राभा : पूर्व भारतातील एक प्रसिद्ध अनुसूचित जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने आसाम व पश्चिम बंगाल राज्यांत आढळते. प्रदेशपरत्वे त्यांच्या राहणीमानात काही किरकोळ भेद आढळतात तथापि सांस्कृतिक दृष्ट्या आसाम व बंगालमधील लोकांच्या चालीरीती आणि सर्वसाधारण जीवन सारखेच आहे. त्यांची लोकसंख्या १,४,०९६ (१९७१) होती. आसामात हे गारे पर्वतश्रेणीत व ब्रह्मपुत्रा नदीच्या मधल्या पट्टीत म्हणजे गोआलपाडा या जिल्ह्यात राहतात. पश्चिम बंगालमधील जलपैगुरी व कुचबिहार जिल्ह्यांत त्यांची वस्ती असून ते इतर राभांपेक्ष वन्य आहेत. कोच हा त्यांचा एक जो विभाग आहे, तो कुचबिहार मधल्या कोच लोकांच्या सानिध्याचेच निदर्शक आहे. पश्चिम बंगालमधील राभा पश्चिम बंगालमधल्या संथाल, मुंडा वगैरे जमातींपेक्षा अधिक वन्य आहेत परंतु आसाममधल्या राभांपेक्षा ते अधिक प्रमाणात हिंदू वळणाचे आहेत. ते मंगोलॉइड वंशाचे असून वाटोळा चेहरा, बसके नाक, वर आलेली गालांची हाडे, विरळ दाढी, तिरके डोळे, फिकट पिवळा वर्ण, राठ केस आणि कमरेच्या खालचा मोठा पृष्ठभाग ही शारीरिक लक्षणे त्यांत प्रकर्षाने दिसतात. राभांच्या (१) रंगदानिया, (२) पाची, (३) मैतोरिया, (४) कोच, (५) दिहारिया, (६) बैतालिया व (७) शोंगा या सात उपजाती आहेत. यांपैकी कोच, बैतालिया व शोंगा जमातींचा समावेश काही तज्ञ राभांत करीत नाहीत मात्र रंगदानिया वगैरे उर्वरित उपजाती राभांतच मोडतात. हे हिंदू धर्मीय असून दिहारियांमध्ये हिंदुसंस्कार मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांची भाषाही आसामीच आहे. मैतोरियांचे आचार गारोंच्या प्रमाणे आहेत परंतु त्यांचे समाजातले स्थान मात्र रंगदानियांप्रमाणे उच्च आहे.
त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे, काही लोक शेतमजुरही करतात. याशिवाय शिकार व मच्छीमारी हेही उद्योग ते करतात. रंगदानिया राभा आपली मातृभाषा विसरले असून, ते कामसपातली बोलीभाषा बोलतात. गारो लोकांप्रमाणे ते गोमांस खात नाहीत. त्यांचे नेहमीचे अन्न डाळ, भात व पातळ भाजी असते. मासे हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. पुरूष शिकार करून डुक्कर किंवा हरिण मारून आणतात.
रंगदानियांच्या कुळी (बराई) पुढीलप्रमाणे आहेत : (१) तेंगतुंग, (२) रंगदुंग, (३) पान, (४) पामुनुंग, (५) चुरचुंग, (६) हादू, (७) बागू, (८) बाकशोक, (९) चेबांगा व (१०) गुर. पाची व रंगदानिया यांच्यातल्या काही कुळींची नावे सारखीच आहेत. त्यावरून विशिष्ट स्थानिक लोकांच्याच त्या कुळी बनलेल्या असाव्यात असे वाटते. या बराई वा कुळी बहिर्विवाही आहेत. राभा प्रारंभी मातृसत्ताक होते, कालांतराने त्यांनी पितृसत्ताक कुटुंबपद्धती अंगीकारली. त्यांच्यात वंश स्त्रीपासूनच सुरू होतो. मुलांचा वंश मातेचाच मानला जातो परंतु वारसा मात्र पितृप्रधान आहे.
