राम आणि लक्ष्मण प्रजेचे प्रशासन करू लागले. रामाच्या शीलाने व चारित्र्याने सर्व देशवासींना राम प्रिय झाला. राम आणि सीता हे आनंदात एकमेकांच्या सहवासात राहू लागले. लोकांना राम हा आपला राजा व्हावा अशी उत्कट इच्छा झाली. हे पाहून रामाचा यौवराज्याभिषेक दशरथ राजाने ठरविला. ही अभिषेकाची वार्ता रामाला कळली. तसेच लक्ष्मण, सीता यांनाही कळली. राम लक्ष्मणाला म्हणाला, ‘तू आणि मी मिळून या वसुंधरेचे पालन करूया. हे माझे जीवित व हे राज्य तुझ्याकरताच आहे असे समज’. नगरवासी जनांनी आनंदोत्सवाची तयारी केली. राम पितृदर्शनार्थ पित्याच्या महालात गेला. तेथे रामाला पिता विषण्ण अवस्थेत दिसला. कैकेयीला विषादाचे कारण विचारले. कैकेयीने यौवराज्याभिषेक रद्द झाला आहे, तुला चौदा वर्षे वनवासात जावे लागणार व भरताला यौवराज्याभिषेक होणार आहे, असा दशरथाचा निर्णय कळविला. या निर्णयाने राम यत्किंचितही डगमगला नाही. त्याची मुखकांती तशीच प्रसन्न राहिली. तो कैकेयीला म्हणाला, ‘ठीक आहे. मी वनात जातो’. तो तिला आणखी म्हणाला, ‘हे देवी, अर्थपर जीवन जगण्यात मला उत्साह नाही. ऋषींच्या सारखे विमल, धर्ममय जीवन मला अधिक आनंददायक होणार आहे. भरत राज्याचे पालन करील व पित्याची शुश्रूषा करील’. पित्याला आणि कैकेयीला प्रदक्षिणा आणि प्रणाम करून राम बाहेर पडला. अविकारी चित्ताने इंद्रियांचा निग्रह करून रामाने कौसल्यामातेला चौदा वर्षांच्या वनवासाची मी तयारी केली आहे, असे सांगितले. माता शोकाकुल झाली. या वार्तेने लक्ष्मण क्रुद्ध झाला त्याची समजूत घालावी लागली. नंतर कौसल्येला वंदन करून तो सीतेकडे गेला. तेथे प्रवेश करताना लज्जेने त्याची मान किंचित खाली झाली. तिला पाहताच शोक अनावर झाला. रामाने सांगितले, की ‘आता वृद्ध मातेचा सांभाळ करून तिची सेवा कर’. सीतेने वनवासात बरोबर जाण्याचा आग्रह धरला. लक्ष्मणानेही रामाबरोबरच वनवासात राहण्याचा हट्ट धरला आणि त्याकरिता रामाचे पाय घट्ट धरले. सीता-लक्ष्मणांसह राम पित्याला भेटण्यासाठी गेला. राम दृष्टीला पडताच राजा दुःखावेगाने मूर्छित होऊन खाली पडला. मूर्च्छेतून सावध झाला, तेव्हा राम हात जोडून पित्याचा निरोप घेऊ लागला. दशरथ म्हणाला, ‘कैकेयीला केलेल्या वरदानामुळे मी दिङमूढ झालो आहे. मला बंधनात टाकून अयोध्येचा राजा हो’. तेव्हा राम म्हणाला, ‘आपण सहस्त्र वर्षेपर्यंत पृथ्वीपती रहा. मी चौदा वर्षे संपवून आपल्या चरणांची सेवा करण्याकरता परत येईन’. राजा रामाला म्हणाला, ‘एवढी रात्र येथे माझ्याजवळ काढ’. राम उद्गारला, ‘मला आपले सत्य राखले पाहिजे. राज्य, सुख, भोग्य वस्तू, स्वर्ग आणि जीवित यांचीसुद्धा पर्वा नाही. आपण कैकेयी मातेला दिलेले वचन सत्य करणे, एवढीच एक इच्छा आहे’. कैकेयीने जाडीभरडी वस्त्रे आणली होती. राम आणि सीता यांनी ती जाडीभरडी वस्त्रे परिधान केली. राम, सीता आणि लक्ष्मण यांनी पित्याच्या पायावर मस्तक ठेवले व मातांना अभिवादन करून वनवासाकरता प्रस्थान ठेवले. रथारूढ झाले. जनसमुदाय रथाच्या मागोमाग येत आहे, हे रामाने पाहिले. तेव्हा सारथ्याला सांगितले, रथ वेगाने हाक. दुःखाने वेडा झालेला राजा आणि कौसल्या हे पायीच चालत येत होते. लोक परत फिरेनात तेव्हा राम त्यांना म्हणाला,‘तुमचे माझ्यावर प्रेम आहे ते सर्व भरतावर करा’. लोकांनी पिच्छा पुरवला. नदीतीरापर्यंत आले. राम घाईने तमसा नदी उतरून गेला. पुढे गंगा नदीचे दर्शन झाले. शृंगवेरपुरापाशी त्याने मुक्काम केला. तेथे निषाद जमातीचा अधिपती रामाचा मित्र गुह रहात होता. गुहाने भक्ष्यभोज्यपदार्थ रामाला भेट म्हणून आणले. ते रामाने नाकारले. तेथेच रात्र काढली. प्रातःकाळी उठल्यावर गुहाने आणलेल्या नावेत बसून गंगा तरून गेला. रथ सोडून दिला. रामाने गंगा पार केली. गंगा-यमुनांच्या संगमाजवळ भरद्वाज मुनींच्या आश्रमापाशी आला. मुनींनी त्यांचे आतिथ्य केले आणि आपल्या आश्रमातच रहा अशी प्रार्थना केली. हे ठिकाण अयोध्येच्या फार जवळ आहे दूरचे एखादे ठिकाण सांगा, असे मुनींना रामाने विनविले. राम-लक्ष्मणांनी यमुना नदी ओलांडली व दुसऱ्या दिवशी चित्रकूट पर्वतापर्यंत पोहोचले. तेथे वाल्मीकी ऋषी वास्तव्य करीत होते. त्यांच्या आश्रमासमीपच लक्ष्मणाने धुळीचे लोट दिसले. सैन्याच्या ध्वनीने आकाश भरून गेले. लक्ष्मणाने काय गडबड म्हणून शोध घेतला तेव्हा भरत ससैन्य चाल करून येत आहे, असे लक्ष्मणाला वाटले. म्हणून लक्ष्मण म्हणाला, की ‘भरताशी सामना केलाच पाहिजे’. तेव्हा राम म्हणाला, ‘मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो, की मला काही नको. धर्म, अर्थ, काम एवढेच नव्हे, तर सगळी पृथ्वीसुद्धा तुमच्याकरताच आहे. भरताला मारून मिळालेले राज्य घेऊन मला काय करायचे आहे?’ भरत रामाला भेटला, पित्याच्या मरणाची वार्ता ऐकून राम शोकाने मूर्च्छित झाला. सावध झाल्यावर पित्याची उदकक्रिया व पिंडदान केले. भरताने रामापुढे पादुका ठेवल्या. रामाने त्या पायात घातल्या व भरताच्या सांगण्याप्रमाणे त्या काढून भरताला दिल्या. चित्रकूट पर्वतावरील आश्रम त्यानंतर राम-लक्ष्मणांनी सोडून दिला. तेथून ते अत्री ऋषींच्या आश्रमाकडे गेले. त्या आश्रमात सीतेने तपस्विनी अनुसूयेची भेट घेतली. ती रात्र रामाने त्या आश्रमातच घालवली. दुसरे दिवशी रामाने दंडकारण्यात प्रवेश केला.