यांच्यात लग्नविधीला फार महत्त्व असून पुत्रप्राप्तीवाचून मुक्ती मिळत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. लग्न करताना मुलीचे देज वराला द्यावे लागते. त्याला ‘गावधन’ म्हणतात. देज देण्यासाठी वराकडे पैसे नसल्यास तो भावी सासऱ्याकडे काही दिवस काम करतो आणि मग विवाह करतो. घटस्फोट आणि पुनर्विवाह यांची पद्धत आहे. वरपक्ष वधूला तांदूळ, राईचे तेल व शेंदूर देतो. ते तेल तिच्या डोकीला लावतात. भांगात शेंदूर भरतात आणि मग सोयरिक पक्की करून लग्नाचा मुहुर्त ठरवतात. लग्न वराच्या घरी लागते. अधिवास नामक विधी वधूवरांच्या घरी आदल्या दिवशी करतात. लग्नाच्या वेळी एक कोंबडे बळी देतात आणि घरी गाळलेली दारू ऊर्फ जोंगा किंवा तांदळाची दारू ऊर्फ चोको लोकांना प्यायला देतात. मद्याचा वापर बहुतेक सर्व राभांमधील समारंभांतून आढळतो.
सुलभ प्रसूतीसाठी मा-बाई देवतेला कोंबडे, डुक्कर किंवा बोकड बळी देतात. प्रसूतीनंतर दाई वार केळीच्या पानात गुंडाळून ते पान तुंब्यात घालून तो तुंबा पुरते. पंधरा दिवसांनी डुकराचा बळी देऊन नामकरण करतात. मुलाचे नाव त्याची आई पसंत करते. मुलाची नाळ पडली की शुद्धीचा विधी करतात. जननाशौच तीन दिवस पाळतात.
प्रारंभी राभा हे जडप्राणवादी होते आणि भुतपिशाचादींची पूजा ते करीत. काली, कामाक्षा, शीतला, गंगादेवी, बडा ठाकूर, सत्यपीर इ. देवता व काही विशिष्ट भुतेखेते यांना ते भजतात. त्यांचे असे स्वतःचे काही विशिष्ट देव आहेत. ते असे : बाई-मा बाई, बाई खो किंवा खोकसीबाई, हसांगबाई (ग्रामदेवता), बेराहच्चुबीदूक (पाळीव पशुंची देवता), हाई मेरोंगबाई (गृहदेवता), बीरबाई इत्यादी.
राभा मृताला जाळतात परंतु अपघाती मृत्यु असल्यास त्याला पुरतात. प्रेत स्मशानात नेण्यापूर्वी चोको मद्याचा नैवेद्य पितरांना दाखवितात. पंचवीस वर्षांपूर्वी काळ्या आजाराने राभांच्या खेड्यांतली वस्ती उद्ध्वस्त होण्याच्या आधी, स्मशानयात्रा मोठ्या थाटामाटाने काढीत असत. प्रेताची कवटी त्याचा मुलगा चितेतून बाहेर काढी आणि मग ती पाठीवर घेऊन इतर मंडळीसह नृत्य करीत असे आणि वाद्ये वाजवीत आपल्या कुळीच्या ‘तूरा हकार’ ला येई. तूरा हकार ही एक गुहा असून तिच्यात त्या कुळीच्या मृतांच्या अस्थी, शस्त्रे वगैरे वस्तू ठेवलेल्या असतात. घरी आल्यानंतर मृत व्यक्ती पुरूष असेल तर पुरुषाचे वस्त्र व स्त्री असेल तर स्त्रीचे वस्त्र जमिनीवर पसरून ठेवतात व तिथे त्या मृताच्या आत्म्यासाठी अन्नपाणी ठेवतात. असे काही महिने केल्यावर मृताचे अखेरचे श्राद्ध करतात. त्यावेळी मोठा समारंभ करून ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळीच्या मेजवानी देतात. त्यावेळी बळी देऊन, विपुल मद्य व मांसाचा त्या मेजवानीसाठी उपयोग करतात. मृताला ‘तू फिरून श्रेष्ठ अशा राभांच्या कुळातच जन्म घे’ असे सांगतात.
संदर्भ : 1. Census of India, Bulletin of the Cultural Institute Tribal Welfare Department of the
Government of West Bengal, Vol. I, No. I, New Delhi, 1962.
2. Das, Amal Kumar, Scheduled Tribes of West Bengal, Calcutta, 1962.
3. Das, Amal Kumar Raha, Manis Kumar, The Rabhas of West Bengal, Calcutta, 1967.
भागवत, दुर्गा