तेथे त्याला जिकडे तिकडे ऋषींचे आश्रम पसरलेले दिसले. तेथे ऋषींनी राजा हा पूजनीय होय आणि आम्ही त्याचे प्रजाजन आहोत, असे सांगून पुष्पांनी आणि फलांनी रामाचा सत्कार केला. त्या घनदाट अरण्यात रामाला एक प्रचंड नरभक्षक विराध नामक राक्षस दिसला. त्याला जिवंतपणीच राम-लक्ष्मणांनी भूमीमध्ये गाडून टाकले आणि ऋषींना अभयदान दिले. या दंडकारण्यात राम-लक्ष्मणांनी दहा वर्षे घालवली. ऋषींच्या निरनिराळ्या आश्रमांमध्ये त्यांचे स्वागत झाले, अनेक महिने त्यांनी ऋषींच्या निरनिराळ्या आश्रमांत वसती केली. त्यांपैकी अगस्त्याश्रमातील वसती सर्वांत महत्त्वाची ठरली. अगस्त्य आणि लोपामुद्रा यांचा स्नेह संपादन केला. अगस्त्य ऋषींनी भगवान विष्णूकरता विश्वकर्म्याने बनविलेले दिव्य धनुष्य रामाला दिले आणि पंचवटीमध्ये राहून तेथील नरभक्षक राक्षसांचा नाश करण्याचा आदेश दिला. पंचवटीमध्ये पर्णकुटी बांधून राम राहू लागला. तेथे गरुडाचा बंधू व अरुणाचा पुत्र जटायू हा पक्षी भेटला. त्याने सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी पतकरली. पंचवटीमध्ये निवास करत असताना लंकाधिपती रावणाची भगिनी शूर्पणखा रामाला भेटण्याकरता आली. तिला रामाचे कामुक आकर्षण उत्पन्न झाले आणि तिने रामाला त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा सांगितली. तिच्या या जबरदस्त मागणीला राम-लक्ष्मणांनी विरोध केला. तिचे नाक आणि कान लक्ष्मणाने तोडले. शूर्पणखा शत्रू बनली आणि रावणाच्या कानावर पंचवटीतील राक्षस-संहाराची वार्ता ऐकून रावणाने आपल्या मारीच नामक मित्राला साहाय्य करण्याची विनंती केली. त्याने प्रथम मदत करण्याबद्दल उत्सुकता दाखवली नाही परंतु रावणाच्या आग्रहाने कांचनमृगाचे रूप धारण केले. मारीच हा इच्छित रूप धारण करणारा ‘कामरूपधर’ होता. या मायामृगाला पाहून सीतेला तो प्राप्त करून घेण्याची इच्छा झाली. राम-लक्ष्मणांना तिने हाका मारल्या. त्यांना तो मृग दिसला. राम विस्मित होऊन लोभावला. सीतेची इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले. त्या मृगाची शिकार करण्याकरिता वनात शिरला त्याच्यावर बाण सोडला. मरताना मारीचाने ‘हा सीते, हा लक्ष्मणा’ असा रामासारखा आवाज काढला. लक्ष्मणाला, सीतेला आश्रमात सोडून वनात धावत जावे लागले. इकडे रावण रामाच्या आश्रमात प्रवेशला. बलात्काराने सीतेला ओढून लंकेला नेले. सीतेला ओढून नेत असताना जटायूने रावणाशी युद्ध केले. रावणाने जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले. इकडे राम-लक्ष्मण आश्रमात परतले तेव्हा सीता दिसली नाही त्यामुळे दोघांच्या मनाला धक्का बसला. सीतेचा शोध सुरू झाला. वाटेत जटायू दिसला. जटायूने सांगितले, की ‘रावणाने सीतेला जबरदस्तीने ओढून नेले आहे. तो दक्षिणेच्या बाजूला गेला आहे’ एवढे सांगून जटायूने प्राण सोडला. सीतेचा शोध करीत असताना वाटेत त्यांना कबंध नामक राक्षस दिसला. त्याचा रामाने वध केला. मरता मरता त्या राक्षसाने सीतेचा शोध करून तिला मिळविण्याकरिता ऋष्यमूक पर्वतावर राहणाऱ्या सुग्रीव वानराची मदत घेण्याचा सल्ला दिला. सुग्रीव त्यावेळी ऋष्यमूक पर्वतावर पंपा सरोवराजवळ वनवासी अवस्थेत राहत होता. सुग्रीवाचा बंधू वाली याने सुग्रीवच्या पत्नीचा अपहार करून त्याला हाकलून दिले होते. पंपा सरोवराजवळ राम-लक्ष्मण आले. तेथे धर्मज्ञ व संन्यासिनी शबरी रहात होती. तिने रामाचा आतिथ्यसत्कार केला व नंतर लगेच देहत्याग केला. तेथे सुग्रीवाची भेट झाली. अग्नीच्या साक्षीने एकमेकांना साहाय्य करण्याची प्रतिज्ञा दोघांनी केली. रामाने सुग्रीव व बाली यांच्या युद्धामध्ये बालीचा वध करण्याचे आश्वासन दिले आणि त्याप्रमाणे घडले. सुग्रीव व बाली यांच्या युद्धात एका वृक्षाआडून रामाने बाणाने बालीचा वध केला. मरता मरता बालीने रामाला ‘हे तुझे अधर्म्य कृत्य होय’ असा ठपका दिला. बालीवधानंतर रामाने किष्किंधा नगरीच्या राज्यावर सुग्रीवाला राज्याभिषेक केला. सुग्रीवाने ठरल्याप्रमाणे सीतेचा शोध करण्याकरता नाना दिशांना निरनिराळे वानर सेनापती पाठवले. त्याच वेळी अस्वलांचा राजा जांबवान आपले सैन्य घेऊन रामाचा सहायक बनला. या सर्व सेनापतींमध्ये प्रज्ञेने हनुमान हा श्रेष्ठ होता. तो लंकेकडे निघाला. रामदूत म्हणून ओळखीची खूण म्हणून आपली अंगठी हनुमानाजवळ दिली. हनुमानासह सगळे वानर सेनापती शोध करून करून थकले, निराश झाले. निरुत्साहित होऊन प्रायोपवेशन करू लागले. जटायूचा भाऊ संपाती हा शंभर योजनांच्या पलीकडेसुद्धा काय चालले आहे, ते दुरून बघू शकणारा होता तो भेटला. त्याने समुद्रातील लंका बेटात रावणाने सीतेला कोठे ठेवले आहे, याचा बरोबर पत्ता हनुमानाला दिला. हनुमानाने समुद्राच्या पलीकडे लंकेत जाऊन सीतेला भेटून परत गेला, तेव्हा लंकेतील हनुमानाचा पराक्रम पाहून रावणाच्या मंत्रिमंडळामध्ये खूप अस्वस्थता उत्पन्न झाली. रावणाचा धाकटा भाऊ विभीषण याने सीतेला परत करण्याचा सल्ला रावणाला दिला. विभीषणाचा सल्ला त्याने अमान्य केला. रावणाच्या अनेक मंत्र्यांसह विभीषणाने रामाची बाजू घेतली. सुग्रीववादिक वानर विभीषणाची मैत्री स्वीकारण्यास उत्सुक नव्हते. त्यांची नाराजी पाहून रामाने सांगितले, की ‘शरण आलेल्या शत्रूलाही अभय देणे, हे मी आपले कर्तव्य समजतो. रावणदेखील शरण आल्यास मी त्याला अभयदान करीन’.
समुद्रपार करण्याकरिता सेतूची जरूरी होती म्हणून विश्वकर्म्याचा पुत्र नील याने लंकेपर्यंत सेतू बांधण्याची जबाबदारी पतकरली. सेतू तयार केल्यावर सैन्यासह राम-लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान हे सर्व लंकेला पोहोचले. लंकेतील सुवेल पर्वताजवळ त्यांनी आपली शिबिरे उभारली सैन्ये संघटित केली. रामाने आपली सेना सुसंघटीत करून रावणाकडे अंगदनामक प्रज्ञाशाली वानराला शिष्टाई करण्याकरिता रवाना केले. संदेश पाठवला, की ‘सीतेला परत करा, नाहीतर तुम्हा सर्व राक्षसांचा संपूर्ण विनाश होईल’. अंगदशिष्टाईने रावणाचे मन काही बदलले नाही. युद्ध अटळ झाले. युद्ध सुरू झाल्यानंतर प्रतिदिन मोठमोठे राक्षसयोद्धे आणि रामाकडील योद्धे मारले जात होते. सीता अशोकवनामध्ये युद्धाच्या निर्णयाची उत्कंठेने वाट पहात होती. रावणाने तिला निराश करण्याकरता त्रिजटा नावाच्या राक्षसीतर्फे पुष्पक विमान पाठवून रणभूमीवर मूर्च्छित झालेले राम-लक्ष्मण दाखविले. ते मृत झाले आहेत असे वाटून सीता विलाप करू लागली. तेव्हा त्रिजटेने ‘हा खोटा देखावा आहे, शोक करू नकोस. ते सावध होतील’ म्हणून तिचे सांत्वन केले. राम मूर्च्छेतून उठल्यावर लक्ष्मणाला मूर्च्छित पाहून विलाप करू लागला. तेव्हा हनुमानाने द्रोणाचल पर्वतावरील एक दिव्यौषधी लक्ष्मणाला दिली लक्ष्मणाची मूर्च्छा गेली. रामाने रावणाचा प्रचंड बंधू कुंभकर्ण याचा वध केला. लक्ष्मणाने रावणपुत्र इंद्रजित याचा वध केला. जय-पराजयांचे चक्र उलटसुलट दोन्ही पक्षांत फिरत होते. अखेरीस रामाने इंद्राने दिलेल्या दिव्य रथात बसून, अगस्त्य ऋषीपासून प्राप्त झालेल्या ब्रह्मास्त्राने रावणाचे हृग. विदीर्ण केले रावण गतप्राण झाला. हे अनेक दिवस चाललेले युद्ध रावणवधानंतर समाप्त झाले. हे युद्ध एकूण ८७ दिवस चालले त्यांतील १५ दिवस युद्धविराम होता म्हणजे एकूण युद्धाचे दिवस ७२ होते. माघ शु. द्वितीयेस हे युद्ध सुरू झाले. वैशाख शु. द्वादशीस ते रावणवधाने संपले. असे स्कंद व पद्म पुराणांत म्हटले आहे. वाल्मीकिरामायणावरील तिलकटीका तसेच कालिकापुराणानुसार भादपद शु. प्रतिपदा रोजी युद्धारंभ आश्विन शु. प्रतिपदेस राम-रावण युद्धास आरंभ आणि आश्विन शु. नवमीस रावणवध होऊन युद्धसमाप्ती, असे निर्देश आढळतात.
रामाच्या आज्ञेनुसार विभीषणाने बंधू रावणाची अंत्येष्टी विधिवत केली. अंत्येष्टी झाल्यावर विभीषणाचा रावणाच्या ठिकाणी राज्याभिषेक झाला. विभीषणाने सीतेला पालखीत बसवून रामाकडे आणले. तेव्हा रामाने सीतेला म्हटले, की ‘मी रावणाशी युद्ध केले व तू मुक्त झालीस पण हे युद्ध तुझ्या मुक्तीकरिता केले नाही. क्षत्रियाचे कर्तव्य म्हणून मी हे युद्ध केले. तू इतके दिवस परपुरूषाच्या घरी राहिलीस म्हणून मी तुझा स्वीकार करू शकत नाही.’ तेव्हा सीतेने लक्ष्मणाला सांगून अग्निचिता तयार केली व त्या अग्निपरीक्षेत सीता शुद्ध आहे हे सिद्ध झाले. नंतर सीतेसह राम-लक्ष्मण पुष्पक विमानात बसून अयोध्येला परतले. रामाला अयोध्येत राज्याभिषेक झाला आणि रामाने भरताला यौवराज्याभिषेक केला. या अभिषेकाच्या वेळी हनुमान, सुग्रीवादी मित्र अयोध्येत उपस्थित होते.
राम आणि सीता यांनी राज्याभिषेकानंतर एकत्र दिवस आनंदाने घालविले. सीता गर्भवती झाली. तिला डोहाळे लागले. अरण्यामध्ये हिंडावे असे वाटू लागले. इतक्यात गप्पागोष्टी चालत असताना रामाने भद्र नावाच्या मित्राला विचारले, ‘मी लक्ष्मण, सीता, भरत यांच्याबद्दल लोक आपापसांत काय बोलत असतात?’तेव्हा भद्राने लोक सीतेबद्दल शंका घेतात, असे सांगितले. ही लोकापवादाची वार्ता ऐकून राम दुःखी झाला आणि त्याने लक्ष्मणाला सांगून सीतेचा त्याग केला. सीता वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात रहावयास गेली. तेथे कुश आणि लव या जुळ्या बालकांना तिने जन्म दिला. वाल्मीकींचे ते दोघे शिष्य बनले. वाल्मीकींनी त्यांना आपण रचलेले महाकाव्य रामायण गावयास शिकविले. हे दोन्ही कुमार अयोध्येच्या राजमार्गामध्ये रामायण गात हिंडत होते. रामाने त्या दोघांना आपल्या महालामध्ये नेले आणि रामायणाचे गायन भरतादिकांसह ऐकले. नंतर रामाने अश्वमेध यज्ञ करण्याचा बेत केला. अश्वमेध यज्ञाप्रमाणे बरोबर पत्नी पाहिजे म्हणून वाल्मीकी आश्रमातून सीतेला आणले. सीतेने रामाबरोबर अश्वमेधामध्ये सहभाग न घेता आपली माता पृथ्वी हिच्या उदरात प्रवेश केला. कालांतराने रामाला कालपुरूष गुप्त खलबतीकरता भेटला. म्हणाला, की ‘तुझ्यामाझ्या भेटीच्या वेळी तिसरा कोणी असता कामा नये’ परंतु त्या भेटीच्या वेळी लक्ष्मणाला यावे लागले. त्यामुळे लक्ष्मणाचा रामाने त्याग केला. दु:खी लक्ष्मण शरयू नदीच्या तटावर जाऊन सशरीर स्वर्गात निघून गेला. त्यानंतर कालपुरुषाच्या संकेताप्रमाणे लक्ष्मणाच्या वियोगाने दुःखी झालेल्या रामाने भरत, शत्रुघ्न व सुग्रीव यांच्यासह शरयू नदीमध्ये देहत्याग केला. राम हा विष्णूच्या रूपामध्ये विलीन झाला.
सबंध वाल्मीकिरामायणातराम हा विष्णूचा अवतार म्हणून कोठेही निर्दिष्ट नाही परंतु बालकांडातील आणि उत्तर कांडातील प्रक्षिप्त म्हणून आधुनिक समीक्षकांना वाटणाऱ्या भागांत, तो विष्णूचा अवतार आहे, असे वर्णन आले आहे तथापि वाल्मीकींनी नारदमुनींना प्रथम प्रश्न विचारला, ‘या पृथ्वीवर श्रेष्ठ पुरूष कोणता?’ त्याच्या उत्तरात नारदमुनीने तो विष्णूचा अवतार आहे, असे सांगितले नाही वा सूचितही केले नाही. वाल्मीकीरामायणातीलप्रक्षिप्त भागांत आणि इतर संस्कृत व अन्यय भाषांत रामायणे वा रामचरित्रे लिहिली गेली व प्रसिद्धीस आली, त्यांत अनेकांत राम हा विष्णूचा अवतार वा परब्रह्माचे व्यक्त स्वरूप आहे, असे निर्देश आढळतात.
रामाच्या आदर्श जीवनाचा व रामायणाचा भारतीय आणि बृह्दभारतीय कलासाहित्यांवर खोल ठसा उमटलेला आहे. रामकथेचा प्रभाव बौद्ध व जैन साहित्यावरही पडला. बौद्ध धर्मात राम हा बोधिसत्त्व, तर जैन धर्मात आठवा बलदेव मानून साहित्यनिर्मिती झाली. संस्कृत, प्राकृत व प्रादेशिक भाषांत रामकथाप्रसंगांवर अनेक महाकाव्ये, नाटके, चंपूकाव्ये, खंडकाव्ये इ. लिहिली गेली. ⇨ रामलीलेसारखे लोकनाट्यप्रकार तसेच लोकगीतांतूनही रामचरित्राचा प्रभाव पूर्वापार दिसून येतो. भारताबाहेरील तिबेट, खोतान, जावा, मलाया, सयाम, ब्रह्मदेश, कंबोडिया (ख्मेर) इ. देशप्रदेशांतील भाषांतही रामकथेचा आविष्कार झालेला आहे. नृत्य, नाट्य, चित्र, शिल्पादी कलांतूनही रामजीवनातील प्रसंगांचा सुंदर आविष्कार दिसून येतो. भारतातील विविध कलावस्तुसंग्रहालयांमध्ये रामाची आणि त्याच्या जीवनातील प्रसंगांची अनेक चित्रे व शिल्पे आढळतात. राजपूत आणि कांग्रा शैलींत रामायणातील प्रसंगांची अनेक चित्रे आहेत. जोधपूर संग्रहालयातील ९१ चित्रांचा संग्रह उल्लेखनीय आहे. जयपूर पोथीसंग्रहालयातील फार्सी रामायणाच्याप्रतीत ७६ सुंदर चित्रे आहेत. प्रख्यात चित्रकार ⇨ रविवर्मा यांनीही रामायणातील काही प्रसंगांचे सुंदर चित्रण केले आहे. कंबोडियातही रामायण प्रसंगांवर सुंदर चित्रे आढळतात.
शिल्पकलेत रामकथेचा आविष्कार खूपच झालेला दिसतो. वेरूळचे कैलास लेणे, हळेबीड, हंपी, कुंभकोणम्, चंद्रगिरी, देवगढ, ऐहोळे, पहाडपूर (बंगाल), नागार्जुनकोंडा तसेच राजस्थानातील केंकिदा, किवाडू (जि. बारमेर), खेड (रणछोडराम मंदिर) इ. ठिकाणच्या मंदिरांतून रामकथाप्रसंगांचा शिल्पगत सुंदर आविष्कार दिसून येतो. कंबोडियातील ⇨ अंकोरथोम व ⇨ अंकोरवात येथील मंदिरांच्या भिंतीवर रामकथेतील निवडक प्रसंगांचा कलात्मक आविष्कार दिसून येतो. जावातील प्रामबानान येथील शिवमंदिराच्या कठड्यावर सीताहरण वालिवध इ. प्रसंग शिल्पांकित केले आहेत. नेपाळमधील विष्णूच्या अवतारप्रतिमांमध्ये राममूर्तींचाही अंतर्भाव आहे.
दक्षिण भारतात रामाच्या पाषाणमूर्तींपेक्षा धातुमूर्ती अनेक आढळतात. उभा राम द्विभुज व कोदंडधारी आहे समवेत सीता, लक्ष्मण व हनुमान आहेत. त्रिवेंद्रम येथे हस्तिदंतात कोरलेल्या राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता व हनुमान यांच्या अलीकडील काळातील सुंदर मूर्ती आहेत. राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांच्या उभ्या ब्राँझमूर्ती द. भारतात अनेक आहेत. उभ्या रामाची मूर्ती धनुर्धारी असते व ती ‘कोदंडराम’ म्हणून संबोधिली जाते.
पहा : बृहद्भारत राम
संदर्भ : 1. Banerji, D. K. The Life and Adventures of Rama, 1919.
2. Bhat, G. H. Diwanji,P.C. Jhala, G. C. Mankad, D. R. Shah, V. P. and Vaidya,
P. L. Valmiki-Ramayana, 7 Vols., Baroda, 1960-75,
3. Sarma, D. S. The Prince of Ayodhya, Madras, 1964.
4. Tripati, R. S. Rama the God-Man, 1922.
५. गाडगीळ, अमरेंद्र लक्ष्मण, श्रीरामकोश, खंड दुसरा, भाग दुसरा : १ व खंड दुसरा, भाग दुसरा : २, पुणे, १९८१.
जोशी, लक्ष्मणशास्त्री
“